Friday, August 15, 2014

माझा मेसेज बघा ... माझा मेसेज बघा!



माझा मेसेज बघा... माझा मेसेज बघा...
अहो वर आणखी दोघांनी तोच जरी टाकला असेल तरी मी परत टाकलाय बघा.
उद्या मी काही लक्षात ठेवणार नाहीये, पण तुम्हालाही आठवणार नाहीये.
तेव्हा आज तुम्ही माझा मेसेज बघा.
तसा मीही तो पाहिलेला नाहीये. इकडून आला, मी तिकडे चिकटवला.
कसा त्वरीत चपखल चिकटवलाय पहा.

उपलब्ध अशा सगळ्या माध्यमांवर आपल्या नावाचा एक मेसेज टाकून घ्या.
एकाहून जास्ती मेसेज टाकला तरी कोणी वाचणार नाहीये ... काळजी करू नका!
आपल्या भरघोस भक्तीची मग स्वतःलाच पावती द्या.
बाकी देशप्रेम?
ते आपल्या आपल्या सवडीने करायला आपण स्वतंत्र आहोतच की!

अहो प्रधान मंत्री आज बोलले. तेही बिना कागद घेता बोलले!
म्हणाले खेड्यांचा विकास करूया, भारत स्वच्छ करूया,
म्हणाले डिजिटल इंडिया बनवूया!
अहो पण एक तासभर बोलले. त्यांना असेल एक तास वेळ. आपल्याला थोडीच आहे!
पण आपला आजचा कोटा संपला! आता मग?
आता हे सगळं बाकीचं आपल्या सवडीनं बघण्याला आपण स्वतंत्र आहोतच की.

थांबा जरा, एक जोक आलाय.
पूर्वीचा एक नेता कसा काहीच बोलत नव्हता त्याबद्दल लिहिलंय.
शेवटी जय हिंद आहे. आणि सच्चा देशप्रेमी असाल तर शेअर करा म्हणून लिहिलंय.
आता हे करूच शकतो. देशासाठी इतका वेळ देऊच शकतो.
हे लगेच फोरवर्ड करायला आम्ही स्वतंत्र आहोतच की!
तेव्हा तुम्ही आत्ता तो फॉरवर्ड केलेला माझा मेसेज बघा.


पण तरीही काही वेड्यांना आज परत स्फुरण चढेल.
झेंडा वंदन, सफेद कुरते, जिलेब्या, पेढे, राष्ट्रगीत हे सगळंच आठवेल!
सगळे स्वातंत्र्यवीर आठवतील. आणि त्यांच्यात स्पर्धा नसेल.
कारण हा जल्लोष स्वातंत्र्याचा! यामध्ये कोणा दुसऱ्या राष्ट्राचा द्वेष नसेल.
यामध्ये स्वतंत्रता या कल्पनेचा आदर असेल. सगळ्यांचा उद्देश्य एक असेल.

वर्षभर जाण ठेवण्याचा. जागृत राहण्याचा.
एक सशक्त, आदरणीयदेश बनवण्याचा.
आज दिवसभर जेकाही संकल्प केले, ते पूर्ण करण्याचा.
आणि यांच्यावर उद्या मेसेज बनतील. आपण पुढच्या वर्षी तेही फोरवर्ड करूया.

किंवा आपल्यावर मेसेज बनतील असे काहीतरी बनायचा संकल्प बनवूया!

वंदे मातरम!


वेड्या लोकांसाठी,
Prime Minister's Entire Independence Speech
Just in case



Image Credit: http://beta.metastudio.org/static/img/damitr/tricolor.jpg

No comments: