Sunday, April 16, 2017

Peace and Dark Comedy

मला एक इतिहासाचा प्रोफेसर भेटलेला एअरपोर्टवर. तो मला म्हणाला की इतिहासाचं टीव्हीच्या डेली सीरिअल सारखं आहे. मधली चार पाच पानं फाटली आणि अचानक काही दशकं पुढं आलो तरी फार काही हुकलेलं नसतं. तेच ते परत सुरू असतं. लोक ते नवं म्हणून बघत असतात. त्यांना असं बघताना बघण्यात ज्यांना मजा येते त्यांनी इतिहास शिकवा. ज्यांना त्रास होतो त्यांनी क्रांतिकारी व्हावं. असो. त्या इतिहासाच्या प्रोफेसर बद्दल परत कधीतरी.

पण त्यातला "आपलं जग एक स्टँड अप कॉमेडी शो आहे" हा अंडरटोन मला आजकाल राहून राहून आठवतो. अति झालं आणि हसू आलं. अशा प्रकारचा. एकूणच. सरसकट. डार्क कॉमेडी.

आपलं हे असं आहे.
आपण सगळे एका खोलीमध्ये बंद आहोत.
या खोलीतल्या सगळ्या भिंती, सगळे कोपरे पेट्रोलने रंगावलेत.
खोलीत दोन कट्टर वैरीपण बसवलेत.
त्यातल्या एकाकडे ७०० कड्यापेट्या आहेत. पण दुसऱ्याकडे चक्क फक्त ५०० च आहेत!
यावर खोलीमध्ये खल सुरू आहे.
म्हणजे काड्यापेट्या आहेत म्हणून नाही काही. तर या दोघांच्यातला कोणीही एकजण दुसऱ्याच्या डोईजड होऊ नये म्हणून.
त्यासाठी आपण भन्नाट उपाय पण काढलेत.
आधी या दोघांनी. नंतर बाकीच्यांनी.

हे दोघंही अविरत काड्यापेट्या बनवायचे. कारण बॅलन्स राहिला पाहिजे न? सगळ्यांना पटलेलं हे. आता तरीही ७०० विरुद्ध ५०० होईपर्यंत.

हे दोघे काड्यापेट्या बनवतायत तर आता खोलीतला प्रत्येक छोटमोठा पण आपापल्या कुवतीप्रमाणे काड्यापेट्या बनवू लागलाय. कारण त्यांनाही बॅलन्स हवाच आहे की. नाही?

सुरक्षित राहण्याचा या खोलीतला आपला एक सर्वमान्य मार्ग म्हणजे सगळ्यांनी आपापल्या परीनं काड्यापेट्या बनवतच राहणं. म्हणजे एकमेकांकडच्या काड्या बघून कोणी आग लावायला धजणार नाही!

आहे की नाही बेष्ट?

म्हणजे काड्या न बनवणं हा कोणाकडे पर्याय नाहीए. करण बाकीचे लगेच आपल्याला खाकच करतील इतका गाढ विश्वास आहे आपल्याला एकमेकांवर.
पण बाकीच्या कोणी काड्या बनवू नये हाही आपला हट्ट आहे.
कारण इतकं प्रेमही आहे आपलं आपल्या खोलीवर! उगाच नाही?

आणि या प्रेमापोटी आम्ही खोलीतल्या भिंतीच्या कोपऱ्या कोपऱ्यावर खडूने लिहूनही ठेवलंय वेळोवेळी. तेही बदाम काढून.

We <3 p="" peace.="">We पण <3 p="" peace.="">We तर कधीपासून <3 p="" peace.="">तरीपण फक्त We च <3 p="" peace.="">
आता भिंती भरून गेलेत. पण आमचं प्रेम संपलेलं नाही. मग आम्ही एकमेकांनी लिहिलेलं पुसून स्वतःच्या प्रेमाला जागा करतो.

अहो We अजूनही <3 nbsp="" p="" peace.="">
Peace साठी काहीपण न?
आमच्या आडे आलात तर मग तुमची खैर नाही. कारण आमच्या आडे म्हणजे peaceच्या विरूद्ध. मग या अशांसाठी आणखी दोन काड्यापेट्या जास्ती बनवू आम्ही.

ज्याच्याकडे काड्या जास्ती त्याचं peace वरचं प्रेम जास्ती. त्याला ते व्यक्त करायला जास्ती मुभा.

हे असंय.

आण्विक अस्त्रं बनवण्याची चढाओढ जेव्हा अमेरिका आणि रशियामध्ये सुरू होती, त्यावर टिपणी करताना कार्ल सेगन असं काही बोललेला. दशकं उलटली त्याला आता. मला काल एकजण म्हणाला की खूप असंतोष पसरलाय. सगळं परत बरोबर करायला आता युद्धाला तोंड फुटणारे.

तेव्हा हे सगळं आठवलं.

हा निव्वळ योगायोग की सध्या मी माईन काम्फ पण वाचतोय. पण त्याही बद्दल परत कधीतरी.

बाकी I <3 p="" peace="">

Sunday, April 09, 2017

बाहेरचा देश

लहानपणी मला बातम्या वाचून वाटायचं की किती लेम वागतात आपले नेतेमंडळी! जरा मोठं झालो तसं त्यांचं लेम वागणं लाजिरवाणं वाटायला लागलं. मग वाटायचं की बाहेरच्या देशांनी आमच्याकडं पाहिलं तर कसं वाटेल? "आमच्या देशामध्ये न, जरा असंच सगळं गडबड असतं" म्हणायची सवय लागली. आपल्या आपल्यातसुद्धा. "बाहेरचा देश" ही तेव्हा एक काल्पनिक इंटीटी होती. "बाहेरचा देश" हा असा भाग की जिथं सगळं परफेक्ट. आपल्याकडे जे जे राडे होतात ते अजिबात न होत असल्याने एकदम बेष्ट. विंडोज ९८ च्या वॉलपेपर सारखा डीफॉल्ट निसर्गरम्य. तुफान हुशार माणसं रस्त्या रस्त्यावर शिंपडलेला असा प्रदेश. हा असला न्यूनगंड नकळत मनाशी बाळगून आम्ही मोठे झालो आणि मग एके दिवशी खऱ्या परदेश वाऱ्या सुरु झाल्या. तिथं सगळंच आपल्या देशापेक्षा छान असणार होतं. आणि ते विमानातून उतरल्या क्षणापासून मी अधाशासरखं दाखवत फिरणार होतो. कोणी आजूबाजूला असेल तर त्यांना. नाहीतर स्वतः स्वतःला. हा असा नकळत स्वतःशी केलेला करार होता. I think अजूनही बऱ्याच लोकांचा असतो तसा.

मग एकदा मी ऑफिसमधून घरी येताना, कोरियाच्या रस्त्यांवर मशीनगन घेऊन उभी असलेली मोठीच्या मोठी पलटण पाहिली. कधी जकार्ता मध्ये आयुष्यभर देशाबाहेर न पडलेल्या माझ्या तिथल्या इंडोनेशिअन कलिग्सनी मला ख्या ख्या ख्या करत सांगितलं की अख्ख्या एशिया मध्ये तेच जास्ती करप्ट असणारेत. त्यांच्याही मनात एक आपापला न्यून होता. त्यांचीपण एक "बाहेरचा देश" नावाची कल्पना होती. तिथल्या काहींना तर वाटायचं की मी "बाहेरच्या देशा"तून आलोय. एके दिवशी कोण्या ऑस्ट्रेलियन लोकांनी परत एकदा बालीमध्ये काहीतरी घाण केली म्हणून ऑस्ट्रेलियाच्या जकार्ता मधल्या एम्बसीमध्ये एका हिरोने अन्थ्रेक्सची पावडर नेऊन टाकली. कोणी उदो उदो केला. कोणी निंदा केली. मला ऑफिसला सुट्टी मिळाली. तेव्हा बाल्कनीमध्ये बसून लांबच्या लांब पसरलेल्या शहराकडं बघून असं वाटलं की हा "बाहेरचा देश" नसावा. कदाचित एशियाच जरासा गडबड प्रकार असावा. खूप गर्दी, त्यामुळं खूप मतं, मग तुझं नाय माझं नाय घाल कुत्र्याला असं असावं.

दरम्यान खूप वर्षं गेली. "बाहेरचा देश" काही सापडला नाही. आत्ताच काही महिन्यापूर्वी मी ब्रिटनमध्ये बसून ग्रेक्सीटवर चर्चा ऐकल्या. ग्रीसकडचे पैसे संपले म्हणे. आता आपल्या कष्टाचे पैसे यांना कितीवेळा कर्ज द्यायचे म्हणून बाकीच्या युरोपिअन देशांना ग्रीस त्यांच्या गट्टीमध्ये नको होतं. ग्रीसच्या राजकारण्यांना आलेला बुडबुडा. त्यांना काय बाहेर जायचं नव्हतं. दरम्यान ग्रीसची जनता आपल्याला अशी अपमानास्पद वागणूक आणि सरकार गप्पच म्हणून रुसून बसलेली! सगळाच गोंधळ. लोकांना मुबलक प्रमाणात ओपिनियन पुरवण्यात येत होती. आणि लोक ती ओपिनियन आपलीच म्हणून त्वेषाने एकमेकांशी वादविवाद करत होते. या विषयावर दररोज चर्चा उपचर्चा करून चरितार्थ चालवणाऱ्यांचीही मला ओळख झाली. थोडी ओपिनिअन्स माझ्याकडेही आली. यातून मनोरंजन करून घेणं म्हणजे मॅच्युअर्ड हे मी लगेच आत्मसात केलं. ग्रेक्सीट हा प्रकार थोडाफार झेपायला सुरु झाला होताच तेवढ्यात कोणीतरी ब्रेक्सीट नावाचं पिल्लू पायात सोडलं. यामध्ये उलटं होतं. ब्रिटननं बाहेर पडायचं म्हणून दंगा सुरु केलेला.

आम्ही भूमिपुत्र, म्हणून आम्ही श्रेष्ठ. आमचा पैसा. आमचे जॉब्स. परप्रांतीय म्हणजे गुन्हेगारी, वायफळ खर्च. संस्कृतीचा ऱ्हास. असली ज्वाज्वल्य अभिमानाची भाषणं मी लंडन मध्ये ऐकली. युरोपिअन युनिअन मध्ये खूपच कचरा भरलाय आणि आपण तर खूप भारी आहोत असं म्हणून मग ब्रिटनची नेते मंडळी पेटून उठलेली मी पहिली. परत लोकांना मुबलक ओपिनियन वाटण्यात आली. त्यावर परत "वैचारिक" वादविवाद भरवण्यात आले. आणि मग काठावर का होईना चक्क ब्रेक्सिट व्हावं असं मत पास झालं की!! या वेळेस मलाही अधिकृत मतदान करता आलं. वोटिंग करायचं राहिलं असलं तरी ज्यांनी वोटिंग केलं ते कसे गाढव होते यावरही खल झाला. दुसऱ्या दिवशी लोकं चहाबरोबर खायचं बिस्कीट संपल्यासारखं सैरभैर झाले! आता कशावर शिरा ताणणार? कोणाकडे पुढचा प्लानच सापडेना. पेटून उठलेले नेते मंडळी चुनावी जुमला होता असं म्हणून गाशा गुंडाळून रिटायर होतो म्हणायला लागली! एकूण काय? तर पाचा प्रश्नांची ब्रेक्सीटची कहाणी साठ प्रश्न अनुत्तरीत ठेवून निष्फळ संपन्न होतीय की काय असं वाटलं.

या सगळ्यामध्ये मी तसा घर का ना घाटका. कधी प्रेक्षकांत बसून टाळ्या पिटल्या, तर कधी आपण इथलेच म्हणून अक्कल पाझळली. थोड्याच वेळात अमेरिकेच्या निवडणुकानी जोर पकडला. मग तर सगळंच बदललं. And then suddenly Brexit was no more the only comedy that happened on world stage in 2016! निवडणुकांच्या निकालांनी बऱ्याच लोकांना चकित केलं. तर बऱ्याच जणांना चिंतितही केलं. आता अर्धा देश ज्याच्या मागे उभा राहिला तो माणूस निवडून आला याची काय चिंता करायची म्हणा? आता अश्या माणसाच्या मागं उभं राहणाऱ्यांची संख्या अर्ध्या देशसंख्येएवढी होईपर्यंत समजलंच नाही याची चिंता करता येईल फार फार तर. पण तो आणखीनच वेगळा विषय.

माझा आणखी एक "बाहेरचा देश" बाहेरचा निघालाच नाही. ज्या "बाहेरच्या देशामुळं" जग सुंदर असणार होतं तो देश कुठला याचं उत्तर अधिकाधिक अवघड होत होतं.

Actually, "बाहेरचा देश" ही कल्पनाच खूप मजेशीर आहे असं मला वाटतं. आपलं दररोजच रहाटगाडगं नाकारून चार दिवस टुरिस्ट म्हणून भटकताना दिसलेल्या चकचकीत ग्लासचा हट्ट केल्यासारखं. आपल्याकडे निवडणुकांचे फड लागतात तेव्हा दिवसात तीन वेळा तिथल्या अजब कथांची गलबत येऊन थडकतात. आपण दुर्लक्ष केलं तरी त्यांचा कचरा अंगावर पडतच राहतो. त्यांचा आधी कंटाळा येतो. नंतर राग. आणि मग क्वचित डोकावणारा दूरचा डोंगर लय भारी वाटतो. तिकडच्या डोंगरावर राहणाऱ्यांची कहाणी वेगळी. त्यांचा कचरा वेगळा. तो आपल्या अंगावर पडत नाही. त्या कचऱ्याबद्दल आपल्याला अज्ञान. आणि त्या अज्ञानातल्या सुखकडची धाव म्हणजे हा "बाहेरच्या देशाचा" शोध. शेवटी कुठंही जा. या सगळ्याच्या गाभ्यामध्ये माणूसच. तो खाऊन खाऊन किती वेगळी माती खाणार?

एकूण काय मग? सगळी बोंबाबोंब असं म्हणायचं?

एखाद्या दिवशी आजूबाजूला सुरू असलेलं बघून खूप निगेटिव्ह वाटलं की हे असलं सुचतं. पण मलाही माहिती आहे की हे असं नसतं. नसावंच म्हणजे. भलतीकडं पाहिलं की भलतंच दिसतं. आपल्याकडं काहीतरी छान आहे. आपल्याला छान गोष्टींचा छंद आहे म्हणून वेगवेगळ्या छान जागा शोधणं हे असंही असत असेलच की. मग त्या जागा देशांच्यातल्या असोत किंवा मनातल्या. अशा कारणाने सापडत गेलेल्या बाहेरच्या प्रदेशाने जग सुंदर होतही असेल. नाही?

You change something because you want to go away from what you dislike is far different than going somewhere to find more of what you like. One is running away leaving things behind and other is going on a journey collecting things. But then I take a step back. I look at myself and try to find an answer. Have I collected things on my way or do I have only what I have right now... which also can become nothing anytime? Have I been an adventurist or have I been an escapist?

... And I struggle finding it out while the hunt for बाहेरचा देश continues nonetheless.

Tuesday, March 21, 2017

My Encounter With The Truthमला आठवतंय, शाळेत असताना शेम्बूड पुसायला येत नसला तरी आम्ही हिरीरीनं गांधी, सावरकर, टिळक, चवीला हवा असेल तर गोडसे आणि थेट हिटलर मध्ये स्पर्धा लावायचो! हौशी लोक त्यामध्ये आंबेडकर, भगतसिंग पासून थेट शिवाजी, आणि अकबर यानाही ओढायला कमी करायचे नाहीत. उगाचच मला अमुक अमुक आवडतो असं एकानं म्हणायचं आणि मग बाकीच्यांनी त्याची इज्जत काढायची. Identifying yourself with whom you hate most or whom you cannot stand anyone else hate at all ची ही आपली पहिली पायाभरणी असावी. आमच्या शाळेत जेव्हा आम्ही हे करायचो तेव्हा मला अमुक आवडतो म्हणणाऱ्यांनाही फारशी अक्कल नसायची आणि त्यांना उलट बोलणाऱ्यानाही फारसं कळलेलं नसायचं. बऱ्याचशा बाबतीत मी त्या अवस्थेतून फारसा बाहेर आलोय असं वाटत नाही अजूनही. पण आलं पाहिजे खरं.

हे आठवायचं कारण म्हणजे, आपल्या पुस्तकी कारकिर्दीची तब्बल तीन पुस्तकं संपल्यावर आपण थेट गांधीबाबांची ऑटोबायोग्राफीच उचलली. हय गय नाय काय! पण हा प्रकार जरा वेगळाच निघाला. तब्बल एकोणीस तास खपवल्यावर असं समजलं की आपल्याला किती कमी समजलं होतं तेच जास्ती समजलंय. म्हणून यावर काहीतरी लिहावं असं बऱ्याचदा उचंबळून आलं तरी काय आणि कसं लिहावं हे झेपत नव्हतं. माहिती असलेलं किंवा माहिती आहेच असं वाटलेलं पुसून परत पाटी कोरी करायची कुवत किंवा हिम्मत यांच्यातल्या एकात कुठेतरी विकेट पडता पडता राहिली.

मोहनबाबूंच पुस्तक संपून आता काही महिने झाले. पुस्तकात मोहनचा बॅरिस्टर होऊन नंतर महात्मा झाला. पण तो होता होता आपल्याला मात्र दम लागला. पुस्तकाच्या शेवटी महात्मा म्हणलं गेल्याबद्दल त्यालाही छान नाही वाटलं. गांधी हा विषयच जरा विचित्र करून ठेवलाय आपण. नाही? जॉब्स आणि मलालाचं पुस्तक समोर असताना, तेव्हा तेव्हा नव्यानं समजलेल्या गोष्टींबद्दल गप्पा मारता यायच्या. हे मला इथं नाही करता आलं. गांधींबद्दल एकूणच वाद जास्ती आहे. मग गांधीवाद तर दूरच राहिला.

एखाद्या माणसाला महात्माच करून टाकलं की कदाचित त्याच्यावर चर्चा होण्याचा स्कोप संपत असावा. एकदम दाऊ पेक्षा होलिअर! मला असं शिवाजी महाराजांच्या बद्दलपण वाटतं. माणसाला माणूस असण्याची मुभा संपली की मग विषयच संपला. असो. आधीच न झेपलेला विषय सुरु आहे, त्यात महाराज आणून सोडले म्हणजे तर सगळाच गोंधळ उडायचा. तर आपण मोहन वरच परत येऊ.

आता बघा, आपल्याला ज्ञात असलेल्या गांधीना चोरून जाऊन नॉन वेज खायचं, किंवा नॉन वेज हेच इंग्रजांच्या ताकदीचं रहस्य आहे असं म्हणून सगळ्या भारताला नॉन वेज खायला घालून ताकदवान करायचा छुपा प्लॅन बनवायचं स्वातंत्र्य आहे? किंवा जगाला मदत करता करता, आपल्या बायकोला मात्र कानाला धरून घराबाहेर निघून जा असं सूनवण्याचं स्वातंत्र्य आहे? या पुस्तकातल्या मोहनला ते आहे. म्हणून तो जड जातो. तो प्रत्येक टप्प्यावर स्वतःला बदलत, सुधरत आणि घडवत जातो. म्हणून त्याला जज पण करता येत नाही. तिथं आणखी अवघडल्यासारखं होतं.

जॉब्सच्या पुस्तकासारखं हे पुस्तकही थोडंसं I'm not particularly proud of all the things I've done च्या नोट वर सुरु होतं. इथे मोहन म्हणतो की मी चुकत शिकत दुरुस्त करत इथवर आलोय. हे माझे प्रयोग. या माझ्या बरोबर चूक गोष्टी. तुम्हाला यातून शिकण्यासाठी. एखाद्या विद्यार्थ्याने शास्त्रीय प्रयोग केल्यासारखे हे माझे प्रयोग. तेवढंच माझं श्रेय. बाकी शास्त्र वैश्विकच. मी कायम स्वतःला तपासत जाईन आणि जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे बदल करत जाईन. म्हणजे हे जे आज म्हणतोय ते उद्या रिवाईज व्हायला स्कोप. आणि तो असलाच पाहिजे.

अशी ही गोष्ट, गुजरातमधून, इंग्लंड, फ्रांस मधून, आफ्रिकेतून भारतात येऊन थडकते. आता मोहन इथून पुढे जो काही असणार आहे, जे काही करणार आहे, ते सगळं थेट लोकांच्या समोरच असणार आहे. त्यात वेगळं काय लिहायचं? असं म्हणून रजा घेते. मात्र तेव्हाचा मोहन, आणि आपण महात्मा म्हणून मिरवतो ते गांधी यांच्यात लई तफावत आढळते!

मोहनसाठी इंग्रज सरसकट बदनाम आणि वाईट होते असं वाटत नाही. म्हणजे ऑनसाईट जाऊन आलेल्याला जसे पाश्चिमात्य म्हणजे सरसकट संस्कृतीहीन वाटत नाहीत तसे. मोहनचा अभ्यास आणि वाचन एकदम बाप! मग ते धर्मग्रंथांचं असो, राजकीय असो किंवा ऐतिहासिक असो. वेगवेगळ्या थेरपीवरचा अभ्यासपण कडक. हायड्रो थेरपी, अर्थ थेरपी अशा नैसर्गिक उपचारावर खूप जाम विश्वास. पुस्तकामध्ये एक प्रसंग आहे ज्यात मोहन आपल्या तापानं फणफणलेल्या मुलाला या असल्या थेरपीने बरं करतो. तेव्हा अंगावर काटा येतो. मजा अशी आहे की असाच प्रकार जॉब्सच्या आयुष्यातही घडलेला. पण फरक असा की आपले आजार नॉन वेज न खाल्ल्याने, फलाहार केल्याने किंवा कोण्या हर्बल थेरपीनेच बरे होणार या हट्टापायी जॉब्सने आपला जीव गमावला. मोहनच्या प्रयोगामध्ये अशी कॅजुलटी होत नाही.

मोहन पासून महात्मा पर्यंतचा प्रवास खडतर वाटतो. मोहनसाठी आणि त्याच्या अजूबाजूच्यांच्या साठीसुद्धा. हा सगळा प्रवास मावळ नक्कीच वाटत नाही. किंबहुना विलक्षण ताकदी शिवाय हे असं करणं अशक्यच असं वाटतं. आपल्या बायको आणि मुलांसाठी आपण काय करू शकलो आणि काय नाही याचं मोहनचं विश्लेषण आणि खंत दोनही मनाला लागतात. या पुस्तकातल्या बऱ्याच गोष्टी कशाच्या मागे दडतील इतक्या किरकोळ नाहीच वाटत, तरीही कुठं हरवल्या हेही कळत नाही.

असो. तर सुरुवातीला म्हणाल्या प्रमाणे अजूनही काय लिहायचं हे कळलं नाहीचय हे दिसलंच असेल. आजचे बरेचसे राजकीय किंवा सामाजिक पेच प्रसंग हे पुस्तक चाळताना परत आठवतात. मी मागे हिंद स्वराज हे पॉकेटबुक वाचलेलं. त्यातल्या बऱ्याच मुद्द्यांची पार्श्वभूमी या पुस्तकात सापडते. गांधींना अभिप्रेत स्वराज आणि आपल्याला १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेलं स्वातंत्र्य हे फारच भिन्न वाटतात. आणि त्यानंतरही आपण फारसं त्याबद्दल काही केलंय असंही नाही वाटत. स्वावलंबी होण्यापासून, मग ते आपण स्वतः असो, आपलं घर असो, गाव असो, आपलं राज्य असो किंवा आपला देश असो, आपण एकूणच लांब चाललोय असं वाटतं. आणि याची खंत वाटू नये याची पुरेपूर काळजीही घेतोय. आणि हे फक्त भारत देशापुरतं सीमित नाहीए. अमेरिका आणि इग्लंडसारखे देशही याला अपवाद वाटत नाहीत. आणि म्हणून गांधी, त्यांचे विचार, त्यांच्या पद्धती हे more relevant than ever वाटले मला.

असो. शेवटी हा सगळा एक्को है कहानी पर बदले जमाना टाईप प्रकार आहे. जरा वेळ लागेल हे सगळं पचायला. दरम्यानच्या काळात लिओ टॉल्स्टॉयचं वॉर अँड पीस झालं. आता पुढचा पाडाव माईन काम्फ.