Sunday, March 31, 2019

अपन कुछ और भी हो सकता है

आपण आहोत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळे असू शकतो ही जाणीव एकाच वेळी थोडीशी रिबेलियस आणि थोडीशी अस्वस्थ करणारी आहे. जितके मोठे होऊ, तितकी जास्त. तिशीकडून चाळीशीकडे कूच करता करता मला वाटेत भेटलेलं हे "अपन कुछ और भी हो सकता है" वालं पिल्लू आता भलतंच मोठं झालंय. आता त्याला दत्तक द्यायचं की आपणच वाढवायचं हा, असा पूर्णपणे अनपेक्षित असंही म्हणता येणार नाही, पण तरीही जरा सोचने लायक प्रश्न पडलेला आहे. त्या निमित्तानं हे थोडंसं.

Follow Your Dreams वर रकानेच्या रकाने आणि सिनेमे खपले असले तरी झालं ड्रीम फॉलो करून मग आता पुढं काय, यावर सहज असा फारसा मसाला नाही सापडत! आता झाला मुराद रॅप सिंगर, इक्बाल पण खूप क्रिकेट खेळाला, सीड फोटोग्राफर बनला, किंवा भुवननं तिगूना लगान माफ करवला. मग ३-४ वर्षं झाली. आत कीक मिळेना तीच. पुढं? आता तेच करत बसणार (भुवनला बिचाऱ्याला तो ऑप्शन नाहीए म्हणा!) की दुसरं ड्रीम बघणं झेपणार? हातातलं सोडणार की सगळ्याच दगडांवर पाय ठेवणार? असं वाटत असेलच की. नसेल मसाला तर "खुद लिखो खुदकी कहानी" हेही ठीक आहेच. पण तरीही सगळेच सुपरमॅन आणि स्पायडर मॅन असते, तर मग डीसी आणि मार्वल ने काय करायचं हे असंही आहे.

तर.
आज आपण जसे असू, ते आत्तापर्यंत जे केलं, जे दिवे लावले, त्या सगळ्याचा परिपाक म्हणू. आपण हिरो असलेला प्रत्येकाचा आपापला सिनेमा असतोच की मन की गेहराईयोंमे. मग त्यात कुठेतरी action packed सुरुवात असते, कधीतरी खचाखच मेलोड्रामा असतो, तोंडी लावायला कुठेतरी थ्रील ठासून भरलेलं असतं. त्याचबरोबर मधेच आपण निर्माण केलेल्या आणि आपल्याला देऊ केलेल्या जबाबदाऱ्या, आणि त्यांच्या खाली दबून राहायचा आपलाच अनाकलनीय हट्ट यांनीही स्क्रिप्ट मध्ये घुसखोरी केलेली असते. या सगळ्याचा एक क्लायमॅक्स असतो. मग जिंकतो कुठंतरी आपण. तिथं मजा होते कदाचित. आता संपला की सिनेमा आपला, अशा कुठल्याश्या अनुत्साही मोडवर जाऊन "सेटल" होऊ पाहते गोष्ट. प्रेक्षक असतो तर उठून गेलो असतो. इथे तो स्कोप नाही हे आधी कोणी सांगत नाही राव. काही काळानंतर समोरचं चित्र बदलत नाही. पण सवय होऊन जात असावी जे सुरू आहे त्यात रमायची. त्यातच काहीतरी लुटूपुटूचं शोधून काढायची.

आणि मग चुकून वाटेत राहून गेलेल्या, करून बघूया वाटलेल्या पण कधीच न केलेल्या, किंवा कधी काळी फुलप्रुफ प्लान बनवू म्हणून राखून ठेवलेल्या आणि म्हणून धूळ खात पडलेल्या गोष्टी बंड पुकारतात. अचानक out of nowhere, "पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त" अशी डरकाळी फोडत जाग येते. ती जाणीव म्हणजे ही "आपण आणखीही काहीतरी असायचं होतं" याची झालेली आठवण. अशी डरकाळी फोडल्या नंतर "काही नाही", "काय कुठं?" असं म्हणत वारदात से काढलेला पळ किंवा आता मला तर जादुई चिराग मिळालाय! मी त्यांचं काहीतरी करेनच, तुम्ही तुमचं बघा म्हणून जगाला दाखवलेला ठेंगा, या दोनही गोष्टी तितक्याशा सहज नक्कीच नाहीत. किंबहुना या दोन्ही पेक्षा काहीतरी वेगळंच होत असावं पुढं.

आपापलं छान सगळं हुडकून, एकदम सेट्ट आयुष्य लावलेले पण आहेतच की. आणि त्यांचा आपल्याला जाहीर हेवा वाटतोच. पण हे पुढंच लिहिलेलं सगळं अस्थिर आत्म्यांच्या बाबतीत आहे. लहान असताना, मन किया, मोड़ लिया, मन किया, बैठ गए, करणारं मन, मोठं झाल्यावर हेच करायला इतकं अनॅलिटीकल कसं होत असेल हा एक प्रश्न आहेच? शेवटी य विचार आणि कृती शून्य. म्हणून एकूणच ही "आणखीही काहीतरी असायचं होतं" जाणीव एकाच वेळी थोडीशी रिबेलियस आणि थोडीशी अस्वस्थ करणारी आहे.

Follow Your Dream करताना कुतूहल असतं सगळ्याच बाबतीत. त्यातूनच बरेचसे नमस्कार चमत्कार घडतात. पण, नंतर बरीच वर्षं खपून कर मैदान फतेह झाल्यावर, तेच कुतूहल राहिलंय का? हा प्रश्न विचारायला मन कचरतं. म्हणजे अब तुम मुझे पहले जैसा प्यार नहीं करते सारखं ऑकवर्ड होतं. पण समजा, जर खरंच संपलं असेल कुतूहल, तर सब कुछ दाव पे म्हणून नवा फासा टाकणं कितपत सोपं आहे? नुकतंच संपवलेल्या एका पुस्तकात होतं असं. माणसाचं आयुष्य वाढलं, आणि पूर्वीच्या मूलभूत गरजांच्या साठीची धडपड कमी झाली, म्हणून आता जो ज्यादाचा वेळ काढायचाय, त्यात काय करायचं त्याचं as a species च आपल्याला अजून मोजमाप लागायचं आहे. पूर्वी आयुष्यभर करायच्या असायच्या अशा गोष्टी आता अर्ध्या आयुष्यात करून संपल्या तर नवल नाही. आणि हे असंच असतं म्हणे दर पिढीचं.

पण मग त्यातूनही शोधायचं तर काही उदाहरणं सापडतात बरं का!

आपला स्टीव जॉब्स घ्या. चांगलं अॅपल बनवला. पण तिथून ढुंगणावर लाथ मारून बाहेर काढल्यावर त्याने animation film कडं लक्ष वळवला की. म्हणजे ढुंगणावर लाथ मरायचीच वाट बघायची का आपण? हा आपला माझा प्रश्न. प्रत्येक जण थोडीच भाग्यवान असेल असं बना बनाया असताना पिछवाड़े पे लाथ मिळायला की जेणे करून तुम्ही आता आणखी काय करू यामध्ये लक्ष घालाल!

किंवा स्टारबक्स वाल्या बाबाचं उदाहरण घ्या. हलाखीच्या परिस्थिती मधून आला, खूप अभ्यास केला. Vice president झाला कुठेतरी. "सेट्टल" व्हायची मूलभूत गरज आता भागलेली. पण मग त्याच्या कंपनीमध्ये कॉफी विकायला येणाऱ्या दोन लोकांना बघितला. भला इनकी खुशी मेरे खुशीसे ज्यादा कैसे? या प्रश्नाला उत्तर सापडेना. दिला मग सगळं सोडून आणि टाकला परत फासा. आणि मग बाकीचं सर्वज्ञ आहेच. आपला प्रश्न असाय की, आम्हाला कॉफी विकणारे लोक इतके उत्साही नाहीत, म्हणून आम्ही दुसरं काही चापापून बघायचं राहणार का?

आणखीही भन्नाट गोष्ट शारदा बापटची ऐकली. आहे ते इलेक्ट्रॉनिक्स मध्ये छान सुरु होतं. मग डॉक्टर होऊन बघितलं. ते करता करता मग पायलट पण झाली. आता कॉम्प्युटर आणि हेल्थकेअर मध्ये काहीतरी करतेय. मधेच पियानो वादन शिकली. फक्त करून बघूया हे ब्रीद पकडलं आणि मग बाई थांबल्याच नाहीत.

आता शोधायचं तर मिळतात खरी उदाहरणं. मेहनत लागते पण. पण शेवटी प्रश्न तिथेच आहे. "अपन कुछ और भी हो सकता है" वालं हे मोठं झालेलं पिल्लू दत्तक द्यायचं की आपणच वाढवायचं? पूर्वीच्या काळी "बेटा, ये मेरा सपना अब तू पुरा कर" हे allowed होतं. कारण लोकांची आयुष्यच संपायची. What's your excuse?

असं आपलं मला वाटतं बाबा. म्हणजे अजून बूड हलवून काही केलेलं नसलं तरी, मग बसल्या बसल्या आणखी कोणाच्या बुडाला बत्ती लागते का बघू म्हणून हे जरा लिहून काढलं.

(PS: On a lighter note, स्वदेसच्या मोहन भार्गवने almost करून दाखवलेलं हे. पण आता आपण नासा मध्ये थोडीच काम करतोय? हे असं excuse ठेवू तुरतास. बाकी Bollywood, not having addressed something, is indeed a rare thing!)