Thursday, January 01, 2015

Perfectly Awesomely Average!

खूप खूप पूर्वी माणसाला फारशी अक्कल नव्हती. मग हळूहळू जशी अक्कल आली, तसं त्याला वाटायला लागलं की आपण खूप भारी आहे. पण लवकरच त्याच्यासारखी अक्कल असलेली बरीच माणसं त्याला दिसू लागली. मग त्याला वाटलं की पृथ्वी खूप भारी आहे! आपण सगळे राहतो त्यावर. बाकी सर्व आपल्या भोवती घिरट्या घालतंय! पण मग कळलंकी तसं काही नाहीये; आपण सगळे सूर्याभोवती फिरतोय. अगदीच वाईट वाटू नये म्हणून चंद्र होता आपल्या भोवती फिरणारा. पण मग त्यानं कुणाचं समाधान होणार? मग माणसाला वाटलंकी सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांपैकी आपली पृथ्वी म्हणजे लयी भारी. पण तेही समाधान फार काळ नाही टिकलं. कळलं की आपल्या या कुटुंबामध्ये गुरु, शनी वगैरे बाप माणसं पण आहेत. आपल्याला माहिती नव्हतं  तरी काय झालं? पृथ्वी फक्त त्यांपैकी एक खूपच साधारण आकाराचा आणि प्रकारचा ग्रह आहे. बस. नसर्वात मोठा. न सर्वात लहान. Perfectly average!

मग माणसाला असं वाटायला लागलं की आपला सूर्य एकदम भारी. याच्या पलीकडं काही नाही. हेच महान! पण छ्या हो. ते ही नाही. करोडो आहेत म्हणे सूर्य. आणि जवळपास प्रत्येक सूर्याची आपली आपली एक सूर्यमालिका! म्हणजे आपला सूर्य खूपच साधारण असा. ना खूप मोठा, ना खूप छोटा! Perfectly average!

मग या सगळ्या सूर्याना सामावून घेणारी आपली galaxy! ती तरी भारी असावी असं कोणाला तरी वाटणार इतक्यात कळलं की बाबा तसही नाहीये काही. कारोडो galaxies आहेत म्हणे. त्या पैकी आपली आहे एक. साधारण. Perfectly average!

Perfectly average! पण आपल्या सर्वांच्या अस्तित्वाला कारणीभूत. Spectacular. आपल्या सगळ्या लहान मोठ्या गोष्टीना सामावून घेणारी. Nonetheless a very beautiful place. युनिक असण्याचा सुंदर असण्याशी काय संबंध तसाही? 
पण आपला भूतकाळ बघता, ते तसं पुरत नाही आपल्याला कदाचित.

हे सगळं आज का? तर काही कारण असं नाही. जरा वाई वरून सातारा गाठतोय. माजेशीर वाटला हा मुलभूत गुण आपला. आपण कसे स्पेशल, युनिक आहोत हे स्वतःलाच पटवून देण्याचा. आता वर जे काही लिहिलंय ते तर सगळं विज्ञानाची कास धरून होतं तोपर्यंत विषय वेगळा होता! पण जित्याची खोड आहे आपली ती! अशी कशी जाणार? शास्त्राला निःशस्त्र करून बऱ्याच आघाड्यांवर ही वेगळेपणाची घोडदौड सुरु आहेच की. नाही?  मी कसा वेगळा? किंवा माझा गाव कसा वेगळा? किंवा माझा रंग कसा श्रेष्ठ? किंवा माझा धर्म कसा बेष्ट? आणि काय नि काय! कशाचा आनंद घ्यावा, आणि कशाचा अभिमान बाळगावा या मधली गल्लत. आता यामध्ये कुठलं विज्ञान सांगता आणि कुठलं काय?

खरंच गरज आहे का आपण वेगळे असण्याची? आपण स्पेशल असण्याची, श्रेष्ठ असण्याची आवश्यकता का भासत असेल आपल्याला? What if we are just perfectly average? What if that's how it is supposed to be?

एका आजोबांशी याबद्दल बोलताना त्यांनी खूप सुंदर उदाहरण दिलं. ते हसले आणि म्हणाले, “किती वेगळं असलास म्हणजे पुरेल तुला? याचा मापदंड कळला की प्रश्न मिटेल. कारण मग पुढे काही उरणारच नाही.

जंगल बघितलंयस? तुम्ही लोक सुट्टी काढून ग्रीनरीच्या नावानं बघायला जाता आवर्जून, ते वालं जंगल! खूप सारी झाडं, आणि त्यांची सळसळणारी असंख्य पानं! बघितालीयेस? आपण माणसं आणि ही पानं फुलं थोड्या फार फरकानं एक सारखीच. तीही आपल्यासारखी असंख्य आहेत. आता बघितलंस तर प्रत्येक पान, प्रत्येक फूल त्याच्या त्याच्या परीनं खूप युनिक असतं. खूप खासप्रकारे बनलेलं. आणि ते तेवढं वेगळेपण त्यांना पुरेसं असतं. आता त्यांना हे कळलंय आणि आपला स्ट्रगल अजून सुरुये. हा एवढाच फरक. ती पानं फुलं त्यांच्या आपापल्या असण्यावर  खुश आहेत. आणि आपल्याला आपलं असणं पुरत नाहीये.”

मला खूपच आवडलंय हे उदाहरण. आज सरत्या वर्षाच्या काठावर बसून येत्या वर्षाकडे पाहिलं तर असं वाटतंय की, हे वर्ष, आपल्या असण्यात रमायला शिकवेल. आजूबाजूच्यांना त्यांच्या असण्यात रमू देईल. जे ब्रह्मांडामध्ये नाही, ते पिंडामध्ये असण्याचा हट्ट सोडायला लावेल. “मी श्रेष्ठ आणि बाकी कनिष्ठ” यात नसलेली मजा आणि “माझ्याच रंगात रंगलेले सगळे” या हट्टा मधला बेरंग समजावून देईल! नव्या गोष्टी तर करूच. पण प्रगतीच्या दिशेने. वेगळेपणाच्या किंवा श्रेष्ठत्वाच्या चढाओढीने नाही. बाकी जे आहे ते तसच छान आहे. Perfectly average. काहीही extravagant असायची गरजच नाही.

I had a perfectly average last year. And I wish to have a perfectly average next year too. I think, it will be wisely beautiful. Perfectly awesomely average! 

Wish you the same! :)



No comments: