Tuesday, July 08, 2014

जरा चुकलंच! नाही?



महाराज जेव्हा महाराज व्हायचे होते, तेव्हाची गोष्ट ही. पण महाराज, महाराज असल्यामुळे, त्यांना आता महाराजच म्हणू. तसेही कोणाच्या धार्मिक, मानसिक आणि शारीरिक भावना दुखावण्याचा आपला अजिबात विचार नाही. तर एकदा नेहमीसारखेच महाराज सह्याद्रीच्या कडेकपारीमधून घोडदौड करत आपल्या किल्ल्यात परत आले. मावळ्यांची दीन अवस्था बघून महाराजांना दया आली. महाराजांना सारख्या येणाऱ्या या दयेमुळे "महाराजांना दादोजींच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवा" हे जिजाऊंचे पत्र कोणीतरी मधल्या मध्ये बदलून "महाराजांना स्वराज्याची स्वप्नं पडू लागलीत म्हणून त्यांना कौंसलिंगला पाठवा" असं करून महाराजांना पोच केलं. जिजाऊनी केलेला आदेश म्हणून महाराजांना पर्याय नव्हता. ते गेले कौन्सलिंगला. तिथे समोर एक इंग्रज बसलेला - केन रुदरफोर्ड. इंग्रज का म्हणाल तर उगाच त्याच्या आडनावावरून त्याची जात हुडकायचा प्रयत्न होऊ नये म्हणून! नाहीतर पुढची गोष्ट वाचायच्या आधीच बरेच निष्कर्ष काढले जायचे! हा केन भविष्यातून भूतकाळात आलेला म्हणे. किंवा अशी आख्यायिका तरी होती.

महाराजांनी आपले विचार त्यासमोर मांडले, "आमच्या या भूमीवर आमच्या माणसांची ही अवस्था? हे बरोबर नाही. स्वराज्य झालेच पाहिजे. या लोकांसाठी मला काहीतरी करायचंय. आणि यासाठी माझे आयुष्य गेले तरी बेहत्तर. पण हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा!"

केनने महाराजांकडे 'तुषार कपूरचा पिच्चर बघतोस का?' असं विचारल्यासारखी नजर टाकली. (म्हणजे खूप कौतुकाच्या भावनेनं. असं म्हणायचं होतं. नाहीतर आपल्याला तुषारच्या चाहत्यांच्यापण भावना दुखवायच्या नाहीत) "छे रे वेड्या. असं थोडीच करतात?" महाराजांना वेड्या म्हणाल्यामुळे चार मावळ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्यांनी लगेच तलवारी काढल्या. बाह्यावर केल्या. एखादातरी तबेला किंवा अभ्यासिका फोडण्यासाठी त्यांनी तडक गावाकडे धाव घेतली. हर हर महादेवच्या आरोळ्या ऐकू आल्या. केन पुढे बोलू लागला. "आता उद्या म्हणशील की तुला मुघल राजांना पळवून लावायचंय. असं नसतं करायचं ब्वा! तो बघ तो तानाजी. बिचाऱ्याचा पोर लग्नाला येणारे. तुझ्या नादाला लागला तर उद्या त्याचं लग्न बाजूला ठेवून तुझ्याबरोबर गावभर फिरायला येईल! तो बाजी बघ. उद्या तो ऑनसाईट जायचं स्वप्नं बघू शकेल. पण तू नादी लावलास तर पन्हाळ्याच्या बाहेरही पडायचा नाही!"

महाराजांनी आपला मुद्दा परत मांडायचा प्रयत्न केला. केनला कळू शकेल अशी अजूनही त्यांना अशा होती.
"राष्ट्राची निर्मिती किंवा विकृती ही केवळ आपल्या आणि आपल्याच कर्माने होते. हा विचार लोकांच्या मनात रुजवण्याची गरज आहे! स्वराज्य निर्मितीचं कार्य एकट्या दुकट्याच नाही? स्वराज्याचं स्फुल्लिंग या मावळ्यांच्या मनात पेटलं पाहिजे. गुलामगीरी मिटवण्यासाठी त्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला पाहिजे! मग प्राण गेले तरी बेहत्तर. मग ते प्राण माझे असो किंवा या मावळ्यांचे. हे राज्य स्वर्वांचे होईल. इथल्या लोकांना सक्षम बनवता येईल. आता रायारेश्वारी स्वराज्यस्थापनेची शपथ आणि मग काम सुरु. इथल्या लोकांना मिळत आलेली दुय्यम वागणुक आता थांबली पाहिजे. हे सगळे एक बनले पाहिजेत."

केनचा पेशन्स संपत चालला होता. त्याने परत एकदा मान नकारार्थी हलवत समजावण्याचा प्रयत्न केला. "विघ्नसंतोषीपणा आहे हा. शंभर वर्षाचा अनुभव आहे हो निजामाकडे? तुझ्या CV मध्ये तुम्ही अजूनही फ्रेशर म्हणूनच दिसतंय. स्वराज्याचा आगाऊपणा कुठे करतो?" महाराजांना आगाऊ म्हणालेला ऐकून आणखी चार मावळे बाह्या वर करून तलवारी काढून गावाकडे धावले. "दुय्यम स्थान नको असेल तर स्वातंत्र्य कुठे घेतो? परत मग तुझ्यावर जबाबदारी यायची यांना सुधारून मोठं करायची. त्यापेक्षा सोपा उपाय सांगतो तुला. जरा futuristic आहे. तडक निजामाच्या दरबारी जा. आणि तिथे या मावळ्यांसाठी एकच गोष्ट माग. माग म्हणजे अगदी हट्टच धर. सोडूच नको. निजामाला सांग की बघ या लोकांच्याकडे. कसे दीन आहेत. मागासलेले आहेत. यांना संधी हवी. तर यांच्यासाठी एकच गोष्ट दे. आरक्षण! मग परत ये इकडे. ज्याचा ज्याचा तुला उत्कर्ष करायचा आहे त्याला त्याला मग आरक्षण बहाल कर. ... ... हे बघ. तुला आत्ता झेपणार नाही हे. पण आजपासून तीनशे ते चारशे वर्षानंतर जी प्रगत मनुष्यजात असेल ते हेच करणारेत. तू आज तसे केलास तर इतिहासामध्ये तुझं नाव दूरदृष्टी असलेला म्हणून होईल. ...

एक दूरदृष्टी असलेला ...

एक दूरदृष्टी असलेला बलाढ्य निजामाचा प्रामाणिक सरदार ... शिवाजी भोसले (१६ टक्के आरक्षित)."

============================

कृपया, हे वाचून कोणी बशी आणि बशा फोडू नयेत. कारण तो हेतू नाहीये.
खरं सांगू तर मला हा खेळच कळत नाही. २१ मे २००६ रोजी मी एका आरक्षण विरोधी मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. आज त्याला नऊ वर्षं होऊन गेलीत. आपल्याला एक नवं आरक्षण देण्यात आलंय. स्वातंत्र्य मिळवून इतकी दशकं उलटली तरीही आम्ही लोकांना मागासच ठेवलंय म्हणून मिरवायचं पदक!

या मुद्द्यामध्ये इतकी क्लिष्टता बाळगली जाते की काय सांगा? क्रिमी लेअर, उत्पन्न पातळी, तात्विक मुद्दे, तांत्रिक मुद्दे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भावनिक मुद्दे! काहीही बोलायला जा की कोणाच्यातरी भावना दुखावतात! तुमचा उद्देश्य काहीही असो. तेवढेच पुरात नाही. मग कशाला पडा यात?

मला आता खूप भीती वाटतेय. माझ्या, आपल्या, सर्वांच्या आरक्षित भविष्याची. पावलो पावली भावना दुखावून घेणाऱ्या समाजाची. कदाचित हे लिहिल्यामुळे कोणाच्या दुखावलेल्या भावनांची. आणि म्हणून माझ्या भविष्याची. आडनावावरून जात हुडकत फिरणाऱ्या सुशिक्षितांची. यावर आपण काहीच करू नाही शकत या रुजत चाललेल्या भावनेची. एसी ऑफिसमध्ये बसून जगातल्या तमाम मुद्द्यांवर लिखाण करून तात्पुरते समाधान मानणाऱ्या तरुणांची. "तू त्यात नको रे पडू!" असं सांगणाऱ्या जिजाऊंची.

============================

असाही विचार केला तर ... की या सगळ्यात महाराजांच्याच भावना दुखावल्या गेल्या असतील? महाराज सोडा, एकूणच स्वातंत्र्यासाठी जे जे झटले त्यांच्या भावना वगैरे दुखावल्या असतील? आरक्षणच हवं होतं तर मग स्वातंत्र्य कशाला घेतलं? गांधी, टिळक, आझाद यांनी आरक्षणच मिळवण्यासाठी लढायचं होतं न? जरा चुकलच त्याचं! वेगळी "strategy" करायला हवी होती! किंवा माझच चुकलं असेल. आणि असेल तर हे लिहिल्याबद्दल सर्वांची बिनशर्त माफी.

No comments: