Tuesday, March 23, 2010

Shift of Origin

ईश्कीया बघून सकाळी ११ला कोथरूडच्या सिटी प्राईडमधून बाहेर पडलो. पार्कींगचे ५-१० रुपये वाचावे म्हणुन गाडी थिएटरच्या शेजारच्या बिग बझारच्या पार्कींगमधे लावलेली. थिएटर आणि बिग बझारच्या मधला रस्ता दुसऱ्या बाजुला बंद. म्हणुन वर्दळ कमीच. पार्किंगकडे जाणारेच कोणी असेल तर तेवढेच. बरोबरच्या लोकाना टाटा बाय बाय करत करत त्याच रस्त्यावरून मी गाडीपर्यंत आलो. पुढचे कार्यक्रम ठरवण्यासाठी फोनाफोनी सुरू झाली. येरझाऱ्या घालायला खुल्या पार्किंगपेक्षा सुंदर आणि कुठली जागा? त्यातही सकाळची वेळ म्हणुन रस्ताही अगदीच मोकळा मोकळा आणि लख्ख! गाड्या काढणारे आणि लावणारे सोडले तर आणखी कोणी नाही. थिएटर मधून बाहेर पडून पार्कींगपर्यंत आलो. येताना त्या रस्त्यावर नजरेत येतील असे चाळे करणारी टोळी दिसलेली. साधारण अकरावी-बारावीतली मुलं असावीत. एका स्कूटीसारख्या गाडीवर बसलेली मुलगी, समोर तिच्या दोन मैत्रीणी, आणि तिला जवळ जवळ मिठी मारून बाजुला ऊभा असलेला तिचा मित्र. मिठीही अशी मारला होता की जसं काही गाडी आपोआप सुरू होऊन त्या मुलीला घेऊन गेली तर काय घ्या! त्यांचे हास्यविनोद सुरू होतेच, थोड्या वेळात रोमान्सपण सुरू झाला. समोरच्या मैत्रीणींचे खिदळणेपण त्यातलाच एक भाग होता.

माझ्या येरेझाऱ्या सुरू झाल्या. अधेमधे डोळ्याच्या कोपऱ्यातून या चौकडीच्या कलांकडे पण नजर होतीच. फोनवर बोलत बोलत, या टोकापासून त्या टोकापर्यंत फेरी मारायचो. मग पलटी मारताना या चौकडीकडे नजर जायची. परत दुसऱ्या टोकाकडे जायचो. परत पलटी. परत नजर. असला प्रकार करत फोनवर बोलणं सुरू होतं माझं. आधी वाटलं मला की आता हे लोक तसेही गायब होतील, थोडं फार माझ्यामुळं अवघडल्यासारखं वाटेलच ना? या लोकाना माझ्यामुळं ऑकवर्ड वाटेल या कल्पनेनंच मनातल्या मनात मलाही मजा येत होती. कॉलेजमधे कसं मुद्दामहून कबाबमे हड्डी बनून लोकाना त्रास देताना मजा येते तशी. आसुरी आनंदाची मजा! पण कुठचे काय? समोरचे प्रकरण लाजणारं आजिबात नव्हतं. बरोबरच्या दोन मैत्रीणीनी पण या दोघाना नाही लाजवलं तर मी कशाला लाजवेन? मधेच गाडीवरची मुलगी खाली ऊतरली. मुलाने लगबगीने परत दुसऱ्या बाजुला जाऊन तिला हात दिला. "उतर सिंडरेला, तुला पायात सॅंडल देतो की आणि कुठे काय देतो!" अशा अविर्भावात. ती लाजतेय का रडतेय काही कळत नव्हते पण मुलगा तिला कंफर्टेबल करायच्या प्रयत्नात मनापासून दंग होता. ती लाजत नक्कीच नसावी! (उगाच मलापण काहीबाही अपेक्षा!) समोर येरझाऱ्या घालणारा मी अनकंफर्टेबल होतो की नाही होतो याची कोणाला तमा? त्या मुलाला तर मिसुरडंपण फुटलं नसेल. साधारण अकरावी बारावीचीच जनता असावी. पण फुलऑन रस्त्यावर चुम्माचाटी सुरू होती! ईश्कीया बघून आल्या आल्या मला रस्त्यावर लाईव ईश्क वगैरेचा डेमो सुरू होता. थोड्या वेळाने तो मुलगा निघून गेला. दमला असावा किंवा त्या मुलीनच सांगीतलं असावं की आता बास, बाकी उद्या! तिन्ही मुली परत खिदळत पार्किंगकडं आल्या. माझ्याच जरा बाजुला त्यांच्या गाड्या होत्या. त्यावर यांचं बस्तान बसलं. तेवढ्यात दुसरा एक मुलगा त्यांच्यामागून आला, आणि त्यांच्यातल्याच दुसऱ्या मुलीला पकडला. आता यांचा रोमान्स सुरू झाला! आता मलापण बाल्कनीपेक्षा स्टॉलचा अनुभव होता! पहिल्या रांगेत बसून क्रिकेटच्या मॅचची रंगत जास्ती असते म्हणतात. तशी रोमॅंटीक सिनेमाची रंगतपण पहिल्या रांगेतून जास्ती येते हे ज्ञान तेव्हा झालं. आता मगासचा आसूरी आनंद वगैरे सगळं मावळून मलाच तिकडून काढता पाय घ्यायची पाळी आलेली. माझे फोनही सगळे संपले. मी ही निघालो.

पण हा सिनेमाबाहेरचा सिनेमा ऊगाच डोळ्यांच्या कोपऱ्यात अजुन स्पष्ट-अस्पष्ट चालू होताच. ही ११ वी, १२ वीची मुलं, आणि कायच्या काय प्रकार!? आधी मला कळेना, मला राग आलाय की नुसतंच द्वंद्व सुरू आहे. राग वगैरे काही खरच नव्हता, पण काहीतरी आतल्या आत सुरू नक्की होतं. मला नवल (किंवा जेलसी?) कशाचं वाटतय हे मी शोधत होतो. म्हणजे ११ वी १२ वीच्या मुलांनी "हा असला"  प्रकार करावा? की "११ वी १२ वीच्या" मुलांनी हा असला प्रकार करावा? माझा आक्षेप त्या प्रकाराला होता की त्या वयोगटातल्या मुलाना यावर मीच अडखळलो. म्हणजे हे ऊद्या जर माझ्या वयाच्या कोणी केलं तर मी ईतकाच विचार केला असता की विनासायास accept केलं असतं? तसं, माझ्या वयाच्या बऱ्याच जोड्या ठरलेल्या स्पॉटवर हमखास आपली प्रेमप्रकरणं भेळ वाटल्यासारखी दाखवत उभी असतातच. खोटं का बोला? जागाही वेगळ्या सांगायला नकोतच. पण मी कितीवेळा इतकावेळ त्याचा विचार केलाय? म्हणजे ज्या त्या वेळी काहीतरी चेष्टा म्हणा, किंवा काहीतरी तात्विक म्हणा, ज्या ज्या मुडप्रमाणे कमेंट टाकलेच असतील. मतं व्यक्त केलीच असतील. पण विषय तिथल्या तिथेच बंद व्हायचा. असा रेंगाळत नाही रहायचा. आज जरा जास्तीच तरूण जनता दिसल्यानं मलापण जरा अजोबापण चढलं असावं! पण अस्वस्थ नक्कीच झालं होतं. त्याना अनकंफर्टेबल करण्याच्या प्रकारामधे, मीच अनकंफर्टेबल झालेलो.

Out of the numerous things that typically excite or impress teen age, perhaps romance is one of the most easily accessible thing! When we were at that age, perhaps, we always had someone, may it be parents or siblings, accompanying us. They probably were always helping us make sense out of whatever we saw, we experienced. I don't remember as many incidents when I selected what I wanted to watch and what not, this decision was always in safe hands; someone always did that for me. I was not driven by someone. I always had my own freedom to make choices, but I was never left alone to interpret things that I was seeing around me. Someone always had time for me. I think, early independence is something to think about for these kids. फार लवकर त्याना स्वतःच्या स्वतःच्या जग बघायला सोडलय आपण. या सगळ्यात जर कोणी अशा सहज सुलभ प्रलोभनाना बळी गेला तर त्याची काय चुक? बळी वगैरे पडत नाही घ्या कोणी. जे येइल भोगासी, त्यातून काहीतरी बनवत जातातच लोक. पण तरीही.

मी त्याना का दोष देऊ? "समोर जे काही पाहिले ते जर माझ्या वयातल्या कोणी केलं असतं तर मी कदाचीत accept केलंही असतं" या विचाराचं postmortem माझ्या मनात सुरू होतं! कदाचीत कुठेतरी मी आधीच हे accept केलय. आता त्याला वयाचं बंधन घालून कदाचीत मी माझ्याच ईगोचे लाड पुरवतोय. किंवा खरच काहीतरी चुकल्याचं खोलवर सलतय. जे झालं, जे दिसलं, त्याला लाख नावं ठेवून नव्या पिढीच्या नावानं दंगा करणं फार सोपं आहे. त्यामधे मलापण काही सलणार नाही. पण एखादा प्रश्न परत परत बोलून दाखवला म्हणजे सुटत नाही. तो आहे हे मान्य केलं तरीही तो सुटत नाही. त्याला कोण जबाबदार आहे हे हिरीरीनं सिद्ध जरी केलं तरी सुटत नाही! हे सगळे स्वतःला समाधान देणारे सोपे पण एकदम निरर्थक मार्ग आहेत.

कदाचीत माझ्या लहानपणी मी या गोष्टी निषिद्ध म्हणुन पाहिल्या, म्हणुन आज मला त्या चुक वाटत असाव्यात. या मुलानी तशा नाही पाहिल्या. भुमितीमधे "Shift of Origin" ची एक फार सुरेख कल्पना असते. अक्षावरती किंवा रेषेवरती, शुन्याच्या उजवीकडच्या सगळ्या जागा "धन (+)" आणि डावीकडच्या म्हणजे "ऋण (-)". शुन्य म्हणजे ओरीगीन, उगम, केंद्र. त्याच्या जागेवरून ठरणार की बाकी गोष्टींच्या जागा धन की ऋण ते! आता हाच शुन्य जर थोडा डावीकडं हलला, तर मग पुर्वी ऋण (-) असलेल्या जागा आता धन (+) होणार. शुन्याची जागा जशी हलेल, तशा इतर जागांशी निगडीत असलेली चिन्हं बदलतात. यालाच "Shift of Origin" म्हणतात. एकदम सरळ आणि सोपी संकल्पना. आपण लहानपणी जे बघतो ते शुन्य. एकदम निर्विवाद मान्य केलेलं सत्य. तो आपला ओरीगीन, उगम, केंद्र. त्यावरून धन आणि ऋण गोष्टी ठरणार. त्याला चांगल्या आणि वाईट म्हणू. माझ्या पुढची पिढी त्यांच्या लहानपणी जे बघेल ते वेगळे असेल. कदाचीत डावीकडं सरकलं असेल, तर माझ्यासाठी ऋण (-) असलेल्या जागा त्यांच्या साठी आपसूक धन (+) झालेल्या असतील! नाही का?

आता हे "shift of origin" त्यांच्यासाठी कोणी केलं? त्यानी नक्कीच नाही केलं! हे आपणच केलं. पिढ्यानी पिढ्या हा ओरीगीन, हा शुन्य, हलत आलाय. आता तो मुळात कुठं होता कोणालाच माहित नाही. जे आज समाजाला चुक वाटतय, ते उद्या बरोबर वाटेल, परवा परत चुक वाटेल. हे सगळ सरळ करायला मला हा शुन्य उजवीकडं न्यायचाय की डावीकडं मला काहीच माहीत नाहिए. जे आत्ता चांगलं वाटतय, ते सत्य, आणि तेच बरोबर. या एवढ्याच तत्वावर बाकीचं माझं ज्ञान आधारीत आहे. बाकी सगळं मिथ्या! हे बरोबर की चुक? मला नाही माहित. पण हे अस्वस्थ करणारं नक्कीच आहे.

Thursday, March 18, 2010

पावसावर आणखी एक कविता

मागच्या आठवड्यात अचानक संध्याकाळी इथे पुण्यात फार  जोरात पाउस आला. तेव्हा अदिती बरोबर गप्पा मरताना जमुन गेलेल्या काही ओळी (म्हणजे तिनंच जमवलेल्या!).


काय मस्त वाटतं ना? पाऊस भारी असतो अरे
दर सकाळी यावा, तुफान एकदम, वारा सुटून वगैरे

धूळच धूळ सगळीकडे, श्वास कोंडेल असा वारा
दोन मिनिट सुद्धा बाहेर गेलं तर आंघोळ होईल असा

काम सोडून दिसेल तिथून त्याच्याकडे बघत राहावे
गाणी येतात कोणाला! पण उगीचच काहीतरी गुणगुणावे

उगीचच काढून कारण काहीतरी जागेवरून उठायचे
गरम चहा कॉफी आणि गप्पा यातच ऑफीसचे तास संपायचे

जबरदस्त, सॉलिड, जन्नत वगैरे काहीही विशेषणे त्याच्या नावावर खपतात
तंबुस केशरी संध्याकाळीवर त्याचा सडा आणि मग मातीचा वास घेऊन तासचे तास निघतात