Saturday, April 09, 2016

उगाचच धार्मिक वगैरे

मी असं वाचलंय की हिंदू म्हणजे धर्म वगैरे नाहिए पण जगण्याची पद्धती आहे. त्याच्या आतमध्ये लागलंच तर परत सर्वधर्म सहिष्णुता असंही आहे. मध्यंतरी असंही वाचलं की इस्लाम धर्मामध्ये एकमेकांशी भाईचाऱ्याने वागावं असं म्हणलंय. अतिथी म्हणजे भगवान हे असं त्यात सांगितलंय. मग बौद्ध धर्म आहे, जैन आहे. त्यांनाही सगळ्यांवर दया करायची आहे. ख्रिश्चन धर्मामध्येही सगळ्या जगात शांतता आणि प्रेम पसरवण्यासाठी प्रार्थना करा असं संगताना मी ऐकलंय. आणि मग हे असं असताना, कोणी काहीही मानो, सगळं केशवं प्रति गच्छतिच हे असंही ठासून सांगणारे मला भेटलेत. आमचा अल्ला हाच एकमेव देव यासाठीही मारामारी करणारे मला दिसलेत. येशूच तुमचं रक्षण करणार, त्याला शरण जाच असं म्हणून ट्रेनमध्ये लोक पण माझ्या मागं लागलेत. एकूण काय? तर धर्म ही मजेशीर भानगड बनलीय. धर्माच्या बाबतीत सुद्धा कदाचित ८०-२० रुल असावा. म्हणजे ज्यांना ८०% कळालं असे २०% आणि ज्यांना २०% कळालं असे ८०%.

आणि मग उथळ पाण्याचा मुबलक खळखळाट!

आता पुढे लिहिलेलं सगळं हाही उगाच केलेला खळखळाट असूच शकतो. आणि सगळेच खळखळाट निसर्गरम्य असावेत असा नियमही नाही. तेव्हा वाचता वाचता जास्ती त्रास होऊ लागला तर लगेच थांबावं.

धर्माची तपशीलं आपल्या आपल्या परीनं, कुवतीनं, किंवा इंटरेस्टसाठी हक्कानं आणि अधिकारवाणीनं मांडणारी एक जमात बहुदा प्रत्येक धर्मामध्ये असतेच. बऱ्याचदा त्यांना इतकं काही काही कळलेलं नसतं की मग त्यांना बाकीच्या कोणी काही कळून घ्यायचा प्रयत्न केलेलं चालत नाही. "मला आधी समजलं" म्हणून ज्यांनी आधी हात वर केला त्यांनी मग पूर्व दिशा दाखवायची, ही त्यांची परंपरा! कोणाच्या पुस्तकाचं कव्हर जास्ती सुरेख, किंवा कोणाची जास्ती पानं, किंवा सर्वात जुनं पान कोणाकडे, किंवा कोणाचं पुस्तक जास्ती खपलंय हे यांच्या तात्विक चर्चेचे मुद्दे! पुस्तक उघडायची तसदी कोण घेतो?

पण हे सगळं असं असलं तरीही मला वाटतं की there's indeed One sane version of every religion. And whatever little I could read so far, to me each of that version sounded pretty nice.

मग सगळ्यांचं सगळंच भारी असणार असेल तर काय हरकत आहे सगळंच शिकायला? "धर्म" हा खरं तर multiple choice question करायचा.म्हणजे कोणी म्हणेल की मी हिंदू-मुस्लिम. किंवा कोणी मुस्लिम-ख्रिश्चन. किंवा कोणी बौद्ध-मुस्लिम-हिंदू. ज्याचे जास्तीत जास्ती धर्म त्याला जास्ती भाव. सगळे पार्क्स मोफत. बँक मध्ये एखादा टक्का व्याज जास्ती. बिग बझार मध्ये फास्ट ट्रॅक लाईन. किंवा टोल माफ. किंवा शाळा कॉलेजमध्ये ज्यादा responsibility. हवं तर जॉब मध्ये किंवा अप्रेजल मध्ये एखादा पॉईंट चढ.

हे धर्म कसे मिळवायचे याची एक पद्धत करायची. त्याचे खास वर्ग करायचे. आपण भाषा नाही का शिकत? तसं. म्हणजे धर्माची exclusivity जाऊन inclusivity आली पाहिजे. या धर्मासाठी तो धर्म सोडायचा असली भानगड बंद. तुम्हाला भारी व्हायचं असेल तर मराठीही आलं पाहिजे आणि इंग्रजीही. सगळं आलं तर तुम्ही लय भारी. नाही आलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण बाकीच्यांना नावं ठेवत बसायचं नाही! म्हणजे अणुबॉम्ब बनवण्यासाठी इंग्रजी वापरलेलं म्हणून जपानी माणसांनी इंग्रजीवर बंदी आणायची असली फालतुगिरी नाही.

इंग्रजी शिका, फ्रेंच शिका, मारवाडी शिका किंवा मराठी शिका. शहाणे व्हा. सोपा हुशोब. तसंच हिंदू धर्म शिका, इस्लाम शिका, ख्रिश्चन धर्म शिका. शहाणे व्हा. हाही सोपा हिशोब.

उदाहरणार्थ, प्रत्येक भाषेत प्रेम व्यक्त करायची पद्धत वेगळी, त्यांचे nuances वेगळे, पण व्यक्त होणार ते प्रेमच! त्यासाठी शायरी वापरा, दोहे वापरा, अभंग म्हणा किंवा verses लिहा! हे सगळंच समजलं आणि जमलं तर किती माजा? तसंच प्रत्येक धर्मांमधले nuances, रीती, रिवाज, आणि शिकवणी वेगवेगळ्या. हेही सगळं समजलं आणि जमलं तर? माजा म्हणजे काही काळानंतर जसं भाषा एकमेकांचे शब्द वापरायला लागतात, तसं धर्म पण एकमेकांमध्ये मिसळू लागले तर?

असो. तर हे असे धर्म बिर्म शिकवायचे कोणी? तर हे वर जे ८०% कळलेले २०% घटक होते की जे बहुधा धार्मिक सावळो गोंधळापासून लांबच राहतात त्यापैकी काही सुज्ञ लोकांना आपापले धार्मिक वर्ग चालवायला द्यायचे. खूप साऱ्या धर्मांचा गाढ अभ्यास आणि त्या सगळ्यांवर गाढ प्रेम असलेले लोक तिथे प्राध्यापक ठेवायचे. प्यार एकदाच होतं हे थोतांड आहेच मग एक नाही पण खूप साऱ्या धर्मांवर खरं खुरं प्यार असायला काय हरकत आहे? अशा धार्मिक शाहरुख खानांना गुरू निवडायचं. आणि या सगळं शिकलेल्यांची मग practicals ठेवायची. नाही जमायचं कदाचित सुरुवातीला. पण नंतर जमेल. प्यारमे सगळं मुमकिन असतं. सिलॅबसच्या बाहेर गेलं कोणी की तडक शाळेत परत पाठवायचं. फर्जी पुस्तकं आणि भरकटलेल्या शिकवण्या सगळ्या बंद!

या सगळ्यांचा मग एक धार्मिक कोशंट ठेवायचा. त्याला उगाचच DK म्हणूया. हा DK म्हणजे ICC Cricket Ranking प्रमाणं करायचा. कायम अपडेट होणार तो. प्रत्येक माणसाचा, राज्याचा आणि देशाचा एक एक DK. आपापल्या आधार कार्ड नंबरला चिकटवून ठेवायचा तो. ४ लोकांना एखादा धर्म बिर्म बरोबर समजावला की तुमचा DK वाढणार. धर्माच्या नावानं उटपटांग गोष्टी केल्या की कमी होणार. प्रसंगी अशांचे धर्मच काढून घ्यायचे. निगेटिव्ह DK वाल्याना जास्ती टॅक्स. पॉसिटिव्ह DK वाल्याना कमी टॅक्स. दर ५ - ६ महिन्यांनी आपल्या आपल्या प्राध्यापकांशी जाऊन गप्पा मारायच्या. आपण कसं वागलो, काय केलं हे सांगायचं. आणि मग प्राध्यापकांनी तुमचा DK अपडेट करायचा. लयी भारी DK वाल्याना प्राध्यापक व्हायची संधी. आणि प्राध्यापक असणं हा प्रकार भारी असतोच की. या प्राध्यापकांनाच धर्माचा सिलॅबस नियमित अपडेट करत राहायची मुभा.

याचे केवढे फायदे होतील? उगाच अल्पसंख्यांक वगैरे लाड नाहीत. लोकांना प्रेम बीम करताना सोपं होईल. जास्ती ऑप्शन मिळतील. आम्ही अमुक अमुक धर्माचे कट्टर आहोत हे वाक्य लाजिरवाणे होईल. सुट्ट्या वगैरे बऱ्याच मिळू शकतील. धर्म, अर्थ, राष्ट्र हे सगळं जोडता येईल. कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या की त्याना लगेच शाळेत घालता येईल.

How about that?

तळटीप: या सगळ्यातला मजेचा भाग सोडला तरी खूप वाईट नाही आयडिया? नाही? उगाचच नाजूक, भावूक, आणि गरीब करून ठेवलंय आपण धर्माना. त्यांना ना मैत्री करायचा स्कोप ना कोणाशी गप्पा मारण्याचा! विचार करून पहिला तर कितीतरी गमतीशीर गोष्टी घडू शकतील यामध्ये. आणि मुख्य म्हणजे religions would also start evolving! तुम्हाला तुमच्या ग्रुप मध्ये शेअर करायचं असल्यास जरूर करा. आणि काय काय भारी होऊ शकेल असं सुचलं तर तेही सांगो...

पाडवा झाला काल. आता नवीन वर्षाची नवीन स्वप्नं हवी! तर हे माझं नवं स्वप्न. उगाच धार्मिक वगैरे...

बाकी पाडव्याच्या तुम्हा सर्वाना खूप शुभेच्छा...