Saturday, May 28, 2016

वेडा दिमित्रीस...

 अथेन्समध्ये दरवेळी कोणीतरी इंटरेस्टिंग माणूस सपडतोच. यावेळी दिमित्रीसची पाळी होती.

शहराच्या मधोमध, बऱ्यापैकी वस्तीमध्ये त्याचं घर होतं. माझ्या ऑफिसचे दोघे आणि मी मिळून पुढचे तीन दिवस अथेन्स मध्ये कामासाठी जायचं होतं. या तीन दिवसात हॉटेलचा ऑप्शन सोडून कोणाच्या घरी राहायची आयडिया आमच्यातल्या एकाला फार भारी नाही वाटली. त्यानं हॉटेल निवडलं. वेंकट आणि मी दिमित्रीसकडे प्रकटलो. वेंकट सकाळीच पोचला. मला पोचायला रात्र झाली.

दाराच्या वरच्या काचेच्या भागातून आतमधला जिना दिसत होता. त्याच्या दुसऱ्याच पायरीवर, मोठीच्या मोठी काळसर तपकिरी झालेली दाढी असलेला, एक वयस्कर माणूस, हातात पुस्तक घेऊन, पांढऱ्या शुभ्र कपड्यात रस्त्याकडे नजर रोखून बसला होता. गाफील असताना नजर गेली असती तर छातीत धडकीच भरली असती असला अवतार इतक्या रात्री दाराशी बघून. पण दिमित्रीसकडं असली भानगड असणारे याची थोडीफार कल्पना आधीपासून असल्यामुळे तितकासा धक्का नाही बसला. तो बसलेला माणूस म्हणजे साक्षात सॉक्रेटिस होता! त्याच्या बाजूने ६२ वर्षाचा दिमित्रीस पळत पळत पायऱ्या उतरून खाली आला आणि त्यानं दार उघडलं. माझी नजर सोक्रिटीस कडेच होती. घर सोडून परत जाताना याच्याबरोबर फोटो काढायचा असं ठरवत मी आत गेलो.

आमची सोय दुसऱ्या मजल्यावर केलेली. पहिल्या मजल्यावर दिमित्रीस आणि त्याच्या अचाट कलाकृती. आणि तळाच्या मजल्यावर, दिमित्रीसपेक्षा वयानं थोडीशीच लहान असलेली, त्याची मैत्रीण जोआन. "ही माझी मॅनेजर आहे. ही मला खूप आवडते. माझं हिच्यावर प्रेमच आहे. ही इथे राहते. मी वर राहतो. तुम्हाला उद्या हीच ब्रेकफास्ट देईल. माझं इंग्लिश जरा वाईट आहे पण हिला छान इंग्लिश बोलता येतं. तुम्ही हिच्याशी बोला." असं म्हणून दिमित्रीसनं तिची ओळख करून दिली. दिमित्रीसच्या दोन वाक्यांमध्ये आणखी कोणी बोलायची जागा शोधणं म्हणजे जरा अवघडच प्रकरण होतं. जोआन नुसतीच हसून माझ्याकडं बघत होती. दिमित्रीसची मात्र बडबड सुरूच होती. फोटोमध्ये बघितलेल्या बाकी गोष्टी कुठं कुठं आहेत यावर बोलत आम्ही वरच्या मजल्यावर गेलो. वेंकट आमचा आवाज ऐकून बाहेर आला. म्हणाला, "अरे यार सवाल मत पुछो. ये वैसेभी बोहोत कुछ कहानी बताता है. मुझेभी बताया था. पर अधेसे ज्यादा कुछ समझ नही आया!" पण आपण थांबतोय थोडीच! दिमित्रीसची एनर्जी अशी होती की ती बघून कोणी गप्प बसूच शकणार नाही! आमच्या हिंदी संभाषणामुळे तो क्षणभर थांबला. आणि मग म्हणाला, "तुम्ही भारतामधून आला न? तुम्ही लोकं खूप फास्ट बोलता! मला काही कळतंच नाही. जर स्लो बोला. मग जरा जरा कळतं मला. आता माझं वय पण ६२. याचं नाव यानं मगाशी सांगितलेलं पण तेही माझ्या आता लक्षात नाही. तशी तुमची नावं जरा अवघडच आहेत." याच्या अंगात कशाची एवढी एनर्जी संचारली होती देव जाणे. पण संसर्गजन्य एनर्जी होती ती. त्याला आम्ही म्हणालो, "आम्हालापण ग्रीक बोलता येत नाही. त्यामुळे तुमच्या इंग्लिशची फारशी काळजी करू नका. काहीतरी मॅनेज करू आपण." दिमित्रीस मग खालच्या मजल्यावर जाऊन मावळला आणि आम्हीही झोपी गेलो.

हा माणूस बोलताना इतके हातवारे करायचा, इतक्या उड्या मारायचा, की साठी उलटली असेल असं वाटायचा स्कोपच नव्हता. कंबरेतून नकळत थोडासा वाकलेला होता. तेवढंच काय ते असेल तर वयाचं लक्षण! या माणसाकडे इतकी एनर्जी होती, त्याच्या कामाबद्दल इतकी पॅशन होती की बोलायला लागला की डोळे आपोआप मोठे व्हायचे आणि त्याच्या हातवाऱ्यांबरोबर हलायला लागायचे! वेंकटसाठी सुरुवातीला दिमित्रीस म्हणजे "मी ही इथं काय मज्जा केलीए महितीए का?" असं म्हणणारे 'मी आणि माझा शत्रुपक्ष' मधले आजोबा होते. पण त्या आजोबांना आपणहून प्रश्न विचारणारं माझ्यासारखं सावज सापडल्यावर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता! वेंकटला सुरुवातीला काळात नव्हतं की मी जेन्युअनली इंटेरेस्टेड आहे की दिमित्रीसची खेचतोय. पण खरं सांगायचं तर दिमित्रीसकडं इतकं काही साठवलेलं होतं की ते बघितलं नाही तर आपलीच वेगळी चेष्टा झाल्यासारखं झालं असतं. पोटली बाबाकी सारखं दिमित्रीस त्याचे किस्से सांगत गेला आणि नंतर वेंकट पण त्याचा फॅन झाला. या माणसाने त्याच्या घरातलं सगळं समान स्वतः बनवलेलं. लाकडी गोष्टी बनवण्यात हातखंडा असावा त्याचा. एक बुद्धिबळाचा मोठा पट बनवलेला. भिंतीवर असंख्य गोष्टी मांडलेल्या. याने इमिलिओ नावाचा रोबो बनवून मधल्या खोलीत ठेवलेला. त्याचं वयही सुमारे ३० वर्ष होतं. जसजशी नवीन टेक्नॉलॉजी येत गेली तसे इमिलिओला नवीन गोष्टी मिळत गेल्या. आता खोलीमध्ये कोणीही आलेलं त्याला आपोआप कळायचं आणि तो हॅलो म्हणायचा. त्याच्या खांद्यावर कॅमेरा बसवलेला आणि त्याचं प्रक्षेपण थेट दिमित्रीसच्या खोलीत. एका युरी एल्गार नावाच्या राष्टीयन माणसाबरोबर मेतकूट जमवून याने ७ स्टॅच्यू बनवलेले. पायरीवर बसलेला सोक्रिटीस त्यातलाच एक. लिविंग रूम च्या छतावर आणि एक माणूस तरंगत होता. किचनच्या दारात हिप्पोक्रॅटिस उभा होता. डॉक्टर लोक शपथ घेतात न, तो हाच. दुसऱ्या मजल्यावर जिथे आम्ही राहत होतो तिथे दरवाज्यात दोन एलिअन्स उभे होते. लिविंग रूम मध्ये याने स्वतः बनवलेल्या खुर्च्या होत्या. त्यातली एक दिमित्रीसची फेवराईट. त्याच्या एका हातापाशी किबोर्ड जोडलेला, दुसरीकडे कॉम्प्युटरचा स्क्रीन. त्यावर चेसमास्टर800 चा पट कायम मांडलेला. आम्ही कॉलेजमध्ये असताना बघितलेला मी ती चेसचा गेम. त्यानंतर थेट आत्ता दिमित्रीसच्या खुर्चीवर पाहिला. कुठे टेबलवर छोटी स्टीलची सोलर सिस्टीम ठेवलेली. यातल्या बऱ्याच गोष्टी कचऱ्यातून उचलेल्यात हेही दिमित्रीसनं लगेच अधोरेखित केलं! कुठे खास लाकडाचे वेगळे आकार करून लाईटचे स्टँड होते. आणि हे सगळं मी बनवलंय हे सांगताना काय लकाकायचे त्याचे डोळे! वाह..! त्याचं लेटेस्ट म्हणजे एक सोफा होता. त्याला एक मेटलची आर्क होती. ती फिरवून गादीवर ठेवली की आकर्षक सोफा. परत फिरवून उभी केली की एकदम डिजाईनर बेड. दुसऱ्याबाजूला आणखी एक अर्धी आर्क. त्यावर एक छोटा लाईट. आमचा हॉटेलमधला मित्रपण येऊन बघून गेला. एक ग्रीक मित्रही घर बघायला म्हणून दुसऱ्या दिवशी खास घरी आला. आणि मी लोकांना घर बघायला बोलावलं म्हणून हा आणखीच खुश.

दुसऱ्या दिवशी घरी यायला थोडा उशीर झाला तर दरात उभं राहूनच याने हजेरी घेतली. म्हणाला, "६ ला फोन कर म्हणलेलो न? मग का नाही केलास? काळजी वाटून राहते न? लेट झाला तर काय हरकत नाही पण सांगून ठेवावं न?" साक्षात आमच्या मातोश्रीच समोर दिसल्या. तिसऱ्या दिवशी इमाने इतबारे संध्याकाळी फोन करून दिमित्रीसबाबाला सांगितलं की "लेट होणारे यायला". मग ओके म्हणाला. ब्रेकफास्ट आपल्या आपल्या रूम मध्ये करायचा नियम होता त्याचा, पण आम्ही सगळे जोआनच्या इथेच बसायचो गप्पा मारत. त्यानं कसं त्याचे आईवडील ग्रीस सोडून चेक रिपब्लिक मध्ये गेले ते सांगितलं. त्यांच्यात २५ वर्षाचं अंतर होतं म्हणे. पहिला चान्स मिळताच त्यानं अथेन्स मध्ये बस्तान हलवलं. आपल्या आई वडिलांचा देश याला बघायचा होता. म्हणाला कालच ग्रीसनं युरोपिअन युनियन बरोबर ९९ वर्षांचा करार केला. काहीतरी शेकडो मिलियन का बिलियन युरो परत करायचेत. त्याच्या मनाला हे विशेष लागलेलं. म्हणाला, "लोकांना कळलेलं नाहीए अजून, पण आजपासून आम्ही ऑफिशिअली पारतंत्र्यात गेलो आहोत."

जोआनचं सगळं लक्ष घर बघण्यात होतं. कायम हसतमुख आणि एकदम शांत. आम्ही गुरुवारी निघणार हा हिशोब तिच्या मनात. दररोज सकाळी आमचं वरच्या मजल्यावर दार वाजलं की ही लगेच बाहेरून आमच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन यायची. ज्यूस बनवायची फ्रेश. मला कामासाठी माझा प्लान थोडा बदलावा लागला. बुधवारी संध्याकाळी ऐवजी सकाळी निघायला लागणार होतं. आदल्या दिवशी लेट आल्यामुळं या दोघांना सांगू नाही शकलो. आता सकाळी हे लोक उठायच्या आधीच गायब होणार होतो. फोटो बिटो काढू शेवटच्या दिवशी असं ठरवलेलं ते सगळं आता राहून जाणार होतं. तरीही आम्हाला सकाळी जाग आली आणि खाली जोआनला आम्ही उठल्याची चाहूल लागलीच! समान घेऊन पायऱ्या न वाजवता जरी मी खाली आलो, तरी ही बाहेर आलेली आधीच. "मी निघालोय, वेंकट थांबतोय आणि एक दिवस असं सांगितलं तिला". दिमित्रीसचा दरवाजा बंद होता अजून. पण न सांगता गेलो तर आणि परत हजेरी घ्यायचा म्हणून जोआनला विचारलं की असेल का हा बाबा जागा? पण तिची गडबड वेगळीच. ब्रेकफास्ट न करता कसं सोडू याला? "थांब आलेच" म्हणून बाहेर पडली ती. दिमित्रीसला पण बेल मारून गेली. तो नाईटड्रेसमधेच खाली आला! सगळं ठीक आहे न? वगैरे विचारपूस झाली. तेवढ्यात जोआन ब्रेकफास्ट घेऊन आली. पण मला वेळच नाहीए हे ऐकून खट्टू झाली. तरी दही घ्यायलाच लावलं तिनं. गाडीत बसून खा म्हणाली. परत आम्हाला आमच्या मातोश्रीच आठवल्या. वेंकट गालातल्या गालात हसत हा सगळा प्रकार बघत होता. जाताना दिमित्रीसने ग्रीक स्टाईलमध्ये दोनही गालावर पप्पी घेतली आणि म्हणाला, "परत कधीही ये, यु टू आर ऑलवेज वेलकम." वेंकटनं परत आठवण करून दिली की तो जात नाहीए. जोआन म्हणाली, "पॅरिसमध्ये जातोयस, जरा जपून." आणि या धावत्या भेटीची सांगता झाली.

ग्रीसचं आणि भारताचं बरच सेम सेम आहे. तसं अख्ख्या युरोपबद्दलच वाटतं मला तो भाग वेगळा. फरक एवढाच की ग्रीक लोक पैसा आणि देव सांभाळून ठेवण्यात कुठेतरी कमी पडले असावेत. सगळ्या देव लोकांच्यात कोणी अनाथ देव असतील तर ते ग्रीक लोकांचे. त्यांना आता फक्त म्यूजिअम मधेच स्थान. मंदिरं त्यांच्या नाशिबातून गेली. पैशाचा जर झोलच झालाय. दिमित्रीस म्हणाला, "तशी माणसं इकडची छान मनानं पण आता पैसा कमी, कारखाने बंद पडतायत, म्हणून थोडं विचित्र वागतात." मी माझ्या ग्रीक मित्रांना सांगतो की मी जेव्हा जेव्हा अथेन्सला आलोय तेव्हा तेव्हा खूप भारी लोक भेटलेत. आणि त्यांची प्रतिक्रिया नेहमीच जराशी रुक्ष असते. "तुला त्यांच्याबरोबर दररोज थोडीच राहावं लागतं? म्हणून तुझ्याशी बरं वागत असतील." शेवटच्या दिवशी परतताना मोठाले रस्ते आणि तिथं बंद पडलेली दुकानं दिसतायत. कारखान्याच्या बाहेर थकलेल्या लोकांची गर्दी दिसतेय. हे बंद झालेले दरवाजे कधी उघडतील याची कल्पना कोणालाच नाहीए. दिमित्रीस म्हणाला की तो कोण्या एका अमेरिकन कंपनीला सगळं समान करून विकणार होता. पण क्रायसीस नंतर सगळं ठप्प झालं. आता सगळं समान त्यानं घरात सजवलंय. काहीतरी खटाटोप करून मार्ग काढणं सूरू आहे. आता जे दूध त्याच्या बहिणीला चेक रिपब्लिक मध्ये अर्ध्या युरोपेक्षा कमीमध्ये मिळतं ते त्याला अथेन्स मध्ये एक युरोला मिळणारे.

आमच्या काळी असं नव्हतं, म्हणणारे लोक इथं खूप अढळतात. फक्त "आमच्या काळी"च्या ऐवजी याच्याकडे आता "बिफोर क्रायसीस" अशी टर्म प्रचलित आहे. लोकांची अधे मध्ये कोणा ना कोणाच्या विरोधात निदर्शनं वगैरे सुरु असतात. आणि बाजूच्याच भिंतींवर एखाद्या सीम कार्डमुळे, फोनमुळे, एखाद्या क्रीममुळे किंवा एखाद्या पाण्याच्या बाटलीमुळे प्रचंड खुश झालेल्या सुखी कुटुंबांच्या, तरुणांच्या, मुला मुलींच्या जाहिराती पण असतात. आमचं प्रॉडक्ट घेतलं की लाईफ एकदम सेट ही युक्ती इथं अजूनही चालताना दिसते. इतकं सोपं आणि इतकं अवघड असं आयुष्याचं विश्लेषण असं एकाच आणखी कुठे बघायला मिळेल? हे सगळं असूनही या लोकांनी मध्यंतरी सीरियावगैरे कडून आलेल्या निर्वासित लोकांना आपल्या देशात आसरा द्यायला अजिबात कमी केलं नाही! हेही तितकंच विशेष.

वेड्या दिमित्रीससारखं हे शहर पण तितकंच वेडं वाटतं. दोघांनाही काहीतरी मार्ग लवकरच सापडो.
 
(दिमित्रीसची ग्रीक भाषेतली वेबसाईट: www.idc-space.com)