Sunday, April 20, 2014

प्रियकर, प्रेयसी आणि प्रेम!

परवा कसला सही दिसत होता यार चंद्र! पूर्ण चंद्र ग्रहण होतं. बघितलं? लाल लाल बुंद झालेला. नासानं लाइव दाखवलं पण होतं. किती दुर्मिळ योग! भारतामधून नाही दिसला याचं एक दुःख राहीलच. हे सगळं दिवसभर बघून, वाचून, संध्याकाळी टेरेसवर कॉफी घेऊन गेलो. तिथे लाल बुंद चंद्र दिसला. अहाहा. म्हणजे असा किती वेळा दिसतो सांगा न? म्हणजे चंद्राचे इतके बारकावे नुसत्याच डोळ्यानं दिसत होते. दुर्बीण वगैरे असती तर आणि काय काय झालं असतं. एक टक बघत राहिलं त्याच्याकडे तर 3D असल्यासारखा पण दिसत होता. तसा एरवीपण दिसतोच पण तेव्हा जरा जास्तीच. काय काय लिहावं या घटने बद्दल ते कमीच. प्रभावित होऊन मी बघत होतो आणि मागून मित्र आला.

"काय छान दिसतोय .. नाही?"
"अगदीच रे"
"एकदम हम दिल दे चुके सनम आठवला!"
मी गप्प.
"अगदी चांद छुपा बदलमे ... शर्माके मेरी जाना ..."

इतकं out of context कोणी येऊन का असं डिस्टर्ब करावं? देव झोपलेला आहे हेच खरं! नाहीतर देवाला तरी हे असं कसं बघवत असेल? आणि चंद्र शर्मा बिर्माके कुठे छुपातोय? म्हणजे हे सुचतंच कसं? अरे समोर बघ मित्रा! कसा लाल बुंद झालाय. ब्लड मून म्हणत होते दिवस भर सगळे याला. काहीतरी वाचावं की! की दिसला चंद्र की लगेच शर्माके बादल के पीछेच घुसवायचा? हे असले प्रकार करत असावेत जग भर, म्हणूनच लाल बुंद झाला असावा चंद्र. सांगत असेल की अरे बाबानो, थोडी तरी इज्जत करा!

"नाही रे. ते नाहीये आठवत मला." आपला मूक निषेध नोंदवायचा माफक प्रयत्न केला. दिवसभर जे वाचलं ते आठवायचं सुरु होतं. पण हा माणूस ऐकायला तयार नव्हता.
"हं. सपने न मग? चंदा रे, चंदा रे. कभी तो जमीपे आ ... काय गाणं आहे राव हे! आज खासच आहे चंद्र! एकदम romantic! Candle light dinner आणि बाजूला wine चे ग्लास! अहाहा"

बेवडा साला. झिंगूनच असलं असंबंद्ध बोलू शकतात लोक. जमिनीवर कशाला आणतात बाबा चंद्राला. आणि हे असलं म्हणून पोरी कशा काय पटतात यांना? अचाट आहे यार!! मला वाटतं न, या अशा माजलेल्या प्रेमप्रेमी लोकांमुळे एके दिवशी आकाशातून चंद्रच गायब होईल. त्यानं तरी कितीकाळ सहन करावं न? Identity Crisis किती बघा न! पृथ्वीच्या काळजाचा तुकडा बिचारा. पण त्यातही काही शास्त्रज्ञाना प्रोब्लेम आहे. म्हणजे जन्मापासून बिचाऱ्याला त्रास. हा आला कुठून? आतला माणूस आहे की परप्रांतीय? इथून सुरुवात. आता इतकी वर्षं मुकाट्यानं फेरे मारतोय न पृथ्वीचे, मग कुळ कायद्यानं घ्या की त्याला आत. द्या त्याला हक्क. पण हे असले गहन प्रश्न सोडून, लोकांनी याला कुठेही कसाही वापरायला सुरु केलंय! प्रेमाच्या नावानं काहीही करायचं लायसन्स असतंच की. (आता स्पायडर म्यान ला पण नाचवला यांनी प्रेमाच्या नावानं तर बाकीच्यांची काय कथा? पण त्याच्याबद्दल परत कधीतरी!) प्रियकराची प्रेयसी लांब गेली की चंद्र, जवळ असली की तरीही चंद्र. तिच्या चेहऱ्यात चंद्र, चंद्रात ती. चंद्राचा ओवरयुज करून शेवटी लग्न झालं की मग मधुचंद्र! चंद्राच्या कोरीमध्ये आणि शंभर गोष्टी दिसायच्या! चंद्रा बरोबर चांदनी असते, कधी चंदानिया असते. या त्याच्या बहिणी की त्याच्या बायका? हे ही एक न उकललेलं कोडं आहे. बायका असतील तर कृष्णाला सोलिड स्पर्धाच की! एकूण काय तर आपण सोडतच नाहीत चंद्राला. या सगळ्यात त्याचा काहीही संबंधही नाही. त्याला कळतच नसेल की का बाबा मला गोवताय या सगळ्यात?

आता त्या बिचाऱ्याला आपली मतं मांडता येत नाहीत. पण मूक प्राणी वगैरेंवर दया बिया आपण करतच नाही तसंही न? प्रेयसीच्या चेहऱ्यात चंद्र वगैरे दिसणं हा अपमान नाही वाटत समस्त प्रेयासीना? चंद्रावर इतक्या काय प्रेमकविता खपाव्यात? म्हणून Woman Empowerment गरजेची आहे. कॉंग्रेसला कळलंय ते बरोब्बर. (इलेक्शन आहे म्हणून काहीतरी उगाचच आपलं पोलिटिक्स बद्दल! मनावर घेऊ नका नाहीतर तुम्हाला चंद्राची शपथ आहे!). मुलीनी परखड उत्तर दिलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. एकतर सुरुवार सणसणीत थप्पड मारून झाली पाहिजे. "चंद्रामधलं काय बघून तुला मी आठवले रे? इतके डाग त्याच्यावर. ते डाग म्हणजे मुळात खड्डे आहेत मोठे मोठे! एक lifeless मोठा खडक चंद्र!! तो बघून तुला मी आठवूच कशी शकते?" हा प्रश्न मुलीनी विचारला तरच काहीतरी होऊ शकेल. चंद्राच्या नावावर ही जी काही अंदाधुंदी सुरुये, ती थांबलीच पाहिजे.

तशा मुलीही कमी कुठायत? चंद्राची साक्ष बिक्ष काय काढता अरे!! आपल्या प्रेमाला चंद्र कसा काय साक्षीदार असू शकतो? उद्या कोणाला पुरावा हवा असेल तर चंद्रावर जाऊन शोधा! ती एक लक्ष्य मध्ये प्रीती झिंटा म्हणाली ब्वा की मला चंद बिंद्र म्हणू नको नाहीतर मार खाशील. पण ते हिरोला झेपत नाही आणि तो थेट सैन्यातच भरती होतो! आता हे संस्कार केल्यावर कसं व्हायचं? कोण मुलगी धाडस करेल मग?

पूर्वीच्या काळी, चंद्रावर संशोधन करणाऱ्याना म्हणे खूप विरोध असायचा. म्हणायचे, देव आहेत ते. त्यांना त्या लेवल वरून खाली नका आणू. मला वाटतंय की त्यांना म्हणायचं असेल की चंद्राला त्या लेवलवरून खाली आणू नका, लोकांना झेपणार नाही! देव नाही आहेत ते म्हणालात तर लोक उभी आडवी केस घेतील! त्या लोकांना नक्की भविष्य दिसलं असणार. अतिपरिचयात अवज्ञा! म्हणून नको म्हणत असतील.

असो. शेवटी, मी कॉफी संपवली, आता काम आहे, म्हणून टेरेस वरून कटलो. तो मित्रही कटला. म्हणजे त्याचा काहीही इंटरेस्ट नव्हताच त्या चंद्रात. जणू काही, माझी तपश्चर्या भंग करायला पाठवलेला त्याला! सेक्स रेशो कमी होत चाललाय. देवालाही मेनका भेटली नसेल म्हणून याला पाठवला असणार. काय करणार? आपलं नशीबच असं! कसं आयुष्य काढतोय माझं मला माहिती! खरं सांगतोय. चंद्र साक्षीदार आहे!

No comments: