Tuesday, March 21, 2017

My Encounter With The Truth


मला आठवतंय, शाळेत असताना शेंबूड पुसायला येत नसला तरी आम्ही हिरीरीनं गांधी, सावरकर, टिळक, चवीला हवा असेल तर गोडसे आणि थेट हिटलर मध्ये स्पर्धा लावायचो! हौशी लोक त्यामध्ये आंबेडकर, भगतसिंग पासून थेट शिवाजी, आणि अकबर यानाही ओढायला कमी करायचे नाहीत. उगाचच मला अमुक अमुक आवडतो असं एकानं म्हणायचं आणि मग बाकीच्यांनी त्याची इज्जत काढायची. Identifying yourself with whom you hate most or whom you cannot stand if anyone else hates at all ची ही आपली पहिली पायाभरणी असावी. आमच्या शाळेत जेव्हा आम्ही ही स्पर्धा भरवायचो तेव्हा, मला अमुक आवडतो म्हणणाऱ्यांनाही फारशी अक्कल नसायची आणि त्यांना उलट बोलणाऱ्यानाही फारसं कळलेलं नसायचं. पुढे इतिहासाच्या पेपरमध्ये शिट्ट्या वाजल्या की कळायचं की कोणी किती पुड्या सोडलेल्या. पण मोठं झाल्यावर आत्ता कुठे काय परीक्षा बिरीक्षा? त्यामुळे बऱ्याचशा बाबतीत मी त्या अवस्थेतून फारसा बाहेर आलोय असं वाटत नाही अजूनही. पण आलं पाहिजे खरं.


हे आठवायचं कारण म्हणजे, आपल्या पुस्तकी कारकिर्दीची तब्बल तीन पुस्तकं संपल्यावर आपण थेट गांधीबाबांची ऑटोबायोग्राफीच उचलली. हय गय नाय काय! पण हा प्रकार जरा वेगळाच निघाला. तब्बल एकोणीस तास खपवल्यावर कळलं की आपल्याला किती कमी कळलेलं तेच जास्ती कळलंय! म्हणून यावर काहीतरी लिहावं असं बऱ्याचदा उचंबळून आलं तरी काय आणि कसं लिहावं हे झेपत नव्हतं. माहिती असलेलं किंवा माहिती आहेच असं वाटलेलं पुसून परत पाटी कोरी करायची कुवत किंवा हिम्मत यांच्यातल्या एकात कुठेतरी विकेट पडायची.


मोहनबाबूंच पुस्तक संपून आता काही महिने झाले. पुस्तकात मोहनचा बॅरिस्टर होऊन नंतर महात्मा झाला. पण तो होता होता आपल्याला मात्र दम लागला. पुस्तकाच्या शेवटी महात्मा म्हणलं गेल्याबद्दल त्यालाही छान नाही वाटलं. गांधी हा विषयच जरा विचित्र करून ठेवलाय आपण. नाही? जॉब्स आणि मलालाचं पुस्तक समोर असताना, तेव्हा तेव्हा नव्यानं समजलेल्या गोष्टींबद्दल गप्पा मारता यायच्या. हे मला इथं नाही करता आलं. थेट टोकाचीच चर्चा सुरु व्हायची इथे. गांधींबद्दल एकूणच वाद जास्ती आहे. मग गांधीवाद तर दूरच राहिला. एखाद्या माणसाला महात्माच करून टाकलं की त्याच्यावर चर्चा होण्याचा स्कोप संपत असावा. एकदम दाऊ पेक्षा होलिअर! (मला असं शिवाजी महाराजांच्या बद्दलपण वाटतं. माणसाला माणूस असण्याची मुभा संपवली की मग विषयच संपला. असो. आधीच न झेपलेला विषय सुरु आहे, त्यात महाराज आणून सोडले म्हणजे तर सगळाच गोंधळ उडायचा. तर आपण मोहन वरच परत येऊ.)


आता बघा, आपल्याला ज्ञात असलेल्या गांधीना चोरून जाऊन नॉन वेज खायचं, किंवा नॉन वेज हेच इंग्रजांच्या ताकदीचं रहस्य आहे असं म्हणून सगळ्या भारताला नॉन वेज खायला घालून ताकदवान करायचा छुपा प्लॅन बनवायचं स्वातंत्र्य आहे? किंवा जगाला मदत करता करता, आपल्या बायकोला मात्र कानाला धरून घराबाहेर निघून जा असं सूनवण्याचं स्वातंत्र्य आहे? या पुस्तकातल्या मोहनला ते आहे. म्हणून तो जड जातो. तो प्रत्येक टप्प्यावर स्वतःला बदलत, सुधरत आणि घडवत जातो. म्हणून त्याला जज पण करता येत नाही. तिथं आणखी अवघडल्यासारखं होतं.


अशी ही गोष्ट, गुजरातमधून, इंग्लंड, फ्रांस मधून, आफ्रिकेतून भारतात येऊन थडकते. आता मोहन इथून पुढे जो काही असणार आहे, जे काही करणार आहे, ते सगळं थेट लोकांच्या समोरच असणार आहे. त्यात वेगळं काय लिहायचं? असं म्हणून रजा घेते. मात्र तेव्हाचा मोहन, आणि आपण महात्मा म्हणून मिरवतो ते गांधी यांच्यात लई तफावत आढळते!

जॉब्सच्या पुस्तकासारखं हे पुस्तकही थोडंसं I'm not particularly proud of all the things I've done च्या नोट वर सुरु होतं. इथे मोहन म्हणतो की मी चुकत शिकत दुरुस्त करत इथवर आलोय. हे माझे प्रयोग. या माझ्या बरोबर चूक गोष्टी. तुम्हाला यातून शिकण्यासाठी. एखाद्या विद्यार्थ्याने शास्त्रीय प्रयोग केल्यासारखे हे माझे प्रयोग. तेवढंच माझं श्रेय. बाकी शास्त्र वैश्विकच. मी कायम स्वतःला तपासत जाईन आणि जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे बदल करत जाईन. म्हणजे हे जे आज म्हणतोय ते उद्या रिवाईज व्हायला स्कोप. आणि तो असलाच पाहिजे. मलाही. आणि तुम्हालाही.

मोहनसाठी इंग्रज सरसकट बदनाम आणि वाईट होते असं वाटत नाही. म्हणजे ऑनसाईट जाऊन आलेल्याला जसे पाश्चिमात्य म्हणजे सरसकट संस्कृतीहीन वाटत नाहीत तसे. मोहनचा अभ्यास आणि वाचन एकदम बाप! मग ते धर्मग्रंथांचं असो, राजकीय असो किंवा ऐतिहासिक असो. वेगवेगळ्या थेरपीवरचा अभ्यासपण कडक. हायड्रो थेरपी, अर्थ थेरपी अशा नैसर्गिक उपचारावर खूप जाम विश्वास. पुस्तकामध्ये एक प्रसंग आहे ज्यात मोहन आपल्या तापानं फणफणलेल्या मुलाला या असल्या थेरपीने बरं करतो. तेव्हा अंगावर काटा येतो. मजा अशी आहे की असाच प्रकार जॉब्सच्या आयुष्यातही घडलेला. पण फरक असा की आपले आजार नॉन वेज न खाल्ल्याने, फलाहार केल्याने किंवा कोण्या हर्बल थेरपीनेच बरे होणार या हट्टापायी जॉब्सने आपला जीव गमावला. मोहनच्या प्रयोगामध्ये अशी कॅजुलटी होत नाही.


शेवटी मोहन पासून महात्मा पर्यंतचा प्रवास खडतर वाटतो. मोहनसाठी आणि त्याच्या अजूबाजूच्यांच्यासाठीसुद्धा. हा सगळा प्रवास मवाळ नक्कीच वाटत नाही. किंबहुना विलक्षण ताकदी शिवाय हे असं करणं अशक्यच असं वाटतं. आपल्या बायको आणि मुलांसाठी आपण काय करू शकलो आणि काय नाही याचं मोहनचं विश्लेषण आणि खंत दोनही मनाला लागतात. या पुस्तकातल्या बऱ्याच गोष्टी कशाच्या मागे दडतील इतक्या किरकोळ नाहीच वाटत, तरीही कुठं हरवल्या हेही कळत नाही.

असो. तर सुरुवातीला म्हणाल्या प्रमाणे अजूनही काय लिहायचं हे कळलं नाहीचय हे दिसलंच असेल. आजचे बरेचसे राजकीय किंवा सामाजिक पेच प्रसंग हे पुस्तक चाळताना परत परत आठवत राहतात. मी मागे हिंद स्वराज हे पॉकेटबुक वाचलेलं. त्यातल्या बऱ्याच मुद्द्यांची पार्श्वभूमी या पुस्तकात सापडते. गांधींना अभिप्रेत स्वराज आणि आपल्याला १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेलं स्वातंत्र्य हे फारच भिन्न वाटतात. आणि त्यानंतरही आपण फारसं त्याबद्दल काही केलंय असंही नाही दिसत. स्वावलंबी होण्यापासून, मग ते आपण स्वतः असो, आपलं घर असो, गाव असो, आपलं राज्य असो किंवा आपला देश असो, आपण एकूणच लांब चाललोय असं वाटतं. आणि याची खंत वाटू नये याची पुरेपूर काळजीही घेतोय. आणि हे फक्त भारत देशापुरतं सीमित नाहीए. अमेरिका आणि इग्लंडसारखे देशही याला अपवाद वाटत नाहीत. आणि म्हणून गांधी, त्यांचे विचार, त्यांच्या पद्धती हे more relevant than ever वाटले मला.


असो. शेवटी हा सगळा एक्को है कहानी पर बदले जमाना टाईप प्रकार आहे. जरा वेळ लागेल हे सगळं पचायला. दरम्यानच्या काळात लिओ टॉल्स्टॉयचं वॉर अँड पीस झालं. आता पुढचा पाडाव माईन काम्फ.