Saturday, October 22, 2022

माझं (पण) (शाकाहारी) खाद्य जीवन

माझा "तू भोसले म्हणजे चिकन मटण हाणतच असशील?" पासून "कोल्हापूरचा असून नॉन वेज खात नाहीस?" पर्यंतचा प्रवास अजिबात नाट्यमय नव्हता. पण तो नाट्यमय, क्रांतिकारी, जनहितकरी किंवा वैज्ञानिक असावा असं माझ्या जवळच्या जनतेला अजूनही वाटतं. किंवा त्यांना असं वाटत असावं असं मला वाटतं. आता तर मी शाकाहारी होऊन सुमारे बारा-तेरा वर्ष झालीत. तरीही "काय सांगतो?" "कधीपासून?" हे असले फुलटॉस अधून मधून सर्रास येत असतात. यावर कधीतरी "मेरे पास माँ है" सारखं लिजेंडरी उत्तर सापडवं अशी खूप वर्षं ईच्छा होती. और फिर एक दिन.........

और फिर एक दिन यंदा पुण्याहून परत येताना मला फ्लाईटमध्ये एक गोरा प्राणी भेटला. त्या बाबानं जेवायला विगन मागितलेलं. तसंही आजकाल इतकी गोरी लोकं स्वतःला विगन म्हणून आयडेंटीफाय करतात, की काय सांगू! कधी कधी मला वाटतं लवकरच LGBTQ सारखं Potato-Mushroom-Beetroot वरून PMB असं काहीतरी बनवून विगन लोकांसाठी सर्वनामं पण बनवतील. लंडन वगैरे सोडा, पण मला पोलंडमधल्या क्राकव सारख्या भागात सुद्धा खास फक्त विगन खाण्यापिण्याच्या जागा सापडलेल्या. पूर्वी नॉनव्हेज जगभर सर्वज्ञ आणि स्वाभाविक होतं. वेजीटेरीयन पामराला आपली ओळख करून देताना चिकन मटण नको, गाय बैल नको, मासे नको असा जो तो मी असं सांगावं लागायचं. त्यानंतर सुद्धा ताटात ऑक्टोपस आल्याच्या कथा आहेतच, कारण तुम्ही ऑक्टोपस नको असं थोडीच म्हणालेला? पण अहो, आता हे विगन लोक सहज समजलेत सगळ्यांना! म्हणजे वेजीटेरीयन माणसाचा आयडेंटिटी क्रायसिस गेलाला नाहीये तो नाहीच. आता आम्ही "विगन प्लस चीज किंवा डेअरी चालेल.", अशी ओळख करून देतो. तरीही "मग अंडी चालतील का?" असा कुत्सित प्रश्न कधी कधी वाट्याला येतोच तो भाग वेगळा. (कधी कधी मला वाटतं की हिंदू खतरे में हैं... मुसलमान खतरे में हैं... पेक्षा खरं तर वेजीटेरीयन जास्ती खतरे में हैं! असो) तर अशा आयडेंटिटी क्रायसिस ने ग्रासलेल्या माझ्या वेजीटेरीयन मनाला या गोऱ्या विगनला डिवचायची इच्छा न झाली तरच नवल. मी म्हणालो, "(गोरा म्हणजे बीफ आणि पोर्क हाणत असणार?) विगन? (असं काय झालं जिंदगी मे?) का म्हणे? जस्ट क्युरियस बर का! (काहीतरी मसालेदार, क्रांतिकारी, वैश्विक, सामाजिक आणि वैज्ञानिक सांग बघू) अजून काही नाही." आईस ब्रेकरच्या नावाखाली माझ्या वाट्याला आलेले तसले अजून चार स्टिरीओटाईप खोडसाळपणे खपवले. आता समोरच्याने आपल्या आपल्या श्रध्देनुसार बिटवीन दी लाईन्स वाचावं.

पण हा बाबा नास्तिक निघाला. त्याला श्रद्धा नव्हती. त्यानं मी दिलेला फुल टॉस झेलला आणि अलगद बाजूला ठेवला. त्यातून काहीच क्रांतिकारी, जनहितकारी किंवा गहन बाहेर पडलं नाही. तो म्हणाला, "मी विगन झालो कारण मी विगन झालो. That's it." आणि त्यानं परत जे खात होता ते खायला सुरू केलं. माझ्यासाठी ही युरेका मोमेंट होती. कारण यही जवाब तो मै इतने साल ढूंढ रहा था! डोक्यावरचं वजन गेल्यासारखं झालं. मी पण शाकाहारी झालो कारण मी शाकाहारी झालो. एवढंच तर होतं. आणि एवढंच तर असतं. कुठं "मेरे पास मां है" च्या शोधात गाव भटकत होतो! आपण थोडीच कोंबडीने आज्ज्याला चोच मारली म्हणून कोंबड्या खात सुटलोय? जस्ट... खातो म्हणून खातो. जस्ट लाईक दॅट. चव आवडते, रंग आवडतात, वास आवडतो, अशी सोपी मध्यमवर्गीय करणंच असतात खरं तर. तसंच कोंबडी न खाण्याला पण असूच शकतात की. नाही काय? या सगळ्या प्रकारात माझी मलाच मजा आली.

माझ्या शाकाहारी होण्यामागे ठोस कारणं नव्हती अशातला भाग नव्हता. पण शाकाहारी होण्या आणि न होण्यामागे इतकी ठोस करणं सापडली की गुद्दागुद्दी व्हायला लागली. त्यामध्ये अजून खोल जाण्याचा आळस, हे असं माझं कारण असावं, असं आत्ता मागे वळून बघताना वाटतंय. आपण भारतावर प्रेम का करतो? तर "भारतात जन्मलो म्हणून" हे कारण बहुतांश लोकांसाठी पुरतं. पण सांगायला बोलायला सुजलाम सुफलाम आणि संतांची भूमी बरं पडतं. तसंच ते शाकाहारी मांसाहारी प्रकरण आहे, असं मला कधी कधी वाटतं. आपण कुठं जन्माला आलो, कुठं वाढलो, यामध्येच बहुतांश लोकांची करणं संपत असतील. पुढे मित्र बदलले, जागा बदलल्या, परीस्थिती बदलली की खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. काही उरतात, काही सरतात. शेवटी काय हो, आपलं आपलं तेव्हा तेव्हा ठरलेलं असतं काय करायचं. करणं नंतर काही का सुचेनात. माझे य लोकं ओळखीचे आहेत की जे आधी मांसाहारी नव्हते पण आता आहेत. पण माझ्या वाट्याला येतं ते अटेंशन त्यांच्या वाट्याला नाही येत.

प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, असा एक काळ होता. आठवतंय? तेव्हा अमुक तमुक जाडीच्या पिशव्या वापरू नका. त्या पेक्षा कागदी किंवा कापडी पिशव्या वापरा, याचा खूप कल्ला असायचा. मग तेव्हा एकदा असं वाटलं की, इतक्या पिशव्या वापराच कशाला? असलं काय पिशवी मधलं आयुष्य? चिप्सच्या पॅकेट सारखं बहुतांश पिशव्यांमध्ये हवाच तर असते! चार सीटच्या गाडीतून दोन लोक जायचं आणि हवा भरभरून पिशव्या घेऊन जायचं? खरं सांगायचं तर मला काहीही घंटा फरक पडत नव्हता, पण बसल्या बसल्या मनातल्या मनात क्रांती घडवून आणण्यासाठी हा विषय बरा होता. अजून जरा वेळ याच विषयावर घुटमळल्यानंतर असं वाटलं की पिशव्या भरभरून आणण्या इतक्या गोष्टी लागतातच कुठं आपल्याला? हू म्हणून खरेदी सुरू केली की मग प्लॅस्टिक काय, कागदी काय आणि कापडी काय? शेवटी प्रॉब्लेम म्हणून पिशवीकडे रोखलेल्या हाताची चार बोटं स्वतःकडे आहेत या विषयाकडे आपण येतोच की. याचा अर्थ, जीवन मिथ्या आहे, आणि आपण फकीर है आणि झोला लेके निघू, असं म्हणणं नाही आहे. पण आपल्या सोयीच्या नावाखाली आपल्या आजूबाजूच्या परीसराची, वातावरणाची घाऊक गैरसोय करतोय का, याची जाण असायला काय हरकत आहे?

बीनकामाचं बसलेलं असताना विचार आलेला असला तरी इसमे पॉइंट तो था! पण त्याचं आकलन होईल एवढं गांभीर्य नव्हतं. वाचनाचा आळस आणि आपले सगळेच मित्र मैत्रिणी दिव्य असल्यामुळे सुरुवातीला दिशाहीन प्रश्नांच्या चौफेर फैरी झाडणं सुरु होतं. यातूनच मी प्रथम आपण खातो पितो ते का? तेच का? आणि कशाला? इथंवर पोचलो. बाकीच्या प्रश्नांची नाही तर या प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणून मग इथे खणायला सुरु केलेलं. सुरुवात छोट्या छोट्या लुटूपुटूच्या अर्ग्युमेंट्सनी झाली. अमक्याला आवडतं म्हणून खायचं असतं. तमाक्याला नाही आवडत म्हणून खायचं नसतं, मग या महिन्यात खायचं नसतं, त्या वारी एवढंच खायचं असतं, इथपासून ते जंगलात राहायचे लोक तेव्हा प्राणीच मारून खायचे, शेती केल्यामुळेच खरतर पर्यावरणाची वाट लागली, आपल्या जबड्याचा आकार बघा, दातांची रचना बघा, आणि काय आणि काय आणि काय!

या अशाच क्षणी मर्फीला "अज्ञानात सुख असतं" ही उक्ती सुचलेली असावी. कारण यानंतर दरवेळी खाताना डोक्यात प्रश्नांचा भुंगा डोकावू लागला. एकूणच कनफ्युजन ही कनफ्युजन है, सोल्युशन कुछ पता नही... ही हालत! प्रत्येकाचं आपलं आपलं लॉजिक. त्यात कोणाचंही तुमचं आमचं सेम असतं असं नाही. या सगळ्यामध्ये सुखी माणसं म्हणजे खवय्ये लोक. त्यांचं ब्रीद, खानेका, पीनेका, न्हानेका, धोनेका, बोंब न्ही मारनेका, भाईसे पूछनेका. ऍनालिसिस पॅरालिसिस त्यांच्या गावी नाही. पण या निर्वाणापर्यंत पोचण्यासाठी मला वेळ होता.

दरम्यानच्या काळात मला बरेच नवे नवे प्रश्न मिळत राहिले, आणि साहजिकच कशाचंही एक असं घंटा उत्तर मिळालं नाही. आपण वापरतो त्या गोष्टींमुळे तसंच आपण खातो पितो त्या गोष्टींमुळे, त्या उगवण्यासाठी, त्या पोसण्यासाठी, त्यांची वाहतूक करण्यासाठी आणि त्यांचा निचरा करण्यासाठी लागणाऱ्या साधनांमुळे आपण वातावरणाची आणि आपल्या आजूबाजूच्या परीसराची खूप मोठी झीज करतो आहोत का? जिथे जे पिकतं तिथे ते खावं असं तर शाळेत सुद्धा होतं. गांधीबाबा सुद्धा म्हणाले होते की जिथे जे बनतं ते वापरावं. पण उसे कभी इस नज़र से बघितलेलं नव्हतं. ते सगळं अंगिकारायचं असतं असं कुठं सांगितलेलं? आता ते सगळं तपासून बघण्याची, त्याला उलट प्रश्न विचारण्याची ही पहिलीच वेळ. मुळात शाकाहार म्हणून आपण जे बकासुरा सारखं खातो, ते उगावण्याची आपली क्षमता आहे का? आणि प्रमाणात हवं तेवढंच खात असू तर मांसाहार केला तर योग्य आहे का? कोंबडी खाल्ली तर ठीक मग कुत्रा मारून का खात नाहीत? मांसाहार म्हणून जे प्राणी मारणार, त्यांना सुद्धा पोसायला धनधान्य लागणारच की, मग त्याची क्षमता आहे का? या सगळ्याचा एक सरसकट जगभर लागू पडेल असा क्रांतिकारी नियम होऊ शकतो का? याचा जातीधर्माशी संबंध आहे की हा केवळ कॉमन सेन्सचा भाग आहे?

एके ठिकाणी लिहिलेलं की, भारतीय उपखंडात, किंवा आफ्रिकेत कुठे कुठे, जिथे हवामान नियमित आहे, शेती खूप करता येते, तिथं शाकाहार स्वाभाविक आहे. पण इंग्लंड, रशिया, नॉर्वे सारख्या प्रदेशात जिथे हवामानाच्या नावानं बोंब आहे, जिथं शेती करताना खूप मर्यादा पडतात, तिथं मुबलक गहू, तांदूळ आणि पालेभाज्यांचा हट्ट करणंसुद्धा वेडेपणाचं आहे. उदाहरणार्थ, रशियामध्ये सायबेरीया भागात, भाजीपाल्याच्या नावानं शंख आहे. मग लोक घोडी पण खातात. त्यातल्या घोड्याच मांस काढलं की राहतं ते फॅट हे शाकाहारी म्हणून वाढतात.

मला एक WFP चा रिपोर्ट सापडला. त्यात लिहिलेलं की जगाची लोकसंख्या सात अब्ज असेल, तर आपण म्हणे साडे दहा अब्ज लोकांना पुरेल इतकं अन्न बनवतो! आणि या सातपैकी जवळ जवळ एक अब्ज लोकांना दररोज भुकेल्या पोटी झोपावं लागतं. म्हणजे एकाच बातमी मध्ये टाळ्या वाजवायचेत की आपल्या ऑलरेडी शिट्ट्या वाजलेत, हे कळेना. पण असं आहे म्हणे. मग हे अनाठायी अन्न बनतंय कोणासाठी? त्याची मागणी कोण करतंय? ते वाया कोण घालवतंय? या तीनमध्ये तुम्ही आणि मी कुठे बसतो हे आपलं आपण तपासावं.

हे सगळे लूज एंड्स आहेत खरं तर. थोडा अजून विचार केला असता तर सापडलंही असतं काहीतरी त्यातून. पण मग अशा वेळी कामी येणारी सुपर पॉवर म्हणजे - आळस. डोक्यात इतका कल्ला झाल्यावर आपण एकदम व्यावहारिक मार्ग निवडला. घाला काशी! मला पुरे झालं असं म्हणून, कापडी पिशव्या वापरायच्या आणि कंदमुळे खायचीत न? ते करू की! यावर स्वतःशीच मांडवली केली. बाकी पुणे तिथं वेजिटेरीयन माणसाला काय उणे? प्रमाणात खाओ. खुश रहो. इथे सेटलमेंट झाली. ती अजूनपर्यंत टाकलीय. बाकी प्रश्नांचं काय झालं? तर काहीच नाही झालं. ठेवलेले माळ्यावर. कधीतरी मला त्यातूनच "मेरे पास माँ है!" असं लीजेंडरी उत्तर मिळेल अशी अपेक्षा होती. पण आता त्याची गरजच संपली. मग आज फराळाच्या निमित्तानं सोडलं गाठोडं.

आणि हो ... दिवाळीच्या खुप खूप शुभेच्छा. प्रमाणात खा. 😊