Sunday, November 07, 2021

बर्लिनचा फायर अलार्म

"Would you mind if I sit here?""No. Not at all. But it's a French table. तुला फ्रेंच येत असेल तर बस."
"I'm sorry. French is Greek to me." असं म्हणत, मी माझी बॅग टाकली आणि अलीकडच्या खुर्चीवर बसलो.
"ठीके मग. आता काय! करेन adjust!" म्हणत तिनेही खांदे उडवले. आजचा सगळा प्रकार पाहता, तिनं काहीही म्हणालं असतं तरीही मी बसलोच असतो. बूड टेकायला जागा आणि वेळ मिळाला हेही काही कमी नव्हतं!


बर्लिनला कदाचित ही दुसरी किंवा तिसरी वारी असावी. दीड दोन वर्षं झालीच की आता कुठंही जाऊन. पण यंदाच्या ट्रीप मध्ये आत्ता हा एअरपोर्टला जो गोंधळ सुरू होता, तो विशेष होता!
"इतकी जत्रा काय भरलीय आज? एसटी स्टँड झालाय एअरपोर्ट चा."
"फायर अलार्म वाजला सकाळी. मग सगळ्यांना बाहेर काढलं."
"होय की! मग आतमध्ये पण सोडायचं न परत! मी येईपर्यंत वाट बघत होता काय?"
"तीन तास सगळं ठप्प होतं. सगळ्यांना बाहेर काढलेलं. आता मग थोडा वेळ लागेलच की."
"किती हळू! संध्याकाळ झाली आता. सकाळच्या साडे अकरा आणि बाराच्या फ्लाईट पण अजून दिसतायत बोर्ड वर!"
"Or... maybe... you can ask, फायर अलार्म!! बाप रे. Everything alright? Was anyone hurt?"
"काय सांगते? Was anyone hurt?" मला वाटलं खरंच काहीतरी झोल झालाय की काय?
"No. I mean, not that we know of... yet."
"च्या मारी! मग काय उगाच?"
"तू बस न. काय पिणार सांग. गप्पा मारायला थोडीच अलायस तू."
"आज काय फ्री आहे?"
"आज काय का फ्री असेल?"
"तिकडे लाईनीत उभ्या असलेल्या लोकांना फ्री मध्ये पाणी वाटतायत."
"माझ्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत." असं म्हणत तीन मेनू कार्ड पुढं सरकवलं. "समोर किंमत पण आहे."
"मग एक कॉफी दे. तिथून सुरु करू."


आज जिकडे बघाल तिकडे त्रस्त आत्मे होते. पण सगळे रांगेत - हे विशेष. बर्लिन एअरपोर्टच्या टर्मिनल वनला चार ठिकाणाहून आत जाता येतं. चारही ठिकाणी तुडुंब लाईनी लागलेल्या. मी आत आलो तेव्हा मला या लाईनी चेक-इन च्या वाटलेल्या. कोविड काकांची कृपा असल्याने, आज काल सगळ्यांना चेक-इन काउंटरला आपापली कोविड टेस्ट सर्टिफिकेटं, पॅसेंजर लोकेतर फॉर्म, असल्या गोष्टी दाखवायला जावंच लागतं. तुमच्याकडे चेक इन साठी बॅगा असोत किंवा नसोत. त्यानं काही फरक पडत नाही. मग असतात लाईनी. पण इथे मग मी नंतर बघतो तर इकडून तिकडून नागमोडी वळून, चेक-इन काऊंटर पार करून, या सगळ्या लाईनी थेट सिक्युरिटी गेट पर्यंत गेलेल्या दिसल्या. मी आपलं माझा चेक इन काऊंटर हुडकला आणि सगळे सोपस्कार करून बोर्डिंग पास घेतला. काऊंटरवरच्या ताईंनी जाता जाता सांगितलेलं,
"एक दोन तासाची निश्चिन्ति आहे. कुठली लाईन छोटी किंवा मोठी, असलं काही बघू नको. सगळ्या तितक्याच मोठ्या आणि एकाच स्पीडने संथ जातायत. फार फार तर जिथं चांगले चेहरे आहेत, तिथं बघून थांब."
"मग इथेच थांबतो की." आपल्याला अजून परिस्थितीचं गांभीर्य आलेलं नव्हतं.
"But then you will be holding back so many pretty faces behind you and very soon they will not remain as pretty."
"ये बात भी सही है." म्हणत, तिथून निघालो. उगाच चारही टोकाला जाऊन एखादी लाईन छोटी आहे का हे बघितलं. पण तसलं काहीच नव्हतं. तासाला काही मीटर, यापेक्षा वेगात कोणीच जात असेल असं वाटत नव्हतं. कुठून सुबुद्धी झाली आणि काहीही कारण नसताना आपण लवकर उगवलो इथे, याबद्दल स्वतःची पाठ थोपटून, मधल्या लाईनीत लागलेलो. आणि मग तिथून पुढे हे इथे.


"घे." इकडं आपली कॉफी आली. "आता?"
"आता काय?" मी
"अजून काय?" ती
"अजून काही नाही. मस्त आहे. बुधवारी रात्री आलो इथे. केवढं छान, निरागस, शांत होतं हे एअरपोर्ट! आणि आज बघ! तब्बल दीड-दोन वर्षानंतर जरा जरा आता सुरू झालाय प्रवास तर हे असं! पण तरीही मजा माहितीये का? मगाशी लाईन मध्ये एक म्युजिक शिकवणाऱ्या काकू भेटल्या. त्यांचं काय ते व्हिएन्ना बद्दल प्रेम. तास गेला बघता बघता. या अशा भेटी गाठी, हे एक भारी असतं एअरपोर्ट वर."
"अजून काय म्हणजे... कॉफी बरोबर अजून काय घेणार हे विचारतेय."
"ओ... ते होय. भलतीच नीरस बुआ तू! कॉफी बरोबर आता वाईन तर नाही घेणार. बिस्कीट वगैरे असेल तर दे की."
"पैसे देऊन हा.."
"हाऊ रुड!? असं बोलतेस तू कस्टमर सोबत. तेही असा एअरपोर्टवर अडकलेल्या बेजार झालेल्या कस्टमर सोबत!"
"तू आलायस आज, म्हणून तरी कमीत कमी असं व्हायला नको होतं! नै?"
"जा. काही नको तुझं बिस्कीट व्हिस्कीट." तेवढ्यात तिनं आणलंच काहीतरी.
"घे रे. चल हे माझ्याकडून. ऑन दी हाऊस. नाराज नको होऊ." राणी उदार झाली आणि तिने एक छोटं बिस्कीट दिलं. मग मी ही ते पौष्टिक मानून मी ताबडतोब उचललं आणि माझ्या मानाचं मोठेपण दाखवला.
"कसं आहे न... माझी परसनालिटीच आहे अशी. माझ्या घरा जवळ ट्रेन स्टेशन आहे. तिथली मुलगी पण मला अधे मध्ये सहज मफिन द्यायची."
"बघ. माझा प्रश्न बरोबर होता तर. तुला फ्री ची च अपेक्षा होती की नै?"
"काही संबंधच नाही. बिस्कीट चांगलं आहे म्हणून काहीपण ऐकून घेणार नाही."
"yeah. Right! सोड. तू बघ व्हिएन्नाची बाई दिसते का ते?"
"तुला बरी उत्सुकता आहे?"
"अजून एक गिऱ्हाईक मिळेल न मला"
"तू इटालियन आहेस न? तुझा ॲक्सेंट तसा वाटतोय." वाक्य संपेपर्यंत व्हिएन्ना आणि इटली चा काही संबंध नाही हे लक्षात आलेलं. पण जात जाता नेम मात्र बरोबर लागलेला.
"मला पाच भाषा येतात." तिने वेगळीच सिक्सर मारली.
"खरंच का? की उगाच शेंडी लावतेय?"
"मी इंटरप्रेटर म्हणून काम करायचे. मग ट्रांसलेटर म्हणून..."
"युरोप मध्ये खूप लोकं असतात न ... मल्टी लिंग्वल?"
"युरोपच्या बाहेर तर मी गेलेली नाहीए. पण तुमच्याकडे पण असतील न? I am assuming that you are Indian." मी आपलं मनातल्या मनात आपल्याला येणाऱ्या भाषा मोजल्या. तशा आपल्याला पण तीन चार भाषा येतातच की. not that bad.
"मग ते ट्रान्सलेटर वरून बार टेंडर कशी झालीस?"
"हे आपलं असच अधलं मधलं. आणि हे बरिस्ता आहे. तुला कॉफी दिली की नै आत्ता."
"जर्मन येत असेलच. इटालियन आहेच. इंग्रजी तिसरं. What else?"
"फ्रेंच."
"तुला खरंच फ्रेंच येतं म्हणजे?"
"खरंच फ्रेंच टेबल आहे हे. तुला काय चेष्टा वाटली काय?"
"जा छपरी! आलीय मोठी फ्रेंच टेबल वाली"
"इम्पोली" म्हणून तिनं फ्रेंच ऍक्सेंट पण काढून दाखवला. कोणाला माहिती खरं की काय ते. पण शक की नजर से मत देखो म्हणत, तिनं तिचे इंटरप्रेटर म्हणून काम करताना आलेले मजेशीर अनुभव सांगितले. आणि मग कसं "सोशल" व्हायची जोरात इच्छा व्हायची दार दोन दिवसांनी तेही सांगितलं. लै अवघड बुआ हे दुसऱ्याचं भाषांतर करत बसणं म्हणून तिनं जॉब सोडला. आणि आता एका सॉफ्टवेअर प्रॉडक्ट कंपनीच्या मार्केटींग टीम मध्ये काम मिळवलेलं. त्याच्या मध्ये काय उठून बरिस्ता होऊन अली, हा विषय काय आमचा पूर्ण झालाच नाही.


सगळा गोंधळ पाहता, पुढची फ्लाईट नक्कीच लेट होईल असं मला वाटत होतं पण तसं काही बोर्ड वर अजिबात दिसेना. त्यावर पैज पण लावलेली. पण आमचं बोर्डिंग ठरल्या वेळेला सुरु झालं. एवढं सगळं होऊन आता वेळेत जायला मिळणार हे ही कमी थोडीच? म्हणून हार कर भी जितने वाले को बाजीगर कहते है असलं सांगून पैज हरली तरी नाक वर ठेवून, तिथून गच्छन्ति केली. पण इतकं नशीब थोडीच असतं? कारण माझं लॉजिक बरोबर होतंच. पुढे फ्लाईट उडायच्या आधी आतमध्येच अजून एक दीड तास बसवून ठेवलं. एक फ्री वालं पाणी पाजून आणि प्लेनवाल्या चीप्स चारून, मग शेवटी विमान उडालं.

ता. क. आत्ता हे लिहिताना परत एकदा बघितलं, तरी अजून फायर अलार्मचं कारण काही सापडलं नाहीए. कोणाला काही इजा झाली नाही हे तरी नक्की.