Friday, August 28, 2009

मराठी विरुद्ध मराठी

सकाळी सकाळी रस्त्यावर एक पोस्टर पाहिले ... जमलं तर त्याचा फोटोपण लावेन. त्यावर लिहिले होते - "अजुन लाज वाटते मराठीची?" का असेच काहीतरी. चित्रामधे ईंग्रजीमधले साइनबोर्ड्स होते. बऱ्याच दिवसापासून मनामधे आहे या विषयी लिहायचं. आजकाल एकदम नाजुकपण झालाय हा मराठीकरणाचा विषय! पण कोणी केले नाजुक त्याला? गरज होती का? बरेच मोठे मोठे लोक आता यावर वक्तव्य करतात. याबद्दल काही कळत नसताना याविषयी अधिकारवाणीने बोलायला जेवढी लोक आहेत तेवढीच याबद्दल समजून उमगून या वादापासून लांब राहणारीही लोक आहेत. दोघेही तितकेच घातकी.

खरं सांगायचं तर मलाही कळत नाही बऱ्याचदा की कसं हाताळायचं या मराठीकरणाच्या वादाला. कधी निर्णयाप्रत पोहोचूच शकलो नाही मी. मला मराठी लिहायला आवडते. मला मराठी बोलायलाही आवडते. म्हणून मी उटसूट सगळ्यांच्याबरोबर मराठी बोलायचच याचा आग्रह धरत नाही पण जिथे शक्य तिथे मात्र भरपूर वापरतो. मला कोल्हापुरी मराठी आणि तिथले खास असे शब्द आवडतात. ते कुठेही आणि कुठल्याही भाषेमधे चपखल बसतात आणि मी बसवतो. समोरचापण तितक्याच खिलाडू वृत्तीने ते ऐकूनही घेतो. प्रसंगी वापरतोही. पण हे सगळे केवळ मराठी आहे म्हणून नाकं मुरडणारे मराठी लोकही माझ्याकडे आहेत. त्याना भाषेमधे एखादा स्पॅनीश शब्द चालेल. एखादा हिंदीही कदाचीत चालेल. पण मराठी दिसला की मात्र नाकं मुरडतील. हे असं का? असं कसं झालं असावं? एकीकडे मी मराठी वश्विक पातळीवर नेणाऱ्या विश्व मराठी सम्मेलनामधे मदत करतो. दुसरीकडे "आतातरी मराठीचा आग्रह सोडा" म्हणणाऱ्या माझ्याच मराठी लोकांबरोबर वाद घालत फिरतो. एखादी भाषा जन्मजात मोठी नसतेच. कोणतीही नसेल. पण ती मोठी नाही म्हणुन कोणी तिचा हात सोडून दुसरीकडे जात नाही. तिला ऊच्च पातळीवर पोहोचवावे लागते.

आता शेजाऱ्याच्या घरतलं काहीतरी चांगलं वाटलं म्हणून आपण शेजाऱ्याकडंच जाऊन थोडीच राहतो? जे काही चांगलं आहे ते आपल्या घरातही करायचा प्रयत्न करतोच ना! शेजारच्या काकू जेवणामधे काहीतरी चांगलं बनवत असतील तर मी एक-दोनदा त्यांच्याकडे जावून जेवेनही. पण तिकडेच मुक्काम करणार नाही! माझ्या घरच्या जेवणावर अचानक आळणीचा शिक्का मारणार नाही. कदाचीत माझ्या घरीही तसच काहीतरी बनवायचा प्रयत्न करेन. नाही का? एखाद्या वेळेस ईदची बिर्याणी खायला दरवेळी करीमकडेच जाइन. त्यासमोर माझ्या पुलावचं कौतुक करणार नाही. पण तसेच मझ्या घरचे खाताना मला कमीपणाचेही वाटणार नाही. तेच भाषेबद्दल का नाही? माझ्याकडचं चांगलं तुम्ही घ्या, मला तुमच्याकडचं चांगलं घेऊ द्या. यात वावगं काय आहे? हातचं सोडून पळत्याच्या मागं लगल्यानं मी माझं असं जे होतं तेच सोडतोय, हे बघायला नको का? दुसऱ्याचच चांगभलं करता करता मीच अनाथ होत चाललोय. मला सगळं दुसऱ्यांचच आवडतं. आवडावंही जर चांगलं असेल तर. पण मग मी माझं का विसरावं? त्याची का लाज वाटावी? तेही तसच सुंदर करायला हातभार का नाही लावावा? पुढे पुढे याची ईतकी सवय होते की जे कोणी हातभार लावत असतील, त्यानाही तुच्छनजरेने बघतो. म्हणतो लेकहो आता तरी हे सोडा आणि बाहेर पडा जरा बाहेरचं जग बघा. ओपन माईंड ठेवा.

हा ओपन माईंड पाहिजे म्हणून शंख करताना मी बऱ्याच लोकाना ऐकलय. स्वतःच्या घरातून बाहेर या, बघा बाहेर काय सुरू आहे, ते स्विकारायचा प्रयत्न करा. हे सगळंही ऐकलय. मान्यही आहे मला. पण आजकाल एवढी वाक्यच मागे राहीलीयेत मागे. त्यामागचा हेतू अदृश्य झालाय. हे ओपन माईंड करताना, का म्हणून मी मराठीकडे क्लोज्ड माईंडने बघावं. केवळ मराठी आहे म्हणून गाणी वाईट. चित्रपट टाकाऊ. ईंग्रजी काहीही असेल तर आम्ही काही पूर्वग्रह न ठेवता बघून येणार. पण ही संधी मराठीला का नाही? काही लोकाना हा आकस मराठी बद्दल असतो. काहीना कुठल्याही ईंग्रजेतर भाषेबद्दल असतो. ओपन माईंडच असेल तर मग मराठीकडेच का नाही बघायचं ओपन माईंडनं? तिथं का लाज? केवळ आपलं ते कसं काय चांगलं असू शकेल या विचारामुळं?

भयंकर राग येतो अशावेळी. पण या सगळ्याला दुसरी बाजूपण आहे. माझे असेही लोक आहेत की जे मराठीचा अनावश्यक आणि अती आग्रह धरतात. वेळी संस्कृत शब्द वापरतील पण ईंग्रजी किंवा हिंदी नाही वापरणार. यांचे ओपन माईंड कदाचीत संस्कृतकडे. संस्कृतची मालमत्ता आपल्याच आज्ज्याची म्हणून ती मराठीच्या नावावर खपावायची आणि वर बाकीच्याना आग्रह धरून बसायचा की बाबानो तुम्हीही हेच केले पाहिजे. प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीमधे मराठी पाहिजेच म्हणून मागं लागायचं! हा अत्याचार का? जसे बीन बुडाचा विरोध नको तसाच अतिरेकी आग्रहही नको! समोरच्याला मराठी येते नसेल तर मुद्दामहून त्याच्याशी मराठी बोलणारे लोक काही कमी आहेत? का समोरच्याच्या मनात तिटकारा निर्माण नाही होणार? आणि तो आपणच निर्माण करायचा? समोरच्यालाच काय ईतर मराठी लोकानाही लाज वाटेल याची. म्हणजे आपण मदत करतोय मराठीला की आणि काही? पुढे याचं बिल भाषेवर कोणी फाडलं तर आणि हळू हळू नकळत त्या भाषेपासूनच दुरावलं तर कोणाला दोषी पकडावं? ज्यानी भाषेचं नाव खराब केलं त्याना की जे भाषेपासून दुरावले त्याना? आपलेच दात आणि आपलेच ओठ. लहानपणापासून मराठीपेक्षा ईंग्रजी शब्द वापरले की कौतुक कराणारे पालक जबाबदार की त्या पालकाना ईंग्रजीकडे ड्राईव करणारी आपणच केलेली कटथ्रोट स्पर्धा?

एकीकडे मला जसा मराठीला सावत्र वागणूक देणाऱ्यांचा राग येतो तसाच मी या अशा मराठीचे नाव बिघडवणाऱ्यांसमोरही हतबल होतो. मराठीच काय तर कुठल्याही भाषेमधे अशा प्रवृत्ती नसाव्यात. हे ३ गट आहेत - एक अतिरेकी लोकांचा, दुसरा विरोधकांचा आणि तिसरा राहिलेला समुहाचा ज्याला फक्त कोणाच्यातरी मागे जायचे माहित आहे. हा तिसरा गट बहुमताकडे पळतो. वरकरणी चलती असलेल्या किंवा सेक्सी गोष्टींच्या मागे जातो. या विरोधकाना काही बोलावे तर वाटते की कोणी मला अतिरेकी समजू नये. आणि या अतिरेकी लोकाना बोलावे तर वाटते कोणी मला विरोधकांमधे मोडू नये. आणि असे करत मीही समुहाचा एक भाग बनतो. आणि जिकडे ओघोळ जाईल तिकडे जातो. हाताशपणे. सगळे समजून ऊमगून, न समजलेल्यांच्या मागे. लोक असा बीन बुडाचा विरोध करायला लागले म्हणून या अशा अतिरेकी लोकांची गरज तयार झाली की असे अतिरेकी होतेच म्हणून विरोधक तयार झाले? कोंबडी आणि अंड्याचा वाद आहे हा. विरोधक असोत किंवा अतिरेकी, दोघेही टोकाच्या भुमिकेमधे! ही कट्टरता आता तर आणखीच तीव्र होत चाललीये. पण या सगळ्यामधे भाषा होरपळून निघतीये.

हे विरोधकही माझेच, हे अतिरेकीही माझेच. माझ्याच भाषेवर हल्ला करताहेत. मलाच सहन करायचेय. हा प्रश्न तसा नविन नाही. माहित होताच. पण मला अजुनही उत्तर मिळत नाहीए. काय प्रतिक्रिया द्यायची ते कळत नाहीए. मी कशी मदत करायची ते कळत नाहीए. ईच्छा आहे पण मार्ग दिसत नाहीए. दरवेळी असे रस्त्यावरचे काहीतरी पोस्टर किंवा टिवीवर एखादी बातमी बघून अशी अस्वस्थता जागी होते. पण ...