Tuesday, August 25, 2026

3Ps - P0rn, Politics and Pun



We don't know how to talk about $ex. We were never taught about it. $ex was always a dirty picture. It was just there. Everyone knew it. Every life was impacted by it. But only a few could talk gracefully about it. Those who didn't know much, held the mouthpiece. Most of us (mis)learnt from these legends. Those who knew, and also could talk about it, were only a few, and were mostly called vulgar, blasphemous, anti-this-thing or anti-that-thing! They made everyone uncomfortable. We were told to stay away from them. Ironically, many times, they were also the first ones to be blamed for the misguided youth.

The youth learnt $ex from the streets, from the myths, and from the urban legends. Different genders carried different ideas about $ex. Different economic strata experienced $ex differently. Different countries formed different approaches towards $ex. No matter where you go, only your approach was pious and others were dirty.

As we got old, as our light started to fade, and we started seeing few things clearly. It dawned upon us that there could be a better way. As a beginning some of us acknowledged that there is a need as well as a possibility of change. As our hormones started dying, we were struck by the wisdom for those who were seeing the dawn of hormones.

Today, some of us silently acknowledge that there could have been a way to teach right things about $ex. We silently acknowledge that there could have been a way to talk about the right expectations, the right ways. We quietly realised that talking about $ex or being able to talk about $ex, may not make anyone a good or a bad person, or even inadequate. But it could create a possibility of getting better as a generation. Some of us silently imagine a world where one wouldn't get embarrassed or targeted for being a certain way, for liking a certain things, or for asking questions, for standing up or for even not standing up.

Although we exactly didn't know, we silently acknowledged that there could be a vocabulary to correctly express oneself without feeling ashamed, sad, embarrassed or attacked. I know that there is a cleaner discourse possible. While we were silent, we didn't know when $ex silently became synonyms to p0rn.

Lately, I got interested in politics. I double clicked upon UK politics as the prime ministers were changing one after another. I double clicked into American politics when I was wondering how on earth a Trump can follow an Obama. I got interested in Indian politics after a long time on a number of occasions. Recent student protests took that interest to its peak. But while I know that I know a little, and I don't have the right vocabulary, I want to know more, I want to express, I want to talk, but I am scared to talk about it.

I see a hope. But I still feel scared to touch any political topic in public.

And hence I just changed the topic to p0rn. And I could say it all. Just read it all again, but keep it in mind it's really about politics.

Do you feel the same way, I do?

Sunday, January 04, 2026

ट्रेनच्या फलाटावरचा एक तास

लोकं वय वाढलं की तिरसट होतात, असं ऐकलेलं. मला वाटतंय जसं माझं वय वाढतंय तसं मला जगच तिरसट होतंय असं वाटायलंय. 


आत्ताच्याच ट्रिपचा उदाहरण घ्या. मी ट्रेनने नुअर्क पेन स्टेशन वरून न्यू-ब्रुन्सविक स्टेशनला जाणार होतो. आता याठिकाणी मला आधी असं नमूद करावं असं वाटतंय की अमेरीकेबाहेरुन आलेल्या पब्लिकने "नुअर्क" हे बरोबर म्हणून दाखवलं की तिथंच अमेरीकनांनी पुढचं सगळं मनातलं ओळखलं पाहिजे. नाहीतर काय उपयोग तुमच्या ऐआय माळून घ्यायचा? 


नुअर्कच्या "नु" चं "न्यू" होत नाही न? "नुअर्क" चं "नेवार्क" होत नाहीये न? आपल्याला आधी "नुअर्क" आणि "न्यूयॉर्क" हे करवीर आणि कोल्हापूर टाइप एकच वाटलेलं, हे समोरच्याला कळत नाहीये न? हे सगळे न्यून ओलांडून आपण नुअर्क यशस्वीपणे म्हणालो, आणि मग त्या गडबडीत बाकी समजा आजूबाजूच्या शब्दांची खांडोळी झाली असेल, तर ती समोरच्याने दुरुस्त करून समजून नाही घेतली, तर त्याला असहिष्णू नाही तर काय म्हणायचं?



आमच्या लंडन मध्ये येऊन लोकं, "ग्रीनीच" ला निवांत "ग्रीनवीच" म्हणून इंग्रज माणसाशी संपूर्ण संवाद साधू शकतात. संवाद संपेपर्यंत आपल्याला भेजा-फ्रायचा भारत भूषण बनवलाय हे अजिबात समजू देत नाहीत. पण अमेरीकेत मात्र हे दिसलं नाही. मी म्हणालो, "मला नुअर्क पेन स्टेशन वरून न्यू-ब्रुन्सविक स्टेशनला जायचंय", आणि वर शंका नको स्पेलिंगसाठी माझं तिकीट सुद्धा दाखवलं. तर तिथल्या काकी म्हणाल्या, "डार्लिंग, आम्ही काय जनता गाडी चालवत नाही!"



तिच्या "डार्लिंग" च्या sarcasm मध्येच मला कळलं पाहिजे होतं की बाईंचे पूर्वज इंग्रजांच्या सानिध्यातच घडले वाढले असावेत. शहाण्या माणसाने इथेच हुज्जत घालायची थांबवायला हवी. पण मी तिच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून, तिने दुर्लक्षिलेल्या माझ्या नुअर्क-कलेचं परत प्रात्यक्षिक करून दाखवलं. "माझ्या या तिकिटावर नुअर्क ला जाता येणार न?" 



पण मग काकी जरा अगदीच थेट बोलल्या. "का सोचे थे? गब्बर साबासी देगा?" का तर "नुअर्क" म्हणाला म्हणून? असं थोडीच होत असतं. बाईंनी समोरच्या वेगळ्या काउंटर कडे बोट करून दाखवलं आणि म्हणाल्या, "एनजे ट्रान्झिट ना विचारा. ऍमट्रॅक ने जायचं तर शंभर डॉलर लागतात!" यामध्ये शंभर वर जोर होता. आणि ऐन जे ट्रान्झिट कडे कनिष्ठ भावना. तर ही ती जनता गाडी! आणि माझं तिकीट साहजिकच ऐन-जे ट्रान्झिटचं होतं.


हा भेदभाव! ही वागणूक! मला वाटलं याच गोऱ्या लोकांनी आपल्या गांधीजीना ट्रेन मधून धक्का मारला असावा. आज आपल्या मुलासमोर क्रांति करूनच दाखवू असं मनाशी ठरवून मी बाह्या सरसावल्या. आणि म्हणालो, "हे बघा डार्लिंग बाई, दोनही ट्रेन केवळ एक मिनिटाच्या अंतरावर एकाच ट्रॅक वर येतायत. राइट? एकाच दिशेने जातायत. राइट? आणि न्यू ब्रुन्सविकला थांबणार पण आहेत. राइट?" या सगळ्या राइट च्या गर्दीमद्धे माझं मलाच कळेना की आपण यामध्ये कुठला राइट युक्तिवाद करणार होतो! मनात गांधीजी असले, तरी शर्टच्या आतमध्ये मीच होतो.  



अर्ध्या वाक्यात तलवार म्यान करून, डार्लिंगला मेरी क्रिसमस म्हणून मी माझं भाषण आटोपतं घेतलं. स्वतःचं स्वतःला क्लोजर देऊ करावं म्हणून पोराला म्हणालो, "जरा उद्धटच होती नई रे बाई?" पण आजच्या पिढी कडून कायच अपेक्षा करायची? त्यावर चिरंजीव पडले पक्के इंग्रज आणि इंग्रज लोकाना कोणीतरी उद्धट वाटण्यासाठी एखाद्याने किती उद्धट असेल हवं? माझ्या पोराला ती उद्धट नाहीच वाटली म्हणे! तो म्हणाला, "माईक वर बोलत होती म्हणून तुला वाटलं असेल." आपलेच दात. आपलेच ओठ. अब क्या ही बोले!

Monday, December 22, 2025

अंकल सॅमच्या देशात, परत एकदा

मध्यंतरीच्या काळात मी प्रवासातल्या गडबडी लिहायचं बंद केलेलं. प्रवासात गडबडी होत नव्हत्या असं नसलं तरी दर वेळी काहीतरी होतंच आहे हे बघून लोकं माझ्यावरच शंका घेऊ लागलेले. मग एकदा बोधी वृक्षाखाली बसलो आणि वाटलं की, लोक असंही बदनाम करतायत आणि तसंही बदनाम करणारेत, तर आपणच उपवास का करा? तर म्हणून एक ताजा ताज किस्सा. उपवास मोडायला. 




जाने कितने दिनो के बाद, गली में आज चांद उगवावाच, म्हणून यंदा अमेरीकेला वारी काढली. अमेरीका आणि माझं नातं अगदी ठाकूर आणि गब्बर सारखं जुनं आणि गहिरं आहे. पण इतक्या काळात, मोहोल बदल गया, हालात बदल गए, जज्बात बदल गए, असं जरी असलं, तरीही अधिकार चले जाते है, पण आदतें कुठं जाणार? असंही आहेच.




नाताळच्या शुभ मुहूर्तावर ट्रम्प तात्यांच नाव घेऊन अमेरीकेच्या पायरीला हात लावूच असं ठरवलं. तिकीट काढलं. नियम बदललेत का पाहिलं. आणि इतक्या अगोदर सगळं सेट केलं म्हणून स्वतःवर खुश होऊन घेतलं. या नंतर थेट दुसऱ्या दिवशी निघायचं या अशा वेळी जागा झालो. मग बॅग भरली. ऑनलाइन चेक इन करायला गेलो. ऑफ कोर्स ते झालं नाहीच. एअरपोर्ट वर भेटा म्हणाले. पण हे कुठं नवीन आहे आपल्याला? पण तरीही परत नियम बघितले. आणि तेव्हा दिसलं की ESTA नावाचं प्रकरण आधीपासून करून ठेवायला लागतं. आणि यंदा ते मलाही लागू होतं!




आपण ऑनलाइन जाऊन आपलं नाव गाव फळ फुल द्यायचं आणि त्यांनी बरं म्हणायचं. ही अशी भानगड वाटली (उगाच). लंडनमध्ये म्युझियम बघायला फुकट असलं तरी "आम्ही येतोय बरं का", म्हणून शून्य पौंडाचं तिकीट काढावं लागतं. थोडाफार तसला प्रकार वाटला. ते काढलं नाही तर आतमध्ये घेत नाहीत. लवकरच समजलं की ESTA हा प्रकार भलताच वेगळा होता. आणि शून्य पौंडाचा तर नक्कीच नव्हता. 



मी अर्ज भरायला सुरू केला. त्यांनी पहिल्याच पानावर सांगितलं की तुम्ही असाल कोणीही पण आम्ही उत्तर द्यायला ७२ तास सुद्धा लावू शकू. लंडनमध्ये शून्य पौंडाची तिकिटं लगेच येतात! असो. माझी फ्लाईट २० तासावर होती. म्हणजे आता ESTA नाही मिळालं तर नाताळ लंडनच्या म्युझियम मधेच.




ही आमची आदल्या दिवशीची, म्हणजे कालची सकाळ. एक तर चेक इन होईना, आणि दुसरं म्हणजे सुप्रभात म्हणून ७२ शिट्ट्या वाजलेल्या. 




पण दुसऱ्यांचे आणि स्वतःचे केलेले शंभर धांदरटपणे निस्तरलेल्याचा अनुभव गाठीशी असला की तो इथे कमी येतो. acceptance आणि maturity याचा अनोखा संगम बघायला मिळतो. "आपण गाढवपणा केलाय" हे बिनशर्त मान्य करणे, हा acceptance! आणि शनिवार असला तरी आपलं काम होणार म्हणजे होणारच, यावर गाढ विश्वास ठेवून पॅनिक न होणे, ही maturity. जय हनुमान.



इंग्लंडमध्ये यायचं असेल तर फक्त एक अर्ज आणि सोबत थोडीशी कागदपत्रं द्यावी लागतात. अमेरीकेत यायचं असेल तर कागदपत्रं आणि त्याबरोबर मुलाखत पण द्यावी लागते! इंग्लंड मध्ये यायचं म्हणून केलेल्या अर्जाबरोबरचा, एखादा कागद मागे राहिला तर लोक परत ईमेल करून मागवून घेतात. अमेरीका मात्र लग्नातला फोटो काही ठीक नाही म्हणून रुसून व्हिसाच्या परीक्षेत नापास करू शकते. हे असं असताना, ESTA चा अर्ज सरळसोपा असायचं काहीच कारण नव्हतं. त्यांनीही जून पुराणे सगळे दाखले द्यायला लावून, दहावेळा कुबूल है, कुबूल है, कुबूल है, म्हणवून घेऊन, शेवटी "आता वाट बघा" असा इशारा केला.



वाटलं की, याचि साठी केला होता का ट्रम्प तात्यांच्या तसवीरीचा अभिषेक? पण त्याचं फळ मला मिळालं. नाष्टा संपे संपेपर्यंत ESTA वर शिक्कामोर्तब झालेला ईमेलआलं सुद्धा! 


अहो होणारच होते ते.

आंधळ्याच्या गाई परमेश्वर नाही राखी, तर मग कोण राखी? ट्रम्प?



केवळ चेक इन राहिलेलं. ते तसंच ठेवून शनिवार मावळला. आज पहाटे, राहिलेलं चेक इन पण झालं. कदाचित टॉयलेटवर बसून केलं नव्हतं म्हणून आदल्या दिवशी झालं नसावं. काय माहिती? एक पल में परत एकदा हालात बदल गए, जज्बात बदल गए, मौसम बदल गया! 



अब मुझे किसका इंतजारही नहीं है, असं म्हणत विमानतळावर पोचलो, बॅग घ्या आतमध्ये म्हणून दिली, तर बॅगचा टॅग छापला जाईना. हा कसला चिरकुट प्रॉब्लेम असं मी म्हणायच्या आत तिथल्या ताई म्हणाल्या, तुमच्या मुलाचा पासपोर्ट स्कॅन होत नाही आहे! म्हणून प्रॉब्लेम आहे. 



मला तर भरून आलं. मुलगा अशा प्रकारे बापावर जाईल असं वाटलं नव्हतं. 

मी म्हणालो, "अहो, पण बोर्डिंग पास मिळालाय की मला."

ताई, "मला पण सिस्टिम मधे दिसतंय. पण मला पासपोर्ट स्कॅन होत नाही आहे."

मी, "स्कॅनरच्या लेन्स वर फुंकर मारा. कधी कधी होतं त्यानं."

ताई, "नको सिनिअर ना बोलावते."


मग अजून एक जण आले. ते म्हणाले, "तुमच्या तिकिटात मुख्य प्रवासी म्हणून तुमचा मुलगा आहे. आणि तुम्ही सहप्रवासी आहात."

मला वाटलं माझ्या "स्कॅनर पुसा" वाल्या विनोदाला प्रत्युत्तर असावं हे. म्हणून मीही ख्या ख्या करून दाखवलं. म्हणालो, "होय. मोठा झालाय तो आता."

ते म्हणाले, "तो मायनर आहे. ते सहप्रवासी घेऊन जाऊ शकत नाही"

मी, "हॅ?"

ते, "तेच. असं कसं झालं ते बघतोय."

मी, "काय कसं झाले?"

ते "म्हणजे, तुम्ही बुकिंग करताना त्याला मुख्य प्रवासी म्हणून टाकलंय."

हीच ती "डोस्क्यावर पडल्यासा काय?" मोमेंट. साहजिकच आपण हे मनातच म्हणतो. 

मी म्हणालो, "मला असलं काहीतरी करायला येतं?" 

ते, "नाही आलं पाहिजे. आमच्याच सिस्टिम मध्ये घोळ असणार. असं नाहीच होऊ शकत."

मी, "तरीपण लेन्स पुसून बघा. काय माहित त्यानं सगळं होऊन जाईल." हे असं अगदी ओठावर आलेलं, म्हणायचं टाळलं. 

आधीच्या ताई, नंतरचे सिनियर, यांनी आणि कोणाला तरी फोन केला. व्यथा आणि गाथा सांगितली. "असं कसं झालं? बघा की!" हे केलं. मग प्रिंटर खरारला. आणि माझा बोर्डिंग पास छापून बाहेर आला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर खुशी झळकली. 

मी, "अहो पण बोर्डिंग पास होताच की माझ्याकडे आधीपासून."

ताई, "आता प्रिंटेड घ्या."

माझ्यासाठी अजून एक "डोस्क्यावर पडल्यासा काय?" मोमेंट. पण अर्थातच आपण ते नाही म्हणालो.

मी, "म्हणजे झालेलं काय एक्झॅक्टली?"

ते, "अहो सिस्टिम बॅग चेक इन करून देत नव्हती. कारण प्रवासी मायनर आहे. मग आम्हाला ते बायपास करून घ्यावं लागलं."

मी, "मायनर प्रवाशांनी बॅग नसते न्यायची?"

ते, "त्यानं सहप्रवासी नाही नेता येत."

मी, "असो. जाऊच देत. सकाळी सकाळी एवढं नाहीच झेपतंय. तुमची परवानगी असेल तर निघू काय?" हे अर्थातच नाही म्हणालो.

...



तर बघा. हे असं होत असतं. ही थांबलेलं नाहीच आहे. 


तर आता आपण यंदाचा नाताळ ममदानीच्या परगण्यात काढणार आहे. असाल आजूबाजूला तर हाक मारा. 

 


Saturday, March 08, 2025

सूर्य पश्चिमेला उगवला की काय?

गेल्या रविवारी मी आणि मैत्रेय आम्सटरडॅम मधून लंडनला येत होतो. या फ्लाईटचं एक खास वैशिष्ट मला तेव्हा बसल्या बसल्या सापडलेलं.


संध्याकाळची फ्लाईट होती. ६:२० ला आम्सटरडॅम वरून उडणार आणि ६:२० ला च लंडन मध्ये पोहोचणार. असा प्लॅन होता. हे असं कसं काय यावर गप्पा मारता मारता आम्ही टाईम झोन बद्दल बोललो. कसा सूर्य पूर्वेकडच्या देशात आधी उगवतो याची उजळणी केली.


पण तेवढ्यात एक अजून खास प्रकार दिसला. सूर्य मावळायची वेळ झाली होती. आमचं विमान पश्चिमेच्या दिशेला उडत होतं. आता एका ठिकाणी स्थिर असतो तर सूर्य नक्कीच कधीच बुडाला असता. पण आम्ही तर वेगात पश्चिमेकडे झेपवलो होतो. आणि त्यामुळं सूर्य पश्चिमेला रेंगाळला. आकाश तांबूस लाल झालेलं, ते जवळ जवळ आख्खी फ्लाईट तसंच राहिलं.


हे असं सहसा भारतामध्ये कलकत्ता - मुंबई विमानात होत नाही. कारण, विषुववृत्ताजवळ पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग, विमानांच्या आकाशातल्या वेगपेक्षा खूपच जास्ती असतो. पण हे गणित आमस्टरडॅम किंवा लंडनच्या वरच्या भागामध्ये बदलतं. पृथ्वीचा वेग जवळ जवळ अर्धा झालेला असतो, आणि त्यामुळे विमानाचा वेग चुकून माकून त्याच्या जवळपास फिरकू शकतो.


आणि म्हणून, संध्याकाळच्या फ्लाईट मध्ये, आकाशात वर जाऊन स्थिर झाल्यावर आकाशाची जी परिस्थिती असते, ती रेंगळते, किंवा कदाचित, उलट होते, असंही भासू शकतं. मधल्या एका क्षणी आम्हाला वाटलंही की सूर्य पश्चिमेला बुडत नाहीये, तर कदाचित थोडासा वरच येतोय. तेवढीच काही मिनिटांची मजा.


मला आठवतंय, खूप खूप खूप वर्षापूर्वी, मला बाबांनी "आकाशाशी जडले नाते" हे जयंत नारळीकरांचं पुस्तक आणून दिलेलं. त्यामध्ये नारळीकरांनी असा एक अनुभव सांगितलेला. असा पूर्वेला सूर्यास्त आणि पश्चिमेला सूर्योदय ठळकपणे दिसण्यासाठी विमान एक ठरावीक अक्षवृत्ताच्या वर, सूर्यास्त किंवा सूर्योदयाच्या ठरावीक वेळ आधी, आकाशात ठरावीक उंचीवर असावं लागतं. युरोपातून अमेरिकेकडे जाणाऱ्या सकाळच्या विमानात कदाचित हा प्रकार दिसायला हरकत नाही.


आता काय.. विमानात तर आपण नेहमीच बसतो. फ्लाइट्स पण इतक्या घेतल्या, पण आता मैत्रेय सोबत प्रवास सुरू झाल्यामुळे, चार गोष्टी वेगळ्या आठवतात. चार गोष्टी वेगळ्या सुचतात. आपसूकच.


असो .. अशीच फावल्या वेळातली मजा. या सगळ्या प्रकारात फोटो काढायचं राहून गेलं. पण तरीही वेळ निघून गेल्यावर, जरा अॅंगल हुकल्यावर एक काढलेला फोटो इथे टाकतो आहे.



Thursday, April 20, 2023

कुछ नया करते है - भाग २: ट्रान्सिस्टरची गोष्ट

प्रस्तावना:
एका जूनच्या संध्याकाळी सॅनफ्रांसिस्कोच्या हॉटेल मध्ये एक गोपनीय मिटिंग सुरु होती. मीटिंग मधल्या आठही जणांनी एक डॉलरच्या नोटेवर एक एक करून सही केली आणि इतिहास रचला. या अष्टविनायकांनी ठरवलं की आपण आपली सध्याची कंपनी सोडायची आणि आपली नवीन कंपनी सुरु करायची.
.
Sounds familiar? पण ही गोष्ट १९५७ ची आहे. उस जमाने की स्टार्टअप स्टोरी... असं म्हणू. न्यू यॉर्क टाइम्सने नंतर या घटनेची नोंद "टॉप टेन डेज दॅट चेंज्ड दी हिस्टरी" म्हणून केलेली.
.
या आठ लोकांच्या पैकी कमीत कमी गॉर्डन मूर आणि रॉबर्ट नॉईस कदाचित माहिती असतील. गॉर्डन मूर म्हणजे तोच तो ज्याने नंतर मूर-लॉ बनवला (की जो अजूनही भारी आहे). आणि रॉबर्ट नॉईस म्हणजे तोच तो ज्याने (आणि गॉर्डनने) एका स्टार्टअपनं भागलं नाही म्हणून पुढे जाऊन अजून एक स्टार्टअप काढली - "इंटेल" नावाची.
तसा नॉईस नंतर गरजू होतकरू तरुणांना मार्गदर्शन करत असायचा. त्यातल्या एका स्टीव्हने काढलेली स्टार्टअप सुद्धा माहिती असेल - ऍपल नावाची.
.
१९५७ ला या आठ जणांनी "आज कुछ तुफानी करते है" म्हणत जी कंपनी बनवली, त्याचं नाव "फेअरचाईल्ड सेमीकंडक्टर्स". या कंपनीने सुद्धा इतिहास रचला. आज कुठलाही फोन किंवा कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट उघडून बघितलं की आतमध्ये नखा एवढेसेच किंवा कधी कधी थोडे मोठे काळपट चपटे ठोकळे दिसतात. याना म्हणतात इंटिग्रेटेड सर्किट्स. यांच्यामुळे आपले गॅजेट्स लहानात लहान आणि हुशारात हुशार होऊ शकतात. तर "फेअरचाईल्ड सेमीकंडक्टर्स" या कंपनीने सर्व प्रथम इंटिग्रेटेड सर्किट्स हा प्रकार बनवून दाखवला आणि सगळ्यांच्या चक्कीत धूर आणला. पुढे या इंटिग्रेटेड सर्किट्सनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचाच चेहरा मोहरा बदलून टाकला.
.
आणि हो... आज तंत्रज्ञान क्षेत्राचा खूप महत्वाचा भाग असलेली सिलीकॉन व्हॅली ही सुद्धा या आठ जणांनी सुरु केली. त्यात स्टीव्ह जॉब्स म्हणा, बिल गेट्स म्हणा, मार्क झुकरबर्ग म्हणा, हे सगळे खेळले बागडले.
.
या आठ जणांना "ट्रेचरस एट" म्हणून ओळखलं जातं.
.
***************************
नमनाला हे घडाभर तेल झालं. आता मूळ गोष्टीकडे येऊ. कारण ही गोष्ट ना रॉबर्ट नॉईसची, ना गॉर्डन मूरची, ना स्टीव्ह जॉब्स ची, ना सिलिकॉन व्हॅली ची, ना या ट्रेचरस एट ची.
.
ही गोष्ट या आठ जणांना एकत्र आणलेल्या एका बाबाची आहे. "सब चले पूरब तो हम चले पश्चिम" म्हणत या बाबाने जग ईस्ट कोस्टवर कंपन्या काढत होते तेव्हा वेस्ट कोस्टच्या कॅलिफोर्निया मध्ये जाऊन कंपनी काढला, आठ लै भारी इंजीनिअरना हुडकला, आणि एक कमाल प्रश्न सोडवायला दिला. त्याला अर्थातच अपेक्षित क्रांती करता आली नाही. कारण आठही जण, "आपला बॉस किती खडूस आहे" म्हणून सोडून गेले. पण... त्याचा पिच्चर तंभीभी बाकी होता मेरे दोस्त कारण या बाबाला पुढे १९५६ मध्ये नोबेल सुद्धा मिळालं! तर ही आजची गोष्ट.
.
तशी ही गोष्ट कुठूनही सुरु केली... तरी ड्रॅमॅटिकच वाटते. आपण सुरु करू १९४५ पासून. दुसऱ्या महायुद्धानंतर पासून. तेव्हा व्हॅक्युम ट्यूब वापरून इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू बनायच्या. साहजिकच व्हॅक्युम ट्यूब हे प्रकरण त्या काळासाठी खूप कमाल असलं तरी खूप नाजूक होतं. यावर तोडगा काढण्यासाठी AT&T च्या बेल लॅबच्या मर्विन केली ने एक टीम बनवली. ही अतरंगी टीम म्हणजे आपल्या गोष्टीचे अमर, अकबर आणि अँथनी. या तिघांनी ट्रान्सिस्टर बनवायचं हे त्यांचं काम मनावर घ्यायचं होतं. हा ट्रान्सिस्टर व्हॅक्यूम ट्युबपेक्षा भरी तर असणारच होता, पण त्याने खूप लहान आणि कमी नाजूकसुद्धा असायचं होतं.
.
या कामासाठी एकत्र आलेल्या या तिघांच्यातला सगळ्यात बुड्ढा माणूस वॉल्टर ब्रॅटन - हा होता एक्सपेरीमेंटल फिजिसिस्ट. त्याला फिजीक्स कळायचं म्हणून तो काहीपण बनवू शकायचा. दुसरा होता जॉन बर्डीन - हा म्हणजे त्यांच्या काळाचा शेल्डन कूपर. थिअरॉटिकल फिजीसीस्ट. हा पंधराव्या वर्षीच कॉलेजमध्ये पोचलेला. आणि तिसरा विल्यम शॉकली. कमालीचा स्पर्धा वृत्ती असलेला वैज्ञानिक आणि तिघांच्यातला सगळ्यात धाकटा. पण धाकटा असला तरी शॉकलीने या टीम मध्ये यायच्या आधीपासूनच ट्रान्सिस्टरचा एक ढोबळ स्वरूपाचा आराखडा बनवलेला. हा ट्रान्सिस्टर बनवून आपण दुनियामें फेमस होणार असं शॉकलीचं स्वप्न होतं. पण त्याची कल्पना कागदावर जरी सॉलिड असली, तरी प्रत्यक्षात अजिबातच जमत नव्हती. शॉकलीचा हा आराखडा या त्रिकुटासाठी सुरुवात बनला.
.
काही काळानंतर, रक्त तरुण सळसळणारं म्हणत, शॉकली स्वतः वेगळं काम करायला लागला. म्हणाला मी अजून अलग नजरीयाने बघतो. इकडे ब्रॅटन आणि बर्डीन दोघे मिळून त्यांच्या पद्धतीने काम करतच होते. अधे मध्ये तिघे एकत्र यायचे. पण परत आपापल्या मार्गी जायचे. एक वर्ष गेलं तरी दाखवण्यासारखी प्रगती कोणाचीही नव्हती. आणि मग एके दिवशी, नसत्या उचापती करताना बर्डीनला युरेका मोमेन्ट मिळाली. त्यानं सगळं उपकरण काहीही कारण नसताना पाण्यात बुडवलं आणि अनपेक्षित रीत्या बरेच बरे परीणाम दिसले. पाण्यामुळे हे असं का झालं? हे शोधता शोधता ब्रॅटन आणि बर्डीन ला चक्क प्रत्यक्षात काम करणारा खरा खुरा पहिला ट्रांसिस्टर बनवायची युक्ती सापडली. आणि त्यांनी तो बनवला सुद्धा.
.
खुश होऊन त्यांनी आपला यार शॉकलीला फोन केला. पण मग "क्या सोचे थे? गब्बर खुस होगा? साबासी देगा?" वाली मोमेन्ट आली. शॉकली खुश झाला झाला म्हणेपर्यंत नंतर चिडला सुद्धा. कारण एकच... ट्रान्सिस्टरच्या शोधामध्ये शॉकलीला फेमस व्हायचं होतं की नै? पण आता त्याचं नाव पण लागणार नव्हतं असं त्याला वाटलं! या चिडचिडीमध्ये, सगळ्यांना सोडून शॉकली पुढे मग आपल्याच वनवास गेला. आपल्या आपल्या मठीत त्यानं काम सुरु ठेवलंच. आता बाजूला अमर अकबर.... आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा अँथनी.
.
ब्रॅटन आणि बर्डीन ने बनवलेलं ट्रान्सिस्टरवालं उपकरण काम जरी करत असलं तरी ते बाहेरच्या जगात वापरण्यासाठी अजून योग्य नव्हतं. त्यात अजूनही खूप सुधारणा अपेक्षित होत्या. इथे शॉकली बाबाला संधी दिसली. त्याने त्याच्या पद्धतीने उत्तम सुधारणा केल्या आणि थेट बेल लॅबच्या वकिलांना गाठलं. म्हणाला, माझा शोध, माझी अक्कल. माझ्या नावावर पेटंट काढा. त्यात ना ब्रॅटन ना बर्डीन!
.
ब्रॅटन आणि बर्डीनला जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांना मेरे साथ धोका हुआ है वाला फिल आला. तीन उत्तम आणि तल्लख बुद्धीच्या लोकांनी एकत्र येऊन भारी काहीतरी बनवलं खरं, पण नंतर आपसात खूपच राडा केला. तिघांच्या घाऊक गोंधळात, इकडे वकिलांनी वेगळीच कलाटणी दिली. त्यांनी कागदपत्रं तयार केली, त्याचा अभ्यास केल्यावर असं ठरवलं की या शोधावर खरं तर ब्रॅटन आणि बर्डीन यांचं नाव हवं. हे शॉकली साठी शॉकींग होतं!
.
अशा वेळी न कॉर्पोरेट कल्चर उत्तम असतं. त्यात कसला ड्रामा नसतो की भावना नसते. इकडे हे दिल आणि दर्द घेऊन बसलेले तिघे. आणि तिकडे "ट्रान्सिस्टर बनवायला जमलंय" हे एका कार्यक्रमात जाहीर पण करायला सज्ज झालेली AT&T. १९४८ ला हा कार्यक्रम झाला. एवढंच नाही, तर ब्रॅटन, बर्डीन आणि शॉकलीला एकत्र येऊन फोटो काढायला लावला. हा इथे दिलेला फोटो तोच तो. हा खूप ऐतिहासिक फोटो आहे. याच्या मागेही छोटी गोष्ट आहे की कसं शॉकली फोटो काढायच्या वेळी अचानक मधोमध येऊन बसला आणि भाव खाऊन गेला. वगैरे वगैरे.
.
***************************
एपिलोग:
ट्रांसिस्टर लै भारी हे आपल्याला आत्ता माहिती आहे म्हणून तेव्हाच्या या घटनेचं कौतुक. पण तेव्हा लोकांना अजूनही व्हॅक्युम ट्यूबमधेच जास्ती स्वारस्य वाटत होतं. टच स्क्रीन आला आणि तरीही लोकं बटणाचे फोन वापरायचे न? तसं. पण तेव्हा जपानमधल्या दोन इंजिनिअरना या शोधाचा पत्ता लागला. मॅगझीन वाचायचे हो. बॉम्ब मुळे देश उध्वस्त झालेला. त्याची नवी बांधणी सुरू होती. लोक नवनवी शक्कल लढवत होती. त्यात या दोघांना या छोट्या ट्रान्सिस्टरचं अप्रूप वाटलं. त्यांनी ट्रांसिस्टर वापरून छोटा, खिशात मावेल असा रेडीओ बनवला. रेडिओचं नाव नंतर ट्रान्सिस्टर असच पडलं.
आणि ही जी स्टार्टअप होती.. ती म्हणजे अर्थातच... सोनी.
.
इकडे ब्रॅटन, बर्डीन आणि शॉकली यांनी आपापल्या वाटा वेगळ्या केलेल्या. १९५१ ला बर्डीन ने बेल लॅब्स मधून टाटा बाय बाय केलं. शॉकलीची खडूस कीर्ती इतकी पसरली की त्याला बेल लॅब काय पण एकूणच ईस्ट कोस्ट वर कोणी काम करायला पार्टनर सापडेना.
.
पण फेमस होण्याचं स्वप्न अजूनही बाकी होतं. त्यानं इंटिग्रेटेड सर्किट बनवण्यासाठी आपली नवी कंपनी सुरु करायचं ठरवलं. या वेळी शॉकलीने आपला गाशा गुंडाळला, आणि तो वेस्ट कोस्ट वर पोचला. तिथे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी नव्या कंपनीना स्वस्तात जागा देत होती. तिथं शॉकलीला कोणी ओळखत सुद्धा नव्हतं. मग आपल्या चार्मने त्याने आठ उत्तमातले उत्तम इंजिनिअर शोधले... आणि त्यांना शॉकलीच्या भूतकाळाची कल्पना नसल्यामुळे, त्यांनीही भुलून बिनदिक्कत त्यात उडी मारली. पण या आठ जणांचा "भारावून जाणं" आणि नंतर "ये क्या कर दिया यार" म्हणाण्यापर्यंतचा प्रवास खूपच लवकर संपला
.
शॉकलीला काहीही म्हणा, पण त्यानं तयार केलेल्या सुरुवातीच्या आरखड्याचं महत्त्व कमी होत नाही. ब्रॅटन आणि बर्डीनने केलेले परिश्रम आणि त्यांना मिळालेलं यश, हे सुद्धा कमी मोलाचं होत नाही. ट्रांसिस्टरमुळे इलेक्ट्रॉनिक्स जगतात जी क्रांती झाली ती तर आता कायच सांगा!
या सगळ्याची नोंद घेत, १९५६ मध्ये, या तिघाही जणांना नोबेल पारीतोषक देण्यात आलं.
.
तळटीप: जॉन बर्डीनला नंतर १९७२ मध्ये दुसरं नोबेल सुद्धा मिळालं... सुपर कंडक्टीवीटी साठी.
.
ता.क. बरेच संदर्भ AT&T Tech channel मधले आहेत, बाकी विकीपीडिया आहेच, आणि "न्यू थिंकिंग" मधले बरेच संदर्भ. फोटो अमर अकबर अँथनी चा. 😛 आणि डावीकडे उभा असलेला मर्विन केली.

Sunday, March 26, 2023

कुछ नया करते है - भाग १: कोणी वाफ दवडेल का वाफ

स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वाझनियाक यांच्या जोडगोळीबद्दल कितींदा ऐकलंय. एकाला तंत्रज्ञान माहिती होतं, एकाला बिझनेस कळत होता. आणि मग नंतर त्यांनी सगळं जगच बदलून टाकलं. नै का? हे असं सांगितल्यावर, मला एकाने अडीच - तीनशे वर्षांपूर्वीच्या एका स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वाझनियाक जोडीबद्दल सांगितलं. त्यांनीसुद्धा असंच जग कायमचं बदलून टाकलेलं!
.
गोष्टीची सुरुवात करू पाण्यानं भरलेल्या कोळश्याच्या खाणींनी. काल १७०० चा. आत्ताच्या इंग्लंड प्रमाणेच तेव्हाच्या इंग्लंडमध्येही बीन बादल बरसात हा भाग नवीन नव्हता. अशा पावसात एकदा पाणी खाणींच्या आतमध्ये शिरलं, की खाणींची वाट लागलीच. मग केवळ खाणीतून पाणी काढायला म्हणून लोकांची कुमक पाठवायला लागे. ही सगळी किरकिर सहाजिकच त्रासदायक होती. मग इथे एकाने शक्कल लढवली. पाणी गरम झालं की त्याची वाफ होते आणि ती वाफ वाटेत जे येईल त्याला ढकलत वरच्या दिशेने जाते, हे तोवर ज्ञात होतं. तर मग या बाबाने हे वाफेचं तत्व वापरून पहिलं वाफेचं इंजिन बनवलं. या इंजिनमुळे खाणीतून पाणी काढायला आता लोकांची गरज नव्हती. किरकिर कमी झाली उत्पादन वाढलं.
.
कोण हा बाबा? ऑफ कोर्स, हा म्हणजे जेम्स वॉट नाही.
तर याचं नाव होतं थॉमस न्यूकोमेन. ऍगाथा ख्रिस्तीचा गाववाला. डेवनच्या डार्टमाऊथ मधला.
.
न्यूकोमेन इंजिनमुळे इतका फायदा जरी होत असला, तरी इंजिन खूप कोळसा खायचं. म्हणजे, एकूणच खर्चिक काम होतं. पण तरीही काहीही म्हणा, एक पाया रचला गेला होता. आता मिळालेला मार्ग जास्ती सुकर कसा करायचा, हे कोणीतरी शोधणं बाकी होतं.
.
तर... ही गोष्ट १७१२ ची. पाहिलं सो कॉल्ड वाफेचं इंजिन बनलं तेव्हाची.
पण इथे संपत नाही गोष्ट.
.
यानंतर पन्नास वर्षांनी अजून एका बाबाला ट्यूब पेटली. हा बाबा होता ग्लासगो युनिव्हर्सिटी मध्ये. हे म्हणजे आता आपण दक्षिणेकडून थेट इंग्लंडच्या उत्तरेकडे स्कॉटलँड कडे जाऊ. हा बाबा टेलेस्कोप आणि इतर उपकरणाच्या विविध भागांचं नेमकं कॅलिब्रेशन करायला शिकण्यासाठी तिथे आलेला. लहानपणी त्याला शाळेत मंद म्हणायचे. पण त्याला अभियांत्रिकीमध्ये खूप रस. बाकी विषयामध्ये खड्डा! ग्लासगो युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा त्याने बरीच उपकरणं बनवलेली. याला न्यूकोमेन इंजिन दुरुस्त करायचं काम एकदा दिलेलं. आणि मग रेस्ट इज हिस्टरी.
कोण हा बाबा? ऑफ कोर्स, हा आपला जेम्स वॉट.
.
जेम्स वॉटला एकूणच वाफेचे इंजिन या प्रकारात खूप रस आला. आणि मग आज कुछ तूफानी करते है म्हणत, त्याने न्यूकोमेन इंजिनमध्ये सुधारणा करायचं ठरवलं. आणि केल्यासुद्धा.
आता जास्ती तांत्रिक गोष्टींमध्ये न पडता, थोडक्यात सांगायचं झालं तर जेम्सने केलेल्या सुधारणांमुळे नव्या इंजिनला ७५ टक्के कमी इंधन लागणार होतं. आणि काम सरस.
.
आता इथे एंट्री होते बिझनेसचं डोकं असलेल्या मॅथ्यू बुलटोनची. जेम्स आणि मॅथ्यूने इथून पुढे जो काही कल्ला केला, तो मग सगळ्याच उद्योगधंद्यावर आपली छाप सोडून गेला. खाणकाम तर वेगाने सुरु झालच. दारू बनवणाऱ्या लोकांना पण ग्राइंडिंग साठी मदत झाली. जगाच्या इतिहासात प्रथम घाऊक प्रमाणात वस्तू बनू लागल्या. त्यामुळं नोकऱ्या वाढल्या. याच दरम्यान आणि याचसाठी खूप लोकांनी गावं आणि शेती सोडली आणि शहराकडे पलायन सुरु केलं (गांधींच्या पुस्तकात या इंग्लंडमधल्या शेती आणि गाव सोडून शहराकडे झालेल्या स्थलांतरावर टीका केलेली आढळते. गांधींच्या मते यामुळे गावांचा विकास खुंटला. हे असं इंग्रज भारतात पण करतील आणि त्यामुळं मूठभरच शहरात विकास होईल आणि लाखोच्या लाखो गावं त्यापासून वंचित राहतील असं त्यांना वाटायचं. आणि त्यामुळं भारतासारख्या देशात असलेलं गावांचं सौंदर्य आणि विविधता नष्ट होईल अशी त्यांना भीती होती. असो. तो विषय वेगळा. इंग्लंड मध्ये तर हे व्हायला सुरू झालं.).
.
या वाफेच्या इंजिनाने वाहतूक सुधारली. १८०० च्या पहिल्या दशकात सर्व प्रथम मनुष्यबळ किंवा प्राणी-बळ न वापरता, सुमारे २५ टन माल एकीकडून दुसरीकडे नेण्यात आला. तेही तब्बल ताशी ८ किलोमीटर वेगाने! लो कर लो बात. ही त्या काळासाठी खुप अभूतपूर्व गोष्ट होती. नव्या युगाची सुरुवात होत होती. अशी पण एक गोष्ट आहे की हे जे गाडीत वापरलं ते (लोकोमोटिव) इंजिन, त्याची कल्पना ना जेम्स ची ना मॅथ्यू ची. पण त्यांच्या कंपनी मधल्या विल्यम मरडॉकची होती म्हणे. असो आता. होती यांच्यातल्या एकाची. पण यांनी या तंत्राचं पेटंट बनवलं होतं आणि त्यामुळे १८०० पर्यंत इतर कोणालाही या इंजिनला हात लावता येणार नव्हता! कर दी न स्टीव जॉब्स टाइप बात! पण १८०० ला पेटंट संपलं आणि सगळ्यांनीच ही अशी वाफ दवडायला सुरु केली!
.
काही वर्षात हे तंत्रज्ञान अमेरीकेत पोचलं आणि वेगळाच कल्ला झाला. १८६० च्या दशकात अमेरीकेत थिओडर जुडाह नावाच्या सिव्हिल इंजिनिअरने पूर्व किनारपट्टीपासून ते पश्चिम किनारपट्टीपर्यंत रेल्वे नेण्याचं स्वप्न बघितलं. याच वेळी तेव्हाच्या काँग्रेसला सुद्धा असंच काहीतरी करायचं होतं पण त्यांना कुठून कुठे गाडी पळावयाची हे ठरत नव्हतं. जुडाहने इथे एंट्री मारली. परफेक्ट मार्ग निवडला. युनिअन पॅसिफिक नावाच्या कंपनीला पूर्वेकडचं आणि सेंट्रल पॅसिफिक नावाच्या कंपनीला पश्चिमेकडचं काम सोपवलं. या दोनीही कंपनींनी सहा वर्षं काम करून शेवटी युटाह मध्ये एकमेकाला आपापले स्टीलचे रेलवे ट्रॅक जोडले. हा होता पहिला ट्रान्स कॉन्टिनेन्टल रेल रोड. यामध्ये कॅलिफोर्निया बाकीच्या जगाशी जोडलं गेलं. तेच ते आपलं बे एरिया.
.
देख रहे हो... एका वाफेच्या इंजिनामुळे केवढ्या केवढ्या क्षेत्रात आणि केवढे परिणाम झाले? केवळ बोलटन आणि वॉट कंपनीमुळेच नाही, पण त्या नंतर इतरांनी या इंजिनमध्ये केलेल्या सुधारणांमुळे आणि त्या कार्यक्षम पद्धतीने वापरल्यामुळे, जगभर "औद्योगिक क्रांती" ची पायाभरणी झाली.
.
.
ता.क. न्यू थिंकिंग नावाचं एक पुस्तक काही वर्षापूर्वी वाचलेलं. त्यातले खूप संदर्भ वर वापरलेत. बाकी फोटो बर्मिंगहॅम मधला गुगल बाबाने शोधून दिला. हे जेम्स, मॅथ्यू आणि विलियम. आणि वेगळा दिसतोय फोटो तो थॉमस न्युकोमेन.

Saturday, March 04, 2023

भाग २: मी आणि मे

 

"सुंदर ते ध्यान ... उभे वीटेवरी वीटेवरी वीटेवरी!" हे जे होतं... त्याचा खरा अर्थ काय होता माहितीये? मला वाटतंय की कवीला म्हणायचं होतं की, उभ्या उभ्या केलेलं मेडीटेशन सुद्धा तितकंच सही होऊ शकतं. लोकं मुंबईच्या लोकलमध्ये उभ्या उभ्या डुलकी नाही काढत? तसंच. असो... विनोद बाजूला ठेवू... पण मुद्दा असा की, शेवटी मेडीटेशन म्हणजे मनाचा खेळ. जिथे मांडता आला तिथे मांडावा. मला तो गेल्या एका रविवारी खूपच सॉलिड जमला. मी अचानक चक्क सव्वा दोन तास, सलग एकाच ठिकाणी ध्यान लावून बसू शकलो. बॉर्डरमध्ये कसं तो एक पंटर सुट्टी मिळाली म्हणून गावभर बोंबलत सुटतो... तसं आता आपल्याला थोडंफार जमलंय तोवर खळखळाट फार करायच्या मूड मध्ये मी ही मेडीटेशन वरची ही दुसरी पोस्ट लिहिणार आहे. त्यामुळं चवीप्रमाणे मीठ ऍडजस्ट करून वाचावे. (पहिली पोस्ट, नसेल वाचली, तर विचारावं. लाजू नये)
.
बघायला गेलात तर, मेडिटेशनचे य प्रकार सापडतात. गुगल प्ले-स्टोअर किंवा तुमच्या आयफोन वर मेडीटेशनसाठी केवढ्या तरी ॲप आहेत! प्रत्येकाचं काहीतरी स्वतःचं असं वेगळेपण आहे. असायलाच हवं. नाहीतर माल विकला कसा जाणार? गली नुक्कड पे तर विचारूच नका. आणि तुम्ही परदेशी असाल तर तुम्हाला अजूनच फॅन्सी गोष्टी सापडतील. शेवटी काय हो? योगासेच होगा. आणि काय?
.
अशा या मेडीटेशनच्या गावोगावी लागलेल्या बुफे मधून आपल्याला जे आवडेल, जे रुचेल, जे जमेल ते आपण धरून ठेवावं. हे माझं सध्याचं लॉजिक आहे. कारण trust me, वो मेहरबान कल हो न हो असा सीन व्हायला वेळ लागत नाही! म्हणजे गरज असते तेव्हा अजिबात सुधरत नाही की या परिस्थिती मध्ये लागू पडेल असं मेडीटेशन कुठलं? मी वेगवेगळी मेडीटेशनं बघायची सुरुवात करायच्या खूप आधी, रॉकस्टारमध्ये खटारा भाई सांगतो न, तसं मला एका खटारा भाईने सांगितलेलं की, बाबो, मेडिटेशन लागू पडायला, दिलमें दर्द, लाईफमें प्रॉब्लेम आणि कुठेतरी काहीतरी अडकून पडलेली फिलिंग लागते - नाहीतर, हे असंच ब्रीद ईन, ब्रीद आऊट, करत बसशील आणि हाताशी काहीच लागणार नाही! ही गोष्ट २००४ ची. नाशिकमध्ये मिसळ पाव खाताना प्राणायाम म्हणजेच की मेडीटेशन असं शपथेवर सांगत या खटारा भाईने हे ज्ञान पाझळलेलं. इतक्या उत्स्फूर्त पहिल्या ओळखीनंतर आपण जे स्विच ऑफ झालो, तिथून स्विच ऑन होऊन ते मग आत्तापर्यंत येता येता पाच वेगवेगळी मेडिटेशनं सिरीयसली चाखून बघून झालीत. मुद्दा असा की, टाईम लगता है. आधी का करायचं हे समजायला आणि नंतर कसं करायचं हे जमायला.
.
या सगळ्या मेडीटेशनच्या बुफेमध्ये, ढोबळ मानाने सध्या तरी मला दोन प्रकारचे लोक सापडलेत. एक म्हणजे गायडेड मेडिटेशनच्या समोर रांगेत थांबलेले आणि दुसरे म्हणजे अन्-गायडेड मेडिटेशन करणारे. आपण दोनही रांगेत जाऊन आलोय. मेडिटेशन करताना स्वतःमध्ये आणि इतरांच्यामध्ये होणाऱ्या बदलांची, आपल्या प्रतिक्रियांची आणि प्रतिक्षिप्त क्रियांची जेवढी नोंद घेऊ शकू, तेवढं मेडिटेशनचं भारी गणित समजतं असं मला समजलंय. बाकी, साईडला बीबीसीवर डेव्हिड इगलमनची मेंदूवर असलेली डॉक्युमेंट्री पाहिलीय. लॉरी सॅंतोस ने बनवलेला "हॅपिनेस लॅब" हा पॉडकास्ट खूपवेळा ऐकलाय. हे सांगण्याचं कारण असं की मेडिटेशन हा प्रकार, "मेलडी खाओ, खुद जान जाओ" यातला जरी असला, तरी neuroscience संदर्भांत असलेलं साहित्य ऐकलं, वाचलं किंवा बघितलं तर मला वाटतं मेडीटेशनमध्ये जास्ती मजा येऊ शकते. मला तरी आली.
.
तर...
सुरुवातीला गायडेड आणि अन्-गायडेड वाला भाग सोडवू. गायडेड मेडीटेशन मध्ये कोणीतरी तुमच्या कानात कायम सांगत राहतं की आता काय करायचंय. कुठे बघायचंय. काय अपेक्षित आहे. वगैरे वगैरे वगैरे. अन्-गायडेड मध्ये ही मधली लुडबुड कमी असते. किंवा नसतेच. शेवटी मेडीटेशन म्हणजे काय हो? स्वतःसोबत बसायचंय. काही लोकांना जमतं असंच बसायला. काहींना कोणीतरी हात धरून लागतं बाजूला. हाच तो फरक. यातलं काहीतरी एक करून स्वतःबरोबर गप्पा मारत बसलाच पण मग बाकीचे खंडीभर विचार येऊन गोंधळ घालू लागले तर? बैठे बैठे क्या करे म्हणून काहीतरी डोक्यात येत राहतंच की. मग ते येऊ द्यावेत? की त्यांचं काही करायचं? की ठराविक विचारांना एंट्री द्यायची आणि ठराविक विचारांना नाही? हा एवढाच भाग असतो सहसा. तोच भाग वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. जेवणात नाही का ... कांदा टोमॅटो जीरे मोहरी हींग लसूण वगैरे गोष्टी त्याच की. तरी वेगवेगळी लोकं वेगवेगळ्या आमट्या आणि वरण बनवतातच की. नाही का? तसंच ते.
.
मला स्वतःला अन्-गायडेड मेडीटेशन फारसा झेपलं नाही. मी इतका भरकटत गेलो की शेवटी काही सुधरेना. कदाचित थोडा सराव झाला आणि हे प्रकरण कशाशी खातात हे समजलं, की मग हुकमी अन्-गायडेड मेडीटेशन जमेल आपल्याला, असं ठरवून सध्या तरी गच्छन्ति केलेली आहे.
.
गायडेड मेडीटेशन माझ्या सारख्या थिरथिऱ्या मनाला जास्ती झेपलं. कारण यामध्ये हात धरून चालायला शिकवतात न, असा फील असतो. यामध्ये नमूद करावी अशी म्हणजे मला जमलेली अशी तीन लोकांची मेडीटेशनं - एक सद्गुरू जग्गी वासुदेवनी सांगितलेलं ईशा क्रिया, दुसरं म्हणजे डॉ. जो डिस्पेंझाने सांगितलेलं मॉर्निंग आणि इव्हिनिंग मेडीटेशन, आणि तिसरं म्हणजे सॅम हॅरिसने सांगितलेलं वेकींग अप. तसं मी Calm आणि हेडस्पेस पण वापरून बघितलंय.
.
कसंय न, अगदी सुरुवातीला, मी जेव्हा माझ्या सर्वात खाजगी गोष्टींबद्दल विचार करणार आहे, तेव्हा थेट माझ्या कानात कोणीतरी काहीतरी बोलणारे आणि त्याचा माझ्यावर किंवा माझ्या विचारांवर खोलवर परीणाम होऊ शकणार आहे, ही कल्पनाच मला प्रचंड privacy encroaching वाटलेली. माझ्या आयुष्यातल्या भल्या बुऱ्या गोष्टींचं गाठोडं असं का त्रयस्थासमोर मी का उघडावं? Even your fears are dear to you, aren't they? आणि या अशा काहीशा अवघडलेल्या विचारामुळे सुरुवातीला खूप मर्यादा पडल्या. वेळ द्यावा लागला. त्यावेळी मी Calm आणि हेडस्पेस नावाची दोन भिन्न ॲप वापरून बघत होतो. त्या मध्ये ज्या व्यक्तीचा आवाज मी ऐकत होतो त्या व्यक्तीबद्दल मला खूपच कमी किंवा काहीच माहिती नव्हतं. मी सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला नव्हता. मग ते फारसं प्रभावी नाही झालं. यांत्रिकी पद्धतीनं केलं. फायदा नक्की झाला. नाही असं नाही. पण परत तिकडे जावं असं अंदरसे आलं नाही. गट्टी जमली नाही. छान होतं पण अनोळखी वाटत राहिलं. मला वाटतंय की शिकण्यातला हा ही एक भागच की.
.
या उलट मी सद्गुरू जग्गी वासुदेवनी केलेली युथ अँड ट्रुथ वाली पुष्कळ व्याख्यानं ऐकलेली. किंवा डॉ. जो डिस्पेंझाचं मनावर ताबा आणण्याबद्दलचं किंवा मेंदूमध्ये रीवायरींग कारण्याबद्दलचे विचार ऐकलेले. त्याची लांबून का होईना, पण डेव्हिड इगलमनच्या मेंदूच्या डॉक्युमेंटरीशी सांगड लागत होती. तसंच मी सॅम हॅरिसची बरीच डिबेट्स बघितलेली होती. त्यामुळे या तिघांच्या बाबतीत थोडा कंफर्ट तयार झालेला होता. मला वाटतंय, म्हणून मला या तिघांचीही मेडिटेशनं थोडी फार जमायला लागू शकली असावीत. तिघांचे मेडीटेशनबद्दलचे दृष्टिकोन खूप वेगळे आहे. ते आता एक एक करून सांगेनच. तिघांच्या पैकी सद्गुरू आणि डिस्पेंझा या दोघांच्याही बाबतीत मला बाकीचे बरेच प्रश्न आणि प्रॉब्लेम्स पडत गेले. त्यामुळं आमचं love - hate पद्धतीचं नातं सुरु राहीलं. पण मग मेसेंजर आवडला नाही म्हणून मेसेजकडे दुर्लक्ष थोडीच करणार? त्यामुळे निमूटपणे मुकाट्याने परत परत या मेडिटेशन कडे येणं झालंच. काहीवेळा नाकापर्यंत पाणी आलं की, प्रश्न बाजूला ठेवणे महत्वाचे. नै का? दुसऱ्या महायुद्धातल्या "shut-up and calculate" म्हणायचे, त्या बद्दल वाचलंय का? खूप इंटरेस्टींग गोष्ट आहे ती पण. पण थोडक्यात अशी की, "It works. So keep your questions for leisure time. And right now... just shut up and calculate! Because it works."
.
आता पाहिलं उदाहरण घेऊ सद्गुरूनी सांगितलेल्या ईशा क्रियाचं. सद्गुरूनी अपलोड केलेले व्हिडीओ बघितले असले तर त्यात, "स्व" कसा आपल्या शरीराच्या आणि मानाच्यापण पलीकडचा आहे, यावर केलेली चर्चा आढळते. हा एकच विषय, वेगवेगळ्या विषयांतून आणि वेगवेगळ्या प्रश्नोत्तरातून परत परत मांडला गेलेला आहे. ते समजायला लागलं असेल तर मग पुढे ईशा क्रिया करताना, जेव्हा I am not the body, I am not even the mind हे कानावर पडतं, ते खूप आतपर्यंत जाऊन पोहचू शकतं. आपल्याला सध्या पडलेले प्रश्न, होणारा त्रास, जखडलेली अवस्था यातलं काहीही असलं तरी ते या बॉडी आणि माईंड मधेच आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला या दोन्हीच्या पलीकडे वास्तव्य करू देता, तेव्हा लिबरेटिंग वाटतं. आपणच आपल्याला आपल्या त्रासातून मुक्त केल्यासारखं वाटतं. मग दुसऱ्या कोणावर ना काही अवलंबून राहतं किंवा ना कोणावर काहीही राग किंवा आढी राहते. किंबहुना मला तर जास्तीच इम्फाथॅटिक वाटायला लागायचं ईशा क्रिया केल्यानंतर.
.
पण मजा काय झाली... (आणि हे ही कळायला मला खूप काळ जावा लागला...) की हे मेडीटेशन केल्यावर मी जरा जास्तीच रिलॅक्स व्हायचो. म्हणजे, एक अलगही लेव्हलका टॉलरन्स यायचा. आयुष्याची वाट लागलीय... आता उठलं पाहिजे... काहीतरी बूड हलवलं पाहिजे... हे असं असताना मला... ठीक ही है न... वाट लागली तर लागली... कोई नई... तू रहा चिल् मध्ये... असा एक विचित्र acceptance यायला लागला. आपण भर कुरुक्षेत्राच्यामध्ये येऊन शस्त्र टाकून मांडी ठोकून बसून जायचो. इथून पळून पण जाणार नाहीए आणि लढणार पण नाहीए. हा जरा नकोसा आणि अनपेक्षित परीणाम होता माझ्यासाठी. हे जेव्हा जाणवलं, तिथे थोडा स्वल्पविराम घेतला मग मी.
.
सद्गुरुंच म्हणणं असं आहे की आपण कोण ठरवणार आपल्याला काय हवं? कसं हवं? किती हवं? कारण आपल्या अपेक्षा आणि त्यांची व्याख्या, आपल्याला आत्तापर्यंत आलेल्या अनुभवांनी सीमित आहे. आपण अपेक्षा करून करून ते केवढी मोठी करणार? त्यापेक्षा, he in a way discourages you from defining anything for yourself but claims to be preparing you for embracing something grander which may come your way. यामुळं हे अपेक्षा आणि इच्छा करण्याच्या एका कामातून अचानक सुट्टी झाल्याचा फील पण आला मला.
.
It helped me to let go of many many things. Many unpleasant situations, guilt, aspirations and what not. I am sure, this meditation may have different effects on different people. My experience need not be प्रमाण. आणि आपलं उथळ पाणी आहेच सध्या.
So... it's a learning... आणि work in progress. हे नमूद करणं महत्वाचं.
मला वाटतं की एकटं एकटं मेडीटेशन करू नये. बोलावं. आपल्या जवळच्या लोकांशी तरी बोलावं. म्हणजे, थोड्या गोष्टी बऱ्या समजू शकतात.
.
मी अजूनही अधे मध्ये करतो ईशा क्रिया. It still works. But now I know the effect that it can have on me with prolonged use. त्यामुळं त्याचं एक सेटिंग समजलंय... त्या सेटिंग मध्ये गेलो, किंवा जायचं असेल, तेव्हा मी हे करतो. And at times, it gets me to somewhere entirely different place.
.
तर... that's that.
.
इथे एंट्री झाली डॉ. डिस्पेंझाची. या बाबाने दिलेला गांजा ओढल्यामुळे I almost lost one of my dear friends अशी माझी अजूनही समजूत आहे. पण तो विषयच वेगळा.
गांजा म्हणजे, अर्थात गांजा नाही. मेडीटेशनच की. अजून काय?
पण त्या बद्दल पुढच्या भागात.