Friday, February 27, 2009

मंदाकिनी

पाऊस आला पाहिला,
ना पाहिला मी सोहळा,
मृद्गंध सारा लोटला,
तोही असे ना वेगळा

शब्दास आली ही कळा,
दूरस्थ भासे भावना,
अल्हाद ना दे मानसी,
जैशी सुखाची शर्तशी

संगीत माया धुंदशी,
बेधुंद काया गुंगशी,
ना गंध वाटे त्यातही,
ना मग्न झाले आजही

झाले कसे वेडेपिसे,
हे अंतरीचे गूढसे,
कोणी असे का दूरचे,
लावी मनाला ओढसे
खरं सांगतो, हा वर जो काही प्रकार तयार झालाय, तो लिहिताना नाकी नऊ आले. बऱ्याच ब्लॉगवर मध्यंतरी कविता कविता पाहिल्या. मधे कुठेतरी वृत्तं वगैरेपण वाचली. मनोगत.कॉम ला धन्यवाद. तिथुनच हा किडा घुसला मनात. (मधेच सगळी वृत्तं, यमक वगैरेची बंधनं झुगाडून प्रसून जोशी सारखा धडा लिहायचा विचार आलेला पण त्याच्यासारखे आपल्याकडे शब्दभांडारही नाही आणि परत त्याला संगित लावून पावन करायला रेहमानही नाही). असो. मंदाकिनी मधे लिहायचा केलेला पहिला प्रयत्न आहे (म्हणून नाव पण तेच आहे. काही दुसरं सुचवलं कोणी तरी चालेल). समस्त कवीवर्गास अर्पण. आणि खरच, हे जो लोक वृत्तात वगैरे बसवून कविता लिहितात त्याना मनापासून सलाम. लयी महान आहात राव आपण! मलाही मजा आली आणि तेवढीच तारांबळही उडाली. :)
Post a Comment