Saturday, September 15, 2018

पार्टीशन

संध्याकाळी थोडासा वेळ काढून बर्लिन वॉल मेमोरियलला धडकून आलो. खूपच तुटपुंजी माहिती आहे मला या वॉलबद्दल. कदाचित त्यामुळं कुतूहल बरंच आहे. असलेलं पार्टिशन इथल्या लोकांनी म्हणे काढून टाकलं आणि दोन तुकड्यांचा परत एक देश केला. ही कल्पनाच भारी वाटली एकूण. त्यामुळं खास जायचं होतं इथं. पण मी पोचतो ते बंद झालेलं. मग बाहेरून जे दिसलं ते बघून परत आलो. तिथं राहिलेले अवशेष, ग्राफिटी, आणि त्याभोवती घुटमळणाऱ्या सहलीसाठी आलेल्या टोळक्या असं एवढंच चित्र बघायला मिळालं.

दुसऱ्या महायुद्धनंतर अमेरिका आणि रशियामध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाचे पडसाद बर्लिनमध्ये ठळकपणे उमटले म्हणे. त्याचंच एक प्रतीक म्हणजे ही भिंत. लोकांना communist ईस्ट जर्मनी कडून capitalist वेस्ट जर्मनी कडे जायला मिळू नये म्हणून बांधलेली. नाना प्रकारे लोकांनी ही भिंत पार करायचा प्रयत्न केला. कोणी भुयारं खणली. कोणी विमानं उडवली, कोणी फुग्यातून गेले. या प्रयत्नात बरेच लोक यशस्वी झाले, तर काही लोक मारलेही गेले. प्रत्येक अशा प्रयत्नानंतर भिंत आणखीच दणकट करण्यात आली. भिंतीच्या बाजूला बंदुकी, landmines आणि वॉच टॉवर या गोष्टी येत गेल्या. हे सुरू असताना, वेस्ट जर्मनीची म्हणे बरीच प्रगती होत राहिली. आणि ईस्ट जर्मनी त्या मानाने गरिब राहिली. याच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि अमेरिका यांचा शतरंज सुरूच होता. काही दशकं हे असंच सुरू राहिलं आणि मग १९८९ ला म्हणे भिंत पाडून शेवटी दोन देशांचा परत एक देश झाला. हा असा काहीसा इथला इतिहास आहे.

एकूणच पार्टीशनच्या फार उल्लेखनीय गोष्टी आपल्याला ज्ञात नसल्यानं याचं कौतुक जास्ती वाटलं. आणि हे पार्टीशन तर भीषण महायुद्धा नंतरचं. म्हणून खरं सांगायचं तर परिस्थितीचा अंदाजही नीटसा करता आला नाही. पण तसं म्हणलं तर युरोप मध्ये अशी बरीच ठिकाणं सर्रास आढळतात की जिथं आज बेल्जियन चॉकलेट घालून बनवलेला फ्रेंच क्रेप विकणारा पोलिश माणूस बर्लिनच्या रस्त्यावर उभा असेल. पहिलं आणि दुसरं महायुद्ध आठवलं तर याच देशाची माणसं एकमेकाला बेचिराख करायला निघालेली. या महायुद्धांच्या खलनायकांचा कायमच खूप उदो उदो होतो. मग ते चर्चिल असो, हिटलर असो किंवा मुसोलिनी असो. पण सध्याचं हे चित्र पाहून मला राहून राहून प्रश्न पडतो की इतक्या पराकोटीच्या रक्तपातानंतर, हे आजचं चित्र उभं करणारे नायक कोण असावेत? आणि तेही एका देशात नाही तर युरोपच्या इतक्या सगळ्या देशात एकाचवेळी कार्यरत असणारे. आम्हीच श्रेष्ठ, आम्हीच बरोबर होतो आणि आम्ही सोडून बाकी सगळ्यांचा द्वेष करा हे सुलभ तत्वज्ञान मागे सोडायला जित आणि जेते या दोघांनाही कोणी परावृत्त केलं असेल? सध्याच्या युरोपमध्ये एकमेकाचे हेवेदावे नाहीत असं नाही. फ्रेंच लोकांच्या स्वभावावर ताशेरे ओढले जातात. आर्थिक दृष्ट्या कमकुवत ग्रीस आणि इटलीची चेष्टा होते. पण जुनी उणी दुणी नव्या पिढीला संस्कार म्हणून देऊ केलेली आढळत नाहीत. किंवा मला तरी आढळली नाहीत.

हे कसं झालं असेल?







ता.क. केल्याने देशाटन वाला भाग आहे हा जरा. जसा हा प्रश्न सापडला तसंच आणखी जरा फिरलो की कदाचित त्याचं उत्तरही सापडेल अशी आशा आहे. बाकी इतिहासाचा अभ्यास इतिहासाच्या परीक्षा संपल्यानंतर इतका भारी वाटायला लागला हे गूढ जरा मजेशीर आहे.

No comments: