Wednesday, December 12, 2007

पाऊस एकदम पाऊस होतो

संदिप खरेच्या या ओळी ऐकल्या ...

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही!!

आणि मग एकदम लिहायची खुमखूमी आली ... पण मूड येत नव्हता ... तरीही काहीतरी खरडले ...

कळत नाही बऱ्याचदा ...
पाऊस आला की तू आठवतेस
की तू आठवलीस की पाऊस येतो

पण गाडी पुढे गेलीच नाही ...! तिथेच राहीलं सगळं ... ऊसनं दुखणं आणल्यासारखं वाटलं काहीतरी!
मधे कोणी म्हणाले - पाऊस सुरू झाला! पण लपून छपून कोणालातरी शोधल्यासारखा तोही रात्रीच येऊन जायचा ... जाताना आपण अलो असल्याच्या खुणा सोडून जायचा!

शेवटी काल आणि आज मस्त पाऊस झाला ... केल्वीन होब्स मधे होब्स अंगावर ऊड्या मारून येतो ... तसा! थंडीको मारो गोली म्हणत चक्क पावसात भिजत चालत ऑफिसमधे आलो.

परत काहीतरी खरडायचा मूडा आला ... आहे मुड तोवर लिहीतोय ... बाकी चुकभुल द्यावी घ्यावी :-)


रानात छंद मकरंद गातो
मनात मंद हळुवार राहतो
बघताच मागे वळूनी कधीही
असा बिलंदर कुठून येतो

कधी व्यस्त गाठतो
ओळखीचा एक गंध ठेवतो
मन खिन्न ऊदास असो
कसेही
येऊन तसाही हात पकडतो

वाड्याच्या दगडावर झिरपतो
ओसाड टेकडीवरही घसरतो
मी परदेशी जाईन कुठेही
माझ्यासाठी तिथेही पोहोचतो

ऊनाड नाचतो ...
बेभान गातो ...
अल्लड हसतो ...
साक्षी राहतो ...
हलकेच स्पर्शतो ...
तुडूंब भिजतो ...
काही समजावतो ...
बरेच सुनवतो ...

पाण्यासाठी स्वरूप होतो
न्हासाठी ओलावा बनतो
मोर येईल जेव्हा कधीही

पाऊस एकदम पाऊस होतो!