Tuesday, November 24, 2015

I Protest ... म्हणजे असं मला वाटतं अधे मधेसगळ्या सोशल मिडिया वर हाहाकार माजलेला असतो. एका माणसाची बायको त्याला काय म्हणाली हे त्यानं चव्हाट्यावर मांडल्यामुळ सगळ्या जगभर त्याचं हसं होत असतं. दुसऱ्याची बायको त्यांच्या नवऱ्याना काय म्हणते हा तसंही जिव्हाळ्याचा विषय असल्यानं या चर्चेला उधाण आलेलं असतं. कोपऱ्यावरच्या पानपट्टीवर चुना मळणाऱ्या नाम्याच्या वॉट्सअॅप पासून ते समोरच्या हॉटेल मध्ये गर्लफ्रेंडला ऑडी मधून घेऊन आलेल्या विक्कीच्या फेसबुकपर्यंत, किंबहुना पलीकडच्या काकूंच्या अमेरिकेतल्या नातवाच्या ट्विटरवर पण सगळ्यांच्या चर्चेचा विषय तोच असतो.

शेवटी दिवस संपतो. आता दुसऱ्या दिवशी आणखी कोणावर तरी राज्य घालू असं म्हणून लोक झोपी जातात.
दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालातरी ही पोस्ट सापडते.
कालचा गोंधळ पाहता, मला पु ल आठवले आणि हसू आलं! 
"कसलाही न्यूनगंड बाळगू नका.आणि प्रत्येक बाबतीमध्ये मतभेद व्यक्त करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो, म्हणजे आता 'अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?' या विषयावरती आपण स्वतः पुणे महानगरपालिकेत, उंदीर मारायच्या विभागात आहोत नोकरीला, हे विसरून मत ठणकावता आलं पाहिजे. अमेरिकेची आर्थिक आघाडी - ठोका!" 
-पु ल देशपांडे.
हे बघून सगळे रथी महारथी परत बाह्या सरसावून, आपापली पगारी कामं बाजूला सारून परत मैदानात उतरतात.
सुरुवात पलीकडच्या काकूंचा अमेरिकेतला नातवापासून होते. "उंदीर मारायच्या विभागातल्या लोकांना अशी कमीपणाची वागणूक देणे बरोबर नाही. शेवटी ते पण माणूस आहेत. गांधीजीनी सांगितलंय की कोणतही काम कमी लेखु नये."
मग कोणी actor Karun वायरल विडीओ बनवतो. पिवळ्या लाल अक्षरात लिहितो की फॉरेनमध्ये सगळे समान आहेत! लोकं तातडीने तो लाईक वगैरे करतात.
मग क्युट क्युट मांजर कुत्र्यांचे फोटो टाकणारी एक पोरगी असं पोस्ट करतो, "उंदीर हा प्राणी कायम कमी लेखाला गेलाय. उंदरांसाठी खास मानसोपचार तज्ञांची सोय केली पाहिजे. #EqualityForAll #TomAndJerryFan"
-> "Actually, कुत्र्यांच्यसाठी पण केली पाहिजे. शोलेमध्ये बसंतीला कुत्तोके सामने मत नाचना म्हणाला विरू. तेव्हा बरं कोणी आवाज केला नाही! #LoveForDogs"
-> "खरंय! पुलंना म्हणायचं होतं तर कुत्री पकडून आणणाऱ्या विभागावर पण म्हणता आलं असतं. पण त्यांनी उंदरांनाच वेठीस का धरलं? #SelectiveSomething"
-> "पुलं tom and jerry बघताना."
-> "Dude, that is wagle!"
-> "I am never watching his news again!"
मग एका राजकारण प्रेम्याला चर्चेमध्ये उडी मारावीशी वाटते. 
"मोदींनी परदेश दौरे करण्यापेक्षा आपल्या देशातल्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी काहीतरी केलं पाहिजे."
-> "मोदी शाकाहारी आहेत!! मागच्या ५० वर्षामध्ये किती शाकाहारी नेते येऊन गेले हे माहिती नसेल तर बोलू नये!!"
-> "शेती केल्याने जास्ती उंदीर मारतात. म्हणजे शाकाहारी लोक उंदरांच्या हानीसाठी जास्ती कारणीभूत आहेत!"
-> "आमच्या अपार्टमेंटच्या खाली कुत्री मोकाट सुटलेली आहेत. त्यांचंपण मोदींनी काहीतरी केलं पाहिजे."
-> "तू केजरीवालला मत दिलेलास न? मग त्याला सांग की!"
एव्हाना बरेच इंग्रजी येणाऱ्या, आणि प्रसिद्ध अशा लोकांना पण जाग येते. 
"This is very poorly written statement underestimating ability of Indian common man to comment on global economy! We must condemn it! Pu La needs to apologize. like immediately!"
मग एका न्यूज वाहिनीवर चर्चा सत्र भरतं. 
"India has a very rich heritage. चंद्रगुप्त मौर्यच्या दरबारात शिकारीला जाणारी माणसं पंडित असायची. We should stop underestimating India!"
"महानगरपालिकेमध्ये उंदीर मारायचा विभाग आहे? हे पेटा बीटा न कसं चालतं? आता बरं कोणी काही बोलत नाही!"
-> "हा विभाग कॉंंग्रेसच्या राजवटीमध्ये पण होता. तेव्हा बर तुम्ही आवाज केला नाहीत!"
-> "कॉंग्रेसच्या राजवटीमध्येपण उंदीर मारायच्या विभागातले लोक इतकेच अडाणी होते. तेव्हा बरं पुलं काही बोलले नाहीत? What was he doing then?"
-> "यावर कोणीतरी काहीतरी परत केलं पाहिजे!"
"महापालिकेच्या लोकांची मनं दुखावल्यामुळं एक दिवस विधानसभेतले कामकाज स्थगित करण्यात यावं अशी विरोधी पक्षानं मागणी करावी"
-> "त्यापेक्षा विधानसभेमध्ये उंदीर सोडले तर?"
परत आणि एक इंग्रजी येणारा आणि खूप बुद्धी असलेला न्यूज वाला व्यथित झाला. 
"A person like Pu La, shouldn't be so irresponsible and make public statements like this which not only hurts sentiments of civil servants, but also defames animals and also understates India's talent! One must consider we have given world people like Amartya Sen who won Noble for Economics! #ProudToBeIndian #IndiaKnowsEconomy"
याच बरोबर काही जागरूक नागरीक पुल उद्यानपाशी जाऊन पोचले. 
"पुलंच्या घराबाहेर निदर्शनं करताना एक सेल्फी! #IStandForIndia"
"People of India loved PuLa so much and this is how he talks about them! I will never read him again. I appeal everyone not to read any Pu La again ever too!"
-> "Dude ... He wrote only marathi! You anyway can't read it"
-> "I won't read him in future too!"
-> "#IGiveUp"
हा सगळा गदारोळ सुरु असताना, या सगळ्याला तातडीने लाईक शेअर वगैरे करत असतानाच एक बायको शेजारी बसलेल्या नवऱ्याला मेसेज करते.
"अहो. फोनमधून डोकं बाहेर काढा. पाहुणे तुमच्याकडं बघतायत. त्यांच्याशीपण बोला जरा." 
गडबडून नवरा मान वर करतो. पाहुणे विचारतात "मग? पाच वर्षं झाली तुम्हाला लंडनला येऊन?" 
"हो तर. खरंच की. अगदी कालच्या सारखं वाटतंय. आमची ही म्हणाली की. इथे भारतामध्ये काय ठीक होईल आपलं असं वाटत नाही मला. आपल्या मुलाबाळांच्या भविष्याची चिंता वाटते. वर आपण घर घेऊन ठेवलंय त्याच्या लोनचे हफ्ते पण फेडायचेत. आपण काही वर्ष भारताबाहेर जाऊन येऊ. तुम्ही ऑनसाईट साठी प्रयत्न का नाही करत? मग मी लगेच हापिसात जाऊन लगेच ऑनसाईट द्या नाहीतर जॉब सोडतो असं नम्रपणे सांगितलं. आणि आलो इकडे." 
"वा. खूपच छान. आमचा पिंट्या पण गेली दोन वर्षं कुठेतरी काम करतोय पुण्यात. त्याचं पण काही होतंय का बघा की. आपणच आपल्या लोकांची मदत करायची की. नाही काय? ह्या ह्या ह्या!"