Tuesday, September 08, 2009

We moved on and we met us

(ट्युलीपच्या वीकेंडच्या पोस्टमधले ’तो’ आणि ’ती’ भलतेच आवडले. तसा त्या पोस्टशी याचा काहीही संबंध नाही. पण ते पोस्ट वाचताना सुचलं हे सगळं.
अदितीचेही आणि नॅनीचेही आभार - मझ्या फंड्यांवर वरताण फंडे मारून मदत केल्याबद्दल!)तो त्याच्या मनाची विषण्णता त्याच्या नाटकातून मांडे. तिला त्याची नाटकं आणि त्यामागचं प्रेम कधीही फारसं आवडलं नाही. समोर बोलता न येणाऱ्या स्वतःच्या चौकटीमधल्या रास्त गोष्टी तो नाटकामधून मोकळं करायचा. आणि त्याला मोकळं व्हायला नाटक लागतं हा त्याला आधारही होता आणि त्याला लसणारं सत्यही होतं. आपलं नातं आपल्याबरोबर खुलावं असं त्याला वाटायचं. आणि तिच्या स्वप्नात जसं नातं खुललं होतं तसं आपलं नातं बनवावं हे तिचं स्वप्न होतं. ती बऱ्याचदा त्याला ओरडायची की कसं त्याला रोमॅंटीक होता येत नाही. तिला ख्रिश्चन लग्नामधे घालतात तसल्या पांढरा शुभ्र पेहरावाचं भारी आकर्षण. पण तिचे ते बोलणे आठवणीत साठवताना तो तिला प्रतिसाद द्यायला नेहमी विसरायचा! तो तिच्यासाठी तितकाच गुढ होता जितकी ती त्याच्यासाठी अनाकलनीय!

एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला की जीव नकोसा करून टाकायची. त्याला ती तशीही आवडायची. तिलाही तिचे सर्वकाही ऐकणारा तो आवडायचा. आणि मग यांची गाडी घसरायची. तिचा हट्ट संपायचं नाव न घेईना झाला की तोही अस्वस्थ व्हायचा. तो कशा कशा काय काय गोष्टी कधीच करत नाही याची यादी तिच्याकडे तयार असायची. त्या गोष्टींशिवाय प्रेमात मजाच नाही अशा तिच्या समजाविषयी त्याचा आकस. पण ती चर्चा कधी होऊ न शकलेली. त्याने काही बोलला की तिच्या धर्मग्रंथाला धक्का लागल्यासारखं बाघायची! तिच्या मनातल्या गोष्टी फार काही मोठ्याही नसायच्या. पण त्याशिवाय काही असूच शकत नाही यावर त्याच्यामधल्या ईंजीनिअरचं लॉजिकल थिंकींग बंड करायचं. "एवढ्या लहान लहान साध्या गोष्टींसाठी किती माथेफोड करायला लावतोस? सागळी मजाच निघून जाते" म्हणत तिही हतबल व्हायची. "तुझ्यासाठी लहान असली तरी माझ्यासाठी मोठी आहे. आणि तुझ्या या अशाच वागण्यानं, माहितीये, मी फ्रीली विचारच करू शकत नाही! किती छान छान गोष्टी असतात. पण मला आपलं तुला कसं वाटेल आणि काय वाटेल मधेच मारामारी होते!" तिचे हे पद सुरू झालं की त्याला धडकी भरायची. "अगदी ट्रिवीअल गोष्टी आहेत यार! करू की! मी कधी कुठे काय म्हणालो!? आपण बोललोय ना यार यावर!" हे असले सगळं तो एका क्षणात मनामधे म्हणायचा. तसंही बरचसं मनातल्या मनातच म्हणायचा तो. आणि मग पुढच्या एपीसोडला तयार व्हायचा.

तो जसा आहे तसा आवडण्यासारखं बरचसं त्याच्यामधे होतं. पण त्याला आहे तसा स्विकारणं तितकंच अवघड. हे त्याचं मत स्वतःबद्दलच. हे दरवेळी वाद करताना सांगण्याचा त्याचा आग्रह तिला आजिबात आवडायचा नाही. तिचं फायरींग सुरू झालं की त्याला उगाचच राहून राहून बरं वाटायचं की त्याचे विचार किती लॉजिकल आहेत! तिला मात्र फायरींगनंतर फार वाईट वाटायचं. आपल्याला क्षुल्लक गोष्टीबद्दलपण ओरडावं लागतं.

"कसं होणार आपलं भविष्य" यावर ती मधेच अस्वस्थ होई.
तो म्हणे की, "वेडे आपण ईतकी वर्ष एकत्र होतोच ना. आता काय वेगळं आहे त्याहून? फक्त एक मॅरीडचा टॅग लागेल, एवढच" त्याच्या मनामधेपण तोच प्रश्न घर करून जरी असला, तरी तिला समजावताना तो भलताच कॉंफीडंट व्हायचा.
"लहान लहान गोष्टींबद्दल ईतके काही बोलावं लागतं मला. तुला नको असताना मझ्यासाठी फोर्स करतेय मी असं वाटतं. या गोष्टी नॅचरली आल्या पाहिजेत अरे! ईतके सांगावं लागलं तर मग काय मजा राहीली?" ती लगेच तिची अस्वस्थता बोलून दाखवायची.

त्याला खुप आवडे जेव्हा ती असले काही मनचे बोले तेव्हा. ती म्हणायची, "I am sorry if I am hurting you". तो म्हणायचा, "If that's what it takes to make you speak your mind, then that's what it is!" कधी कधी हे अति व्हायचं. ती भलतंच पुश करायला लागली की मग त्याचापण तोल जाऊ लागायचा. तो ऊखडायचा, "कंटाळा आलाय मला याचा! किती वेळा म्हणू की हे करेन आणि ते करेन! आता मी आहे तो असाच आहे बघ. तुला माहिती आहे. नाही झेपत तुझ्या रोमान्सच्या गोष्टी मला तर नाही झेपत. विचार कर यार तूच. मला नाही बरं वाटत सारखं तुला तेच तेच आश्वासन द्यायला. जर नसतील मझ्याकडे काही गोष्टी, किंवा तुला दिसत असतील शंभर सुधारणा तर कदाचीत आपण नसूच योग्य एकमेकांसाठी! कशाला एकमेकाला ढकला यामधे!?"

पुढंचं सगळं तो मनामधेच म्हणे. तिच्याकडे ईतक्या रोमान्सच्या कल्पना असतील तर स्वतः का करत नाही काही, असे वाटे त्याला! आता कॅंडल लाईट डिनर त्यानेच कशाला प्लान करायला पाहिजे, तीही करू शकतेच ना असं त्याचं लॉजिकल मन म्हणायचं. जसं तिला चांगलं वाटतं तसं त्यालाही चांगलं वाटेलच ना! तो विचार करे की सगळं जगानच का करावं तिच्यासाठी? तिनेही एक पाउल पुढे यावं हे कसं नाही समजत तिला? त्याला स्ट्रेच मारायचा आणि काय आवश्यक असतं म्हणून काय सांगते? तो काही बोलत नाही म्हणून पुश करते ईतकी असे वाटू लागायचं. तो तिच्यासाठी हक्काचा आहे हे मात्र अशावेळी त्याच्या लॉजीकल मनात नाही यायचं. हे असं सगळं द्वंद्व मनात झाल्यावर, तोच मग शब्द फिरवी. तिच्यामधे काहीतरी कमी आहे किंवा ती चुकतीये असे बोलायला त्याला कायमच जड जायचं. मग तो बऱ्याचदा सोडून द्यायचा. पण त्याला भिती असायची की हे सगळं मनामधेच दबून राहीलं आणि कधी एकदम अचानक बाहेर आलं तरं? सगळंच उध्वस्त होईल. त्याला स्वतःची भिती जास्ती वाटायची. रागारागात सगळं सजवलेलं नातंच तो तोडून टाकेल असंही वाटायचं. तिच्या दृष्टीनं त्याल तिच्या मनातलं कळत नाही हा अचंभा होता, तर त्याच्या मनातली भिती तिला का कळत नाही याचा त्याला राग आणि तितकच आश्चर्यही.

तो फार कमी वेळा अशा आक्रमक पवित्र्यात जाई. पण जेव्हा जाई तेव्हा तिला दुखावून जाई. ती मग त्याला सांभाळून घेई. म्हणे, "असं नाही यार करायचं. मी जरा आहे डिमांडींग, पण म्हणून तू घ्यायचं ना समजून. तू व्हायचं ना मोठं! I am your child. असं कोणी करतं का आपल्या मुलाला की बाबा बघ मीच तुझ्यासाठी योग्य नाही!" ती असलं काही बोलायला लागली की ओठ एकदम बदकासारखे बाहेर यायचे. त्याच्याकडं बघता बघता तो विषयच विसरायचा. त्याला वाटायचं, "काय उगाच ओरडलो! ती असेल एकवेळ थीरथीरी! मी तरी सांभाळून घ्यायचं ना!" तो काहीच बोलायचा नाही आणि नुसता हलकेच हसायचा. मग ती म्हणायची, "मी फार लहान आहे. कदाचीत मला नाही येत तुझ्यासारखं विचार करायला. स्वार्थी पण आहे. सगळं माझ्यासाठी मागते. सारखं तुलाच म्हणते की तू हे कर आणि ते कर!" एवढं सगळं बोलल्यावर त्यालाही बरं न वाटून तोही बोलून जायचा,
"तसं काही नाहीए रे. मी म्हणालो ना, मला खरच आवडतं तू असं मनातलं बोलल्यावर. असं राहूच नये मनामधे काही.टाकवं बोलून."
"No! Then I hurt you."
"नाही रे. सांगीतलं ना. मला आवडतं तू मन मोकळं केलस तर. हे बघ, माझ्या मनातपण तुझ्यासारखेच विचार येतात. पण everyone has to take own bets! I have taken mine. You should take yours. आपल्याला बोलायला वेळ आहे म्हणून प्रत्येक लहान सहान गोष्टीबद्दल एकमेकाला कोर्टामधे नाही उभं करायचं ना! काही गोष्टी आत्ता होत नाहीएत. तर नंतर होतील ना. नाही वाटेल खात्री आत्ता, पण तीच तर bet घ्यायचीये. मोठ्ठा डिसीजन घेतोय आपण. आपण राहतो आहोतच एकत्र ईतके वर्ष तसे पुढेही राहू. त्यात काहीच बदलणार नाहीए. बाकीच्या लहान सहान गोष्टी हॅंडल करू आपण रे. आपण एकत्र असणं महत्वाचं आहे. नाही का?"

हे बोलताना त्याने दोनवेळा तिच्या अपेक्षाना परत लहान सहान म्हणल्याचं ती नोटिस करायची पण एकुणच रावरंग पाहता विषयाला बगल देऊन सगळाच नूर बदलायची. त्याला हे ही फार आवडायचं. पण हे जसं शेवटी त्याने मनातलं बोलायचं मनामधे ठेवलेलं - तसं ईथे तिचंही काही आतल्या आतच रहायचं. एकमेकाना खुश कसं करायचं यामधे जरी मार खात असले तरी दोघाना एकमेकाना कसं दुःख नाही द्यायचं हे पक्कं माहित होतं. सुखाबद्दल भरपूर झटून झालेलं त्यांचं. कदाचीत आपापल्या गतायुष्यामधे. कुठेतरी नकळत दोघेही त्याच आयुष्याची मोजपट्टी वापरायचे. त्याच्या गतायुष्यामधे कदाचीत तो जसा होता तसा स्विकारणारं कोणीतरी होतं. तिला समजून घेणारं कोणीतरी तिच्याकडंही होतं. ती जेव्हा त्याच्यामधे सुधारणा सांगे, किंवा तो जेव्हा तिच्या छोट्या मोठ्या रोमान्सच्या कल्पनाना प्रतिसाद देत नसे, तेव्हा पुर्णपणे नकळत दोघानाही आपल्या भूतकाळामधल्या तुटलेल्या झोपाळ्यावरचं वारं झोंबायचं. पण नंतर ऊब मिळवायला दोघेही आपापल्या हक्काच्या ठिकाणीच जायचे. एकमेकाजवळ.
--------------------------------------

बऱ्याच वर्षानं भेटलेल्या मित्रासमोर तो आपली कहाणी सांगत होता. ही कहाणी जिव्हाळ्याची. त्याचा हुरूप बघण्यासारखा असे. फार कमी वेळा तो या कहाणीबद्दल बोले. कुठेतरी मागे सोडून आलेल्या कहाणीबद्दल.

"हे सगळं हे असं होतं बघा. कोणासोबतही जितका वेळ नाही काढला ईतका सहवास आम्हा दोघाना एकमेकांचा होता. जेव्हा निर्णयाची वेळ आली तेव्हा देवानं थोडा वेळही देऊ केला आम्हाला. पण आम्ही विचार करत करत त्याचा दुरुपयोग केला. शेवटी एकमेकाना ईतके अनकंफर्टेबल केले की ...
आणि मग ही आली"

ती हसली. त्याला मधेच थांबवून म्हणाली, "हं. माणसाचं मन क्रुर आहे. एखाद्या गोष्टीबद्दल कमालीची आपुलकी की किंवा प्रेम वाटण्यासाठी ती गोष्ट गमवावी लागते! आणि अशा गमावलेल्या गोष्टीना कळत नकळत कुरवाळत, हे मन आजच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतं."

त्याचा बोलायचा जोश अजुन कायम होता. "पुढचा डाव खेळताना कळात जातं की काय काय करता आले असते पण तेव्हा ऊशिर झालेला असतो. अशा हरलेल्या डावांच्या ओझ्याखाली आजचा डाव खलास होतो. काही कालावधीनंतर ईगो तयार होतात. टॉलरन्स लेवल कमी होतात. जेवढी मुभा एखाद्या अनभीज्ञ व्यक्तीला सहज देतो, तेवढीही एकमेकाला देताना ऊपकार केल्यासारखं वाटतं. एखाद्या नव्या नत्यामधे गुंतण्यासाठी मन सैरभैर होतं. नाहीच तर जुन्या नात्याचं अजीर्ण झालेलं वस्त्र तरी दूर करायची घाई होते. ते वस्त्र शिवून ठिक करण्यापेक्षा नागवं फिरणं जास्ती बरं वाटतं."

"त्यानंतर कदाचीत नव्या नात्याची सुरूवात जेव्हा होते, जेव्हा केव्हाही, तेव्हा सावध होते. ईच्छा अपेक्षांवरचे मुखवटे ऊडून गेलेले असतात. एकमेकाना समजून घेण्याच्या उपर आणि कशातच सुख राहत नाही. एकमेकांसाठी केलेल्या गोष्टीमधे तडजोड किंवा कॉंप्रमाईज ऊरत नाहीत, त्या उत्स्फुर्त वाटतात."

"एक क्षण वाटतं, किंवा वाटलं तरी पाहिजे, की अशीच सुरूवात मी मागच्या नात्याची केली असती तर? मला समज ऊशिरा आली यावर त्या नत्याचा बळी का चढवावा? नातं गमावल्याशिवाय समज नाही! आणि समज नसेल तर ते नातं नाही. कसं होतं ना की नात्याच्या गुंत्यामधे कधीतरी एक्सपायरी डेट येतेच. तारीख रीन्यू करावी लागते. नाहीतर आहे ते बिघडून जातं."

"आम्ही मग आमचं नातं सोडलं. खुप रडलो." तिनं त्याचा हात पकडला, पुढे बोलली, "आणि मग आठवड्याने त्याने एक ईमेल केलं. म्हणाला की मला आवडणार नाही पण त्यालाही असह्य झालं म्हणून त्यानं त्याच्या मनातलं सगळं परत त्याच्या नाटकातल्या नायकासाठी लिहिलं! त्याचा प्रयोग आहे. आणि येशील का विचारलं. मी काही ऊत्तर दिलं काही. त्याला अपेक्षीतच असावं कदाचीत. त्या दिवशी मग मुद्दामहून चुकून भेटलो. मी माझी ओळख करून दिली." बोलता बोलता तिचीही कळी खुलली. "जसं काही प्रथमच भेटतोय. तोही हसला आणि त्याने त्याचीही ओळख करून दिली. म्हणाला अवांतर वेळेत नाटकं बनवतो. बघायला बोलावला. मी म्हणाले, तू मन लावून नाटक बनवला असणार पण माझ्या निरसपणाला बघून ऊदास होशील. मला बोलायला आवडतं तू नाटक संपवून ये. मग आपण तुझ्या नाटकाबद्दल बोलत रात्र काढू. मी वाट बघेन. नाटक संपलं. येताना त्याने प्रथमच न विसरता बुके आणला. सोबत कॅंडल्सही आणल्या. शाळेत पहिला नंबर आलेला सांगायला जसं पळत यावं ना, तसा पळत आला. म्हणाला फक्कड झालं नाटक. मी हातामधल्या फुलांकडे बघत होते. नकळत ते बघायला एक अश्रूही डोकावला. त्याच्यामधला परत तोच खट्याळ भाव दिसला. तो म्हणाला, तुम्हाला आजच भेटलो. पण राहवलं नाही म्हणून फुलं वगैरे आणली. अगदी तुमच्यासाठीच आहेत असं वाटलं. एवढच. तुम्हाला आवडलं नसेल तर खरच राहू देत. माफ करा मला."

पुढे सांगायला तो सरसावला. "मी जेवण मांडेपर्यंत हिने गाणी लावली. म्हणाली माझ्याकडं बघून मला ईंग्लीश आवडत नाहीत असं वाटतं. म्हणून सुरूवात हिंदीनं करेल - दिल ही दिलमे हमको मारे, दिल दुखाना आपका सुरू झालं. चक्क तिने आज क्यू लगे दुनियाकी पेहली सुबहा फिरसे होगी पर्यंत तिनं तेच सुरू ठेवलं. तिला एव्हान माझ्या बॅगमधे एक नवी सीडी दिसली. माझ्याकडच्या सीडींवर बहुधा तिचंच राज्य असायचं म्हणून नवी सीडी तिला लगेच ओळखली. त्यावरच्या नावांवरून सरसर नजर सरकवत होती ती. Bryan Adams, Savage Garden, As long as you love me, Right here waiting ... वगैरे बरीच ओळखीची नावं दिसली. दिलही दिलमे ला मिळालेला वेळ तसाही माझ्यासाठी बराच होता. तिकडे माझ्या कॅंडल्स सेट झालेल्या, आणि ईकडे पहिले गाणं सुरू झालं - Nothing gonna change my love for you. एक नव्यानं ओळख झाली आमची. We moved on and we met us."