Sunday, April 19, 2020

पेहला पेहला प्यार


मी शाळा कॉलेजमध्ये असतानाच्या सिनेमामधली गाणी हा म्हणजे एक खास व्यख्यानमाला होईल असा विषय आहे. एक तर पेहला पेहला प्यार च्या पुढं कोणी जायलाच तयार नव्हतं! आणि इकडं आम्हाला प्यार कशाशी खातात याचं प्रात्यक्षिक करायला मिळत नव्हतं. आमचं कॉलेज कुठं? तर सांगलीमध्ये! मग काय प्यार करणार? हे असंही सहन केलंय बाब्बो आम्ही. तुमच्या कॉलेजमध्ये मुलं मुली बोलतात न? या असल्या प्रश्नांना सुद्धा आम्ही उत्तरं दिलेली आहेत. पण सगळंच बिनबुडाचं नव्हतं म्हणा. कारण मला आठवतंय, कधीतरी एका सेमिस्टर मध्ये, कॉलेजच्या आवारात मुलं मुली एकमेकांशी गप्पा मारताना सापडला तर दंड होईल, हे असं सुद्धा करायचा प्रयत्न केलेला आमच्याकडे. आणि तेव्हा जेमतेम ऑर्कुट होतं, तेही जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात, त्यामुळं या असल्या वागणुकी बद्दल आऊट्रेज करायला देखील वाव नव्हता. असो. कदाचित आऊट्रेज पेक्षा, हसंच जास्ती झालं असतं म्हणा. कारण, मला तर हेही आठवतंय की, वर्गात गेलं की, एका बाजूच्या दोन रांगा मुलींच्या आणि दुसरीकडच्या तीन मुलांच्या हे असंच आम्ही चारही वर्षं बसायचो. आणि कोणाला यात काहीही वाटायचं नाही. अगदी, वीकेंडला कुछ कुछ होता है पचवून आलो तरीही. या अशा सगळ्या पसाऱ्यात, पेहला पेहला प्यार च्या ओव्हरडोस मध्ये, आम्ही कसे काय वाढलो, याचंच माझं मला नवल वाटतं. आता फ्रेंड्स कुठल्या वर्षी बघितलं, याकडं जायलाच नको.आणि, ब्रेकिंग बॅड, नार्कोज, किंवा अगदीच झालं तर सेक्रेड गेम्स पण नव्हतं तेव्हा. करमणूक म्हणाल तर घाऊक मध्ये, पेहला पेहला प्यार.


हे सगळं आत्ता का? थोडक्यात म्हणाल तर लॉकडाऊन मुळे. आणि घडाभर तेल घालून म्हणाल तर हे असं.

साध्या आपल्याला गाणी लागली की ओळखीचीच वाटत नाहीत. गेल्या चार वर्षात ३२ पुस्तकं ऐकून संपली. मग गाण्यांचा नंबरच आला नाही. सांगलीमध्ये कॉलेज आहे म्हणून प्यारशी संबंधच येऊ नये, यामध्ये जितकं लॉजिक आहे, तितकंच लॉजिक पुस्तकं ऐकायला सुरु केली म्हणून गाणी ओळखत नाहीत, यात आहे. पण शेवटी झालं हे असं झालं बुवा. त्याचा अर्थ काहीही काढा. त्यावर दरम्यानच्या काळात धिंगाणा डॉट कॉम बंद झालं. सावन ने पैसे लावायला सुरु केले. आम्ही तर टोरेंट लावून एम पी थ्री डाऊनलोड करायचो. तिथून सांगीतिक कारकीर्दीची सुरु झालेली आमची. त्याचाही कारण म्हणजे टोरेंट लावतोय म्हणजे, काहीतरी टेक्नॉलॉजी मध्ये भव्य करतोय, हा क्रांतिकारी विचार. गाण्याचं प्रेम बीम वगैरे विषयच नव्हता सिलॅबस मध्ये. वर आमच्या सांगीतिक कारकिर्दीचा इतिहाससुद्धा देखणा अजिबातच नाही. मला तर आठवतंय दिवाना अल्बम हिट झाला तेव्हा मला कळलं की हे असलं सिनेमाशिवाय पण खायचं असतं ते संगीत पण इतकं हिट होऊ शकतं. तिकडं पोरं ब्रायन ऍडम्स वर जाऊन पोचलेली, आम्ही दिवाना म्हणजे शाहरुख खानचा नाही, सोनू निगमचा, यावर माहिती काढत होतो. मग लकी अली आणि सिल्क रूट प्रकरण तर माझ्या आयुष्यात खूपच नंतर उगवलं. पण या इथून सुरु झालेली कारकीर्द, थेट स्टेजवर जाऊन घसा खरवडून गाणं म्हणण्यापर्यंत गेली, हेही काही कमी नाही. त्यातही आपलं लक्ष जास्ती कुठं असायचं तर ते वाट चुकली तरी वाट्याला येणार नाहीत, असली कुठली कुठली गाणी हुडकून, साठवून, साचवून मग लोकांना पोट भरभरून ऐकवण्यात! प्रसंगी दाराला बाहेरून कडी लावायला लागली तरी काय झालं! मग कदाचित तेव्हा यात पेहला पेहला प्यार चा ओव्हरडोस समजला नसेल.


आता परत बॅक ऑन ट्रॅक येण्यासाठी, आठवणीतली ८०-९० च्या दशकातली गाणी परत लावायला सुरु केलीत. आणि त्यामुळं लै टाइम ट्रॅव्हल सुरु आहे. लॉकडाऊन मधले उद्योग हो. अजून काय? पण आता हे ऐकताना एकूणच हे पेहला पेहला प्यार, पेहली मुलाकात, अब तक छुपाये रख्खा, शोला दबाये रख्खा, ही तीच तीच एक-दोन पानं सोडली तर पत्त्याच्या कॅट मधली बाकीची पन्नास पानं नाहीच की दिसत! पेहला प्यार असलं तर एकदम उच्च दर्जा. दुसरा तिसरा असेल तर त्याला एक म्हणजे कुठल्या गोष्टींमध्ये जागा नाही. जागा मिळाली तर आधी कॅरॅक्टर हनन केल्याशिवाय एंट्री नाही. नाहीतर मग सॉलिड, लव्ह सेक्स और धोका शिवाय नाहीच. ६०-७० च्या दशकातली किंवा त्याच्याही आधीची काही गाणी ऐकली तर वेगळीच मजा जाणवते. तेव्हाची काहीकाही गाणी आत्ता ऐकताना केवढी सॉलिड सेन्शुअल बनवलेत हे बघून मोठ्ठा आ वासतो! हा दुसरा अँगल साहजिकच आत्ता ऐकताना! तेव्हा तेव्हा त्यासगळ्याच्या मागे पेहला प्यार आणि अब तक छुपाये रख्खा चाच की बॅक ड्रॉप! असो. पण आपण आपल्या आपल्या काळाबद्दल बोलू सध्या तरी. आपला म्हणजे, कटर कट आवाज करणारा मोडेम बाजूला घेऊन सर्फिंग करणाऱ्या पोरा पोरींचा!


प्रॅक्टिकल मिळालं नाही तरी अभ्यास चोख हवा, या धाटणीवर आम्ही इंजिनइरींग काढलं. परीक्षा नसेल तर तसंही माहिती काढायला ऊत येतोच की. तसं आहे ते. माझ्या मित्राच्या मित्राची मैत्रीण पुण्याच्या कॉलेजमध्ये गेली, आणि इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षांमध्ये तिच्या वर्गातल्या एका मुलीचा पाचवा महिना सुरु होता, यावर आमच्या हॉस्टेल मध्ये सखोल चर्चा! दुर्मिळ असला तरी असला एखाद दुसरा प्राणी नक्कीच सापडायचा की, ज्याचं पाहिलं, दुसरं, तिसरं झालं, आणि मग चौथ्यात समजलेलं की पाहिल्यामध्ये कुठं हुकलेलं प्यार! त्याची हव्वा ज्यादा! आणि मग या पार्श्वभूमीवर तरीही, आम्ही जिंदगीमे प्यार एकदाच वाल्या गोष्टी आणि गाणी पण रिचवल्या. कशा काय देव जाणे?
सहिष्णुता असेल हो. आणखी काय?


तर मुद्दा काय? तर ही सगळी विसंगती. एकीकडं प्यार कशाशी खातात इथे मारामारी, दुसरीकडे प्यार पेहला असेल तरच प्यार, दुसऱ्यापासून पुढे सगळे बेकार याचं प्रेशर. एकीकडं मुलामुलींनी एकत्र बसायचं नाही, बोलायचं नाही आणि दुसरीकडं फिक्शन मध्ये सुद्धा पहिला डाव भुताचा नाही. आणि मग हे असलं सगळं काही महत्वाचं नसतं म्हणून आपलं आपणच दुसरीकडं मान वळवावी, तर तिकडं मित्राच्या मित्राच्या मैत्रिणीच्या वर्गातल्या मैत्रिणीच्या किस्स्यावर होस्टेलभर चर्चा! अशी सगळी अजब दुनिया.


गाणी ऐकताना इतक्या टाइम ट्रॅव्हल झाल्या की बऱ्याचशा वेगवेगळ्या काळातल्या आठवणी, विसंगत रीतीने एकमेका पाठोपाठ आल्या. आणि मग मैंने इन्हे कभी उस नजरसे देखाही नहीं मोमेंट आली. आता, एक्कोही कहानी बस, बदले जमाना, हेही खरंच. आणि म्हणाल तर सगळंच टाइमलेस म्हणू शकू, नाही तर सगळंच उगाळत सुद्धा बसू शकू, हेही खरंच.


ता.क. (१)
पॉईंट परत एवढाच की, घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन संपायचा, तोच एक जालीम उपाय आहे. नाहीतर अजून काय काय उगाळत बसावं लागेल याचा नेम नाही.


ता.क. (२)
चर्चाच म्हणाल तर आम्ही होस्टेलवर रात्र रात्रभर गणपतीच्या देवळात बसून ब्लॅक होलवर पण करायचोच. त्याला कॉलेज सांगलीमध्ये असल्याची खंत नव्हती. शेवटी खगोल आमच्याकडेही गोलच होता. आणि आम्हाला accessible आणि available पण होता.

Saturday, April 11, 2020

काय खाणार, बोला?

प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, त्या पेक्षा कागदी किंवा कापडी पिशव्या वापरा - असा एक काळ होता. आठवतंय? तेव्हा मला एक लाईट बल्ब मोमेन्ट आलेली. ती अशी की, अमुक च्या ऐवजी तमुक पिशव्या वापरा हे जरी तेव्हाची निकड असली तरी, एकूणच इतक्या पिशव्या वापराच कशाला, असा विचार केला तर? म्हणजे, पुणे सेंट्रल मधून मी चार गोष्टी घेऊन बाहेर पडलो, की, चारही दुकानाच्या जाडजूड मोठ्या कागदी बॅग्स हातात असायच्या. म्हणजे, हे पण कुठेतरी कमी नको व्हायला? मग याच्या पुढची लेव्हल म्हणजे, एकाच बॅग मध्ये सगळ्या गोष्टी घातल्या तर? मग माझ्या एकाच पाठीवरच्या बॅगमध्येसुद्धा सगळं मावतं की! त्याही पुढची लेव्हल म्हणजे, इतक्यांदा जायलाच कशाला हवं पुणे सेंट्रल मध्ये? आणि मग तिथून वेगळाच अँगल निघाला. प्लॅस्टिक तसं म्हणाल तर वाईट कुठंय? खूप सही गोष्ट बनवलीय की प्लॅस्टिक म्हणजे. प्लॅस्टिक मुळेच सुरळीत झालेली किती उदाहरणं आहेत! पण मग आपण केलेल्या अतिरेकाचं बील कोणावर तरी फाडलं पाहिजे की. मग म्हणून ते प्लॅस्टिकला व्हिलन बनवलं. आता उद्या कागदी पिशव्या उदंड वापरल्या, की मग झाडं तुटणारच न. मग एकूणच आपण किती वापरत सुटायच्या गोष्टी, यावर थोडीशी चर्चा, किंवा स्वगत का होईना, थोडासा विचार आवश्यक नाही का? आपल्या एकूणच गरजा किती आहेत. आणि त्यासाठी आपण किती उड्या मारतो, याचा ज्याचा त्याने आढावा घेणं आणि त्यावर काहीतरी कृती करणं जास्ती बरोबर नाही का?

ही अशी काहीशी तेव्हा, म्हणजे खूप खूप वर्षांपूर्वी, चर्चा झालेली. याचा अर्थ, सगळं सोडून एकदम जीवन मिथ्या आहे हा मार्ग पकडून, जगायला काय लागतं म्हणून पंचा नेसून जा असं म्हणणं नाही? पण कुठल्याच टोकाला न जाता थोडं फार प्रमाणात आणूच शकतो की, हे असं म्हणणं आहे. By the way, त्या सगळ्या चर्चेची परिणीती कशात झाली असं विचाराल, तर तशी खूप मोठ्या प्रमाणात कशातच नाही. पण माझ्या स्वतःपुरतं म्हणाल तर मी शाकाहारी झालो. हेच काय तर फार फार तर फलित. आता प्लॅस्टिक आणि शाकाहार पासून ते आपण काय खातो पितो, कसे खातो पितो, हा सगळाच खूप विशेष विषय आहे. कधीतरी फुरसत मध्ये त्यावरही बोलू. कारण मग, तू विगनच का नाही झालास? वगैरे ते पण अँगल आहेतच की.

मग हे आत्ता का आठवावं? तर त्याला दोन तीन करणं आहेत. सध्या घरी बसून आहे हे एक कारण. म्हणून उगाच तत्वज्ञान पाझरत असतं चारी बाजूने. दुसरं म्हणजे, गेल्या वर्षी सायबेरिया मध्ये गेलेलो तेव्हासुद्धा अशी एक लाईट बल्ब मोमेन्ट आलेली. अकरा बारा वर्षं झाली शाकाहारी होऊन आणि आता रशियाच्या दुर्दम्य भागातून दहा दिवस फिरायचं म्हणल्यावर, कुठेतरी आपल्याला आता इतक्या वर्षानंतर परत एकदा कदाचित काहीतरी मांसाहार करावा लागणार, हे दिसत होतं. कारण पुण्यासारख्या शहरात दररोज चिकन खाण्याचा अट्टाहास करणं जर विचित्र असेल, तर सायबेरिया मध्ये जाऊन मला नाश्त्याला पोहे आणि जेवायला पनीर मागणं सुद्धा तितकंच विचित्र. जिथं जे बनतं, पिकतं, किंवा जे सहज उपलब्ध आहे, ते खाणं जास्ती सुटसुटीत. जिथे शंभर शंभर किलोमीटर वर एक माणूस दिसायचा नाही, तर तिथे रस्त्यावर खूप ढाबे किंवा कॅफे वगैरे असायचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे एखादा कॅफे सापडला, तर तिथे जे आहे ते खायचं हा आमचा मास्टर प्लॅन. नाहीतर पुढे काही कधी मिळेल त्याचा नेम नसायचा. खूप मोजकं खाऊन दिवस काढले. पण मुद्द्याची गोष्ट अशी की, कुठल्याही दिवशी कधीही स्टार्व्हेशन वाटलं नाही. (आणि हो, रशिया मध्ये बीट आणि बटाटा घालून एक सूप करतात, ते ठिकठिकाणी मिळतं. माझ्यासारख्या शाकाहाऱ्याला ते पुरेसं होतं). मग ते सगळं संपवून लंडनला परत आल्यावर वाटलं की, इथे आपण किती अखंड चरत असतो! सायबेरिया मध्ये जेवढं खाऊन मस्त दिवस जायचा, त्याच्या दुपटीहून जास्त सहज असेल हे. इतक्या गोष्टी आजूबाजूला रचून ठेवलेल्या असतात न, म्हणजे घरात असो किंवा बाहेर, त्या सगळ्या प्रलोभनांना नको म्हणणं ही आपल्या पिढीची खरी कसोटी आहे. आपल्या आधीच्या पिढीचे खायचे वांदे होते. आपल्या पिढीची अति खायचे वांदे आहेत.

तर सध्या लॉकडाऊन मध्ये, आहे ती लाईफ-स्टाईल मेन्टेन करण्यासाठी फ्रिज भरून ठेवायची शर्यत सुरु झाली, तेव्हा मला हे सगळं परत आठवलं आणि वाटलं, की, हीच ती संधी. आपण जरा आपलं एकूणच खाणं पिणं प्रमाणात आणलं तर? आता बाहेर सुद्धा पडायचं नाही आहे. घरात तसंही सामान कमी असणारे? म्हणजे, लॉकडाऊन संपेपर्यंत हड्डीपसली दिसायची पाळी आणायची हा जरी हेतू नसला, तरी सवयींमध्ये थोडेसे बदल करायची हीच ती वेळ, असा विचार तर आहे. गेले खूप दिवस संध्याकाळचं जेवण बंद करून पाहिलं. फार काही त्रास होत नाही. सकाळचं जेवण आणि संध्याकाळी खूप दुधाची कॉफी, यावर पण मजा येते. हे of course, कुठल्याही डाएट मध्ये सांगितलेलं नाही. ही आपलीच लिमिटेड अक्कल. त्यानंतर दोन जवळच्या लोकांना विचारलं आणि त्यांनी अजून जरा बेहतर पर्याय पण सांगितले. मुद्दा असा की, मोजकंच खायचं आहे, तर काहीही मनाला येईल तसं कशाला करावं? थोडंच खा, पण भारी खा, असा काहीतरी डाएट असेलच की. वजन कमी करणे, किंवा वाढवणे, असा कुठलाही हेतू नाही. फक्त प्रमाणात खाणे. इतकाच आहे. तर यामध्ये काही पर्याय, सल्ले, असतील तर ते हवे आहेत. बघा, तुम्हाला माहिती असतील, तर जरूर सांगा. आपण असले विषय चावत बसू. That is far healthier than anything else.


ता.क. बाकी अर्धा एक किलो वजन कमी झालंय लॉकडाऊन मध्ये. पण ते सुरुवातीच्या ४ दिवसात झालेलं. त्यानंतर कायम आहे. म्हणजे हे असं एकवेळचे खाण्यामुळे ते कमी झालं नसावं हा आपला सोयीस्कर विचार आहे.