Sunday, February 21, 2016

Love Story
"हे सगळे लव स्टोरी वाले बकवास आहेत. म्हणजे मला तू अवडलीस. तुला मी अवडलो. आपल्या घराच्यानाही काही प्रॉब्लेम नव्हता. हे सगळं किती सही वाटायला हवं? पण च्यायला या सिनेमांच्या, हे सगळं ब्लॅंड वाटायला लागलंय! कोण जबाबदार याला? कोण? यांनी माझं लाईफ असं बोरींग केलंय!!" गेल्या पंधरा दिवसात त्यानं पंचविसाव्यांदा काढलेला विषय!

"तुझी काय इच्छा आहे? पळून जायचंय का मग तुला? तसं करू. मग तुला मिळेल excitement? तू फ्री मध्ये चिडचिड करू नको." फोनमधून मानही वर न काढता तिनं दिलेली प्रतिक्रिया.

"असं नसतं यार. पळून गेलो आपण तरी कोणाला काही वाटणार नाही! माझी आई खाऊचा डब्बा बांधून देईल आणि तुझा बाप तुझ्याकडे क्रेडिट कार्ड देईल. याला काय पळून जाणं म्हणतात? हवाच काढलीय राव सगळी!" त्याच्या येरझाऱ्या सुरु झाल्या.

"तुझं हे जे काय उसने प्रोब्लेम्स आणणं सुरुये न? त्याला माझी आज्जी याला भिकेचे डोहाळे म्हणते."

"येस्स. आपण सांगू तुला डोहाळे लागलेत! खरे वाले. How about that?"

क्षणभर थांबून, तिने नुसते डोळे वर केले. त्याच्याकडे रोखले. आणि मग पुढे म्हणाली, "फालतूपणा करू नको. कोणाला पटणार नाही!" आणि ती परत फोनमध्ये विलीन झाली.

याचा अर्थ कसा लावायचा हे त्याला एक मिनिट कळलच नाही. कपाळावर आठ्या आणून त्यानं विचारलं, "का??" त्याचं अजून नक्की झालेलं नव्हतं की हा आपल्याला टोला मारला की आणखी काय होतं?

"पटलं जरी तरी काय? आता 2 3 आठवड्यात लग्न तर आहे. Chillax आहेत सगळे लोक आपले."

"नाही यार. असं नसायचं असतं फ्यामिलीवाल्यानी."

तो काही थांबायचं नाव घेईना. आणि त्याच्या किरकिरीमुळं तिची लिंक काही लागेना. तिनं फोन बाजूला ठेवला.

त्याचं पुढे सुरूच होतं. भुवया उडवून तो म्हणाला, "मी नकार देऊ का लग्नाला?"

"आणि?" आता ती पण रिंगणात उतरली.

"आणि काय कुठे? बस, नकार म्हणजे नकार. दिल बदल गया म्हणून सांगतो."

"हो. माझी ताई खूप खुश होईल मग!" ती टाळी वाजवून म्हणाली.

तिची ताई म्हणजे त्यानं वश न केलेला एकमेव किल्ला! आता हा असा जखमेवर वार झाल्यावर त्याचा पवित्राच बदलला. "ए ए ए ए... जा म्हणावं तिला! अख्ख्या कॉलेज मध्ये आपल्याला competition नव्हती काय? तिला काय प्रॉब्लेम आहे माझ्याबरोबर? तुझ्या बाबांना विचार. कसले इंप्रेस्ड आहेत ते माझ्यावर."

"बाबा तसंही सगळ्यांच्या वर इंप्रेस्ड असतात. त्यात काय एवढं?" तिनं परत फोन उचलला.

त्यानं पुढं सरसावून परत तो खाली ठेवला आणि म्हणाला, "हे सगळं तुझ्या ताईनं पढवलंय न तुला?"

"छ्या! बाबांना काय मी आज थोडीच ओळखते? त्यांना आमचा पेपरवाला पण एकदम कष्टकरी आणि आदर्श वाटतो!" असं म्हणून तिनं आता पेपर उचलला.

"What do you mean?" त्यानं तिच्या हातातला पेपर खाली ठेवला.

"काही नाही. असंच."

"असंच... कसंच?"

उगाचच थांबत थांबत मग ती म्हणाली, "ताई म्हणते की ... आपल्या कॉलेजची पोरं ... जरा चंपक होती! तिच्या कॉलेज मध्ये एकापेक्षा एक असायची!"

परत ताई!! "आहाहाहा... उग्गाच!"

"नाही खरंच. तो झाकीर आठवतो का तुला? तो IAS झाला पण म्हणे! किंवा तो प्रवीण यायचा बघ घरी कधी कधी आमच्या. आठवतोय का? तुला जीममध्ये ये म्हणालेला बघ. तो आर्मी मध्ये गेला पण म्हणे!"

याला काहीतरी उत्तर देणं भाग होतं. "आपले पण आहेत की लोक. पक्या नाही गुगलमध्ये सिलेक्ट झाला?"

"हं. Good for him." तिनं परत निर्विकारपणे उत्तर दिलं. पण ते बरोबर जाऊन लागलं.

"हं काय हं! आणि ... आणि ... तो चिम्या पण काहीतरी करत होता की..." हव्या त्या वेळी कोण मित्र हातीच येईना.

"चिम्या? त्याला डेक्कनला चुकून धरलेला पोलिसानं... तो? तो काय करतोय?"

"अं... तो ... तो पण करतोय की काहीतरी! ते नाही का ..."

"ठीके रे. तुला तो ताईच्याच बॅचचा ..."

"अबे सोड यार तुझ्या ताईची बॅच!! आपल्या पेक्षा किती वर्षाने मोठी आहे सांग ती!! उगाच काय त्यांची competition मला?!"

"अरे competition नाही! पण मला असं वाटलं ब्वा असंच की..."

"हा एक मुलांना कायमच थ्रेट असतो यार! एक तर मुलीना २-४ वर्षं मोठी मुलं पटवायचा काय छंद असतो काय ठाऊक! च्यामारी कोण कुठला सिनिअर कधी येऊन व्हिलन बनेल सांगता येत नाही! तुम्ही आपल्या वयाची माणसं का नाही बघत? हा? आणि ही थोरल्या भावा बहिणींची जमात तर आणखीच डेंजर. मुबलक competition मुफ्त्मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल! असा बोर्डच गळ्यात टांगत असावेत. हम दो हमारे एक. हे असंच असायला हवंय."

याहून सुरेख करमणूक ती आणखी काय. अशी ती त्याच्याकडे बघत होती. पण त्याचं पुढे सुरूच होतं.

"म्हणजे एखाद्या मुलानं काय काय सांभाळावं? आपल्या वर्गामधली अगाऊ पोरं manage करा. वर तुमच्या गल्ली मध्ये, अपार्टमेंटमध्ये कोण काय आहे का बघा. वर तुम्हाला एक समजून घ्या!! आणि ही सिनिअर बॅच अशी कधीपण टपकू शकते मधेच! ते आहेच! बऱ्याचदा तर आमचा पत्ता कट झालाय हे कळायला पण वेळ लागतो. काय कमी टेन्शन असतात होय! तुझ्या ताईला काय माहिती?"

त्याच्या येरझाऱ्या कधीच थांबल्या. तिनं हसून त्याच्याकडं बघितलं. जवळ जाऊन केसातून हात फिरवला. "हाय रे मेरे Gladiator! बघ की मग. किती अडथळे पार केलास. केवढं लढलास! दमला असशील न. श्वास घे जरा. कॉफी टाकू?"

आणि त्याच्या लेटेस्ट नौटंकीच्या सव्वीसाव्या प्रयोगाची तिनं परत एकदा यशस्वीपणे सांगता केली.

Monday, February 08, 2016

आपला दगडाचा देव... आणि त्याची आणखी एक गोष्टएक असतो दगड. त्याला नवीन नवीन देव केलेलं असतं. मोकळ्या रानातून उचलून त्याची रवानगी थेट एका मंदिरात केलेली असते. तिथं आधीपासून असलेले वेटेरन देव त्याची चेष्टा करत असतात. नवा नवा देव झाल्या मुळे, दगडला काही नीट सुधरत नसतं. दररोज वेगवेगळे लोक येऊन त्याला आपापली गाऱ्हाणी सांगून जात असतात. त्यावर काय करायचं हे त्याला काळात नसतं. पण ही गाऱ्हाणी ऐकून त्याला दरवेळी गहीवरुन मात्र येत असतं. दगड असला तरी, त्याला लवकर पाझर फुटत असतो. बाकीचे वेटेरन देव त्याला कायम सांगत असतात की देवाच्या जातीला असं मऊ होऊन चालत नसतं नाहीतर दगडाला देव बनवण्याचा हट्ट का केला असता?

थोडा काळ उलटतो. दगडाला थोड्या फार गोष्टी कळू लागतात. इतकी गाऱ्हाणी जी ऐकतो त्यावर काहीतरी केलं पाहिजे असं त्याला वाटायला लागतं. म्हणजे श्रोताच किती वेळ राहणार न? बाकीच्या वेटेरन देवांना वाटतं की हा उगाच क्रांतीकारी बनू पाहतोय! जागृत असल्याचा पब्लिसिटी स्टंट करतोय! नेहमी प्रमणे त्याचा हशा करून ते दुर्लक्ष करतात. मग तेव्हा पासून दगड समोर येणार्‍या प्रत्येकाशी संवाद साधायचा प्रयत्न करू लागतो. पण त्याला वाटतं तितकं हे सोपं नसतं. गाऱ्हाणी सांगायला आलेली व्यक्ती काहीही ऐकण्यासाठी थांबतच नसते. खट्टू होऊन दगड रात्ररात्रभर विचार करत बसत असतो. लोक आपलं का बरं ऐकत नसतील यावर त्याला उत्तरच मिळत नसतं. बाकीच्या वेटेरन देवानी आजवर काही फार दिवे लावले नसावेत आणि म्हणून हे असं झालं असावं, असं त्याला राहून राहून वाटत असतं. पण तरीही तो आपले प्रयत्न सोडत नाही. गाऱ्हाणी सांगायला आलेल्याशी संवाद साधायचाच ही त्याच्यासाठी काळ्या दगडावरची रेघ झालेली असते.

अशामध्ये एकदा अचानक एक मुलगी तिथं येते. समोर येऊन सरळ हाकच मारते. म्हणते, "काय लक्ष आहे की नाही माझ्याकडं?"

क्षणभर बावचळून गेल्यामुळे दगड काहीच बोलत नाही. घडा घडा घडा मनातला सांडून, ती मुलगी तिथून निघूनपण जाते. इतक्या दिवसात घडलं नाही ते आत्ता कसं घडलं म्हणून दगड चकित होतो. ती मुलगी आपल्याशी थेट संवाद साधत होती हे त्याला पटत नाही. दुसऱ्या दिवसापासून, दगड तिची वाट बघायला सुरू करतो. मुलगी परत यायला जरा उशीरच करते. आणि मग जेव्हा येते. तेव्हा कोपर्‍यात बसते. काहीच बोलत नाही. लेटस ब्रेक द आइस, म्हणून दगड स्वतःच बोलायला सुरु करायचं ठरवतो.

या आधी कोणाशीच संवाद साधला नसल्यामुळं त्याला जरा अडखळल्या सारखं होतं. पण मुलगी सरावलेली असल्यासारखी दगडाला सहज प्रतिक्रिया देऊ लागते. जसं काही आधीपासूनच ओळख होती. दगडाला वाटतं की सगळं जग पटाईत आहे. कदाचित आपल्यालाच हे जरा उशिरा जमलं असावं - संवाद साधायला! पण मग "हिला कशाला सांगू की ही पहिलीच व्यक्ती जिच्याशी आपण बोलू शकलो" असा विचार करून दगडही एकदम देव असल्या सारखा अनाकलनीय असं काहीतरी बोलायचा प्रयत्न करू लागतो. हिच्याबरोबर वन वे ट्रॅफिक नाहीये याचं त्याला नवल असतं. दगड हळू हळू तिला सल्ले देऊ लागतो. मुलीला दगडाचे विचार फार काही पटत नसतात पण तरीही त्याच्याशी गप्पा मारायला आवडायला लागतं. देवधर्माला लागल्यासारखी, मुलगी आता दगडाला भेटायला नियमित मंदिरात यायला लागते. दगडही तिची नियमित वाट बघायला लागतो.

देवपण हळूहळू दगडाच्या डोक्यात जायला लागतं. मुलीची काहीही अपेक्षा नसताना, त्याला अगाऊपणे तिचे प्रश्न सोडवावे असं वाटायला लागतं. पण नेहमीप्रमाणे तेही दगडाला चटकन जमतच नाही. जरी मुलीला दगडाचं सगळंच पटत नसलं तरी त्याचं असं डायरेक्ट नाक खुपसणं खुपत पण नाही. तिच्यासाठी दगड आता खास झालेला असतो. दगड मग दरवेळी वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून तिला समजावू लागतो.

हे सगळं सुरु असताना, वेटेरन देवापैकी एकजण दगडाला समजवायचा प्रयत्न करतो. म्हणतो. "तू इतकी धडपड करतोयस पण तुला एक गंमत सांगू का?"

"काय गंमत?"

"कोणाला सांगू नकोस. पण आपण खरंच दगड आहोत. आपल्या काहीही केल्यानं कोणाचं काही होत नाही. आहेस तोपर्यंत मजा कर. उगाच अंगाला लाऊन घेऊ नको काही."

दगडाला याचा अर्थ कळत नाही. दगड विचारतो, "मग इतके सगळे लोक जे येतात ते?"

"ते त्यांना माहित. कदाचित ते त्यांच्यासाठी येत असतील. तुला का वाटतंय की ते तुझ्या साठी येतात?"

दगडाला इतके दिवस प्रयत्न करून देव बनण्याच्या त्याच्या स्वप्नाची माती झाल्यासारखं होतं. पण विश्वास बसत नाही. त्याच्याशी ही मुलगी चक्क बोलते म्हणजे काहीतरी स्पेशल नक्कीच असेल, असं त्याला राहून राहून वाटत असतं! आणि म्हणून तिच्यासाठी काहीतरी करायचा त्याचा पण असतो. आता यामुळं मुलीची गाऱ्हाणी सुटणार की त्याचं देवपण सिद्ध होणार हे त्याला माहिती नसतं. पण त्याचे प्रयत्न सुरु असतात.

अशा विचारात दिवस काढत असताना मुलगी यायचं अचानक बंदच होतं. एक दिवस जातो. दुसरा जातो. तिसरा जातो. मग आठवडे जातात. ती येतच नाही. दगडाला आता तिचं नसणं खूप जाणवू लागतं. तो चेहरा पाडून बसू लागतो. त्याचा असा अवतार बघून बाजूचा एक वेटेरन देव दगडाला म्हणतो.

"हे बघ. लोकांचं बरं सुरु झालं की त्यांच्या फेऱ्या कमी होतात. तुझ्या त्या मुलीचं पण काहीतरी बरंच सुरु झालं असणार हे मान्य करायला तुला इतकं जड का जातंय? जितके जास्ती दिवस फिरकली नाही तितकं जास्ती बरं सुरु असणार!"

दगडाला लॉजीक झेपलं असलं तरी ते पचलेलं नसतं.

दुसरा वेटेरन देव म्हणतो, "हे बघ. तिचा प्रश्न मिटला, यावर खुश हो. तूच प्रश्न सोडवायचा होतास असा हट्ट असेल तुझा तर तुला मी आधीच सांगितलेलं की हे देवपण सिरीयसली घेऊ नको. ते लोकांचं काम आहे. आपलं नाही."

पहिला वेटेरन देव परत म्हणतो, "आणि हे बघ लोक आपलं आपलंच फिगर आउट करतात. तुला काय वाटलं की तुला विचारायला येतील? Be careful. उगाच नकळत ईगो वर नको घेऊ."

दगडाला त्याचं वागणं अजिबात सुधारत नसतं. हा आपला इगो आहे की अवाजवी गुंतणं याचं कोडं त्याला सुटत नसतं. हे न सुटलेले प्रश्न घेऊन तो गाभाऱ्यातल्या एकतर्फी प्रेमाच्या भाऊगर्दीकडे निर्विकारपणे बघू लागतो. समोरच्या सर्वांचं त्यांच्या त्यांच्या मते देवावर प्रेम असतं. आणि कितीही चाचपडलं तरी दगडाला काही देवपण सापडत नसतं. किंवा सापडलं ते निभावत नसतं. पण दगडाला एक मात्र नक्की कळलेलं असतं की हे जर जमलं तर दगडात जीव ओतल्यासारखं आणि नाहीच तर तसंही निरर्थक आहेच सगळं!