Friday, July 17, 2015

तुम्ही न... असं केलं पाहिजे!


माणसामध्ये न ही खूप मजेशीर गोष्ट आहे. सगळ्यांच्यात असते की नाही माहिती नाही पण बऱ्याच लोकांच्यात दिसून येणारी गोष्ट आहे ही. स्वतःच्या आजच्या दिवसात कुठली ट्रेन घेऊन, कुठे जायचं यावर confusion जरी असलं तरी अमुक अमुकनं काय केलं तर लय भारी होईल याबद्दल मात्र यांचं काहीच दुमत नसतं!

या लोकांचे वेगवेगळे प्रकार असतात. काही International लेवलचे, काही national लेवलचे, तर काही आपल्या आपल्या गली मोहल्ला लेवल वरचे कलाकार. कोणी निंदा, कोणी वंदा, पण आपली मतं मांडणं हाच आमचा धंदा! असा हा thankless जॉब आजन्म करणारे आधुनिक संतच जणू हे!

सदैव आजूबाजूच्या गोष्टींवर टीका करणाऱ्या लोकांमध्ये आणि यांच्या मध्ये मात्र एक मुलभूत फरक असतो. या लोकांच्यामध्ये प्रचंड आशावाद असतो. दिसेल त्याची उकल असते. आणि लगेच पुढच्याच क्षणी आपणच दिलेली उकल ताबडतोब विसरूनही जाण्याचं खास वरदान प्राप्त असतं! उगाच attachment नको कशाशी! तुम्हाला ऐकायला मिळालीये का ही अशी संतवाणी? या संत वर्गाला कधी कधी टीवीवर expert म्हणून डिबेटना पण बोलावतात. निरखून बघाल तर आपल्या आजूबाजूला असतातच बघा हे लोक. कधी कधी तर चक्क आरशामध्ये देखील सापडतात. मला तर हमखास!

आता हे International लेवल वाले बघा. यांची डायरेक्ट ग्रीसनं काय करायला हवं होतं म्हणजे असं भिकेला लागले नसते पासून ते, फेडररनं स्वतःला कसं ट्रेन केलं पाहिजे होतं पर्यंत खूप ठाम मतं असतात! म्हणजे त्याला पर्यायच नसतो. आता ग्रीस किंवा फेडरर इतकं obvious कसं काय बुवा करत नाही याच क्षणभर आपल्याला देखील नवल वाटेल! पण यांच्याकडे कधीकधी त्याचही स्पष्टीकरण असू शकतं. Apple आणि Google यांनी आता कसं मार्केट काबीज केलं पाहिजे हेही यांना माहिती असतं. हे म्हणजे असे लोक की ज्यानी जन्माला आल्या आल्या आजूबाजूच्या पाळण्यातल्या बाळांना सांगायला सुरुवात केलेली असते की त्या डॉक्टरनं कसं स्वतःला ईंप्रुव्ह केलं पाहिजे! किंवा नर्सनं कसा ड्रेसिंग सेन्स ठेवला पाहिजे. आणि तेही अगदी अधिकारवाणीनं ट्याहा ट्याहा करून! हे लोक "काय केलं पाहिजे?" या प्रश्नालाच इतक्या पुरवण्या लावतात की मग "कसं करायचं?" वगैरे प्रश्न यांच्या गावी येतच नाही. तो प्रश्न बाकीच्यांनी सोडवावा! तसे स्वभावानं खूप धाडसी संत हे. मोठमोठ्या विषयांना लीलया हात घालू शकतात.

यातले National लेवलचे लोक म्हणजे थोडासा वेगळा नामुना.
यांच्या अलीकडच्या खाटेवर मोदी झोपतो आणि पलीकडे केजारीवाल! मोदीच्या सोयीस्कर अबोल्या मागचं रहस्य फक्त यांनाच माहिती असतं. केजरीवालनं राजीनामा दिल्या क्षणी यांना केजरीवालच्याही आधी त्याच्या पुढच्या प्लानचा सुगावा लागलेला असतो. या गटातल्या लोकांकडे एक पेशल गुण असतो की जो international वाल्या लोकांकडे बहुदा नसतो. तो म्हणजे - देशाचा ज्वाज्वल्य अभिमान - तो यांच्या whatsapp आणि Facebook च्या नसानसातून अखंड वाहत असतो. सरकारचे परराष्ट्र धोरण कसं हवं, सीमेवर कशी strategy केली की आपण जिंकणार पासून ते शहीद कपूरचं करिअर कसं बनू शकेल याची त्यांच्याकडे बिनचूक शक्कल असते. कास्ट अवे मध्ये जसं Tom Hanks समोरच्या बॉलला कळकळीने गोष्ट सांगत असतो तेवढ्याच कळकळीने ते टीवीला सांगात असतात की धोनीनं आता कशी फिल्डींग लावली पाहिजे! शेवटी कळकळ महत्वाची. बाकीचा काय असेल तो थोडा फार तपशीलातला फरक. आपल्या देशाची आणि देशातल्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला ईत्थंभूत माहिती आहे असा यांचा प्रामाणिक समाज असतो. कधी काळी एखादी माहिती नसेल तर ते स्वतः तयार करू शकतात. तुम्हाला आठवतंय, बऱ्याचदा विकिपीडिया मध्ये किंवा पुस्तकातही एक स्टार मारून तालात references दिलेले असतात की अमुक अमुक गोष्ट कुठून घेतलीये. तर या लोकांना असल्या सवयी अजिबात म्हणजे अजिबात नसतात. "मला असं वाटतंय" हे पुरेसं असतं त्यांच्या साठी!

आता गली मोहल्ल्याच्या लेवलवर येऊ. हे म्हणजे शिकाऊ बॅच. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींवर यांची मतं तयार होत असतात. पण हलाखीची परीस्थिती अशी की ऐकून घेणारा दर वेळी मिळेलच असं नसतं! आणि मग आपली मतं सडेतोडपणे व्यक्त करण्यासाठी अर्णब गोस्वामी साराखा एखादा न्यूज-अवर आपल्या गल्लीमध्ये घेतलाच पाहिजे असं त्यांना प्रत्येक वेळी वाटत राहतं. यांच्या उचंबळून आलेल्या भावनांची झालेली कुचंबणाच यांना पुढे National किंवा International लेवलला पोचवते! यांना शेजारच्या काकुना सांगायचं असतं की आता मंडईपेक्षा बिग बाजारमध्ये कसं फ्युचर आहे. किंवा टबात बसून पाण्याकडे बघताच यांना विचार येतो की, भांडीवालीने कशा प्रकारे पाणी सोडलं की पाण्याची बचत होऊ शकेल!
शेवटी लोकांच्या भल्याचाच विचार. आणखी काय!
कॉलेजच्या वर्गामधल्या ७० पैकी ६९ मुलांनी कुठे गेलं की त्यांचं फ्युचर होणार हे फक्त यांना आणि यांनाच माहिती असतं. जितका confidence मंगलयान सोडताना इस्रोला नसेल, तितका यांना सहजच असू शकतो. त्यासाठी यांना कारण लागत नाही. मित्र मैत्रिणीनी कोणाशी लग्न करावं. कोणाला बॉयफ्रेंड करावं. कोणाला गर्लफ्रेंड करावं हे देखील यांना माहिती असतं. स्वतःची सोडली तर बाकीची सगळ्यांची कोडी यांना उलगडलेली असतात. स्वतःचं करिअर बोंबललं असलं तरी, दुसऱ्याने त्याच्या करिअर मध्ये काय करावं यामध्ये भावूक होतात. आणि इथूनच यांच्या समर्पित आयुष्याची वाटचाल सुरु होते.

शेवटी दुसऱ्या साठी जगणं हेच खऱ्या संताचं जगणं! नाही काय?
स्वतःच्या चड्डीची नाडी कशी बांधायची हे शिकण्यामध्ये काय मजा?

No comments: