Monday, February 08, 2016

आपला दगडाचा देव... आणि त्याची आणखी एक गोष्ट



एक असतो दगड. त्याला नवीन नवीन देव केलेलं असतं. मोकळ्या रानातून उचलून त्याची रवानगी थेट एका मंदिरात केलेली असते. तिथं आधीपासून असलेले वेटेरन देव त्याची चेष्टा करत असतात. नवा नवा देव झाल्या मुळे, दगडला काही नीट सुधरत नसतं. दररोज वेगवेगळे लोक येऊन त्याला आपापली गाऱ्हाणी सांगून जात असतात. त्यावर काय करायचं हे त्याला काळात नसतं. पण ही गाऱ्हाणी ऐकून त्याला दरवेळी गहीवरुन मात्र येत असतं. दगड असला तरी, त्याला लवकर पाझर फुटत असतो. बाकीचे वेटेरन देव त्याला कायम सांगत असतात की देवाच्या जातीला असं मऊ होऊन चालत नसतं नाहीतर दगडाला देव बनवण्याचा हट्ट का केला असता?

थोडा काळ उलटतो. दगडाला थोड्या फार गोष्टी कळू लागतात. इतकी गाऱ्हाणी जी ऐकतो त्यावर काहीतरी केलं पाहिजे असं त्याला वाटायला लागतं. म्हणजे श्रोताच किती वेळ राहणार न? बाकीच्या वेटेरन देवांना वाटतं की हा उगाच क्रांतीकारी बनू पाहतोय! जागृत असल्याचा पब्लिसिटी स्टंट करतोय! नेहमी प्रमणे त्याचा हशा करून ते दुर्लक्ष करतात. मग तेव्हा पासून दगड समोर येणार्‍या प्रत्येकाशी संवाद साधायचा प्रयत्न करू लागतो. पण त्याला वाटतं तितकं हे सोपं नसतं. गाऱ्हाणी सांगायला आलेली व्यक्ती काहीही ऐकण्यासाठी थांबतच नसते. खट्टू होऊन दगड रात्ररात्रभर विचार करत बसत असतो. लोक आपलं का बरं ऐकत नसतील यावर त्याला उत्तरच मिळत नसतं. बाकीच्या वेटेरन देवानी आजवर काही फार दिवे लावले नसावेत आणि म्हणून हे असं झालं असावं, असं त्याला राहून राहून वाटत असतं. पण तरीही तो आपले प्रयत्न सोडत नाही. गाऱ्हाणी सांगायला आलेल्याशी संवाद साधायचाच ही त्याच्यासाठी काळ्या दगडावरची रेघ झालेली असते.

अशामध्ये एकदा अचानक एक मुलगी तिथं येते. समोर येऊन सरळ हाकच मारते. म्हणते, "काय लक्ष आहे की नाही माझ्याकडं?"

क्षणभर बावचळून गेल्यामुळे दगड काहीच बोलत नाही. घडा घडा घडा मनातला सांडून, ती मुलगी तिथून निघूनपण जाते. इतक्या दिवसात घडलं नाही ते आत्ता कसं घडलं म्हणून दगड चकित होतो. ती मुलगी आपल्याशी थेट संवाद साधत होती हे त्याला पटत नाही. दुसऱ्या दिवसापासून, दगड तिची वाट बघायला सुरू करतो. मुलगी परत यायला जरा उशीरच करते. आणि मग जेव्हा येते. तेव्हा कोपर्‍यात बसते. काहीच बोलत नाही. लेटस ब्रेक द आइस, म्हणून दगड स्वतःच बोलायला सुरु करायचं ठरवतो.

या आधी कोणाशीच संवाद साधला नसल्यामुळं त्याला जरा अडखळल्या सारखं होतं. पण मुलगी सरावलेली असल्यासारखी दगडाला सहज प्रतिक्रिया देऊ लागते. जसं काही आधीपासूनच ओळख होती. दगडाला वाटतं की सगळं जग पटाईत आहे. कदाचित आपल्यालाच हे जरा उशिरा जमलं असावं - संवाद साधायला! पण मग "हिला कशाला सांगू की ही पहिलीच व्यक्ती जिच्याशी आपण बोलू शकलो" असा विचार करून दगडही एकदम देव असल्या सारखा अनाकलनीय असं काहीतरी बोलायचा प्रयत्न करू लागतो. हिच्याबरोबर वन वे ट्रॅफिक नाहीये याचं त्याला नवल असतं. दगड हळू हळू तिला सल्ले देऊ लागतो. मुलीला दगडाचे विचार फार काही पटत नसतात पण तरीही त्याच्याशी गप्पा मारायला आवडायला लागतं. देवधर्माला लागल्यासारखी, मुलगी आता दगडाला भेटायला नियमित मंदिरात यायला लागते. दगडही तिची नियमित वाट बघायला लागतो.

देवपण हळूहळू दगडाच्या डोक्यात जायला लागतं. मुलीची काहीही अपेक्षा नसताना, त्याला अगाऊपणे तिचे प्रश्न सोडवावे असं वाटायला लागतं. पण नेहमीप्रमाणे तेही दगडाला चटकन जमतच नाही. जरी मुलीला दगडाचं सगळंच पटत नसलं तरी त्याचं असं डायरेक्ट नाक खुपसणं खुपत पण नाही. तिच्यासाठी दगड आता खास झालेला असतो. दगड मग दरवेळी वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून तिला समजावू लागतो.

हे सगळं सुरु असताना, वेटेरन देवापैकी एकजण दगडाला समजवायचा प्रयत्न करतो. म्हणतो. "तू इतकी धडपड करतोयस पण तुला एक गंमत सांगू का?"

"काय गंमत?"

"कोणाला सांगू नकोस. पण आपण खरंच दगड आहोत. आपल्या काहीही केल्यानं कोणाचं काही होत नाही. आहेस तोपर्यंत मजा कर. उगाच अंगाला लाऊन घेऊ नको काही."

दगडाला याचा अर्थ कळत नाही. दगड विचारतो, "मग इतके सगळे लोक जे येतात ते?"

"ते त्यांना माहित. कदाचित ते त्यांच्यासाठी येत असतील. तुला का वाटतंय की ते तुझ्या साठी येतात?"

दगडाला इतके दिवस प्रयत्न करून देव बनण्याच्या त्याच्या स्वप्नाची माती झाल्यासारखं होतं. पण विश्वास बसत नाही. त्याच्याशी ही मुलगी चक्क बोलते म्हणजे काहीतरी स्पेशल नक्कीच असेल, असं त्याला राहून राहून वाटत असतं! आणि म्हणून तिच्यासाठी काहीतरी करायचा त्याचा पण असतो. आता यामुळं मुलीची गाऱ्हाणी सुटणार की त्याचं देवपण सिद्ध होणार हे त्याला माहिती नसतं. पण त्याचे प्रयत्न सुरु असतात.

अशा विचारात दिवस काढत असताना मुलगी यायचं अचानक बंदच होतं. एक दिवस जातो. दुसरा जातो. तिसरा जातो. मग आठवडे जातात. ती येतच नाही. दगडाला आता तिचं नसणं खूप जाणवू लागतं. तो चेहरा पाडून बसू लागतो. त्याचा असा अवतार बघून बाजूचा एक वेटेरन देव दगडाला म्हणतो.

"हे बघ. लोकांचं बरं सुरु झालं की त्यांच्या फेऱ्या कमी होतात. तुझ्या त्या मुलीचं पण काहीतरी बरंच सुरु झालं असणार हे मान्य करायला तुला इतकं जड का जातंय? जितके जास्ती दिवस फिरकली नाही तितकं जास्ती बरं सुरु असणार!"

दगडाला लॉजीक झेपलं असलं तरी ते पचलेलं नसतं.

दुसरा वेटेरन देव म्हणतो, "हे बघ. तिचा प्रश्न मिटला, यावर खुश हो. तूच प्रश्न सोडवायचा होतास असा हट्ट असेल तुझा तर तुला मी आधीच सांगितलेलं की हे देवपण सिरीयसली घेऊ नको. ते लोकांचं काम आहे. आपलं नाही."

पहिला वेटेरन देव परत म्हणतो, "आणि हे बघ लोक आपलं आपलंच फिगर आउट करतात. तुला काय वाटलं की तुला विचारायला येतील? Be careful. उगाच नकळत ईगो वर नको घेऊ."

दगडाला त्याचं वागणं अजिबात सुधारत नसतं. हा आपला इगो आहे की अवाजवी गुंतणं याचं कोडं त्याला सुटत नसतं. हे न सुटलेले प्रश्न घेऊन तो गाभाऱ्यातल्या एकतर्फी प्रेमाच्या भाऊगर्दीकडे निर्विकारपणे बघू लागतो. समोरच्या सर्वांचं त्यांच्या त्यांच्या मते देवावर प्रेम असतं. आणि कितीही चाचपडलं तरी दगडाला काही देवपण सापडत नसतं. किंवा सापडलं ते निभावत नसतं. पण दगडाला एक मात्र नक्की कळलेलं असतं की हे जर जमलं तर दगडात जीव ओतल्यासारखं आणि नाहीच तर तसंही निरर्थक आहेच सगळं!

No comments: