Sunday, May 27, 2007

Drive to Bigsur

घरी जायच्या आधीचा शेवटचा वीकेंडम्हणून कुठे ना कुठेतरी जायचेच होते. थोड्या फार चर्चेनंतर बिग्-सर नावाच्या एका ठीकाणी जायचे ठरले. अभिजीत, संदीप, राहूल आणि मी. करायचे काय याचा काही खास प्लान नव्हता पण एक छान ड्राईव्ह आहे एवढेच माहीत होते. आणि तेही बे च्या बाजूने. या गोष्टी बहुधा अमेरीकेतच करायचे सुचते. कधी पुण्यात असताना ड्राईव्हला वगैरे जायच्या चैन्या सुचायच्या नाहीत. चैन्या म्हणता येणार नाही खरं. पण एकूणच असे कधी केल्याचे स्मरत नाही. रवीवार संध्याकाळी काम सुरू होते म्हणून शनीवार नक्की झाला. सकाळी ९ वाजता. तसे शनीवारी सकाळी ९ ला उठणे हे आधीच जरा धाडसी होते. पण प्लान करताना एकंदर सगळ्यांचा उत्साह असतोच जोरावर. ठरले मग सकाळी ९ वाजता निघायचे. सांताक्रूझ ला धडक मारून पुढे बिग्-सरला जायचे ठरले.


माझी सकाळ झाली ८ ला. नेहमी प्रमाणे उठेपर्यंत साडे आठ वाजलेच. ईथे आल्यापासून फक्त दोनदाच घरी असताना आत्तापर्यंत शनीवारी ईतक्या लवकर उठलो असेन. एक - एकदम पहिल्या दिवशी - जेव्हा अलेलो ईथे तेव्हा. आणि दुसरे आज. सगळे प्रातर्वीधी उरके पर्यंत ९ वाजून गेले. लॅपटॉप असल्याचा हा असा फायदा होतो. कुठेही असा. काहीही करा - always connected. कमोडवर किंवा जेवणाच्या टेबलवर, त्या लॅपटॉपला कशाचा काही फरक पडत नाही. आपण कशाला मग भेदभाव करा. एकूण सगळे सुरू असताना ५-६ जणाशी चॅट करून झाले. साडे नऊला अभिजीतचा फोन. फोन घेताच मी म्हणालो, "अरे कुठे आहात तुम्ही? मी ५ मिनीटमधे तयार होतोय". ५ मिनीटात तयार कोणी होत नाही हे जरी माहीत असले तरी ही अशी आता पद्धत झालीये बोलायची. जो पहिल्यांदा बोलेल त्याला advantage. उगाच वेळेचे महत्व असल्याचे बिरूद घेऊन मिरवता येते. असो अभिजीत कडून कळाले की संदीपचा काहीच पत्ता नाहीए. फोन पण उचलत नाहीए. झाले. ९ चा धाडसी "प्लान" आता साडे नऊ झाले तरी प्रत्यक्षात येईल असे काही दिसेना. पुढे साडे दहा पर्यंत प्रयत्न झाले, संदीपला संपर्क करायचे. आवरण्यात पण एक शिथीलता आली. ऊशीर झालेलाच आहे आणि आपल्यामुळे नाही झालेला ही कल्पनाच ईतकी सुखावणारी होती की ही शिथीलता आपोआपच आली.


मधेच संदीपला सोडून जायची आयडीआ आली. ईतक्यात संदीपचाच फोन. "अरे आज जाना नही है क्या? मै कबसे वेट कर रहा हू!?" बाकी पुढचे प्रेमळ संवाद काही लिहायची गरज नाही. शेवटी साडे बाराला "प्लान" प्रमाणे प्रवास सुरू झाला.


मेमोरीयल डे सोमवारी. (हा शब्द मला कोथरूड डेपो जवळच्या चहावाल्याची आठवण करून देतो. त्याने लिहीलेय - बाहेरीयल पदार्थ खाण्यास मनाई आहे! असो, आता कुठी काय आठवावे याला काय बंधन). तर मेमोरीयल डे. तो आहे सोमवारी. अजून कोणी मला समजेल असे उत्तर नाही दिलेले की काय असतो हा डे. पण त्यामुळे लॉंग वीकेंड मिळालाय. रस्त्यावर त्यामुळे गर्दी होती. जणू सगळेच त्या बिग्-सर कडे निघालेले. बसल्या बसल्या उगाच प्रयत्न केला, काहीतरी नॉस्टाल्जीक वगैरे वाटून घ्यायचा. दोन दिवसात परत जाणार मी म्हणून. पण काही केल्या जमेना. परत तेच. कधी काय वाटावे त्यावर काय बंधन?


शेवटी ड्राईव्ह साठी आलेलो त्याचीतरी मजा घ्यावी असे ठरवले. बाहेर खरच सुंदर दृश्य होते. बे च्या बाजूने रस्ता होता. अलीकडे उंच कडा. काही ठिकाणी वस्ती पण. आणि दुसरी कडे समुद्रबीच वाळू. मधेच मला माझी कवीता आठवली. पण बाहेरचे सगळे जरा जास्तीच छान होते. कविता वगैरे कधी विसरली कळालेच नाही. परत त्या पाण्यात त्या कड्यात त्या नागमोडी वळणात खिडकी उघडल्यावर कानापाशी येऊन ओरडणाऱ्या त्या वऱ्यात एकुणच त्या निसर्गात बुडून जावे वाटत होते. पोटभर श्वास घेण्यात काय मजा आहे हे या अशा वेळी कळते. किती श्वास घेऊ तितके कमीच. पोट भरतच नाही. प्रत्येक श्वासागणीक मन अधीकाधीक ताजं होत जातं. ताशी ६० च्या वेगाने जाताना मात्र हे वारे बाकी लोकाना त्रास देऊ लागले. नाईलाजाने खिडकी बंद करावी लागली आणि त्या आळणी ए.सी. ला शरण गेलो.


मधेच डाऊनटाऊनला थांबलो. थोडीशी पोटपूजा वगैरे उरकून पुढे बोर्डवॉकला गेलो. आपल्याकडची जत्रा असते तसे काहीतरी होते. पण बीच च्या बाजूला. ईकडे समुद्र आणि बाजूला जायंट व्हील. त्या मोठाल्या राईड्स. पाण्याचा आवाज आणि त्या राईडमधल्या लोकांचा आवाज एकमेकाला स्पर्धा करत होते. जत्रा तीच पण उगाचच यामुळे वेगळी वाटली. सध्या समर टाईम असल्याने काही फारशी मजा नाही बीचवर हे मत संदीपने एव्हाना दहावेळा सांगून झालेले. तशी खरच मजा वाटत नव्हती. सगळे जसे काही आपापले विश्व करून होते. कोणी दोघे डीस्क टाकून खेळत होते. कोणी आपल्या मुलाना घेऊन पाण्यात जात होता. कोणी वरती पुलावर उभा राहून सी लायन्स चा अवाज ऐकत होता. पुलाच्या म्हणजे व्हार्फच्या टोकाला पाण्यात गळ टाकून बसलेले. कोणी गाडीची सगळी दारे खिडक्या उघडून, तिथेच बाहेर खुर्ची टाकून सह कुटुंब बसलेले. पण सगळे एकमेकापासून "सुरक्षीत अंतर ठेवा" अशी पाटी लावल्याप्रमाणे अलीप्त. काहीतरी वेगळे वाटले मात्र. कळाले नाही काय ते. पण काहीतरी वेगळे होते. तसे कशाला कोण दुसऱ्याच्यात लुडबुड करतो. पण तरीही. जरा जास्तीच अलीप्त होते सगळे. किंवा मीच अलीप्त होतो. या सगळ्यात मिसळत नव्हतो. काही नक्की कळाले नाही.


आम्ही पुढच्या ठिकाणी जायला निघालो.


बीना पार्कींगचे पैसे देता आलेलो. परत गेल्यावर तिकीट मिळाले असेल या विचारात आलो. ईथे ती एक मजा नाही. म्हणजे, पोलीसाने पकडावे, मग विचारावे, "काय रे? लायसन्स आहे काय?" पर्कींगचा पंगा असला तरी काय? पोलीस म्हणला की त्याने लायसन्स न विचारवे म्हणजे शान के खिलाफ! मग जरा घासाघीस. जरा ओळख पाळख. ईथे तसे काही नाही. सरळ तिकीट लावून पोलिस गायब. पुढे तुमची जबाबदारी पैसे भरायची. घासाघीस राहूच दे पण बोलायची पण संधी नाही मिळत. पण सुदैवाने आम्हाला असे काही तिकीट वगैरे मिळाले नव्हते. कदाचीत कोणी पोलिसाने बघायच्या आधी आम्ही परत अलेलो. बरे झाले, उगाच बोलायची संधी नाही मिळाली म्हणून वाईट वाटायला नको!


गाडी परत सुरू. परत त्या बिग्-सर च्या ड्राईव्हवर. परत त्याच रस्त्यावर. बे च्या बाजुने. बीच बघत. परत कानात वारा. शेवटी एका ठिकाणी थांबलो कॉफी साठी. "One café mocha, one hot chocolate, one cappuccino and one red wine". बरोबर चिकन वगैरे होतेच. शेजारी समुद्र. हलकासा वारा. गप्पा रंगल्या. चेष्टा मस्करी सुरू झाली. वेळ झटक्यात उडाला. या अशा हवेत, पाण्याजवळ वगैरे मस्त भजी किंवा मिसळ पाव खाण्याची काय मजा होती ते आठवले. रंकाळ्यावर फिरताना हातात भेळ खाताना कधी वाटले पण नव्हते की आपण हे मीस् करू. ईथे ते तपरीवर उभा राहून पाणी पुरी किंवा भेळ खाण्याचे सुख नाही. सुखाच्या कल्पना जिथल्या तिथल्या वेगवेगळ्या.


बसल्या बसल्या समोर एक लहानशी टेकडी दिसत होती. टेकडी नाही म्हणता येणार कदाचीत. समुद्रात सरळ उभा आणि उंच असा दगड. तिथे जायची एकदम लहर आली. एकदम उंच. त्याच्या टोकावर. सगळे बाहेर पडलो. निम्म्यापर्यंत सगळेच होतो, पण पुढे बाकी कोणी आले नाही. संध्याकाळपण झालेली. दिवसभर गाडीला भिंगरी लावल्यागत फिरत होतो, म्हणून जरा शीण आला होता. पण काही केल्या त्या टोकावर जाऊन १ सेकद तरी का होईना, ऊभे रहायची ईच्छा जाईना. परत तेच आता कधी काय वाटावे यावर काय बंधन. बाकी कोण आले नाही, पण मी उगाच स्वतःचे समाधान करायला म्हणून गेलो पुढे.


झपा झप पावले ऊचलली. बघता बघता चढलो वरती. एकदम ऊंच. सुसाट वारे. एकदम बेभान होऊन वाहणारे. कसाबसा ऊभा राहीलो. समोरे अजस्र समुद्र. काय म्हणू त्याला? अथांग प्रचंड अजस्र काहीच सुचेना. सगळे शब्दच तोकडे वाटत होते. कोणा एका विराट दैवी शक्तीला शरण गेल्यासारखे थोडा वेळ आहे तसाच स्तब्ध झालो. तो मोठाच्या मोठा जलाशय आणि मी. ऊगाचच काहीतरी बोलतोय असे वाटले. (परत तेच कधी काय वाटवे!). मधेच खाली लक्ष गेले. मी अगदी टोकावर ऊभा होतो. एक पाऊल पुढे आणि खाली काहीच नाही. एकदम स्टीप का काय म्हणतात तसे. जोर जोरात लाटा धडका मारत होत्या खाली. चारीकडून त्यांचाच आवाज. एकच जल्लोष सुरू होता. ऊनाड नाचत होत्या. काही व्रात्य होत्या त्या ईथ खाली येऊन धडक मारत होत्या. जसे काही झाडावरून नारळ पाडायला हत्ती ढूशा मारतोय. अविरत. जसा काही तोच धर्म त्यांचा. मी ऊगाचच विजयी मुद्रेने बघीतले खाली. थोड्या वेळात परत नजर वर आली. आणि परत बुडून गेलो त्या निसर्गात. त्या वाऱ्यात. एकूणच सगळ्यात, फक्त त्या खाली धडक मारणाऱ्या लाटा सोडल्या तर बाकी सगळ्यात.


का कूणास ठाऊक, पण समुद्र, किंवा कुठलाही मोठा जलाशय किंवा जोराचा पाऊस आणि माझे काहीतरी नाते आहे. एक विलक्षण उत्साह देऊन जातात या गोष्टी. एकदम instant. सेल चार्ज व्हावा तसे. शवासन करताना एक सांगीतलेले कोणी, मन म्हणजे एक पोकळ नळी सारखे बनू द्या. जे विचार आत येतील त्याना येऊ द्या. जे जातील त्याना जाऊ द्या. कशावरही ताबा मिळवायचा प्रयत्न नको. कशातही गुंतू नका. हे कधी शवासन करताना जमले नाही. पण हे असे ईथे हे चटकन जमते. होऊनच जाते आपोआप. मन मुक्त झाल्यासारखे. समोरून येणारा तो सुसाट वारा जसा काही या नळीमधूनच आरपार होतो. झरझर बरेच विचार आले अगदी काहीपण निरर्थक किंवा कसेही पण मन कशातच गुंतले नाही. थोड्याच वेळात नळी पोकळ झाली. एकदम होलो. आणि मग ते पाणी आणि मी. त्या शक्तीला शरण गेलेला.


हे सगळे केवळ ५-१० मिनीट मधे घडले. पण बरेच काही घडून गेल्यासारखे भासले. मागे ऊभे असलेले माझे मित्र हाक मारत होते. मन नव्हते पण खरच जायची वेळ आलेली. मनातच विचारले मी त्या शक्तीला. काय देऊ मी तुला? कशी करू परतफेड? … पण देणार तरी काय? तिथून खाली उतरताना वाटत तर असे होते की मला सगळे तर ईथूनच मिळालेय. पुढे होईलच भेट परत. कुठेतरी. बघू हे उत्तर तेव्हा सपडते का.


जसा जसा खाली उतरलो, तस तसा मी परत माणसात येऊ लागलो. परत सगळे भरकटलेले विचार, कल्पना, परतीची फ्लाईट, पुण्यात जाऊन काय काय करायचे याची यादी, काम, प्लान्स, घर, मित्र, मैत्रीणी, लफडी, काम …. या अश्या बऱ्याच सगळ्याने मन चटकन व्यापून टाकले. अंधूकसा अजुनही मनात होता तो मगासचा अनुभव. काश कॅमेरा असे अनुभव पण टिपत असता!


काहीतरी देण्याचा तो विचार तोही होता मनात. पण आता खाली उतरलेलो. तशी विचाराचीपण पातळी खालावली. काहीच नाही तर ब्लॉग मधे जागा देऊ असे ठरवले.


राजा ऊदार झाला आणि

आता मी पामर आणि देऊ तरी काय शकणार!


आता घरी येऊन ४-५ तास झालेत. रात्रीचे (किंवा पहाटेचे) ३ वाजलेत. मी अजुनही त्याच दगडाच्या टोकावर ऊभा असल्याचा भास होतोय. मन तिथून बाहेर येतच नाहीए. ती उतारावरची पिवळी, केशरी लहान लहान फुले अजुनही डोळ्यासमोर येताहेत. त्या खाली धडक मारणाऱ्या लाटांची दया येऊ लागलीये. उगाचच खुन्नस देत होतो त्याना. काय सांगावे, कदाचीत मला पाडायचा हेतू नसेलच त्यांचा. मांजर नाही पायात घुटमळत? ढुशा मारत? कदाचीत त्या लाटा पण तसेच काही करत असाव्यात. त्याना परत एकदा जाऊन हे सांगावे असेही वाटतय. हा हा कधी काय वाटावे, काय नेम?


बाकी विचाराचा कचरा होताच मनात. शवासन करायचा प्रयत्न केला. कधी झोप लागली कळालेच नाही. पण रात्रभर मी त्या समुद्राच्या तिथेच होतो.

Post a Comment