Friday, June 03, 2016

Worthy Opponents!

स्टीव्ह जॉब्सच्या पुस्तकातले सुरुवातीचे काही चाप्टर सोडले तर अधून मधून बिल गेट्स दर्शन देत राहतो. सुमारे ३ दशकांच्या कालावधीमध्ये, ज्यांनी कॉम्प्युटर आणि नंतर डिजिटलचं क्षेत्र घडवलं आणि गाजवलं असे हे दोन लोक. या तीन दशकांच्या कालावधीमध्ये हे दोघे बऱ्याचदा एकमेकाच्या समोरासमोर येत राहिले. पुस्तकाच्या शेवटच्या भागात या दोघांच्या एका खूप विलक्षण भेटीचं वर्णन आहे. तेव्हा जॉब्स कँसरमुळं जवळपास बिछान्याला खिळलेला. आणि गेट्स पण मायक्रोसॉफ्ट मधून रीटायर झालेला होता. त्या भेटीबद्दल ऐकताना आधीच्या बऱ्याच आठवणी येतात.

खूप खूप खुप वर्षांपूर्वी स्प्रेडशीट्स नावाचं सॉफ्टवेअर (की जे आत्ता आपण एक्सेल म्हणून वापरतो) बनवून गेट्सनं apple मधल्या काही इंजीनिअर लोकांचा रोष ओढवून घेतलेला. गेट्सचा तो काही पहिला परिचय नव्हता apple बरोबर. पण तरीही हा वाला जरा विशेष. जॉब्सला हे स्प्रेडशीट्स इतकं आवडलेलं की त्यानं स्वतःची टीम जी अशाच सॉफ्टवेअर वर काम करत होती, ती थेट बंदच करून टाकलेली. तेव्हापासून हा लुकडा उंच गेट्स apple च्या लोकांसाठी अप्रिय झाला होता. Apple च्या लोकांनी वारंवार जॉब्सला सांगायचा प्रयत्न केला की याच्यावर विश्वास ठेऊ नको. जॉब्सचं आणि गेट्सचं फारसं जमत होतं यातलाही भाग नव्हता. फक्त गेट्स जॉब्सचा तेव्हाचा फेवरेट होता एवढंच. तसंही जॉब्सचं आणखी कोणाबरोबर जमत होतं? हाही तितकाच चर्चेचा विषय. जॉब्सला टेक्नॉलॉजीमधलं घंटा कळत नाही तर हा का सगळ्यात नाक खुपसतो म्हणून गेट्सचा आकस. आणि गेट्सची काहीतरी छान डिजाईन करण्यात किंवा एकूणच सगळ्यात किती घाणेरडी टेस्ट आहे हे वारंवार अधोरेखित करण्याचा जॉब्सचा हट्ट. त्यांची पहिली भेट झाली तेव्हा गेट्सची मायक्रोसॉफ्ट फक्त स्टार्टअप होती आणि जॉब्स apple पब्लिक गेल्यामुळे श्रीमंत झालेला.
तिथून पुढचा या भेटींचा सिलसिला खूप खास आहे. त्यातल्या मला या काही भेटी विशेष लक्षात राहिलेत.

गेट्सनं जेव्हा स्प्रेडशीट्सचं सॉफ्टवेअर आयबीएमला विकलं तेव्हाची भेट. जॉब्सला mac बरोबर हे सॉफ्टवेअर exclusive हवं होतं. त्यानं तसा करारही केलेला गेट्स सोबत. पण नंतर mac रिलीज व्हायला एक वर्ष उशीर झाला. आणि कराराचा कालावधीही संपला. त्यात भरीस भर म्हणून mac बरोबर स्प्रेडशीट्स प्रीलोडेड द्यायच्या प्रॉमिसवर जॉब्स स्वतःच पलटलेला. यामुळे कायद्याचं म्हणा किंवा नैतिक म्हणा, गेट्सवर कुठलंच बंधन राहिलं नव्हतं. सॉफ्टवेअर आयबीएमला विकणं हा तेव्हाच्या सॉफ्टवेअर कंपनीसाठी खूप स्वाभाविक निर्णय होता. आणि करार संपताच गेट्सनं तो घेतला. पण जॉब्सला ते अजिबात आवडलं नाही. आणि मग त्यानं गेट्सला बोलावून घेतलं. खडसावणी करण्यासाठी. जॉब्सच्या बऱ्याचशा मीटिंग या ऑफिसच्या बाजूला कुपर्टीनोच्या रस्त्यावर चालत चालत व्हायच्या. तशीच ही एक. जॉब्सचा थयथयाट आणि आरडा ओरड गेट्सनं नेहमीप्रमाणे ऐकून घेतला. पण तरीही जे झालंय त्यात अजिबात बदल होणार नाही यावर तो ठामही होता. सगळी आग ओकून झाल्यावर जॉब्सनं गेट्सकडं एक बालिश मागणी केली. "Don't make it as awesome as it is on Mac!!" जॉब्सनं हे असले प्रकार आयुष्यभर केलेले. क्षणात राग आणि क्षणात ढसाढसा रडणं हे वगैरे त्याच्या अजूबाजूच्यांसाठी नवं नव्हतं. गेट्स साठीही नव्हतं. या सगळ्यानंतरही गेट्स apple साठी सॉफ्टवेअर बनवत राहिलाच हा भाग वेगळा.

नंतरची खास भेट म्हणजे जेव्हा मायक्रोसॉफ्ट विंडोज 1.0 रिलीज झालं तेव्हाची. गेट्सनं mac मधल्या बऱ्याच गोष्टी चोरल्या आणि विंडोज मध्ये वापरल्या हा त्याचा आरोप. आणखी एक कडाक्याची मीटिंग!! जॉब्सनं परत एकदा गेट्सला हजेरी घेण्यासाठी बोलावलं. जॉब्सची आरडओरड ऐकून घेतल्यानंतर गेट्स जॉब्सला आठवण करून देतो की, ते दोघेही ज्याच्यावरून भांडतायत, ते आहे खरं झेरॉक्स नावाच्या कंपनीचं. म्हणून त्यामध्ये तुझं माझं करण्याचा प्रश्नच येत नाही!! जॉब्सचा संताप 'आपण केलेली टेक्नॉलॉजी दुसऱ्या कोणीतरी कॉपी केली' याही पेक्षा 'किती घाणेरडी कॉपी केली' यामुळं खूप जास्ती होता असं मला वाटतं. पुढे गुगलनं अँड्रॉइड काढल्यावरसुद्धा अशाच प्रकारचा संताप जॉब्सनं केलेला. प्रॉडक्ट सुंदर डिजाईन करण्यात जॉब्सचा हातखंडा. त्यामध्ये जाण असलेली माणसं जॉब्सला विलक्षण आवडायची. त्यांच्याबरोबर काम करायला त्याला खूप आवडायचं. पण बाकीच्या लोकांना गई गुजरी वागणूक देण्यातही त्याला कधीच वावगं वाटलं नाही. गेट्स हा बाकी जगासाठी कोणीही असला, तरी जॉब्स साठी त्या बाकीच्या लोकांपैकी एक होता.

त्यानंतर एक काळ असा आला की गेट्स मोठा माणूस बनलेला. गेट्सची मायक्रोसॉफ्टही खूप मोठी झाली. आणि जॉब्स जवळ जवळ रस्त्यावर आलेला. त्याला apple मधून काढून टाकलेलं आणि apple स्वतःसुद्धा जवळपास बुडीत निघणार होती. दरम्यान या दोघांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शाब्दिक चकमकी सुरूच होत्या. जॉब्सनं सुरु केलेली दुसरी कंपनी नेक्स्ट सुद्धा फार काही चांगलं करत नव्हती. तेव्हा गेट्सकडे एक प्रस्ताव आलेला. Apple साठी ऑपरेटिंग सिस्टीम लिहिण्याचा. त्याचवेळी apple ने तसाच प्रस्ताव नेक्स्टलाही दिलेला. या चढाओढीमध्ये जॉब्सने बाजी मारली आणि गेट्सला आत घुसू दिलं नाही. किंबहुना ही जॉब्सची दुसरी एन्ट्री होती apple मधली. Apple ने थेट नेक्स्ट अख्खी कंपनीच विकत घेतली. यामध्ये मजा अशी होती की ज्या ऑपरेटिंग सिस्टीम साठी नेक्स्ट घेतली, ती सिस्टीम, apple ने कधीच वापरली नाही. पण apple ला जॉब्स परत मिळाला. हेच काय ते या डीलचं फलित.

अशाच सारखा पण थोडा वेगळा प्रसंग याच्या आधीही घडलेला. पण तेव्हा गेट्सने कुरघोडी केलेली. नेक्स्टला वाचवण्यासाठी जॉब्सने आपल्या तत्वांना मुरड घालून आयबीएमच्या कॉम्प्युटरसाठी ऑपरेटिंग सिस्टीम देण्याचा प्रस्ताव मांडलेला. विंडोज किती घाणेरडी सिस्टीम आहे हे त्याने आयबीएमला पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला. आयबीएम बरोबर करार पण केला. पण यावेळी गेट्सनं थयथयाट केला आणि तिथं जॉब्सला घुसू दिलं नाही. त्यासाठी जॉब्सनं आयबीएमला दिलेली वागणूकही तितकीच किंवा जास्तीच जबाबदार होती हेही खरं.

जॉब्सच्या apple मधल्या दुसऱ्या इनिंगमध्ये परत यशस्वी झाल्यावर जॉब्स आणि गेट्स एका इंटरव्यू मध्ये एकत्र आलेले. काही वर्षांपूर्वी तो इंटरव्यू मला अचानक युट्युब वर सापडलेला. आणि लय भारी मजा आलेली तो बघताना. त्यावेळेस हे दोघेही खूप यशस्वी होते. दोघांनीही आपापल्या पद्धतीने जगावर आपली छाप सोडलेली. आता इतकं सगळं झाल्यावर एकमेकांचं श्रेष्ठत्व नाकारण्याची तशी काहीच गरज उरलेली नव्हती. त्या इंटरव्यूमध्ये काही दशकानंतर का होईना, गेट्स काही बाबतीत जॉब्सचं कौतुक करताना दिसतो. पण जॉब्स मात्र गेट्स बद्दल चार चांगले शब्द काढायला कचरतानाच दिसतो. जॉब्सच्या लेखी तुम्ही प्रचंड भारी असणं खूप आवश्यक होतं, काहीतरी तारीफ मिळवण्यासाठी. त्यात उत्तेजनार्थ बक्षीस नावाचा प्रकारच नव्हता.

या सगळ्यापेक्षा खूप वेगळ्या अशा भेटीचे वर्णन पुस्तकाच्या शेवटच्या भागात आहे. कँसरमुळं बिछान्यावर खिळलेल्या जॉब्सला भेटायला म्हणून गेट्स गेलेला तेव्हाचा किस्सा. ते फक्त दोघे असे सुमारे ३ तास बोलत बसलेले. मला अजूनही अफाट कुतूहल वाटतं त्या भेटीचं. जॉब्सनं गेट्सला त्याच्या तेव्हाच्या नव्या आयडियाबद्दल सांगितलं. नवं प्रॉडक्ट कसं डिजाईन करणार त्याचे नमुने दाखवले. गेट्स तेव्हा म्हणाला "कुठे मी मलेरिया का कशावर औषध शोधतोय आणि हा माणूस या अशा अवस्थेतही नवी प्रॉडक्ट डिजाईन करायचा विचार करतोय! कदाचित मी थोडा उशिरा रिटायर व्हायला हवं होतं!" त्या भेटीमध्ये दोघांनीही आपापल्या गातायुष्यावर गप्पा मारल्या. जॉब्सनं त्याच्या बायकोचं कौतुक केलं. जॉब्स म्हणाला की "माझ्यासारख्या माणसा बरोबर राहणं सोपं नाही आणि ते मला माहिती आहे. तसं आपण दोघेही लकी होतो. आपल्याला खूप चांगले जोडीदार मिळाले. आपली मुलंही खूप चांगली घडतायत." गेट्सनं म्हणे एक पत्रही लिहिलेलं जॉब्सला की जे म्हणे त्यांनं आपल्या उशाशी ठेवलेलं. मागच्या ३ दशकांत झालेल्या सगळ्या भेटीपेक्षा ही भेट खूपच निराळी आणि भावूक वाटली मला.

Apple आणि मायक्रोसॉफ्ट बद्दल शिरा ताणून भांडणाऱ्या जनरेशन मधून आपण वाढलो. या दोघांच्याबद्दलही फॅन म्हणून एक पक्कं असं मत बनलेलं. पुस्तक वाचायला सुरु करण्या आधी थोडीफार अपेक्षा होती की आतमध्ये काय असणारे. तरीही पुस्तकात असलेल्या जॉब्सबरोबर जमायला बराच वेळ लागला! पण कट्टर अशी काल्पनिक मतं गुंडाळून ठेवल्यावर जमलं शेवटी. किंवा पुस्तकाशी वाद घालण्याचा स्कोप नसल्यामुळे शेवटी जमवून घ्यायलाच लागलं. मला हे पुस्तक वाचून ज्या आणखी काही लोकांबद्दलचा आदर वाढला त्यापैकी गेट्स हा एक. पण हे दोघेही खूप वेगळ्या प्रकारे समोर येतात या पुस्तकातून. दोघांचीही काम करण्याची पद्धत, परिश्रम घेण्याची तयारी, आलेल्या परिस्थितीला काय वाट्टल ते झालं तरी तोंड द्यायची हिम्मत बघितली की मग या दोघांच्यात चढाओढ लवावीशी नाही वाटत. त्यांनी एकमेकांशी स्पर्धा केली, किंवा जे काही केलं तो त्यांचा विषय होता, पण फॅन म्हणून मग दोघेही आवडतात आपल्याला. वर्दी अपोनंट्स!

No comments: