Thursday, June 23, 2016

जागो मोहन प्यारे

तशा सगळ्या गोष्टी इकडून तिकडून सेमच. म्हणून उगाच बाजूला सन सनावळी द्यायची. तर पिरिएड फिल्म सारखी ही आपली एक पिरिएड गोष्ट. सध्याच्या आपल्या किंवा आजूबाजूच्यांच्या आयुष्याशी साधर्म्य आढळल्यास आढळू दे. काही हरकत नाही. गोष्ट एकदम १९००च्या आधीची आहे. किंवा असं म्हणू की, १८५७ चा उठाव झाला त्याच्या नंतर काही दशकं उलटली तेव्हाची आहे.

गोष्टीचा हिरो मोहन. म्हणून गोष्टीचं नाव जागो मोहन प्यारे

तर एक असतो मोहन. त्याला काय शाळेत फार काही झेपत नसतं. ठीकठाक मार्क पडत असतात. पण बोलायला लई भारी असतो. पण तेही घराच्या आतमध्ये. बाहेर गेला की दातखिळी बसत असते! कोणत्याही आईसारखी मोहनची आईसुद्धा त्याला कोणाशी मैत्री करावी आणि कोणाशी करू नये हे सांगत असते! मोहनची आई श्यामची आई नसल्याने, मोहनही श्याम नसतो. म्हणून तो आईला कायच्या काय क्रिएटिव्ह उत्तरं देऊन गुंडाळत असतो. एक लई बेणा पोरगा असतो मोहनच्या संगतीत. त्याला बघून मोहनची आई त्याला बजावते, "चार हात लांब राहा त्याच्यापासून. नाहीतर बिघडशील!" त्यावर मोहन लगेच त्याची थेअरी सांगतो, "त्याच्या संगतीत राहून मी बिघडेन कसं काय? माझ्या संगतीत राहून तो सुधारेल असं का नही वाटत तुला?" असले दिव्य उत्तर ऐकून आई म्हणते, "जा कार्ट्या!"

मोहनला वाटतं आपण जिंकलं. आणि मग पुढे तो आपल्या मित्राबरोबर माती खायला सज्ज होतो. कारण हर एक दोस्त कामिना होता है. त्याचा मित्र लागलीच मोहनला आपले क्रांतिकारी विचार सांगायला सुरु करतो. मोहनला क्रांती करायला आवडत असतं म्हणून तोही कान देऊन ऐकतो.
मित्र म्हणतो की "बघ, मी अथेलेटे आहे पण हे गोरे लोक आले स्पर्धेमध्ये की तेच जिंकतात! सांग का?"

मोहनला तसंही झेपलेलं नसतंच की हे चाललंय कुठं? तो विचारतो, "का?"

मित्र आपली अक्कल पाझळतो. "कारण गोरे लोक मांस खातात! मांसाहारामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती आणि कशातच नाही!"
मोहनच्या चक्कीत जाळ! तो लगेच आणखी पुढच्या क्रांतिकारी लेवलला एक्स्ट्रापोलेट करतो. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा बिढा देण्यापेक्षा हे सगळ्यांनी मांसाहारी बनवलं की झालं! मग कशाला राहतायत इंग्रज भारतात? पण यात असतो एक झोल! मोहन असतो एकदम वैष्णव ब्राह्मण वगैरे! म्हणजे मास मच्छी खाल्लं तर घरी रट्टे मिळणार हे नक्की असतं. मग मोहन स्वतःला पण शेंडी लावतो. "देशाच्या हितासाठी हे सगळं" असं म्हणतो आणि मग सुरू करतो नॉनव्हेज खायला! त्याचा मित्र अन तो मिळून शकला लढवून कुठे कुठे काय काय बनवून खाता येईल ते शोधून सगळे प्रकार करून बघतात. हर एक दोस्त कामीना असतोच. मग हा मित्र मोहनला पुढे सिगारेट वगैरेची पण ओळख करून देतो! अशी ही गहरी दोस्ती आणि असे हे दिव्य मित्र! आणि असा हा मोहन.

मोहनला जेव्हा कळतं की आपल्याला आपणच पद्धतशीरपणे उल्लू बनवून घेतलंय, तेव्हा तो काय हयगय न करता डायरेक्ट आत्महत्याच करूया म्हणतो. पण नंतर त्याला कळतं की मांसाहारासारखं ते सोपं नाहीये. त्याच्याकडे तितके पैसेही नसतात आणि धाडसही नसतं. त्यामुळे आत्महत्या वगैरे प्रकरणं झेपत नाही. मग मोहन पुढे आयुष्यभर हा आपला गाढवपणा लक्षात ठेवतो. हा मांसाहार त्याच्या आयुष्यात परत एकदा येतो! तेव्हाचा दुसरा मित्र त्याला म्हणतो, की "अरे दिव्य माणसा. जेव्हा गरज नव्हती तेव्हा गावभर नॉनव्हेज खात सुटलेला! आणि आता गरज आहे तर काय म्हणे उसुल? याला काय अर्थ आहे?"

(आता इथे इंटर्वल घेऊ शकतो. :))

तर झालेलं असतं असं. प्रत्येकाचे जसे cross-referencing वाले काका मामा असतात तसे मोहनचे ही असतात. ते मोहनच्या घरी येतात आणि म्हणतात, "घाला बोटे, मांडा गणित! आता इथं शिकतोयस तिथंच पुढे शिकत गेलास की कारकून होशील आणि इतका पगार मिळेल! त्यापेक्षा मुंबईला वगैरे गेलास आणि अमुक कॉलेजमध्ये शिकलास तर अशी प्लेसमेंट मिळेल आणि मग इतका पगार! पण तरीही त्या अमक्याच्या त्या तमक्या शेंबड्या पोरा एवढा पगार तुला नाहीच मिळणार! बोल काय करतोस?"
मोहनकडं काही उत्तर नसतं. पण काका सोडतायत कुठे?

ते सांगतात "तुला परदेशीच शिकावं लागणार." (सन १९०० च्या आधी आहे म्हणालो की नाही? उगाच GRE, GMAT वगैरेचं नाव नका घेऊ) मोहन परदेशी जायच्या ऑप्शनवर हरकून जातो! तिकडं जाऊन कॅमेरा आणि मॅकबुक घ्यायची सोय नसली तरी काय झालं? फॉरेन ते फॉरेन. आता काय पण झालं तरी भरताबाहेरच जायचंच असं ठरवतो! मग माँ का प्यार मध्ये येतं. सल्ला दिलेले काका सोयीस्कर गायब झालेले असतात. आई आता कुठल्या दुसऱ्या काकांची की मामांची परवानगी घेऊन ये असं सांगते. "तुझे बाबा गेल्यानंतर आपल्याकडे तेच तर सगळं ठरवतात". मग बिचारा मोहन त्यांच्याकडं जातो. काका मग बॉल दुसऱ्याच्या कोर्टात टाकतात. दुसरा तिसऱ्याच्या कोर्टात टाकतो. जॉईंट फॅमीली म्हणाल्यावर ढीगभर हितचिंतक आलेच. आणि मग त्यांसगळ्यांचं हित चिंतायला हवंच की. शेवटी हा "ताकतुंबा त्या घरी जा" वाला खेळ संपवायला एकजण शक्कल लढवतो.

मोहनकडून देवासमोर प्रॉमिस करून घेतात की "मोहन वाईन, वूमन आणि मीट यांना अजिबात हात लावणार नाही. तरच त्याला परदेशी जाता येईल!" हा तह मंजूर करून मोहन शेवटी परदेशी जायला निघतो. (आपण शाळेत नाही का करायचो? आईची शप्पथ आहे वगैरे भानगडी? तसच की पण जरा उगाच १९०० च्या आधीचं) आपल्या बापजाद्यामध्ये कोणी समुद्र ओलांडून गेलं नाही म्हणून समुद्र ओलांडणंच निषिद्ध असं ठरवलेले मोहनच्या जातीमधले काही लोक सोयीस्कर रित्या मोहनला धर्मामधून बाहेर वगैरे काढतात. उद्या मोहनने बाहेर जाऊन काहीतरी भलतेच दिवे लावले तर काय घ्या? असा त्यांचा शुद्ध हेतू असावा. आपला धर्म सेफ राहिला पाहिजे न? पुढे हेच लोक मोहन परत आल्यावर त्याला रीतसर धर्मामध्ये परतही घेतात तो भाग वेगळा. कारण "फॉरेन रिटर्नड" लेबलवाला मेंबर त्यांना अचानक आवडायला लागतो. मोहन दोनही वेळी म्हणतो, "काय करायचंय ते करा. I don't care".

आता तिकडे फॉरेनमध्ये हे इथे, साउथ केन्सिंग्टनच्या या आत्ता मी बसलोय याच्या पलीकडच्या फलाटावर बसून मोहनचा मित्र त्याला म्हणाला असेल की, "अरे दिव्य माणसा. जेव्हा गरज नव्हती तेव्हा गावभर नॉनव्हेज खात सुटलेला! आणि आता इथे जगायचं असेल तर गरज आहे तुला नॉनवेज खाण्याची!" पण मोहनचं उत्तर एकच "उसूल!" आता मोहनला वाटत असतं की सगळ्या भारताने शाकाहारी झालं पाहिजे. पण त्याच्याबद्दल फिरकभी.

मोहनची ही हळू हळू जागं होण्याची कथा खूपच वळणं घेते. पुढे मोहनचा बॅरिस्टर गांधी आणि नंतर बापू होतो. त्याला महात्मा करतात तेव्हा त्याच्याकडे फारसा ऑप्शन नसतो. आणि शेवटी मोहन पैशाच्या नोटेवर जाऊन विसावतो.


हे लिहिल्यावरपण मला एकदम ज्ञानेश्वर लेवलचं काम केल्यासारखा आगाऊ फील आलाय. शेवटी पुस्तक सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगण्यापेक्षा पवित्र काम ते आणखी काय? बाकी नेहमीसारखच ५ पैशाचा मसाला सोडला तर हे सगळं असं आणि असंच झालेलं. नाही पटत तर डायरेक्ट गांधींची ऑटोबायोग्राफीच वाचा.

(क्रमशः)
Post a Comment