Wednesday, September 07, 2016

नावात काय आहे?

पिच्चर संपला आणि शेवटी अगणित लोकांची नावं यायला लागली की ती वाचायला जो थांबतो तो खरा शौकीन. पण शौकीन जरी नसाल तरीही शेवटपर्यंत थांबवायची ट्रिक मार्वल आणि डीसी च्या लोकांना फक्कड जमलीए. ते चक्क मिड क्रेडीट आणि पोस्ट क्रेडीट सीनच टाकतात. घ्या. आता जाताय कुठं? ही नावं बघताना सापडतो कोण कुठला जेम्स, कोण अय्यर, कोण पाटील, कोण रूदरफोर्ड. ज्यांच्या ज्यांच्या हातभाराने पिच्चर बनला ते सगळे.

तर मुद्दा या सगळ्यांच्या खारीच्या वाट्याचा नाहीए. (तेवढं महान वीकडेला कुठं सुचणार?) मुद्दा आहे सिनेमा आणि त्यात सोयीस्कर नसलेल्या आडनावांचा. हे कुठल्या तरी प्रकारचं ism किंवा acy आहे. (परत... hypocrisy किंवा racism वगैरे शब्द वापरायची आपली लेवल नहिए. आणि वीकडे ला तर नक्कीच नाहीए). पण या भानगडीला काहीतरी नाव नक्कीच हवंय. पण तुरतास ते बाजूला ठेवू. कारण नावात काय आहे?

तसं म्हणालं तर हॉलीवूडच्या सुपर हिरोना आपल्या आडनावाचा बळी द्यावा लागत नाही. म्हणजे आपल्याला पीटर पारकर, ब्रूस वेन, टोनी स्टार्क, बॅरी अॅलन हे सगळे आडनावानिशी माहिती आहेत. पण आपल्याला क्रिशचं आडनाव माहिती आहे का? द्रोणाचं (द्रोणाचार्य नव्हे... अभिषेक बच्चन)? रा.वन चं (वन हे आडनाव नव्हतं)? किंवा शक्तिमानचं? आपला प्रश्न असं आहे की हा भेदभाव का? एवढंच कशाला? आत्ताच्या मोहेनजेदारोच्या सरमनचं आडनाव माहिती आहे का? त्यातल्या त्या बखर जोखरचं? किंवा राज आणि सिमरनचं? कहो ना प्यार है मधल्या रोहितचं? राहुल खन्ना आठवत असेल. तोही थोडक्याच लोकांना कदाचित. नाहीतर राहुलच. कारण वो एकच नाम सुना होगा. पण राहुल खन्नाची अंजली ही अंजली शर्मा होती हे किती जणांना लक्षात आहे? आता त्यातल्या अमनचं आडनाव आठवतंय?

Nation must want to know. हे असं का?

म्हणजे सरमन हा सरमन सृजन तावडे असला तर? बखर जोखर तर मला आधी एकाच प्राण्याचं नाव वाटलेलं. ते निघालं माणसांचं नाव. तेही दोन वेगळ्या माणसांच. (तीस मार खान मध्ये कसं भाईयोको बुलाव अशी कॉमन हाक असायची रघु आणि राम ला. तसं इथं बखर-जोखर को बुलाव अशी कॉमन हाक होती). ते दोघे बखर नलावडे आणि जोखर नलावडे असं असेल तर. एवढंच कशाला राज कुलकर्णी आणि सिमरन पाटील यांची लव स्टोरी असली असती तर? किंवा अमन हा अमन चाबुकस्वार असला तर?

म्हणजे तावडेनी पराक्रमी असू नये की काय? नलावडेना हिंस्त्र जुळं होऊ नये की काय? किंवा पाटील कुलकर्णी यांची लवस्टोरी गोल्डन जुबिली होऊ नये की काय? अगदीच काय तर चाबुकस्वारने सलमान सारखा त्याग करू नये की काय?

आ?

म्हणून म्हणतो. या ism किंवा acy ला काहीतरी नाव मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी मेणबत्त्या जाळल्या पाहिजेत.

एखादाच कोणीतरी बाबुराव गणपतराव आपटे. की जो चक्क बापाचं नावपण सांगायला कमी करत नाही. उगाच राज, प्रेम, राहुल, रोहित, प्रिया, अंजली एवढंच अर्धं मुर्धं सांगून थांबत नाही. (इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षीचं रॅगिंग आठवायचं. तेव्हा कसं संपूर्ण नाव सांगायचं ट्रेनिंग मिळतं?)

कसंय.
मिशा वाढवल्या की चेहरा अचानक चौकोनी दिसायला लागतो तसं आडनाव लावलं की पात्राला पात्रता येते. रोबर्ट लँगडन किंवा हॅरी पॉटर सारखी. आपल्याला सवयच नाही न राव त्याची. (आडनावांचं आरक्षण हवं पिच्चर मध्ये. कशी आयडिया? यासाठी तरी मेणबत्त्या जाळल्याच पाहिजेत!)

आता वर सांगितलेल्या आडनावांसकट ते ते पिच्चर आठवून बघा. त्रास झाला तर तुम्ही कुठले तरी ist आहात. नाही झाला तर तुम्ही बेष्ट.

- हुकुमावरून.


आणि म्हणून गाढवासारखं काम केल्यानंतर शिव्या खाल्ल्या की जेव्हा उगाचच कशातरी विरुद्ध बंड करावसं वाटतं तेव्हा लिहायला बसू नये.