Sunday, January 17, 2016

आपला दगडाचा देव... आणि नेहमीचीच गोष्ट

(फलाटावरचे मेक आउट्स आणि ब्रेक अप्स बघता बघता पाझरलेलं ज्ञान हे. पद्धती बदलल्या तरी गोष्टी थोड्या फार फरकानं त्याच राहतात. नाही?)  असं होतं न कधी कधी. की काही सुधरत नाही!
भरकटल्या सारखं होतं!
म्हणजे बऱ्याचदा तसं serious नसतंही कदाचीत काही. पण आपल्याला भयाण वाटत असतं.
आणि मग कोणीतरी entry मारतं आपल्या जगामध्ये.
तशी आपणच मारवलेली असते ही entry.
कायमच खाऊ गल्लीमधून जात असलो तरी पोटाला चिमटा बसल्यावर गेलेलं लक्ष आणि मग जे उचललं त्याचा उदो उदो.
तसं सोयीस्कर.
पण असो. असं म्हणायचं नसतं.
कारण त्यातलं magic कमी होतं मग.

खुश राहण्याची गरज किंवा सवय खूप मुलभूत असावी आपली.
काही वेळा बरी आणि काही वेळा बुरी अशी सवय.
किंवा खूप वेळा न समजलेली. असं म्हणूया.
आणि यामुळे हा नवा गडी आपल्यासाठी एकदम सर्वेसर्वा होतो.
मग हे किती natural होतं हे असं आपण आपल्यालाच भासवतो.
मनातल्या मनात केलेलं Manipulation स्वतःलाच natural म्हणून खपवायला जास्त bargain नाही करावं लागत.
कारण तेही तितकंच गरजेचं. कमीत कमी तेव्हापुरतं.
मग आता हा सर्वेसर्वा जगण्यासाठी आवश्यक अशी गोष्ट होतो.
त्याच्या प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक action reaction चे आपण आपल्याला हवे तसे अर्थ काढून त्याला almost देव केलेलं असतं.
त्याचं देव होणं हा आपला हट्ट असतो आणि म्हणून आपल्या लेखी त्याला सगळं माफ असतं.
म्हणजे except only one thing.
ती म्हणजे त्याचं देव नसणं!
बाकी सब कुछ मान्य.

पुढे दिवस बदलतात. आपले प्रश्न बदलतात.
किंवा प्रश्नांची आपल्याला हवी असलेली उत्तरं बदलतात.
आणि हे उसनं दिलेलं देवपण जपण्याचा आपला हट्ट आगाऊ होतो.
मग देवाला त्याच्या मनाप्रमाणं वागण्याची मुभा नसते. म्हणजे आपल्या मनात तरी नसते.
देवानं आदर्श असायचं असतं.
त्याचं देवपण म्हणजे आपण जबरदस्तीने पांघरलेला अंगरखा असला तरी काय झालं?
एकदा आपल्या साठी देव झाला की आता वेगळं अस्तित्व कशाला?
पण हे पचवलं तर आपण तयार केलेल्या ख़ुशीवाल्या मनोऱ्याचा ९/११ व्हायची भीती!
मग आपण आपल्या देवाला discounts देऊ करतो.
त्याचंवालं अस्तित्व आपल्याला झेपत नसलं तरी अधे मध्ये सोयीनुसार पचवल्यासारखं करतो.
सोयीस्कर लक्ष आणि दुर्लक्ष असे हे खेळ सुरु करतो.
कारण खुश होण्याची आपली एकेकाळची गरज आपण त्याकडून पुरी केलेली असते.
या सगळ्या struggle मध्ये मजा अशी असते की बऱ्याच वेळा या देवाला हे सगळं दिव्य नसतंच माहिती.
हे आपल्या आपल्या मुठीमधलं वादळ.

म्हणजे कशी मजा असते न?
कोण कोणाच्या लेखी काय आहे हे त्याला अपेक्षित असलेल्या पेक्षा खूप भिन्न किंवा काही पटीतही असू शकतं!
आणि याला काही बंधन असू शकत नाही! नाही?

आणि मग एके दिवशी या देवाची retire व्हायची पाळी येते.
तसंही हे friction किती वेळ टिकणार?
त्यालाही expiry date असणारच की.
देवालाही मुक्ती हवी.
देव मग आपला आपला अंतर्धान पावतो.
किंवा मग देवाला परत दगड मानण्यात येते.
"तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती" अशी स्वगत वाली ओळ आपण नैवद्य म्हणून त्याला दाखवतो आणि आपापले मार्ग मोकळे करतो.

मनातली एक जागा मात्र रीकामी होते.
आता नवी भरती होणार नाही असला बजेट कट जाहीर होतो.
कधी कधी या जागेचं उदात्तीकरण करून आपली आपली पूजा हळूच सुरु राहते!
एकलव्याने कसं द्रोणाचार्यांचा पुतळा बांधला आणि अंगठा देऊ केला तसं आपलं काहीतरी गमवायची वेळ येत नाही तोवर ही पोकळी कुरवाळली जाते.
किंवा मग ते असं होतं न? की काही सुधरत नाही.
भरकटल्या सारखं होतं.
उगाच भयाण पण वाटतं.
मग आजूबाजूला नजर जाते. म्हणजे चुकून मोबाईल मधून मान वर काढतो तसं.
आणि मग या देव्हाऱ्यात एक नवा देव बसतो.