Sunday, January 12, 2014

हट्टाने हुतात्मा!प्रत्येकाची आपापली अशी खूप पेशल नि युनिक़ ष्टोरी असतेच की. अगदी, प्रत्येक टपरीवर जसा अगदी एक सारखाच पेशल चाय मिळतो. तसा. तशी आपण एक पेशल वाली आणि एकदम युनिक लाव ष्टोरी लिहिली पाहिजे राव. लव ष्टोरी नाही लिहिली तर मग काय लिहिला! तसं लव ष्टोरीला काय काय लागतं? एक नायक? एक नायिका? नाही. आपण आधुनिक ष्टोरी लिहिणार! त्याला खूप सारे लोक लागतात. तेही असे की ज्यातला खरा नायक कोण होता आणि खरी नायिका कोण होती याचाच पत्ता नाही लागला पाहिजे! (म्हणालो नव्हतो एकदम पेशल वाली युनिक स्टोरी असणारे!).

पहिला मुलगा घ्यायचा. पहिली मुलगी घ्यायची. याचं तिच्यावर प्रेम. तिचं याच्यावर प्रेम. तुम्हाला काय वाटलं? हा शेवट आहे? नाही. ही सुरुवात आहे. यांचा टाईम एक्सिस बदलायचा. म्हणजे तिचं याच्यावर प्रेम, तेव्हा याचं तिच्यावर प्रेम नाही. याचं तिच्यावर प्रेम तेव्हा तिचं याच्यावर प्रेम नाही! अहाहा. आता जमतंय. मग आणखी लोक आणायचे. प्रत्येकाला रोजगार मिळालाच पाहिजे की. जेव्हा पहिल्या मुलाचं पहिल्या मुलीवर प्रेम नाहीये, तेव्हा याच्यावर प्रेम करणारी दुसरी मुलगी आणायची. जेव्हा पहिल्या मुलाचं पहिल्या मुलावर प्रेम नाहीये तेव्हा कोणावर तरी असलं पाहिजे की म्हणून दुसरा मुलगा आणायचा. आता कसं सगळं भरल्या भरल्या सारखं वाटतंय.

पहिला मुलगा, पहिली मुलगी, दुसरा मुलगा, दुसरी मुलगी. ही आपली पात्रं. आता हे हलवलेले टाईम एक्सिस जोडायचे. इंटर्वलच्या आधी तिचे याच्यावर प्रेम. इंटर्वलच्या नंतर याचे तिच्यावर प्रेम. तेच तेच सीन रिपीट मारायचे. फक्त याच्या ऐवजी तिला टाकायचं आणि तिच्या ऐवजी याला टाकायचं. सारांश असा की दोनही मुलांचे पहिल्या मुलीवर प्रेम. आणि दोनही मुलींचे पहिल्या मुलावर प्रेम. आता हे बघून तुम्हाला बुलीअन एक्वेशन आठवली असतील तर तुम्ही खरे इंजिनिअर! फक्त आपली ष्टोरी पेशल करायचीये न म्हणून टाईम एक्सिस हलवलाय आपण. तर या सगळ्याच्या इंटरसेक्शन मध्ये पहिला मुलगा नी पहिली मुलगी एकत्र येणार असं वाटत असेल तर फसलात राव तुम्ही. मग ष्टोरी सुरूच कशाला केली असती? आता परम्युटेशन कोम्बीनेशन लावायची. कथा सशक्त झाली पाहिजे न?

पहिल्या मुलाला पहिली मुलगी आवडायला लागली तेव्हा त्याच्यावर दुसऱ्या मुलीचं प्रेम होतं. मग तिला थोडा वेळ तटस्थ ठेवायचं. पहिल्या मुलाला उपरती आली की मग घर बार सब कुछ सोडून पहिल्या मुलीच्या मागे पाठवायचं. पहिल्या मुलीला टायटनची जाहीरात करवायची. म्हणजे तिने सांगायचे की टाईम बघ. तेरा टायमिंग गलत हो गया! वो अलग टाईम था. ये अलग टाईम है. शाळा कॉलेजपासून सगळ्या ठिकाणी लेट पोहचत असला तरी असा दणका त्याला पहिल्यांदाच मिळालाय असा विशेष खुलासा करायचा. मग ह्युमर टाकायचा. मुलाला घड्याळाची दुकानं पालथी घालायला लावायची. तुम्हाला काय वाटलं? परत दुसऱ्या मुलीकड पाठवू आपण त्याला? मग शहाणा म्हणाल की त्याला तुम्ही? असं नाही करायचं. दुसऱ्या मुलीला तटस्थतेतून जागं करायचं. पहिल्या मुलानं अकलेचे धिंडवडे काढलेले बघून तिनं तरीही त्याला परत यायची ऑफर द्यायची. आणि मग हे इथंच सोडायचं. लोकांना कुतूहल वाटलं पाहिजे की! म्हणजे पहिला मुलगा अक्कल थोडी वापरणार की अखंड असाच गुळ काढत बसणार याचं!

तेव्हा इकडे दुसऱ्या मुलाला हळू हळू पहिल्या मुलीच्या प्रेमात पडायचं. (नीट वाचत नाही बा तुम्ही राव. मगाशी दुसऱ्या मुलाचे प्रेम आहे असं थोडीच म्हणालेलो आपण? फक्त मुलीलाच प्रेमात पडलेलं की नाही?). मग सरसकट सगळ्याचाच आवाका वाढवायचा. प्रत्येक पत्राला अधे मधे जग हिंडावंयचं. अगदीच intense इमोशन हव्या असतील तर सगळ्यांना तसंही वेगवेगळ्या भागात राहायला पाठवायचं. तात्विक प्रेम आहे असं म्हणू हवं तर. उगाच सगळे एकत्र कशाला हवेत? तसंही आपली युनिक आहे की नाही ष्टोरी? ग्लोबल विलेजचा मुद्दा मांडायचा. पहिल्या मुलाला तसंही गुळ काढत बसायला आवडतच की. त्याच्या तोंडून अधे मधे तत्वज्ञान वदवायचं. (अहो रेड्यानं देखील गीता म्हणालेलीच की!)


आता या नंतर दोन तीन पर्याय ठेवायचे शेवट करण्याचे.
प्लीज. पहिला मुलगा पहिली मुलगी नाही एकत्र येऊ शकत. कारण ष्टोरी पेशल आहे आपली. ते सोडून विचार करू. तसंही आपल्याला हे सगळं एकत्र आणताना खूप सारा त्याग आणि खूप सारं तत्वज्ञान दाखवायचंय.

एक lite version असं असू शकतं.पहिल्या मुलाने परत दुसऱ्या मुलीकडं जायचं. जैसे थे.
पहिल्या मुलीनं दुसऱ्या मुलाकडं जायचं. जैसे थे.
आपण कसे थिरथिरे नाही हे दाखवून द्यायचं.
पहिल्या मुलानं पुढे जाऊन गुळाच्या बिजिनेस मध्ये invest कारचं.
पहिल्या मुलीनं पुढे जाऊन घड्याळाच्या बिजिनेस मध्ये invest करायचं.


मग standard version असं असू शकतं.पहिल्या मुलीनं टायटनची brand ambassador व्हायचं. माघारी फिरायचंच नाही. दुसऱ्या मुलाकडं घड्याळ जरी असलं तरी ते स्लो चालतंय याच्याबद्दल काहीतरी जागतिक प्रयत्न करवून आणायचे.
पहिल्या मुलानं गुळाच्या ढेपा बनवायचा लघुद्योग सुरु करायचा - बाबाजीका ठुल्लू गुळ केंद्र!
दुसऱ्या मुलानं thanks giving ला स्वस्तात iPad मिळाल्यासारखं खुश व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीच्या कामाला लागायचं.
दुसऱ्या मुलीनं अचंभित होऊन सगळीकडं बघायचं आणि शहाण्या माणसानं यांच्या नादी लागू नये असं म्हणून शहाण्यासारखं यातून बाजूला व्हायचं.


मग premium version असं असू शकतं.पहिल्या मुलीनं टायटनची brand ambassador व्हायचं. माघारी फिरायचंच नाही. पुढे रोलेक्स घड्याळवाल्याबरोबर टायमिंग साधायचं.
दुसऱ्या मुलानं thanks giving ला स्वस्तात iPad न मिळाल्यानं फारसं नाखुश नाही व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीच्या कामाला लागायचं.
पहिल्या मुलानं गुळाच्या ढेपा बनवायचा लघुद्योग सुरु करायचा - बाबाजीका ठुल्लू गुळ केंद्र!
दुसऱ्या मुलीनं गुळ केंद्राला भेट देऊन पहिल्या मुलाला थोडी अक्कल शिकवायची. आणि शेवटी परत अचंभित होऊन शहाण्या माणसानं यांच्या नादी लागू नये असं म्हणून शहाण्यासारखं यातून बाजूला व्हायचं.


मग gold version असं असू शकतं.
एकदम गोव्यामध्ये जायचं. चौघानाही बिड्या फुकत, दारू हाणत, बीचवर हिप्पी झालेलं दाखवायचं!


मग limited version असं असू शकतं.
चौघांनी मिळून विपश्यना करायला जायचं!
Post a Comment