Tuesday, February 18, 2014

अजनबी

अनोळखी शहरामध्ये आपुलकी सापडायची तिला. नवी नाती. नवी माणसं. कुठलाही पूर्वग्रह नाही. कुठलीही अपेक्षा नाही. उडत उडत आपोआप ती सर्वात उंच इमारतीच्या छतावर जाऊन पोहोचायची. टेकडी असेल, कधी कोणा अपार्टमेंटच्या टेरेस असेल, कधी कोणा restaurant मध्ये असेल. असं ठिकाण की जिथून अख्ख्या शहराचा आराखडा दिसावा. ते ठिकाण तिचं हक्काचं असायचं. नव्या शहराला लग्गेच आपलसं करायचा हा तिचा सर्वात आवडीचा मार्ग. तासंतास अशा ठिकाणी बसून राहायला तिला आवडे. "इथलं काहीच माहिती नाही" पासून, ते "यहासे दूर जहातक नजर जा रही है, वो सब मेरा इलाका है" असं फिलिंग येईपर्यंत. शहरांमध्ये चुकून कोणीतरी पेहचान का असलाच तरी तिला कोणीही रिसीव करायला नाही येणार, ही तिची अट असायची. कारण, बऱ्याचदा ती एक दिवस आधीच आलेली असायची. हा पहिला दिवस तिला स्वतःसाठी लागायचा. खूप उंचावरून पाण्यात उडी मारायच्या आधी, कठड्यावर काही क्षण काढतात न. तसा हा एक दिवस तिला लागायचा. यासाठी आदल्या दिवशी दुपारी किंवा रात्रीच पोहोचायची तरतूद केलेली असायची. शहर अगदीच अनोळखी असेल तर असलं काही करण्याची गरजच नाही.

रात्रीच्या काळोखात जे शहर दिसतं ते दिवसा नाही दिसू शकत अशा मताची ती. काळोखात न्हाऊन गेलेलं शहर. त्यामध्ये ती मिसळून जायची. या काळोखात समोर स्वतःचं तर प्रतिबिंब तर दिसत नाहीये न? हा प्रश्न तिला कधीच न सुटलेला? म्हणून तिनं असले प्रश्न ऑप्शनला टाकलेले. तसं असायचं काय समोर? लुकलुकणाऱ्या पिवळ्या नि लाल रंगाच्या लांबलचक ओळी. संपूर्ण शहरामधून अखंड पाळणाऱ्या. अधून मधून आपण बीझी असल्याचा चित्कार टाकणाऱ्या. कितीही उंच असली, तरी तिला ग्रीट करायला ते आवाज यायचेच. प्रत्येक शहराचा आवाजही वेगवेगळा. काही वेळा तिला ते आवाज मोठे वाटायचे. काही वेळा त्रस्त. काही वेळा निर्विकार. तर काही वेळा मौनी बाबासारखे, कळून न कळल्यासारखे. या आवाजाबरोबर त्या लाल पिवळ्या रांगांची चुळबुळ. बाजूला पांढर्‍या पिवळ्या पण अजिबात न लुकलुकणाऱ्या खिडक्या. काही पडद्या आड, काही काचे आड, काही गजा आड, तर काही सताड उघड्या. कदाचित प्रत्येक खिडकीची आपली आपली गोष्ट. तरी दुरून सगळ्या एकसारख्याच. रात्र जसजशी वाढत जाई, तसतशी ती लाल पिवळ्या ओळीनी आखलेली गडबड कमी होत जाई. खिडक्यांच्या पलीकडल्या गोष्टीना अर्धविराम मिळे. जीवाच्या आकांताने काहीतरी विकण्यासाठी अखंड जळत असलेले निर्विकार रंगीत साईन बोर्डस, हे एवढेच काय ते बाकी उरत. तिला हा सगळा बदल टिपत बसायला खूप आवडे. एखाद्या कॅनवास वरचे रंग हळू हळू निसटून, अख्खा कॅनवास आपल्यासाठी कोरा करकरीत होतोय असं तिला वाटे. आता हा कॅनवास रंगवायची संधी तिला मिळणार याचा आनंद कुठेतरी लपलेला असायचा त्यात. याच्याच कुठल्या तरी कोपर्‍यात तिची गोष्ट सुरु होणार. तिचे काही रंग तिथे सांडणार. काही रंग तिच्यावर उडणार. या अशा लघुकथांचं पुस्तक म्हणजे तिचं आयुष्य.

.............................


"मी खुश असेन, मी जे काही करेन त्यात. तुम्हाला आणखी काय हवंय?"
"असलं फालतू तत्वज्ञान नको सांगूस! चार लोक जे काय सांगतायत ते मूर्ख आहेत का?"
"चार चौघांनी केलं म्हणून करणं हे तरी कुठं हुशारीचं लक्षण आहे?"
"जगात तू एकटी हुशार! आम्हाला काही अक्कलच नाही की नाही?"
"मी जर मुलगा असते. तरीही तू मला असच अडवलं असतस?"
"हो. अगदीच अडवलं असतं! काळजी वाटणारच की तुझी!"
"मी चार चार चौघांच्या सारखं करणं तुझ्या लेखी जास्ती महत्वाचं आहे की मी खुश असणं?"
"... तुझ्या बाबांशी बोल तू!"

.............................

"तुझं कुठे काही ..."
"त्याचा काय संबंध?"
"आमचच चुकलं. तुझ्याकड लक्ष न दिल्याचा परिणाम!"
"तुमचं बारीक लक्ष होतं माझ्यावर."
"पण जग असच म्हणणार न!"
"तुम्ही जगाची फिकीर केली असती बाबा, तर मला असं वाढवलंच नसतं!"
"तुझा तो एक मित्र होता न ..."
"बॉंड गीरी करू नका."
"तो नसतो आज काल तुझ्या बरोबर."
"तुमचे ते एक टक्कल पडलेले, जाड काळा चष्मा घालणारे उंच मित्र होते. ते आज काल नसतात तुमच्या बरोबर!"
"या गोष्टी सारख्या नाहीयेत! उगाच अक्कल दाखवू नको! चार माणसं सांगतात म्हणून मुद्दाम हट्टानं उलट करायला बघातेयास तू!"
"मला सांगा मग, हे जे तुम्ही आणि आई ने, चार चौघांसारखे, चार चौघांसारखे वगैरे जे सुरु केलाय, तसं केलं की मगच माणूस खुश होतो. याची शाश्वती काय?"
"आम्ही खुश नाहीये का? आम्ही चार चौघांसाराखेच केले न? काय वाईट आहे त्यात?"
"इतका घाम गळून, इतकं शिकून, इतके कष्ट करून जर जीवाच्या आकांताने चार चौघांसाराखेच करायचे असेल तर मग काय मजा? तुम्हालाही तुम्ही काय म्हणताय ते पटत नाहीये बाबा! मान्य करा!"
"... तुझ्या आईशी बोल तू!"

............................

प्रत्येक शहरातली तिची माणसं वेगळी. त्यांच्याबरोबरच्या गोष्टी वेगळ्या. त्या सगळ्यांची ती आवडती. भिरभिरणाऱ्या फुलपाखरासारखी. जितक्या लवकर नव्या शहरामध्ये मिसळायची, तितक्याच लवकर त्यातून अलिप्त होऊन पुढेही निघून जायची. अशा या नव्या शहरांना मिठी मारण्यासाठी तिला अशा उंच जागांची गरज लागायची,

"Madam. It's closing time."

मंद वाऱ्यात उडणारे तिचे केस खूप लांबूनच लक्ष वेधून घ्यायचे. तेच थोडे बाजूला सारून, मग ती म्हणायची, "अरे यार ... आणि थोडा वेळ बसू दे न!!" समोरच्याची भाषा कुठलीही असली, तरी त्याला हे कळून जायचं. नाही कळलं तरी, तिच्या चेहऱ्याकडं बघून तिला नाही कोणीच म्हणायचं नाही! अतरंगी जागा शोधून काढायची ती, म्हणून बऱ्याचदा security guards च तिला हाकायला यायचे!

"Just a few more minutes Madam. We got to close it now!" किंवा "We don't allow anyone here" असलच काहीतरी म्हणायचे. पण तिला नाही म्हणणं त्यांच्या जीवावर यायचं! काही लोकांना हे वरदान असतं. तिलाही ते होतं!

"Thank you so much friend!" आणि अनोळखी शहरात तिनं हा पहिला मित्र बनवलेला असायचा.
Post a Comment