Monday, July 15, 2013

मिल्खा मिल्खा भागलास का?

काहीही दाखवतात आज काल सिनेमा मध्ये. भाग मिल्खा भाग बनवण्याच्या आधी राकेश मेहरा स्वतः खूप भागला असावा! नाहीतर काही pointच नाहीये असलं काहीतरी बनवण्यात. आपल्याला सिनेमाचं वेगळं लॉजिक माहितीये. जे काही आपण नेहमी जगतोच तेच परत सिनेमामध्ये काय दाखवायचं म्हणून तिथे fiction बनवायचं. आणि आपल्यालाही आवडतच की ते! आणि मग ते आवडतं म्हणून आपण त्याच्यासारखं करायचा अखंड प्रयत्न करायचा. मी तर दबंग सारखे पाठीला चष्मे लावून फिरण्याचे प्रकार पण पाहिलेत. गाण्यात कोणी ओरडला की "जो भी मै केहना चाहु, बरबाद करे अल्फाज मेरे" की इकडे तमाम जनतेचे पण अल्फाज लगेच त्यांना बरबाद करायला लागतात! खोटं का सांगू? मी पाहिलंय हे माझ्या डोळ्यानं. या इथंच की. फेसबुकवर! म्हणजे आजू बाजूला जे नाही ते सिनेमामध्ये दाखवायचं आणि मग जे सिनेमामध्ये आहे ते आजू बाजूला उभं करायचं! अशी काहीशी आपली मजा सुरु असते!

या सगळ्यात भाग मिल्खा पहिला आणि एकदम धक्काच बसला! तसे पुर्वीपण धक्के बसलेले असे. एकदाची भडास काढतोच म्हणून आज लिहितोच!

१. नायक चक्क मेहनत घेताना दाखवलाय! असं कोणी करतं का? म्हणे मेहनत करायची. काबाड कष्ट करायचे. मग यश मिळणार! आपला आकाश कसा होता? टपोरीगीरी करायचा. मग शेवटी त्यालाच मिळते की नाही प्रीती झिंटा? उगाच कबिल बीबील काय व्हायचं? नायक म्हणाला कि कबिल झालाच की! नायिका पळवणे हे एकमेव गोल. प्यार प्यार करून थेऱ्या झाडायच्या. उसके लिये जगायचं असतं उसके लिये मरायचं असत! कष्ट बिष्ट काय! तेही नायिकेसाठी नाहीच म्हणे!!

२. नायिका म्हणते कुछ करके दिखाव. मग ये. आणि नायक मान्य करतो नि जातो कि खरच कूछ करायला! मला वाटलेलं एक गाणं म्हणेल नी मग सगळं sorted! अशीच असते कि पद्धत आपल्याकडे! नाही काय?

३. नायिका आता गेली. लग्न बिग्न केलं तिने हे कळल्यावर तर आपण लगेच तडक तिच्या घरी बिरी पोचतो. तिच्या नवऱ्याला धाब्यावर बसवून दुल्हनिया पळवून आणतो. हय गय नाय! कारण आपणच हिरो असतो न! पण इथे हा नायक बिचारा बर म्हणून आपल्या मूळ कामाला लागतो!!! कमीत कमी bomb defuse करणारा तरी व्हायचा न मग? तेही नाही. म्हणजे इतिहासावरून काही बोध घ्यायचाच नाही असं ठरवलं तर मग कोण काय करणार!

४. एकदा तर चिकणी पोरगी येते जवळ. तेही स्विमिंग पूल मध्ये. आणि हा म्हणतो "बाई, नंतर या!" ये लो करलो बात!! ऐसा भी कभी होता है?

५. सिनेमाभर नायक बिचारा इकडे तिकडे पळत असतो. आता नावात "भाग" आहे मान्य आहे! पण इतके कधी ते मनावर घेत का कोणी ते? हा चक्क athelete असतो. आणि सिनेमाभर athelete गिरी करत राहतो!! व्यायाम करतो. सराव करतो. काहीच्या काही! आपल्याला कुठे सवय असली? आम्ही शाळा college वरचे सिनेमे बघतो की ज्यात शाळा college केवळ २-४ मिनिट असतात! हे म्हणजे भलतच होतं!

६. आत्ता हे सगळं बघून काहीही परिणाम झालेत मनावर! कष्टेवीण फळ नाही असलं मनावर बिंबवल यांनी! मला वाटायचं exotic ठिकाणी ट्रीप केल्या. गाणी ऐकली म्हणाली आणि परत कामावर आलं की आपण एकदम स्टार होणार. म्हणजे गेले १०-१२ वर्षं तर मला असाच वाटतंय. आणि प्रयत्नही सुरु आहे. पण यांनी तर भलतच सांगितलंय. आता चक्क सकाळी सकाळी उठून मी कामावर येतो! या सिनेमाला कमीत कमी पेरेंटल गायडन्स तरी लेबल लावायचं न आधी! म्हणजे मनाची तयारी करून गेलो असतो!

७. हा माणूस चक्क एक गोल सेट करतो. आणि ते मिळवतो! हा म्हणजे अतिरेक होता! ते गोल कायम डोळ्यासमोर ठेवतो! असं नसतं यार करायचं. आम्ही तर अप्रेजल मध्ये गोल सेटिंग पण करायला कंटाळतो. मारत मरत करतो. आणि मग डायरेक्ट वर्षाअखेरीस त्याच्याकडे बघतो. असच तर करायचं असतं! असं दररोज दररोज कोण बघत बसेल त्याच्याकडे? लोक काय म्हणतील? तसंही अशा गोष्टी समोर ठळकपणे दाखवायच्या थोडीच असतात? म्हणजे तमाम जनतेला जाहीरपणे वेडावून दाखवण्यासारखे आहे हे! सेन्सर बोर्ड झोपलाय हेच खरंय.

८. मागे रांझाणा पाहिला नी कलेजेमे ठंडक पोचली. तडक जिममध्ये जावून सांगणार होतो. Body shody वगैरे काय बनवायची? धनुषकडे बघा! लवकरच सांगायचा प्लान होता. आणि आता मिल्खा बघितला! जरा टायमिंग चुकलच! आता सिनेमा आहे. आम्हाला कल्पना आहे की समोरचा जो आहे तो खरोखर मिल्खा नाहीये! तुम्ही अगदीच धनुषला वगैरे नाही आणणार काम करायला इतके माहिती आहे. पण इथे या माणसाने स्वतः कशाला मेहनत घेऊन मिल्खा व्हायचं? म्हणजे बघणाऱ्यांची पर्वाच नाही! झक मारत आज परत जिमला जावे लागणार!

आता काय. धावतो आहे. मिलाखा ने सांगितलंय. जरा दम लागला म्हणून म्हणून थांबायची पण सोय नाही! त्यांनी ते पण कवर केलय! बस भाग! एक गोल ठरव. आणि मग त्याकडं भाग! उगाच नाही ते लाड नाही करायचे! सिनेमांनी inspire करायचं थांबवलं पाहिजे यार! ये सब गया तेल लेने. आपण सिनेमा मोठा आहे म्हणून निषेध करू. असले आणि चार पाच सिनेमे आले तर हाहाकारच व्हायचा!


ता.क. पडद्यावर साक्षात नेहरू आले. नी त्यांची कोणी चेष्टा केली नाही! कमीत कमी government हा तरी आपल्या जिव्हाळ्याचा विषय! कोणावरही काहीही सबंध नसताना चेष्टा करायचं लायसन्स असतं की आपल्याकडं! नेहरूंच्या बद्दल आपला काही आक्षेप नाही. पण दिसला politics की घाल शिव्या अशीच की आपली पद्धत! कर चेष्टा! ते पण नाही यार या सिनेमामध्ये!
Post a Comment