Thursday, June 23, 2016

जागो मोहन प्यारे

तशा सगळ्या गोष्टी इकडून तिकडून सेमच. म्हणून उगाच बाजूला सन सनावळी द्यायची. तर पिरिएड फिल्म सारखी ही आपली एक पिरिएड गोष्ट. सध्याच्या आपल्या किंवा आजूबाजूच्यांच्या आयुष्याशी साधर्म्य आढळल्यास आढळू दे. काही हरकत नाही. गोष्ट एकदम १९००च्या आधीची आहे. किंवा असं म्हणू की, १८५७ चा उठाव झाला त्याच्या नंतर काही दशकं उलटली तेव्हाची आहे.

गोष्टीचा हिरो मोहन. म्हणून गोष्टीचं नाव जागो मोहन प्यारे

तर एक असतो मोहन. त्याला काय शाळेत फार काही झेपत नसतं. ठीकठाक मार्क पडत असतात. पण बोलायला लई भारी असतो. पण तेही घराच्या आतमध्ये. बाहेर गेला की दातखिळी बसत असते! कोणत्याही आईसारखी मोहनची आईसुद्धा त्याला कोणाशी मैत्री करावी आणि कोणाशी करू नये हे सांगत असते! मोहनची आई श्यामची आई नसल्याने, मोहनही श्याम नसतो. म्हणून तो आईला कायच्या काय क्रिएटिव्ह उत्तरं देऊन गुंडाळत असतो. एक लई बेणा पोरगा असतो मोहनच्या संगतीत. त्याला बघून मोहनची आई त्याला बजावते, "चार हात लांब राहा त्याच्यापासून. नाहीतर बिघडशील!" त्यावर मोहन लगेच त्याची थेअरी सांगतो, "त्याच्या संगतीत राहून मी बिघडेन कसं काय? माझ्या संगतीत राहून तो सुधारेल असं का नही वाटत तुला?" असले दिव्य उत्तर ऐकून आई म्हणते, "जा कार्ट्या!"

मोहनला वाटतं आपण जिंकलं. आणि मग पुढे तो आपल्या मित्राबरोबर माती खायला सज्ज होतो. कारण हर एक दोस्त कामिना होता है. त्याचा मित्र लागलीच मोहनला आपले क्रांतिकारी विचार सांगायला सुरु करतो. मोहनला क्रांती करायला आवडत असतं म्हणून तोही कान देऊन ऐकतो.
मित्र म्हणतो की "बघ, मी अथेलेटे आहे पण हे गोरे लोक आले स्पर्धेमध्ये की तेच जिंकतात! सांग का?"

मोहनला तसंही झेपलेलं नसतंच की हे चाललंय कुठं? तो विचारतो, "का?"

मित्र आपली अक्कल पाझळतो. "कारण गोरे लोक मांस खातात! मांसाहारामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती आणि कशातच नाही!"
मोहनच्या चक्कीत जाळ! तो लगेच आणखी पुढच्या क्रांतिकारी लेवलला एक्स्ट्रापोलेट करतो. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा बिढा देण्यापेक्षा हे सगळ्यांनी मांसाहारी बनवलं की झालं! मग कशाला राहतायत इंग्रज भारतात? पण यात असतो एक झोल! मोहन असतो एकदम वैष्णव ब्राह्मण वगैरे! म्हणजे मास मच्छी खाल्लं तर घरी रट्टे मिळणार हे नक्की असतं. मग मोहन स्वतःला पण शेंडी लावतो. "देशाच्या हितासाठी हे सगळं" असं म्हणतो आणि मग सुरू करतो नॉनव्हेज खायला! त्याचा मित्र अन तो मिळून शकला लढवून कुठे कुठे काय काय बनवून खाता येईल ते शोधून सगळे प्रकार करून बघतात. हर एक दोस्त कामीना असतोच. मग हा मित्र मोहनला पुढे सिगारेट वगैरेची पण ओळख करून देतो! अशी ही गहरी दोस्ती आणि असे हे दिव्य मित्र! आणि असा हा मोहन.

मोहनला जेव्हा कळतं की आपल्याला आपणच पद्धतशीरपणे उल्लू बनवून घेतलंय, तेव्हा तो काय हयगय न करता डायरेक्ट आत्महत्याच करूया म्हणतो. पण नंतर त्याला कळतं की मांसाहारासारखं ते सोपं नाहीये. त्याच्याकडे तितके पैसेही नसतात आणि धाडसही नसतं. त्यामुळे आत्महत्या वगैरे प्रकरणं झेपत नाही. मग मोहन पुढे आयुष्यभर हा आपला गाढवपणा लक्षात ठेवतो. हा मांसाहार त्याच्या आयुष्यात परत एकदा येतो! तेव्हाचा दुसरा मित्र त्याला म्हणतो, की "अरे दिव्य माणसा. जेव्हा गरज नव्हती तेव्हा गावभर नॉनव्हेज खात सुटलेला! आणि आता गरज आहे तर काय म्हणे उसुल? याला काय अर्थ आहे?"

(आता इथे इंटर्वल घेऊ शकतो. :))

तर झालेलं असतं असं. प्रत्येकाचे जसे cross-referencing वाले काका मामा असतात तसे मोहनचे ही असतात. ते मोहनच्या घरी येतात आणि म्हणतात, "घाला बोटे, मांडा गणित! आता इथं शिकतोयस तिथंच पुढे शिकत गेलास की कारकून होशील आणि इतका पगार मिळेल! त्यापेक्षा मुंबईला वगैरे गेलास आणि अमुक कॉलेजमध्ये शिकलास तर अशी प्लेसमेंट मिळेल आणि मग इतका पगार! पण तरीही त्या अमक्याच्या त्या तमक्या शेंबड्या पोरा एवढा पगार तुला नाहीच मिळणार! बोल काय करतोस?"
मोहनकडं काही उत्तर नसतं. पण काका सोडतायत कुठे?

ते सांगतात "तुला परदेशीच शिकावं लागणार." (सन १९०० च्या आधी आहे म्हणालो की नाही? उगाच GRE, GMAT वगैरेचं नाव नका घेऊ) मोहन परदेशी जायच्या ऑप्शनवर हरकून जातो! तिकडं जाऊन कॅमेरा आणि मॅकबुक घ्यायची सोय नसली तरी काय झालं? फॉरेन ते फॉरेन. आता काय पण झालं तरी भरताबाहेरच जायचंच असं ठरवतो! मग माँ का प्यार मध्ये येतं. सल्ला दिलेले काका सोयीस्कर गायब झालेले असतात. आई आता कुठल्या दुसऱ्या काकांची की मामांची परवानगी घेऊन ये असं सांगते. "तुझे बाबा गेल्यानंतर आपल्याकडे तेच तर सगळं ठरवतात". मग बिचारा मोहन त्यांच्याकडं जातो. काका मग बॉल दुसऱ्याच्या कोर्टात टाकतात. दुसरा तिसऱ्याच्या कोर्टात टाकतो. जॉईंट फॅमीली म्हणाल्यावर ढीगभर हितचिंतक आलेच. आणि मग त्यांसगळ्यांचं हित चिंतायला हवंच की. शेवटी हा "ताकतुंबा त्या घरी जा" वाला खेळ संपवायला एकजण शक्कल लढवतो.

मोहनकडून देवासमोर प्रॉमिस करून घेतात की "मोहन वाईन, वूमन आणि मीट यांना अजिबात हात लावणार नाही. तरच त्याला परदेशी जाता येईल!" हा तह मंजूर करून मोहन शेवटी परदेशी जायला निघतो. (आपण शाळेत नाही का करायचो? आईची शप्पथ आहे वगैरे भानगडी? तसच की पण जरा उगाच १९०० च्या आधीचं) आपल्या बापजाद्यामध्ये कोणी समुद्र ओलांडून गेलं नाही म्हणून समुद्र ओलांडणंच निषिद्ध असं ठरवलेले मोहनच्या जातीमधले काही लोक सोयीस्कर रित्या मोहनला धर्मामधून बाहेर वगैरे काढतात. उद्या मोहनने बाहेर जाऊन काहीतरी भलतेच दिवे लावले तर काय घ्या? असा त्यांचा शुद्ध हेतू असावा. आपला धर्म सेफ राहिला पाहिजे न? पुढे हेच लोक मोहन परत आल्यावर त्याला रीतसर धर्मामध्ये परतही घेतात तो भाग वेगळा. कारण "फॉरेन रिटर्नड" लेबलवाला मेंबर त्यांना अचानक आवडायला लागतो. मोहन दोनही वेळी म्हणतो, "काय करायचंय ते करा. I don't care".

आता तिकडे फॉरेनमध्ये हे इथे, साउथ केन्सिंग्टनच्या या आत्ता मी बसलोय याच्या पलीकडच्या फलाटावर बसून मोहनचा मित्र त्याला म्हणाला असेल की, "अरे दिव्य माणसा. जेव्हा गरज नव्हती तेव्हा गावभर नॉनव्हेज खात सुटलेला! आणि आता इथे जगायचं असेल तर गरज आहे तुला नॉनवेज खाण्याची!" पण मोहनचं उत्तर एकच "उसूल!" आता मोहनला वाटत असतं की सगळ्या भारताने शाकाहारी झालं पाहिजे. पण त्याच्याबद्दल फिरकभी.

मोहनची ही हळू हळू जागं होण्याची कथा खूपच वळणं घेते. पुढे मोहनचा बॅरिस्टर गांधी आणि नंतर बापू होतो. त्याला महात्मा करतात तेव्हा त्याच्याकडे फारसा ऑप्शन नसतो. आणि शेवटी मोहन पैशाच्या नोटेवर जाऊन विसावतो.


हे लिहिल्यावरपण मला एकदम ज्ञानेश्वर लेवलचं काम केल्यासारखा आगाऊ फील आलाय. शेवटी पुस्तक सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगण्यापेक्षा पवित्र काम ते आणखी काय? बाकी नेहमीसारखच ५ पैशाचा मसाला सोडला तर हे सगळं असं आणि असंच झालेलं. नाही पटत तर डायरेक्ट गांधींची ऑटोबायोग्राफीच वाचा.

(क्रमशः)

Friday, June 03, 2016

Worthy Opponents!

स्टीव्ह जॉब्सच्या पुस्तकातले सुरुवातीचे काही चाप्टर सोडले तर अधून मधून बिल गेट्स दर्शन देत राहतो. सुमारे ३ दशकांच्या कालावधीमध्ये, ज्यांनी कॉम्प्युटर आणि नंतर डिजिटलचं क्षेत्र घडवलं आणि गाजवलं असे हे दोन लोक. या तीन दशकांच्या कालावधीमध्ये हे दोघे बऱ्याचदा एकमेकाच्या समोरासमोर येत राहिले. पुस्तकाच्या शेवटच्या भागात या दोघांच्या एका खूप विलक्षण भेटीचं वर्णन आहे. तेव्हा जॉब्स कँसरमुळं जवळपास बिछान्याला खिळलेला. आणि गेट्स पण मायक्रोसॉफ्ट मधून रीटायर झालेला होता. त्या भेटीबद्दल ऐकताना आधीच्या बऱ्याच आठवणी येतात.

खूप खूप खुप वर्षांपूर्वी स्प्रेडशीट्स नावाचं सॉफ्टवेअर (की जे आत्ता आपण एक्सेल म्हणून वापरतो) बनवून गेट्सनं apple मधल्या काही इंजीनिअर लोकांचा रोष ओढवून घेतलेला. गेट्सचा तो काही पहिला परिचय नव्हता apple बरोबर. पण तरीही हा वाला जरा विशेष. जॉब्सला हे स्प्रेडशीट्स इतकं आवडलेलं की त्यानं स्वतःची टीम जी अशाच सॉफ्टवेअर वर काम करत होती, ती थेट बंदच करून टाकलेली. तेव्हापासून हा लुकडा उंच गेट्स apple च्या लोकांसाठी अप्रिय झाला होता. Apple च्या लोकांनी वारंवार जॉब्सला सांगायचा प्रयत्न केला की याच्यावर विश्वास ठेऊ नको. जॉब्सचं आणि गेट्सचं फारसं जमत होतं यातलाही भाग नव्हता. फक्त गेट्स जॉब्सचा तेव्हाचा फेवरेट होता एवढंच. तसंही जॉब्सचं आणखी कोणाबरोबर जमत होतं? हाही तितकाच चर्चेचा विषय. जॉब्सला टेक्नॉलॉजीमधलं घंटा कळत नाही तर हा का सगळ्यात नाक खुपसतो म्हणून गेट्सचा आकस. आणि गेट्सची काहीतरी छान डिजाईन करण्यात किंवा एकूणच सगळ्यात किती घाणेरडी टेस्ट आहे हे वारंवार अधोरेखित करण्याचा जॉब्सचा हट्ट. त्यांची पहिली भेट झाली तेव्हा गेट्सची मायक्रोसॉफ्ट फक्त स्टार्टअप होती आणि जॉब्स apple पब्लिक गेल्यामुळे श्रीमंत झालेला.
तिथून पुढचा या भेटींचा सिलसिला खूप खास आहे. त्यातल्या मला या काही भेटी विशेष लक्षात राहिलेत.

गेट्सनं जेव्हा स्प्रेडशीट्सचं सॉफ्टवेअर आयबीएमला विकलं तेव्हाची भेट. जॉब्सला mac बरोबर हे सॉफ्टवेअर exclusive हवं होतं. त्यानं तसा करारही केलेला गेट्स सोबत. पण नंतर mac रिलीज व्हायला एक वर्ष उशीर झाला. आणि कराराचा कालावधीही संपला. त्यात भरीस भर म्हणून mac बरोबर स्प्रेडशीट्स प्रीलोडेड द्यायच्या प्रॉमिसवर जॉब्स स्वतःच पलटलेला. यामुळे कायद्याचं म्हणा किंवा नैतिक म्हणा, गेट्सवर कुठलंच बंधन राहिलं नव्हतं. सॉफ्टवेअर आयबीएमला विकणं हा तेव्हाच्या सॉफ्टवेअर कंपनीसाठी खूप स्वाभाविक निर्णय होता. आणि करार संपताच गेट्सनं तो घेतला. पण जॉब्सला ते अजिबात आवडलं नाही. आणि मग त्यानं गेट्सला बोलावून घेतलं. खडसावणी करण्यासाठी. जॉब्सच्या बऱ्याचशा मीटिंग या ऑफिसच्या बाजूला कुपर्टीनोच्या रस्त्यावर चालत चालत व्हायच्या. तशीच ही एक. जॉब्सचा थयथयाट आणि आरडा ओरड गेट्सनं नेहमीप्रमाणे ऐकून घेतला. पण तरीही जे झालंय त्यात अजिबात बदल होणार नाही यावर तो ठामही होता. सगळी आग ओकून झाल्यावर जॉब्सनं गेट्सकडं एक बालिश मागणी केली. "Don't make it as awesome as it is on Mac!!" जॉब्सनं हे असले प्रकार आयुष्यभर केलेले. क्षणात राग आणि क्षणात ढसाढसा रडणं हे वगैरे त्याच्या अजूबाजूच्यांसाठी नवं नव्हतं. गेट्स साठीही नव्हतं. या सगळ्यानंतरही गेट्स apple साठी सॉफ्टवेअर बनवत राहिलाच हा भाग वेगळा.

नंतरची खास भेट म्हणजे जेव्हा मायक्रोसॉफ्ट विंडोज 1.0 रिलीज झालं तेव्हाची. गेट्सनं mac मधल्या बऱ्याच गोष्टी चोरल्या आणि विंडोज मध्ये वापरल्या हा त्याचा आरोप. आणखी एक कडाक्याची मीटिंग!! जॉब्सनं परत एकदा गेट्सला हजेरी घेण्यासाठी बोलावलं. जॉब्सची आरडओरड ऐकून घेतल्यानंतर गेट्स जॉब्सला आठवण करून देतो की, ते दोघेही ज्याच्यावरून भांडतायत, ते आहे खरं झेरॉक्स नावाच्या कंपनीचं. म्हणून त्यामध्ये तुझं माझं करण्याचा प्रश्नच येत नाही!! जॉब्सचा संताप 'आपण केलेली टेक्नॉलॉजी दुसऱ्या कोणीतरी कॉपी केली' याही पेक्षा 'किती घाणेरडी कॉपी केली' यामुळं खूप जास्ती होता असं मला वाटतं. पुढे गुगलनं अँड्रॉइड काढल्यावरसुद्धा अशाच प्रकारचा संताप जॉब्सनं केलेला. प्रॉडक्ट सुंदर डिजाईन करण्यात जॉब्सचा हातखंडा. त्यामध्ये जाण असलेली माणसं जॉब्सला विलक्षण आवडायची. त्यांच्याबरोबर काम करायला त्याला खूप आवडायचं. पण बाकीच्या लोकांना गई गुजरी वागणूक देण्यातही त्याला कधीच वावगं वाटलं नाही. गेट्स हा बाकी जगासाठी कोणीही असला, तरी जॉब्स साठी त्या बाकीच्या लोकांपैकी एक होता.

त्यानंतर एक काळ असा आला की गेट्स मोठा माणूस बनलेला. गेट्सची मायक्रोसॉफ्टही खूप मोठी झाली. आणि जॉब्स जवळ जवळ रस्त्यावर आलेला. त्याला apple मधून काढून टाकलेलं आणि apple स्वतःसुद्धा जवळपास बुडीत निघणार होती. दरम्यान या दोघांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शाब्दिक चकमकी सुरूच होत्या. जॉब्सनं सुरु केलेली दुसरी कंपनी नेक्स्ट सुद्धा फार काही चांगलं करत नव्हती. तेव्हा गेट्सकडे एक प्रस्ताव आलेला. Apple साठी ऑपरेटिंग सिस्टीम लिहिण्याचा. त्याचवेळी apple ने तसाच प्रस्ताव नेक्स्टलाही दिलेला. या चढाओढीमध्ये जॉब्सने बाजी मारली आणि गेट्सला आत घुसू दिलं नाही. किंबहुना ही जॉब्सची दुसरी एन्ट्री होती apple मधली. Apple ने थेट नेक्स्ट अख्खी कंपनीच विकत घेतली. यामध्ये मजा अशी होती की ज्या ऑपरेटिंग सिस्टीम साठी नेक्स्ट घेतली, ती सिस्टीम, apple ने कधीच वापरली नाही. पण apple ला जॉब्स परत मिळाला. हेच काय ते या डीलचं फलित.

अशाच सारखा पण थोडा वेगळा प्रसंग याच्या आधीही घडलेला. पण तेव्हा गेट्सने कुरघोडी केलेली. नेक्स्टला वाचवण्यासाठी जॉब्सने आपल्या तत्वांना मुरड घालून आयबीएमच्या कॉम्प्युटरसाठी ऑपरेटिंग सिस्टीम देण्याचा प्रस्ताव मांडलेला. विंडोज किती घाणेरडी सिस्टीम आहे हे त्याने आयबीएमला पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला. आयबीएम बरोबर करार पण केला. पण यावेळी गेट्सनं थयथयाट केला आणि तिथं जॉब्सला घुसू दिलं नाही. त्यासाठी जॉब्सनं आयबीएमला दिलेली वागणूकही तितकीच किंवा जास्तीच जबाबदार होती हेही खरं.

जॉब्सच्या apple मधल्या दुसऱ्या इनिंगमध्ये परत यशस्वी झाल्यावर जॉब्स आणि गेट्स एका इंटरव्यू मध्ये एकत्र आलेले. काही वर्षांपूर्वी तो इंटरव्यू मला अचानक युट्युब वर सापडलेला. आणि लय भारी मजा आलेली तो बघताना. त्यावेळेस हे दोघेही खूप यशस्वी होते. दोघांनीही आपापल्या पद्धतीने जगावर आपली छाप सोडलेली. आता इतकं सगळं झाल्यावर एकमेकांचं श्रेष्ठत्व नाकारण्याची तशी काहीच गरज उरलेली नव्हती. त्या इंटरव्यूमध्ये काही दशकानंतर का होईना, गेट्स काही बाबतीत जॉब्सचं कौतुक करताना दिसतो. पण जॉब्स मात्र गेट्स बद्दल चार चांगले शब्द काढायला कचरतानाच दिसतो. जॉब्सच्या लेखी तुम्ही प्रचंड भारी असणं खूप आवश्यक होतं, काहीतरी तारीफ मिळवण्यासाठी. त्यात उत्तेजनार्थ बक्षीस नावाचा प्रकारच नव्हता.

या सगळ्यापेक्षा खूप वेगळ्या अशा भेटीचे वर्णन पुस्तकाच्या शेवटच्या भागात आहे. कँसरमुळं बिछान्यावर खिळलेल्या जॉब्सला भेटायला म्हणून गेट्स गेलेला तेव्हाचा किस्सा. ते फक्त दोघे असे सुमारे ३ तास बोलत बसलेले. मला अजूनही अफाट कुतूहल वाटतं त्या भेटीचं. जॉब्सनं गेट्सला त्याच्या तेव्हाच्या नव्या आयडियाबद्दल सांगितलं. नवं प्रॉडक्ट कसं डिजाईन करणार त्याचे नमुने दाखवले. गेट्स तेव्हा म्हणाला "कुठे मी मलेरिया का कशावर औषध शोधतोय आणि हा माणूस या अशा अवस्थेतही नवी प्रॉडक्ट डिजाईन करायचा विचार करतोय! कदाचित मी थोडा उशिरा रिटायर व्हायला हवं होतं!" त्या भेटीमध्ये दोघांनीही आपापल्या गातायुष्यावर गप्पा मारल्या. जॉब्सनं त्याच्या बायकोचं कौतुक केलं. जॉब्स म्हणाला की "माझ्यासारख्या माणसा बरोबर राहणं सोपं नाही आणि ते मला माहिती आहे. तसं आपण दोघेही लकी होतो. आपल्याला खूप चांगले जोडीदार मिळाले. आपली मुलंही खूप चांगली घडतायत." गेट्सनं म्हणे एक पत्रही लिहिलेलं जॉब्सला की जे म्हणे त्यांनं आपल्या उशाशी ठेवलेलं. मागच्या ३ दशकांत झालेल्या सगळ्या भेटीपेक्षा ही भेट खूपच निराळी आणि भावूक वाटली मला.

Apple आणि मायक्रोसॉफ्ट बद्दल शिरा ताणून भांडणाऱ्या जनरेशन मधून आपण वाढलो. या दोघांच्याबद्दलही फॅन म्हणून एक पक्कं असं मत बनलेलं. पुस्तक वाचायला सुरु करण्या आधी थोडीफार अपेक्षा होती की आतमध्ये काय असणारे. तरीही पुस्तकात असलेल्या जॉब्सबरोबर जमायला बराच वेळ लागला! पण कट्टर अशी काल्पनिक मतं गुंडाळून ठेवल्यावर जमलं शेवटी. किंवा पुस्तकाशी वाद घालण्याचा स्कोप नसल्यामुळे शेवटी जमवून घ्यायलाच लागलं. मला हे पुस्तक वाचून ज्या आणखी काही लोकांबद्दलचा आदर वाढला त्यापैकी गेट्स हा एक. पण हे दोघेही खूप वेगळ्या प्रकारे समोर येतात या पुस्तकातून. दोघांचीही काम करण्याची पद्धत, परिश्रम घेण्याची तयारी, आलेल्या परिस्थितीला काय वाट्टल ते झालं तरी तोंड द्यायची हिम्मत बघितली की मग या दोघांच्यात चढाओढ लवावीशी नाही वाटत. त्यांनी एकमेकांशी स्पर्धा केली, किंवा जे काही केलं तो त्यांचा विषय होता, पण फॅन म्हणून मग दोघेही आवडतात आपल्याला. वर्दी अपोनंट्स!

Wednesday, June 01, 2016

तर सीरियाचा पोरगा आणि युरोपची पोरगी


(तुम्ही आत्ताच्या जनरेशनचे असाल तर ही स्टोरी तुम्हाला आवडेलच. तुम्ही निरूपा रॉय, अमिताभ बच्चन वगैरे जनरेशनचे असाल तरीही ही स्टोरी तुम्हाला आवडेल. लक्ष दे के वाचो. वापीस एक बर जरूर पढोगे. ये अपना प्रॉमिस! फक्त एंडपर्यंत वाचनेका!)

एक सीरियाचा पोरगा परदेशात जातो. तिकडे एक युरोपिअन पोरगी पटवतो. दोघे एकाच युनिवर्सिटीमध्ये असतात. पुढे दोघांच्यात लव्ह होतं. पण लडकीके बापको रिश्ता नामंजूर असतो. "एक मुसलमानसे शादी करेगी!!!" असं म्हणून तो रिश्ता झिडकारून लावतो.
पोरगी म्हणते "मगर मै उसके बच्चेकी माँ बनने वाली हू!"
पोरगीला वाटतं आता सुटेल सगळं कोडं.
पण कुठलं काय? इकडे सिरीयाचा पोरगा म्हणतो, "हम अभी जवान है. हमे और जिना है. मै किसी बंधनमे नही बंधना चाहता! तुम बच्चा गिरा दो!"
झाला का झोल? पण युरोपची पोरगी बिलंदर. तिला तिच्या प्यारवर लयी विश्वास. तिचा बाप मरायला टेकलेला असतो. ती म्हणते. "मी बाळाला जन्म देणारच. क्या पता? बाप गेल्यावर नंतर आपण अपने सच्चे प्यारको परत बोलवू शकू." ती अजून प्यार मध्ये असते म्हणून तिला असले disastrous प्लान एकदम लॉजिकल वाटतात. ती मुलाला जन्म देते.
पण पुढे काही होत नाही. सिरीयाचा पोरगा निघून जातो. बाप काही वेळेत मरत नाही. आणि जन्माला आलेलं पोर देऊन टाकायला लागतं. (बच्चनच्या पिच्चर सारखं इथं सिनेमाच्या पाट्या पडू शकतात आणि त्यात सगळी पोरं मोठी होणार आणि आई बाबा म्हातारे. पण तुरतास तो मोह टाळू).

कालांतरानं बाप मारायचा तो मारतोच. मग सिरीयाचा पोरगा सच्चे प्यार की पुकार ऐकून परत येतो. मुलगी खुश होते. "मुसलमान हुआ तो क्या हुआ? यही मेरा सच्चा प्यार" म्हणून लग्न करून टाकते. त्यांना मग एक छान मुलगी होते. (इथेही पाट्या पडू शकतात. पण तरीही नकोच. अजून जरा पुढे जाऊ). त्यांची मुलगी पाच वर्षाची होते तोवर सीरियाच्या मुलाचं आणि युरोपच्या पोरीचं फाटायला लागतं. सिरीयाचा मुलगा (परत) सगळं सोडून निघून जातो. म्हणतो मी आता हॉटेल काढणार (म्हणजे इंग्रंजीमध्ये restaurant काढणार). फलाफलचे रॅप विकायला लागतो. आयटीचं लयी मार्केट आहे म्हणून तिकडच्या मोहल्ल्यामध्ये जाऊन दुकान टाकतो. एक नाही तर मग दुसरं. दुसरं नाही तर तिसरं. असं करत जमेल तसं काहीतरी करू लागतो. इकडे युरोपची पोरगी हिम्मत नही हारती! आपल्या मुलीला घेऊन एकटी संसार पुढे ढकलत राहते. आपल्या देऊन टाकायला लागलेल्या मुलाची आठवण काढत राहते.

आता इथे पाट्या पाडू ...! आणि यामध्ये सगळी मुलं मोठी झाली आणि सगळे मोठे म्हातारे झाले ... असं मानू. चहापाणी पिऊन यायचं तर येऊ शकता आता.

मुलं मोठी होऊन काम धाम करायला लागतात. देऊन टाकायला लागलेला मुलगा software मध्ये काहीतरी करायला लागतो. नंतर झालेली मुलगी नॉवेल वगैरे लिहायचा प्रयत्न करत असते. पण software वाल्याला माहिती नसतं की उसकी एक बेहेना है. आणि नॉवेल वालीला माहिती नसतं की उसका एक भाई है!! दोघांच्या आयुष्यात प्रोब्लेम कमी असतात म्हणून ते आपापले आई वडील शोधण्याचं कार्य आलटून पालटून हातात घेतात. पहिल्यांदा सुरु करतो software वाला! तो थेट डिटेक्टिवच लावतो मागे. डिटेक्टिवला आई बाप मिळत नाहीत. पण डिलिवरी केलेला डॉक्टर सापडतो (अनुपम खेर टाईप उसूल वाला माणूस). Software वाला मुलगा त्याला जाऊन विचारतो, "बताओ मेरे माँ बाप कौन है? बताओ? बताओ?" डॉक्टर शांतपणे म्हणतो, "बेटा. मेरे उसूल मुझे इजाजत नही देते की मी तुम्हे मेरे पेशंट की identity बताऊ! चाहे वो तुम्हारे मा बाप ही क्यू न हो!"
वाजल्या का शिट्ट्या!?
Software वाला मुलगा दार धडाम करून निघून जातो. डॉक्टरके अंदरका इन्सान जाग उठतो. तो एक पत्र लिहितो आणि बायकोकडे देतो. पाकिटावर लिहिलेलं असतं की "मी मेल्यावर हे पत्र software वाल्या त्या मुलाला दे."
मग लगेच सोयीसाठी डॉक्टर मरतो पण. त्याची विधवा पत्नी software वाल्या मुलाला शोधते आणि म्हणते की "उन्होने ये तुम्हारे लिये छोडा है!"

पत्र उघडल्यावर software वाल्या मुलाच्या डोळ्यासमोर आपले तरुणपणीचे माँ बाप येतात. पत्राच्या शेवटी माँचा पत्ता असतो. Software वाला मुलगा लगेच software चं काम बाजूला ठेवून थेट त्या पत्त्यावर जातो. दार उघडतो आणि म्हणतो, "माँ!! मै आया हू!" माँच्या डोळ्यातून ढळाढळा अश्रू येतात. तिला कळतं हाच तो आपला देऊन टाकायला लागलेला मुलगा! मुलगा आजूबाजूला बघतो. "पिताजी नजर नाही आ रहे?" असं म्हणे तोपर्यंत त्याला कळतं की पिताजी म्हणे परत आलेले पण मग परत सोडून गेले. मग त्याला राग येतो. पण मग माँ म्हणते की "तुम्हारी एक बेहेनभी है! चलो तुम्हे मिलवाती हू!" बरासोके बिछडे हुये बहिण भाऊ मग भेटतात! युरोपच्या पोरीला की जी आत्ता माँ असते, तिलाही भरून येतं.

आता नॉवेलवाल्या मुलीला आपल्या भाई सारखी हौस येते पिताजी शोधण्याची. पिताजी शोधणे हा त्यांचा आता फॅमीली गेम झालेला असतो. (सुरज बडजात्या च्या सिनेमामध्ये असतात न फॅमीली गेम्स तसं). पण Software वाला मुलगा म्हणतो. "मुझे नाही मिलना उनसे. उन्होने मुझे स्वीकार करनेसे मना किया. उनकी मजबुरी थी. पर उन्होने तुम्हे ५ साल की उम्रमे छोड दिया! ये मै बर्दाश्त नही कर सकता! मुझे वचन दो की तुम उन्हे मेरे बारेमे कभी नही बताओगी!"
वाचन बिचन देऊन, नॉवेलवाली मुलगी मग एकटी शोध सुरु ठेवते. तीपण डिटेक्टिव मागं लावते. तिला आपले फलाफल विकणारे वडील सापडतात. ते आता वेगळं कुजीन विकत असतात. ती तडक आपल्या वडिलांना भेटायला जाते. सिरीयावला पोरगा सिरीयल entrepreneur सारखा सिरीयल restaurant वाला झालेला असतो. आपली मुलगी बघून जरा भावूक होतो. तिला हिस्टरी सांगू लागतो. "तुम्हारे पेहले हमारा एक और बेटा भी था!" नॉवेलवाली मुलगी उगाच माहिती नसल्यासारखं करून विचारते, "क्या मेरा भाई था? अब कहा है वो??". सिरीयाचा बाप म्हणतो, "वो अब कभी वापीस नाही आयेगा. वो चला गया. तुम उसे भूल जाओ" नॉवेलवाली मुलगी काही म्हणत नाही. पुढे तो आपल्या सिरीयल restaurant गीरी बद्दल सांगू लागतो. त्याच्या मेडीटेरेनिअन कुजीनवाल्या restaurant बद्दल पण सांगतो. (म्हणजे मराठीमध्ये फलाफलचं दुकान). "तुम्हे वहा आना चाहिये था. सगळे आयटी वाले भारी लोक तिकडे यायचे. एक software वाला मुलगा तर खूप टीप पण द्यायचा." नॉवेलवाल्या मुलीची ट्यूब चमकते. तिला कळतं की जसं कभी ख़ुशी कभी गम मध्ये सारूक आणि ह्रितिक नकळत रस्त्यावर एकमेकांच्या बाजूने गेलेले, तसं आपला नुकताच सापडलेला software वाला भाऊ जेव्हा चकाट्या पिटायचा, तेव्हा तोही नेमका याच हॉटेलमधून फलाफल खायला यायचा! म्हणजे वो अपने बाप से मिल चुका है!!! पर उसको मालूम नाही है!!!!! पण दिलेल्या वचनमुळे ती काही बोलत नाही.
ती टाटा बाय बाय करून बाहेर जाते आणि कॉईन बॉक्स वरून फोन लावते. भावाला सांगते. "हा भैय्या!! वो फलाफलवालेही ही हमारे पिताजी है!!"

Softwareवाला भाऊ चाट पडतो. त्याला आठवतं. तो म्हणतो. "हा. मुझे वो restaurant याद है. उसके मालिकसे भी मिला हू मै. शायद हमने हात भी मिलाया है! हा मुझे याद है!!" पण पुढे म्हणतो की "पर मुझे अभीभी कोई इंटरेस्ट नही है उनसे मिलनेमे. उनको मेरे बारे मी मत बताओ!!"
आली का पंचाईत? नॉवेलवाली बहिण काही न बोलता निघून जाते.

पुढे दोघे बहिण भाऊ खूप प्रसिद्ध होतात. आणि एक चतुर इंटरनेटचा ब्लॉगर उंगली करतो. तो उगाच निष्कर्ष लावतो की या नॉवेलवाल्या मुलीचा हा जो फलाफलवाला बाप आहे त्यांनच या software वाल्या मुलाला जन्म दिलाय!! हय गय न करता तो थेट हे त्याच्या ब्लॉगवर टाकतो पण. म्हणतो फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन आहे. मला वाटलं. मी टाकलं.
सिरीयाचा बाप ते वाचतो. तो नॉवेलवाल्या मुलीला विचारतो. ती म्हणते. "हा पिताजी. वोही आपका खोया हुआ बेटा है. ... मगर शायद, उसको आपसे नाही मिलना है!!"

...आणि मग ते परत कधीच एक मेकाला भेटत नाहीत!!!

संपली गोष्ट!

पुढे नॉवेलवाल्या मुलगीचं नॉवेलसाठीचं स्ट्रगल संपतं. ती एक नॉवेल आपल्या software वाल्या भावावर लिहिते. नंतर दुसरं फलाफल वाल्या बापावर लिहिते. सेट्ट!
युरोपची पोरगी तिच्या आईवाल्या रोलमध्ये आयुष्यभर बऱ्याचदा सॉरी सॉरी म्हणत राहते.
सिरीयाचा पोरगा हॉटेलं बदलत राहतो.
Software वाला मुलगा किरॅनिस्ट असतोच. तोही कधी आपल्या पिताजीका मुह नाही बघत. मात्र माँ च्या टच मध्ये राहतो.

हे लिहिल्यावर मला एकदम ज्ञानेश्वर लेवलचं काम केल्यासारखा आगाऊ फील आलाय. एखादं अवघड पुस्तक सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगण्यापेक्षा पवित्र काम ते आणखी काय? तुम्हाला काय वाटलं ड्रामा फक्त सिनेमामधेच असतो का काय?

आता प्रमुख कलाकारांची ओळख.
नॉवेलवाली मुलगी म्हणजे मोना सिम्पसन
सिरीयाचा पोरगा म्हणजे अब्दुलफताह जानदाली
युरोपची पोरगी म्हणजे जोआन सिम्पसन
Software वाला मुलगा म्हणजे स्टीव जॉब्स.

इसाक वाटरसन शप्पथ सगळं खरं लिहिलंय. ५ पैशाचा मसाला सोडला तर हे सगळं असं आणि असंच झालेलं. आता परत वाचो गोष्ट मग लिंक लागेल. नाहीतर जॉब्सचं पुस्तक वाचो. आपण मनाचं काही टाकत नाही.

तळटीप. जॉब्स वर हॉलीवूडनं दोन सिनेमे काढले. पण हा प्लॉट कसा काय सोडला देव जाणे!! बॉलीवूडनं सिनेमा काढला असता तर पहिला या विषयावर काढला असता. आणि सुरज बडजात्या आणि रमेश सिप्पी वगैरे लोकांनी कॉपी राईट वायोलेशनची केस पण केली असती!