Saturday, June 20, 2020

Part 5: तर, हे असं इथून सुरु झालेलं

काही देशांच्या व्हिसासाठी फॉर्म भरायचा असला की मागच्या ८-१० वर्षातल्या प्रत्येक परदेश वारीची नोंद करून द्यावी लागते. उदाहरणार्थ युके चा व्हिसा. खूप कटकटीचं वाटलं तरी याला पर्याय नसतो. अमक्याच्या व्हिसाला लागत नाही की! मग यांनाच कशाला हवं? तमक्याला मागचे दोनच वर्ष चालतात, मग याना कशाला दहा हवेत? रिन्यू तर करायचाय; इतका इतिहास भुगोल हवाच कशाला? ही अशी स्वतः स्वतःपाशी कुरकुर करत का असेना, सगळी पाळंमुळं खणून यादी बनवावी लागते. पण या सगळ्यामध्ये एक छान गोष्ट अशी होते, की उगाचच मागे केलेल्या सगळ्या प्रवासाची थोडीशी का होईना आठवण निघते. आता आजकाल मी अधून मधून स्वतः स्वतःच नव्या भटकंतीची नोंद करून ठेवतो. कोणी मागो, ना मागो. माझ्याकडे असे किमान वीस देश नक्की जमलेले. आणि याच आठवणी काढता काढता, नव्या प्रवासाची तयारी सुरु झाली. कामासाठी प्रवास करणं वेगळं आणि स्वतःसाठी प्रवास करणं वेगळं, असलं स्वतःलाच खुश करणारं तत्वज्ञान पाझळुन, मी कागदावर काहीतरी खरडायला सुरु तर केलेलं. पण हा सगळं आराखडा तयार करायचा घाट फार काळ तग धरणार नव्हता. का ही सगळी उठाठेव? का इतकी खाज? या प्रश्नाचं खरं उत्तर सहसा मेलेडी खाव, खुद जान जाव, हे असंच असतं. फक्त वहां तक पोहोचने का रास्ता खूप साऱ्या analysis paralysis से गुजरता है.


प्रवास कुठे करायचा, कधी करायचा, केवढा करायचा, याचा पत्ता नसला तरी, जोश जोश मध्ये, माझी प्रवासात काय नाही करायचं याची मोठी यादी झालेली. महागडी विमानाची तिकिटं नकोत, हॉटेलं नकोत, एअर बिएनबी नको, फारसं सामान सुद्धा नको. फारसं आखीव रेखीव नको. मग काय हवं? तर हमारा प्लॅन कैसा होगा? सस्ता सुंदर टिकाऊ होगा हे एवढंच हवं. तसंही विमानाच्या भानगडीत आपली धावपळ आणि दमछाक जास्ती होते. आणि मग पळायचंच असेल तर मग मौका, दस्तुर, युरोप आणि ट्रेन हे आहेच की! खरं सांगायचं तर, लै जोरात काहीतरी करायचंच आहे असं माझ्याकडे काहीच नव्हतं. आणि कदाचित, हा एवढाच एक प्लॅन हाताशी होता. ही ती मेलडी खाव मोमेन्ट. चुकीचा पेपर सोडवत बसलोय हे समजेपर्यंतची धडपड. मग कळलं, की, करून बघायचं आहे, हे एकच कारण घेऊ. बाकी आल्यावर बघू. आणि मग पुंडलिक वरदे हरी विठ्ठल करून निघालो.


नाश्ता झाला, जेवण झालं, दारं खिडक्या बंद केल्या आणि दुपारी निघालो. बस स्टॉप पाशी पोचण्याआधी, कोपऱ्यावर मार्क आणि वॉटसन काका, त्यांच्या अड्ड्यावर बसलेले सापडले. मग त्यांच्याबरोबर एक कॉफी टाकली आणि थोडा वेळ त्यांच्या गप्पांमध्ये सामील झालो. वॉटसन काकांचं म्हणणं होतं की संगीत प्रेमी असाल तर तुम्हाला जॉन लेनिन काय किंवा रवी शंकर काय, थोडे फार ऐकून तरी माहिती असलेच पाहिजेत. आणि नेहमीप्रमाणे मार्कचं यावर काहीही म्हणणं नव्हतं. किंबहुना, यावर काहीतरी म्हणणंच का असावं असं त्याचं म्हणणं होतं. मी ताजा ताजा सापडलो म्हणल्यावर, काकांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. मी त्यांना, स्टीव्ह जॉब्सला कसा जॉन लेनिन आवडायचा आणि एकूणच बीटल्स आणि जॉब्सचं कसं नातं होतं याची गोष्ट सांगितली. अर्थातच, हे तरी मला का माहिती असावं अशी मार्कची प्रतिक्रिया होतीच. "हा तर म्हातारा झाला ऐशीचा, त्याला काय म्हणणार? पण अरे तुला काय प्रॉब्लेम आहे" अशा नजरेने मार्कने माझ्याकडे बघितलं आणि आम्ही दोघेही हसलो. काका अजून पुढच्या दोन गोष्टी सांगायला सरसावले. पण मी मात्र काढता पाय घेतला. माझी बसची वेळ झालेली. या अशाच अजून खूप साऱ्या गोष्टी गोळा करून येईन, आणि मग परत गप्पा मारू, या बोलीवर आम्ही अलविदा केलं. निघताना एक फोटो घेतला नाही याची खंत राहिली.


"वेलकम टू प्राग" म्हणायच्या सुद्धा आधी "अरे... तुझ्या कानावर केस आहेत!" पासून माझी प्रागमधली पहिली सकाळ सुरु झाली. मिखीलने हे प्रथमच पाहिलेलं म्हणे. "तुझं नाव मिखिल कसं? मिखाईल कसं नाही? किंवा कमीत कमी निखिल तरी असायचं!" असं म्हणून मी त्याला उत्तर दिलेलं खरं, पण आपल्या आणि आजूबाजूच्यांच्या वयातला फरक हा असा चालण्या बोलण्यातून किंवा वागण्यातून वारंवार जाणवणार की काय, हा विचार येऊन गेलाच. आदल्या रात्री हॉस्टेल मध्ये आल्या आल्या नाव गाव फळ फुल लिहून घेतलेली मुलगी पहिली, आणि आता हा मिखील दुसरा. आम्ही तिघेही दिसायला सरसकट एकाच वर्गातले वाटत असलो, तरी माझी तुम्हारी त्वचा से तुम्हारे उमर का पताही नहीं चलता वाली झाकली मूठ होती. आता दर दुसऱ्या व्यक्तीला भेटलो की हा वयाचा गुणाकार भागाकार करायची सवय लागते की काय असं वाटणार तेवढ्यात माझ्याहूनही मोठा, एक कॅनेडियन बापू आमच्यात येऊन मिसळला. इकडून तिकडून अजून थोडे फार लोक असेच येऊन मिसळले आणि आता आमच्या ग्रुपमध्ये माझ्याहून लहान, आणि मोठे, असे दोन्हीकडचे लोक होते. इथे जमलेल्या प्रत्येकाची वेगवेगळी गोष्ट होती. सगळे in transit. आणि जेवढे काही तास किंवा दिवस आम्ही एकत्र असणार होतो, त्या तेवढ्याशा फटीमधून जो काही कवडसा पडेल, तेवढी एकमेकाला समजणार होती. कधी कधी मला वाटतं, हा एकूण प्रकार मला कदाचित भटकंती करायला परावृत्त करत असावा.


आता हा कॅनडा वासी बापू घ्या. त्याच्या मुलाला इंग्लंडमध्ये कॉलेजात प्रवेश मिळालेला. मुलगा लंडनमध्ये कॉलेजच्या पहिल्या दिवसाची तयारी करत होता, आणि हा युरोप फिरायला आलेला. म्हणाला की, मुलाला आता ऑकवर्ड होतं बापासोबत यायला. आणि that works for me, too. दुसरीकडे शाळा कॉलेज संपलं म्हणून महिनाभर फुकट फिरायला आलेले दोघे जर्मन विद्यार्थी होते. हे जर्मन आणि डच लोक इतके ताडमाड उंच कसे असतात देव जाणे. हमारी हाइटसे हमारी उम्रका पताही नहीं चलता श्रेणीमधले सगळे. मी कुठल्या युनीवर्सीटी मधून आलोय, हे त्यांना असलेलं कुतूहल. मी त्यांना माझं तोडकं मोडकं जर्मन बोलून दाखवलं. आणि त्यांच्याकडून दोन तीन शब्द उधार घेऊन पुढे चालू लागलो. आमच्यामध्ये अजून एक जोडगोळी होती. ती एक वेळ असते न जेव्हा आपली ओळख आपण कुठे काम करतो ते सांगून देतो, आपल्या कंपनीच्या ब्रँड वाल्या बॅग, टोप्या, वगैरे वगैरे वापरतो, त्या वयातले होते दोघे जण. आता, मी पर्सिस्टंट वाली बॅग फाटेपर्यंत गेल्या वर्षापर्यंत वापरात होतो, हा भाग वेगळा. हे दोघे नुकतेच अमेझॉन मध्ये लागलेले. मग आता काय सांगू आणि काय नको ही अशी अवस्था. त्यामुळे दोन गोष्टी सांगितल्या, की तिसऱ्या गोष्टीला म्हणायचे की, अजून जास्ती माहिती देऊ शकत नाही, कारण ते गोपनीय आहे. आम्ही तसा करार केलाय. मी म्हणालो, म्हणजे एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट का? तर दोघेही एकसुरात म्हणाले, नाही नाही, "नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट असतं ते." मी म्हणालो, "जे बात. छान आहे. त्या निमित्ताने तुम्ही कामाचं काही बोलणार नाही तर या ट्रीप मध्ये." हा आमचा आईस ब्रेकर. बघता बघता आमची दहा बारा लोकांची वरात आता प्रागच्या गल्ल्यातून खिदळत निघाली. या प्रत्येकात मला, माझी माझीच कुठली तरी भूतकाळातली किंवा भविष्यकाळातली आवृत्ती दिसत होती. आणि हा एक वेगळाच अनुभव होता. ट्रीपमध्ये गोळा केलेलं हे पाहिलं सुवेनिअर. हा अनुभव खूप काळ राहील माझ्याबरोबर.


तसं प्राग मध्ये येऊन मला अर्ध्याहून जास्ती दिवस झालेला. मी खरं तर आदल्या रात्री पोचलेलो. होस्टेलच्या दारात आईस्क्रीम पार्लर होतं. त्यानं आपल्याला आत जातानाच "सामान टाकून ये, तुझी वाट बघतोय" असं म्हणून खुणावलेलं. मग या आमंत्रणाकडे कसं दुर्लक्ष करणार? बाहेर येणं भाग होतं. दहा वगैरे वाजले असतील रात्रीचे. आईस्क्रीम घेऊन, ते संपेपर्यंत चालून येऊ, या विचाराने पुढे नदीच्या दिशेने चालत गेलो. चार्ल्स ब्रिज गाठला. सुमारे साडे सहाशे वर्षांपूर्वी बांधलेला पूल हा. अर्धा पाऊण किलोमीटर लांबीचा नक्कीच असेल. व्लात्वा नदीमध्ये याचं प्रतिबिंब सुरेख दिसत होतं. नदीच्या बाजूला रोषणाई आहे, खाण्या पिण्याच्या जागा आहेत. सगळ्यांची प्रतिबिंब फोटोमध्ये पकडण्याचे थोडे निष्फळ प्रयत्न केले, आणि मग नाद सोडून दिला. पुलाच्या दुसऱ्या बाजूला उंच ठिकाणी प्राग कॅसल दिसत होतं. तिथं बरेचसे चर्च आहेत, म्यूजियम आहे, तिथे बाजार सुद्धा भरतो म्हणे. एव्हाना हातातलं आईस्क्रीम संपलं आणि मग मी रस्त्याच्या कडेची इलेक्ट्रिक स्कुटर घेतली. ती कशी वापरायची याची जुजबी माहिती करून घेतली, उगाच इकडे तिकडे फिरवली आणि दिली ठेवून परत. पुढे प्रागच्या अंधाऱ्या गल्ल्या हिंडत, गाणी ऐकत भटकलो. छोटे छोटे कॉबल स्टोन वाले रस्ते, हलके पिवळे लाईट, तुरळक लोक, छोटेखानी खाऊच्या जागा, हे सगळं पार करत करत शेवटी हॉस्टेल वर पोचलो. चार लोकांच्या खोलीमध्ये माझी सोय झालेली पण त्या वेळी तिथे मी एकटाच होतो. कोणीतरी दुपारीच सोडून गेलेलं, आणि नवं कोणी आलेलं नव्हतं. हॉस्टेलमधला कॉमन एरिया, किचन एरिया, सकाळी नाश्ता कुठं करायचा, अंघोळ कुठे करायची, या सगळ्या जागा बघून ठेवल्या. प्रत्येक जिन्यापाशी, प्रत्येक कोपऱ्यावर, प्रत्येक भिंतीवर, काही न काहीतरी चिकटवलेले, रेखाटलेले किंवा लिहिलेलं होतं. इथं राहून गेलेल्या लोकांनी सोडलेल्या खुणा, नव्या लोकांना खुणावत होत्या. कुठल्याशा कोपऱ्यातून गप्पांचे आवाज येत होते. कुठं कुठं जाऊन आलो पासून ते उद्या कुठं कुठं जायचं याचे काही न काहीतरी प्लॅन बनत होते. काहीही प्लॅन न करता निवांत बसलेली जनता पण होती. एकदा वाटलं की जाऊन बसावं यांच्यात, पण आता सगळं पहिल्याच रात्रीत करशील काय? असं स्वतःला सांगून, शेवटी झोपून टाकलं.


दुसऱ्या दिवशी भटकत भटकत आम्ही जॉन लेनिनच्या भिंतीपर्यंत पोचलो. रूढी परंपरेप्रमाणे तिथे उभं राहून "हा खास वॉटसन काकांसाठी" असं म्हणून फोटो काढून घेतला. मिखिलने सांगितलं की, इथं म्हणे जॉन लेनिन कधी आलाच नव्हता. पण किस्सा असा झालेला की इथल्या कॉम्युनिस्ट पार्टीने, जॉन लेनिन च्या गाण्यांवर बंदी घातलेली. मग ले के रहेंगे आझादी म्हणत, इथल्या विद्यार्थी वर्गाने बंड पुकारलं. चोरून गाण्यांच्या कॅसेट, डिस्क आणल्या. जे सापडले त्यांनी मर खाल्ला. जे नाही सापडले त्यांनी हे सुरूच ठेवलं. रात्रीमध्ये भिंत रंगवून टाकली. मग पाठशिवीचा खेळ पण सुरु झाला. दिवसा पोलीस येऊन भिंतीवरचे रंग काढायचे आणि रात्रीमध्ये विद्यार्थी जाऊन परत रंगवायचे. नंतर तख्तापालट झाल्यावर, कॉम्युनिस्ट राजवट गाळून पडली. लोकशाही आली. आठवण म्हणून मग या भिंतीला लेनिन वॉल च करून टाकलं. बराच काळ ही भिंत पर्यटकांना येऊन रंगवण्यासाठी पण सुरु होती. त्याच्या खुणा अजूनही इथे दिसतात. समाजवादी राजवटीच्या, राजवटीविरुद्ध केलेल्या बंडाच्या, आणि सध्याच्या भांडवलशाही वर केलेल्या टीकेच्या खूपशा खुणा प्राग मध्ये सापडतात. एक डेव्हिड केर्नी नावाचा कलाकार आहे इथे. त्याने बनवलेल्या कलाकृती प्राग मध्ये य पसरलेल्या आहेत. त्याने एकूणच भांडवलशाही पद्धती विरुद्ध भरपेट हात साफ करून घेतलेले आहेत. बऱ्याचदा वादातीत असल्यामुळे असेल कदाचित, पण प्रत्येक पर्यटकाच्या यादीमध्ये या बाबाने केलेलं काही न काहीतरी असतंच. यापैकी, माझ्या वाट्याला आली ती त्याने बनवलेली अग्ली बेबीज, मेलेल्या घोड्यावर स्वार झालेला सेंट वेन्सलास, आणि पिस्सीन्ग मेन. काहीतरी अनाकलनीय सापडलं की ते सहसा यानेच केलेलं असतं असं मिखिल ने सकाळीच सांगितलेलं.


इथे एक सेंट निकोलसचं चर्च आहे. त्याच्या बाजूला आम्ही कॉफी साठी थांबलो. सेंट निकोलस गरीब किंवा गरजू लोकांची खूप मदत करायचा, भेटवस्तू द्यायचा. जग भर लहान मुलांना भेटवस्तू वाटत फिरणाऱ्या सॅन्टा क्लॉज मागची प्रेरणा म्हणजे हाच सेंट निकोलस. याच्या मृत्यूनंतर, त्याची आठवण आता सॅन्टा क्लॉज मुळे कायम आहे. पुढे फिरत फिरत आम्ही एका सत्तर सेंटीमीटरच्या छोट्याशा रस्त्यावर सुद्धा जाऊन आलो. या इथून जाऊ शकतो म्हणजे तुम्ही जाड नाही, ही पावती, यावर कुणाचं तरी ख्या ख्या करून झालं. एव्हाना, शहराची तोंड ओळख झाली असं म्हणता येईल इतकं पायी फिरून झालेलं. इथून पुढं लोकं पांगली. मी माझ्या वाटेला लागलो. दुपारी जेवायला चक्क एक भारतीय शाकाहारी ढाबा मिळाला. खूपच अनोळखी ठिकाणी, छोट्या गल्लीतून जाताना, ओळखीचा वास आला आणि मी आत गेलो. तिथे हा ढाबा होता. तिथे तारा भेटली. मी सहसा बाहेर एकटं भटकताना खचितच भारतीय काहीतरी खातो. पण यावेळी तुला भेटायचा योग होता, या अशा चिजी वाक्यावर आमच्या गप्पा सुरु झाल्या. तारा दुबईवरून काम धाम सोडून भटकायला आलेली. मूळ शहराच्या थोडी बाहेर एके ठिकाणी एअरबीएनबी घेऊन राहिलेली. माझ्या आधी दोन तीन दिवस आलेली म्हणून मला थोडी सिनिअर असं ठरलं. तिनं गेल्या दोन तीन दिवसातल्या चार पाच छान गोष्टी सांगितल्या. तिने किल्ल्याच्या आतमध्ये पायपीट केलेली, तिथं का जाऊच नको, याच्या कारणांची यादी दिली. मी सकाळी भटकून आलेली ठिकाणं तिची व्हायची होती. मी त्यांची यादी तिला सुपूर्द केली. आणि आपापली इंस्टाग्रामची हॅन्डल्स एकमेकांना देऊन वो अपने रास्ते, हम अपने रास्ते झालो.


पुढे प्राग मधलं ज्युईश म्युजीअमच्या दारापाशी आलो. दुसरं महायुद्ध हा जरा एकूणच आपला कच्चा राहिलेला विषय. म्हणून, आता आलोच आहे, तर हे इथून सुरु करू असं म्हणून आतमध्ये गेलो. या म्यूजियमचे वेगवेगळे भाग आहेत. वेगवेगळ्या सिनेगॉग मधून ज्यू लोकांचं राहणीमान, सवयी, पोशाख, धार्मिक गोष्टी, आणि शेवटी सेमेट्री दाखवलेल्या आहेत. इथल्या पिंकाज सिनेगॉग मध्ये, एका रिकाम्या खोलीमधून पुढं जावं लागतं. या खोलीमध्ये, चारही बाजूला, इथे गोळा केलेल्या आणि पुढे छळ छावणीमध्ये पाठवल्या गेलेल्या सुमारे ७८,००० ज्यू लोकांची नावं लिहिलेली आहेत. मी गेलो तेव्हा फारसं कोणी नव्हतं तिथं. कानठळ्या बसतील इतकी शांतता खोलीत होती. An epitaph for those who have no grave, हे या दालनचं नाव. पुढे एके ठिकाणी, छळ छावणीमध्ये असताना, तिथल्या लोकांनी, लहान मोठ्या मुला-मुलींनी काढलेली चित्रं, लिहिलेल्या कविता, गोष्टी, निबंध यांचा संग्रह आहे. या छावणीमध्ये येण्याच्या आधी आयुष्य कसं होतं, पासून ते, इथून कधीतरी आपण बाहेर निघू, मित्र मैत्रिणींबरोबर खेळायला बाहेर जाऊ, गप्पा मारू, हे सगळं त्यात मांडलेलं होतं. यामध्ये अगदीच माहिती नव्हतं असं काही नव्हतं. थोड्याफार गोष्टी माहिती असतातच की आपल्याला. पण असं रुबारू व्हायला आपण कितपत तयार असतो त्याची ही चाचणी परीक्षा होती.


संध्याकाळ होत आलेली. ओल्ड टाऊन मध्ये फिरता फिरता सकाळच्या गॅंग मधली दोन तीन लोकं परत भेटली. आपण काय काय करून आलो, काहीच कसं केलं नाही, याचे हिशोब सांगत भटकंती सुरु ठेवली. इथे एक १४१० मध्ये लावलेलं ऍस्ट्रॉनॉमिकल क्लॉक सुद्धा आहे. इतकं जुनं आणि अजूनही सुरु असलेलं म्हणून ज्यादा कौतुक. ऍस्ट्रॉनॉमिकल आहे म्हणून मला कुतूहल. यामध्ये चंद्र, सूर्य, राशी, बीशी सगळं कळतं म्हणे. खूप उंच असल्यामुळे मला फारसं समजलं नाही, हा भाग वेगळा. रात्री चक्क एक विगन जागा सापडली जेवण्यासाठी. विगन म्हणजे, पनीर, तोफू किंवा बेचवच असायला हवं असं नाही, हा आपला समाज अजून दृढ झाला. त्यांच्या मेनू वरच्या एकही जिन्नसाचं नाव झेपलं नसलं तरी, जे मागितलं ते चविष्ट नक्की होतं.


प्रागच का? याची तीन मुख्य करणं. पाहिलं म्हणजे युरोप फिरलेल्या शंभर लोकांनी खूप हाइप केलेली. दुसरं म्हणजे, मी कुठून ट्रिप सुरु करायची ठरवताना, रॉकस्टारच गाणं ऐकत होतो. आणि तिसरं म्हणे, इकडे तिकडे क्लिक करत फिरताना, चक्क एका पौंडात आपलं विमानाचं तिकीट झालं की राव!! मग विषयच कट न! खरं तर मला स्वतः गाडी घेऊन सुद्धा जायचं होतं सगळीकडे. पण मग युरोपात ट्रेन, बस वगैरे पण इतकी सुटसुटीत आहे की, तो प्लॅन कधीच रद्द केलेला. फ्लाईट घ्यायची नव्हती म्हणून आपण आधी पॅरिस वगैरे शेजारच्या गावातून सुरुवात करणार होतो. पण एका पौडांत तिकीट म्हणजे विषय संपला. आता इथून पुढे कुठं जायचं याचा विचार करत हळू हळू हॉस्टेलच्या दिशेने चालायला सुरु केलं. एव्हाना माझ्या खोलीमध्ये अजून दोन लोकांची भरती झालेली. हे लोक ऍमस्टरडॅम वरून आलेले फिरत. अचानक तुमच्या सारखे छप्पन लोक आहेत, तुम्ही एकटे नाही, ही एकाचवेळी खूप सुखावणारी, आणि म्हणाल तर दुखावणारी, अशी मिश्र भावना मनाला चाटून गेली. चलो ये भी सही, येऊ दे सगळं बाहेर, असं म्हणत, बॅग टाकली, आणि बाहेर हॉस्टेलच्या किचनमध्ये पोलिश काहीतरी खायला बनवायला शिकवणार होते, त्या क्लास ला गेलो.

दुसऱ्या दिवशी क्राकाव ला जायचं असं ठरलं होतं. आणि त्यात अजून तरी काहीही बदल झालेला नव्हता. म्हणजे, सकाळी उठायचं, आणि नहा धो के ट्रेन पकडायची होती.आजूबाजूचे बस स्टॉप वगैरे बघून, दिवसाची सांगता केली.