Thursday, June 20, 2013

The other side of an Umbrella

च्यायला भर पावसाळ्यात मुंबईला फेऱ्या मारायला लागणं या सारखी शिक्षा दुसरी नाही. सलग ३ आठवडे तिथे राहायचे. दिवसभर मिटिंग करायच्या. रात्री खोलीवर येऊन ऑफिस मध्ये फोन लाऊन बसायचे. सगळं झालं की बाहेर फिरून येऊ वाटलं की पाऊस दत्त म्हणून उभा. एक नाही ... दोन नाही ... आठवडाभर असच व्हावं? पाऊस वगैरे गोष्टी आवडतात मला पण त्याने अशा टाईट शेड्यूल मध्ये येऊ नये. म्हणजे रात्री विचार केला की चला घाला कशी, जाऊन भिजून येऊ आता तर तेही वांदे! कपडे थोडीच आणले होते इतके सारे! वर पुरवून वापर सुरु होता. हॉटेलमध्ये इस्त्री बिस्त्रीला थोडीच टाकतो आपण काही! सगळा गठ्ठा घरी आणून धुवायचा असतो! गप्प खिडकीतून पाऊस बघत आपण काय पाप केलं असावं याचा हिशोब लावत डोळे मिटायचे!

पहिला आठवडा असच गेला. विकेंडला फुकट फिरणे झाले. दुसरा आठवडा गेला तेव्हा जाम बोर झाले. जेलमध्ये बंद केल्यासारख वाटत होतं. दररोज काय अरे रात्री पाऊस? नोकरदार माणसाने बाहेर तरी कधी पडायचं? सोमवारी असच परत येताना चक्क खोलीवर पोहोचायच्या आधीच पाऊस आला!! अभी ये तो सोचाही नाही था! पाऊस काय रात्रीच येणार हेच नेहमीचे गृहीतक होते. पाऊस तर सुटला होता बेभान. मंगळवारी सकाळी पण आला. होटेलवाल्याचे छत्री उसनी घेतली. रिसेप्शनच्या काचेच्या दरवाज्यापासून ते गेटपर्यंत जाण्यासाठी जी मोठी छत्री असते. तीच छत्री घेऊन मी डायरेक्ट बाहेरच पडलो. आता हीच श्रींची इच्छा होती हेही मी सिद्ध करू शकतो. अगदीच. नेमक्या त्याच छत्रीवर हॉटेलचे नाव छापलेले निघून गेलेले का असावे? हे दैवी संकेत मी लहानपणापासूनच लगेच ओळखतो. स्वतःच्या या सगळ्या कौतुकामध्ये असताना एक मुलगी दिसली. चक्क तिला छत्रीची फिकीर नव्हती. भिजत चालली होती. एकदा वाटले की भिजू की नको, भिजू की नको असा प्रकार सुरुये तिचा. पण जे काही सुरु होतं ते entertaining सुरु होतं. पावसाने पांचट केलेल्या त्या ट्रीपमध्ये अचानक पाणी दा रंग देख के गाणं वाजल्यासाराख झालं.

इतके दिवस कशी काय दिसली नाही ही पोरगी? की तीही आपल्यासारखीच आली असेल २-३ आठवड्यासाठी? आई शप्पथ! ही जर आपल्याच होटेलमध्ये राहत असेल तर? मग आणखी ३ आठवडे ट्रीप लांबली तरी चालेल! पण ती माझ्या होटेल मधली नव्हती. इतक नशीब चांगलं असतं तर मुळात पावसाने इतका त्रास दिलाच नसता. पण डेप्युटेशन वरच आली असणार. नाहीतर आजवर दिसली असतीच की. आई शप्पथ! म्हणजे आज मीटिंगमध्ये पोचलो की समोर हीच दिसायची. मग दररोज आपण धाप्लेल्या छात्रीमधून एकत्र यायचे! ऑफिस आलं. ती काही नाही आली. परत जाताना पाऊस आला. हॉटेलमध्ये पोचल्यावर गार्डपण आला. म्हणजे गार्ड छत्री बघायला आला. पण हॉटेलचं नाव नाहीये बघून ओशाळला. Sorry sir म्हणून निघून गेला. पण च्यायला ती काही आली नाही. फोन आवरले. बाहेर पडायचा स्कोप नव्हताच. कारण दत्त दारात उभा होता. उभा काय कोसळत होता. काय नशीब आहे यार आपल? हे असलंच आयुष्य काढायचंय. सिनेमामध्ये काहीही दाखवतात यार. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही स्वित्झर्लंड मध्ये गाणे गायला हवे होतो! तर इथे तर ही मुलगी न माझ्या होटेलची. न कुठली! गाणं तर सोडूनच देऊ! सिनेमे सगळे बंद केले पाहिजेत यावर कधीतरी काहीतरी रोख ठोक लिहून आपण क्रांती करू अशा विचारात डोळे मिटले.

पुढच्या दिवशी ती परत दिसली. परत एकदा आईची शप्पथ घेऊन झाली. ही पोरगी इथल्याच कुठल्यातरी हॉटेलमध्ये असावी याचीही खात्री झाली! म्हणजे कालच्या दिवशी पण खूप साऱ्या खात्र्या झालेल्या. पण आजची जास्ती फ्रेश खात्री होती. तिच्या मागे मागे गेलो. छत्री हवी का असे विचारणार तोवर ती आणि एका बाईच्या छात्रीमध्ये घुसली. रंगीलाच्या आमिर खान सारखी पिवळी साडी नेसलेली तिनं. साला लंगुर के मुह मे अंगूर! मैत्रीणीच असतील. गप्पा मारत मारत निवांत चालत होत्या दोघी. नी मागून मी. शेवटी bus stop आला. पिवळा आमीर खान निघून गेला. आणि ही मुलगी बस मध्ये शिरली. माझा डीटूर झाला होता. मुलीच्या नादात मिटींगची पहिली २० मिनिटे चुकणार होती. पण पावसावर ढकलून मी माझी सही सलामत सुटका करून घेतली.

आता ही मुलगी मला दररोज दिसायला लागली. काह्तीअरी गडबड होती. ही आधी का दिसली नाही देव जाणे. पण ही हॉटेलमध्ये राहत नाही याची खात्री झालेली. ही एकदम पक्की खात्री होती. तिथेच आसपास राहणारी असावी ही. दररोज कोणीतरी विचित्र बाई हुदाकायची नी तिच्या छात्रीमध्ये शिरायची! सायको वगैरे असावी असंही वाटलं एकदा. पण सुंदर मुली सायको नसतात. त्यामुळे ती शक्यता लगेच cancel करून टाकली. एकदा संध्याकाळी घरी येताना भेटवी अशी खूप इच्छा होती. म्हणजे कुठे राहते वगैरे सगळाच ट्रेस लागला असता. पण सगळं असं मनासारखं झालं असतं तर मग कशाला? आपल्यालाला काहीही हवं असलं उत्कट की फक्त एकाच गोष्ट मिळत होती. ती म्हणजे धो धो पाऊस. पूर्वी असेच थकून भागून सगळे कवी लोक शेवटी पावसालाच सगळ्याची उपमा देत असावेत. पावसावरच्या सगळ्या romantic कवितांमध्ये मला अचानक मला हा समस्त कवींचा sadness दिसू लागला. कालिदास पण असच माझ्यासारखा ऑफिसला जाऊन जाऊन पाकला असावा. रात्री फिरायला मिळत नसेल पावसामुळे मग सगळे मनातले मांडे असावेत त्याचे. समोर पाऊस दिसतोय म्हणून पावसात सजवले असावेत मांडे! त्याला थोडीच साहित्य वगैरे माहिती असणारे. आपण काढली असणारेत साहित्यिक मूल्य त्यातून! त्या बिचाऱ्याला माझ्यासारखं sad डेप्युटेशन वर पाठवलं असणारे. आता कालिदासानं खरच पावसावर कविता केल्या होत्या की आपल्याला कवी म्हणाला की फक्त कालिदासच आठवतो? या सगळ्या गोंधळात ती चक्क परत दिसली. ही चर्चगेटवर काय करतेय? आई शप्पथ! ही पण याच इमारतीमध्ये येते की काय? काय हे दुर्दैव!! लगेच वीज कडाडली. हा हा हा हा करून गडगडत झाला. मला खात्री पटली की ही पोरगी याच इमारतीमध्ये येते. आणि मी मागचे इतके दिवस झाक मारत होतो. याला काहीच अर्थ नव्हता. आजही थोडावेळ बाहेर आलो नसतो तर हे ही कळले नसते!

पण ही पावसात बाहेर काय करतेय? कदाचित नसेल या इमारतीमाधली. नाहीतरी पावसात बाहेर काय करत असती? आता परत नवी खात्री झाली की या इमारतीमाधली नसावी. पण आपण इतके दिवस झाक मारत होतो हे नक्की होते. ही दररोज येत असावी इथे. आपण येड्यागत आत खुर्च्या गरम करत असायचो! आज भेटूच. तशी आठवडाभर ओळख आहेच की. लांबून का होईना. पण तिनेही कधीतरी बघितले असेलच की. आज एक चांगली गोष्ट अशी होती की आज पाठलाग करायचा नव्हता. ती साक्षात समोर होती. आणि आमच्या मध्ये कोणतीही आगाऊ बाई नव्हती की जिच्या छात्रीमध्ये शिरून ही अंतर्धान पावेल! आता मी हा असा समोर गेलो की ती हसेल माझ्याकडे बघून. मीही हसेन. नी मग छत्री मोठी आहेच आपली. तिला bus stop पर्यंत आपणही सोडूच की. मग परत ऑफिस आहेच की. नवे मित्र मैत्रिणी केलेच पाहिजेत. शाळा कॉलेज संपल्यावर कुठे काय नवे मित्र करतो आपण. आज ही संधी आलीये. दैवी संकेत आहे. जनसंपर्क वाढवलाच पाहिजे. वेगवेगळया गावात डेप्युटेशनला यासाठीच पाठवतात. असे म्हणत म्हणत. माझी चाल मंदावलेली. पण ही पोरगी कधी बाजूने येऊन निघून गेली कळलेच नाही.

I can't believe this. ती बाजूने निघून गेली नी मी प्लान करत होतो? Occupational Hazards!!! या ऑफिस नी ऑफिस च्या कामाने आयुष्य उध्वस्त केलेय माझे. हे काही नाही. स्त्रीदाक्षिण्य वगैरे काही आहे की नाही. मी जातो तडक. नी विचारतो. आजारी पडेल बिचारी. बस. Stop it! I don't need reasons. I am just asking. That's it.

"Excuse me!" तिने वळून बघितलं. "Should I drop you till the bus stop?" च्यायला घातली का कशी!! म्हणजे तिला कळणार आता की मी दररोज तिला follow करायचो! नाहीतर मला काय माहिती ही bus stop वरच जायची ते!? चला sorry म्हणू नी पळून जाऊ. हे आपल्या बस की बात नाहीये. सुंदर मुली झेपत नाहीत सहसा. मिटींग अर्धवट राहिलीये. दुसरीच कोणीतरी वाटलीस म्हणू आणि निघू!

"ठीके!" ती किंचित हसून म्हणाली.

खल्लास!! परत आईची शप्पथ घेतली एक. तसे कोणाला follow थोडीच केलेले आपण! आपला रस्ता एक होता त्याला मी काय करणार? दैवी संकेत होता तो. मी पकडला. तिने उशिरा पकडला असेल. पण मदतच तर करत होतो.

पोरगी तर महा बिलंदर निघाली. जरा वेळाने म्हणाली की bus stop वगैरे नाकोचे तिला. अशीच फिरत होती! ऑफिस अर्धवट सोडून मी चक्क चालत होतो तिच्याबरोबर. ऑफिसचं मंगळसूत्र कधीच काढून खिशात ठेवलेलं. काहीही असलं तरी ती बोलत मात्र इंटरेस्टिंग होती. मी तसा माझ्याच धुंदीमध्ये होतो. पाणी दा रंग परत वाजत होतं! पावसानं इकडून तिकडून झोडपून काढलं होतं. पण Who cares? छान गप्पा होत होत्या. कॉलेजनंतर प्रथमच इतक्या खुलून कोण अनोळखी व्यक्तीबरोबर बोललो असेन. आता इतका पराक्रम झालाच होता. तर म्हणालो चाल .. मारीन ड्राईव्ह ला जाऊ. तीही बर म्हणाली. इकडे मिटींग धाब्यावर बसवलेली. मधूनच मी कुठे कसा गायब झालो? का गायब झालो? याची उत्तरं तयार करत होतो मनात. पण ही मुलगी वेळच देत नव्हती. कोणी सलग इतका वेळ कसे काय इंटरेस्टिंग राहू शकतं? I hope she was also thinking the same! थोड्यावेळात उन्ह पडलं चकक. ऑफिसमध्ये डीच मारल्याचं जरा गिल्ट फिलिंग आलेलं. पाऊस उतरला तसा आपला जोश पण उतरला. That's so not fair! मधेच चर्चा थांबली आमची. च्यायला काय वाटलं असेल तिला. हा का मधेच थांबला म्हणून? ऑफिसमध्ये गेलं पाहिजे यार. हे असले फालतू विचार अधे मध्ये कसे येतात काळात नाही. पण असो. मजा आली. बस पण. जाऊच आता. पाऊस उतरलं. चला. निघतो. वगैरे झालं. एकदम SRK जागा झाला. परत गेलो नी तिला छत्री देऊन आलो. म्हणालो घे. परत पाऊस आला तर! त्या छत्रीवर हॉटेलचं लिहिलेलं नाव निघून गेलेलं हा खरच दैवी संकेत होता याची खात्री झाली परत एकदा.

तिनं विचारलं काय करतोस? आता ऑफिस वगैरे बकवास गोष्टी काय सांगू. म्हणालो युनिवर्सिटीमध्ये आहे. जरा अचानक cool dude वरून हुशार फील आला मलापण. बाकी ती थोडीच छत्री परत करायला येणारे? आपले नशीब असते एवढे तर मग कशाला.

पुढे ऑफिस मध्ये काय झालं यासाठी परत कधीतरी लिहीन.

(Inspired by, https://www.facebook.com/notes/aditi-moghe/oh-umbrella-/542926972425668. अर्थातच, कल्पनाकी उडान)

Wednesday, June 19, 2013

The $ex and city!

काल सॉलिड धमाल झाली. खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या प्रकारे भीती वाटली. सकाळी एक बातमी छापून आली. फेसबुकने ती डोक्यावर घेतली. लोक आता सैरभैर होणार असे वाटू लागले पण तेवढ्यात दिवस संपला. बातमीचा lifa span संपला! आता तुम्हाला यावरून कशाचा काहीच क्लू लागत नसेल तर याचा अर्थ तुम्ही फेसबुक वाचत नाही. किंवा तुम्हालाही भीती वाटलेली पण आता लपवताय! फेसबुक न वाचणे म्हणजे ... बरं राहू दे. त्यावर परत कधीतरी. उगाच एका पोस्ट मध्ये इतक्यांदा विषयांतर नको. आपल्याला निवडणूक थोडीच लढवायचीये! (हे एका मित्राने सही सांगितलंय मला. कुठेही संवाद भरकटला की government, politics आणि corruption यावर काहीतरी भाष्य करून सोडून द्यायचा! त्याच्याहून चांगला escape route असूच शकत नाही! संबंध असो व नसो!) असो ... तर मला थोडीच निवडणूक लढवायचीये. आपण मुद्द्यावर येऊ की लोकांनी मुद्दा कसा सोडला!

काल चक्क हायकोर्टाने एक निर्णय दिला. म्हणजे निर्णय दिला ही न्यूज नाहीये. पण जो निर्णय दिला ती न्यूज आहे! मराठीमध्ये मथळा लिहायचा प्रयत्न केला पण जमत नाहीये ... म्हणून अख्खी न्यूजची लिंक देतो.

http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/couples-who-have-premarital-sex-to-be-considered-married-says-hc/article4824017.ece

हाहाकार! ही बातमी प्रत्येकापर्यंत वेगवेगळी पोचली असणार. लगेच पूर आले स्टेटस नी कमेंट चे! आणि करमणुकीचे कार्यक्रम सुरु झाले!

लग्न मंडप, कार्यालय, केटरींगवाले या सगळ्यांना तर धक्का बसला असणार! आता लग्नाच्या खर्चाने लोकांना देशोधडीला कसे लावणार? त्यांच्या असोसिएशनने बेकारी भत्ता वगैरेचे नियम वाचायला सुरू केले असावेत. स्पर्धेमुळे आधीच वांदे. आता या निर्णयामुळे तर सगळा डाव बदलला! कोर्टाने चक्क सांगितले की लग्न करण्याचा नी या सगळ्यांचा काहीही संबंध नाहीये!! काही हुशार कार्यालयवाल्यांनी लगेच कार्यालयाचे लॉजिंग बोर्डिंग मध्ये रूपांतर करायला सुरू केले असेल. बाहेर पाट्या लावल्या असतील "Hotel Decent - आमची कोठेही शाखा नाही!" बाजूला सलमान खानचा फोटो पण असेल! (आता सलमान खान "लग्न" या गोष्टीचा brand ambassador का? यावर चर्चा करायची असेल तर तुम्ही खुपच मागासलेले आहात यार!)

याहून जास्ती खळबळ टीवी सिनेमावाल्यांची झाली असावी! लग्नासाठी झगमग हवी. मोठा कार्यक्रम हवा. भरपूर लोक हवेत. हे सगळी गृहितकं आता उधळली गेली. कोर्टाचे जजमेंट असे म्हणतं.

"The court said marriage formalities as per various religious customs such as the tying of a mangalsutra, the exchange of garlands and rings or the registering of a marriage were only to comply with religious customs for the satisfaction of society."

घ्या म्हणजे! एका फटक्यात किस्सा खतम. इतकं खरं कसं बोलू शकतात कोर्टात? एक म्हणजे खरं? आणि तेही कोर्टात?? वर्षानुवर्ष अंधा कानून वगैरे करून जी काही चेष्टा चालवली होती त्याचं फळ हे! म्हणजे काही वेळा चक्क गोविंदाला पण वकील केलेला हो! शक्ती कपूर पण तिथे काहीतरी किस्से करायचा! कोर्टाने तरी किती वेळ सहन करायचं? त्यांनीही दिलं प्रत्युत्तर! सुरज बडजात्या (अरे होता न असा एक? विसरलात होय? चित्रहार बनवायचा! बघा आठवून!) पासून ते एकता कपूर पर्यंत सगळे हादरले असतील. मला वाटलं की हेच जरा लवकर झालं असतं तर "ये जवानी है दिवानी" मधून तरी सुटका झाली असती! पण इतका अधाशी कशाला होऊ. त्याचा पुढचा संभाव्य रिमेक तरी नाही व्हायचा यावर खुश होऊ!


"शादिके पेहले सेक्स नाही" असले डायलॉग नाहीत आता सिनेमामध्ये. किंबहुना "शादिके लिये सेक्स पेहले". हे असे काहीसे होईल. शादीवली रात पेक्षा शादिके पेहलेवली रात हे जास्ती प्रसिद्ध होईल. महेश भट्ट चा सुभाष घाई होईल! महेश भट्ट चे सगळे सिनेमे आता family movies म्हणून प्रदर्शित होतील! काही चतुर पत्रकारांनी हा त्याचाच किया कराया आहे अशी पण शक्यता वर्तवालीये! परदेस मधली महिमा चौधरी भारतामध्ये पळूनच येणार नाही! (असा पण होता न एक सिनेमा? असे काय करताय? "ये दिल" हे एकच गाणे नव्हते त्यात! त्यात एक अपूर्व अग्निहोत्री असतो. खूप futuristic विचाराने तो महिमाला अमेरिकेमध्ये घेऊन जातो नी तिथे म्हणतो "चाल अब जिंदगी जीते है!" तेव्हा हायकोर्टाने असला निर्णय दिलेला नसल्याने ती बिचारी अमेरिकेतून भारतामध्ये पळून येते! नी शाहरूखवर प्रेम करते! हा...! तोच तो परदेस). केवढा सारा खर्च वाचेल! ही स्कीम बचत गट किंवा सहकारी पत संस्था यांनीच काढायला हवी होती! पण असो, कोणाच्या का आरवण्याने होईना. सूर्य उगवला. किंवा चंद्र उगवला म्हणूया. Moon is closer to sex than the sun! God Bless Bollywood!

"ये शादी नाही हो सकती" असला डेंजर डायलॉग सिनेमामध्ये येऊन दंग नाही व्हायचा आता. नायक नी नायिका लगेच म्हणतील. अंकल, लेट हो गया. शादी को कब की हो गयी, ये बस satisfaction of society सुरु आहे. We are already satisfied!"

मला तर चिंता वाटते ते marriage certificate साठी त्रास देतात त्या लोकांची. आता काय करतील? विवाहित असूनही कोण्या कोपर्‍यातल्या ऑफिसामध्ये जाऊन चक्कर मारायला लावायचे. अहो आम्ही लग्न केलेय. प्लीज आम्हाला सर्टिफिकेट द्या! आता कदाचित ते कमी होतील. दवाखान्यात कदाचित फेऱ्या वाढतील! सिद्ध करा म्हणतील आम्हीच केले! परत कोर्ट म्हणते

"The court further said if necessary either party to a relationship could approach a Family Court for a declaration of marital status by supplying documentary proof for a sexual relationship"

"Documentary proof" हा तासही माझ्या विशेष कुतूहलाचा विषय आहे. आता यासंदर्भात ऑफिसचा फॉर्म कसा असेल याच्या कल्पनेत वेळ जरा छान गेला. आजूबाजूचे लोक म्हणाले असे एकटाच काय हसतोस अधेमधे! मी म्हणालो futuristic विचार करतोय! काही चतुर मित्रांनी फेसबुकवर खूप नोबल मार्ग सुचवला. म्हणाले टेप करून ठेवा. आणि तेच घेऊन जा ऑफिस मध्ये! म्हणजे आता MMS scandal अधिकृत केल्यासारखे झाले! म्हणजे सगळ्या MMS scandal पटू ना भीती! च्यायला धंदाच बसवला! सरकारी दफ्तरे आता अचानक इंटरेस्टिंग होणार! फायली धूळ खात पडायच्या. आता फायलींचे टेप होणार नी ते नित्य नियमितपणे बघितले जाणार. Fraud ला जागाच नाही हो म्हणजे! वर सगळे कर्मचारी कायम आनंदी. म्हणजे आनंद, परमानंद, अत्यानंद साठी LIC ची policy घ्यायची गरज नाही! Revolutionary निर्णय! बीट नाहीये!

आई बाबांची काळजी मिटेल! मुलं घरी येऊन सांगतील. वर-वधू संशोधनासाठी काय नाव घालते? माझे मागच्याच आठवड्यात लग्न झाले. पुढे म्हणतील की फक्त मला confirm करायचंय की खरच झालं की मला वाटतंय झालं? सगळाच किस्सा सोपा केला! लग्नाच्या आधी करण्याच्या सोपस्कारामध्ये आता divorce decree चा पण समावेश होईल. म्हणजे कभी किधर कुछ गलतीसे हो भी गया हो तो! म्हणजे करिअर कौन्सलिंग मध्ये आता पुढे कशामध्ये स्कोप आहे? या प्रश्नाला आता घटस्फोट या क्षेत्रात बूम येणारे असे लोक सांगायला लागतील! कारण कोर्ट म्हणतं की,

"The court also said if after having a sexual relationship, the couple decided to separate due to difference of opinion, the ‘husband’ could not marry without getting a decree of divorce from the ‘wife’."

राहून राहून मला सारखे वाटते! आपण एका revolutionary generation चा भाग आहोत! किती सार्‍या अभूतपूर्व गोष्टी आपल्या जनरेशन मध्ये घडतायत! काल ही मला परत असे वाटलं!

दिवसाच्या शेवटी परत एकदा बातमी पूर्ण वाचली. दिवसभर जे काही भविष्य रंगवून मनोरंजन केलेलं त्यापेक्षा बातमी जरा वेगळीच होती. एका ठराविक केस मध्ये महिना ५०० नी १००० रुपयांसाठी मारामारी सुरू होती. एकीकडे live-in रिलेशन मध्ये राहून, २ मुलं वगैरे होऊन नंतर एका माणसाने जबाबदारी टाळायचा प्रयत्न केला होता. मुलाच्या जन्माच्या वेळी सही करून दिलेली दवाखान्यामध्ये. तेव्हा जबाबदारी घेतली. नंतर संबंध बिघडल्यावर अलाहिदा! कोर्टाने या एका ठराविक केस पुरता निकाल दिला की बाबा फालतू बडबड करू नको. सगळी history पाहता. तुम्हाला दोघांना नवरा आणि बायको हा दर्जा दिलाच पाहिजे. कार्यालयात जाऊन रिंग नाही घातली म्हणून या जबाबदारीपासून आता इतक्या वर्षानंतर, इतके काही झाल्यानंतर, तू निसटून जाऊ शकत नाहीस! मुकाट्याने जे काही देणं लागतोस ते दे. नी घटस्फोट घे.

परत आता जाऊन स्पष्टीकरण वगैरे देणं आपल्या फेसबुक च्या रुलबुक मध्ये थोडीच आहे. जनता आज दुसऱ्या विषयावर गेलेली आहे. काल एक दिवस या बातमीवर करमणूक करून घेतली. आज दुसरी. काही वेळा या कशातूनही करमणूक करून घेण्याच्या आपल्या सवयीची भीती वाटते यार मला!