Wednesday, April 01, 2015

मै आजाद हू रे बाबा!

स्वातंत्र्याच्या नावाखाली गाढवपणा करून दाखवायचा. मग आपल्या गाढवपणाला गाढवपणासारखं ट्रीट केलं की खवळून उठायचं. हा गाढवपणा करताना फुकट मिळालेलं लाख मोलाचं "स्वातंत्र्य" वापरलं! म्हणून गाढवपणाच्या बाजूने नसलेले सगळे लोक, थेट स्वातंत्र्याच्या विरोधात उभे कारायचे! आणि मग त्यांची मुबलक अक्कल काढत बसायचं. इंटरनेट आहे आपल्याकडं. मग जगाच्या पाठीवर अजून कुठे कुठे गाढवपणा घडलाय याचे दाखले द्यायचे. आणि इतके सगळे दाखले असताना अजून गाढवपणाची सवय कशी काय झाली नाही यावर शाब्दिक कचरा करायचा. हा कचरा कमी पडेल का काय म्हणून कदाचित मग सगळ्यांनी मिळून "गाढवपणा"ची व्याख्या लिहावी असा हट्ट करायचा. त्यात तुमची व्याख्या बरोबर की आमची बरोबर असं करत करत इंच इंच लढवायचा! हे सगळं खूप हस्यास्पद करून सोडलं की मग काही काळानं आपला गाढवपणा जनरलाईज करायचा आणि आमच्याकडे कसे सगळे अजून गाढवच आहे हे गावभर कोकलत सुटायचं. कारण आपण स्वतंत्र आहोत. आणि व्यक्त होणं हा आपला हक्क आहे. आणि तो आपण मिळवलाच पाहिजे.

...

हे असं करणारी भटकी जमात हल्ली बऱ्याच ठिकाणी आढळून येते. स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचे आपापल्या सोयीनुसार अर्थ लावून रस्ता भटकलेले हे लोक.

ज्या उत्साहाने यांना गाढवपणाची व्याख्या करत बसावं असं वाटतं, हक्कांवर गदा आल्याचा भास होताच पोट तीडीकीने सगळ्यांची अक्कल काढावी असं वाटतं, त्याच उत्साहानं यांना कधीतरी परत शाळेमध्ये जाऊन १५ मार्काच्या नागरीक शास्त्रामधले हक्क आणि कर्तव्याच गुणोत्तर आणि प्रमाण पण परत शिकावं असं वाटो हीच प्रभू चरणी प्रार्थना.

कारण ही भटकी जमात वाढली तर पुढे जाऊन यांना आरक्षण पण द्यावं लागेल. आणि ते परवडायचं नाही!

आता हा आपला माझा शाब्दिक कचरा. नाही आवडला तर केरसुणीने बाजूला करून टाकून द्यावा.