Tuesday, February 19, 2008

कारण मला ऊशीरा पोहोचायचे नाही

एक मुलगा भेटायचा मला - २६ नंबरच्या बस स्टॉपवर. डगळ्या पायजम्यामधे असायचा कायम. ऑफीस, घर, पार्टी कुठेही काही भेदभाव नाही - सगळीकडे तसाच पेहराव! बघूनच मजेशीर वाटायचा गडी. बस स्टॉप नामक प्रकारावर नाहीतरी आपल्याला कंठ फुटतोच तसा याच्या बरोबरही फुटायचा. हा अवलीयाही तमाम जनतेप्रमाणे सॉफ्टवेअर कंपनीमधे. डोळ्याला चष्मा पण म्हणे बीना नंबरचा - स्मार्ट वाटावे म्हणून लावलेला. हसतमुख. सदैव चौकड्याचा शर्ट किंवा टीशर्ट मधे. ऊभ्या ऊभ्या बऱ्याच गप्पा व्हायच्या. हा अवलीया तंद्री लागली की मात्र एकदम हसत असा काही क्रीप्टीक बोलायचा की ऐकता ऐकता एकदम फ्युज ऊडाल्यागम वाटायचे.

हल्ली कार घेतल्यापासून बस स्टॉपवर जाणे कमी झाले - पण परवा अचानक जावे लागले आणि योगायोगाने हाही भेटला. अगदी तसाच, जसा पुर्वी असायचा. म्हणाला प्रोजेक्ट बदलतोय. लंडनकडे कूच करायच्या तयारीमधे होता. पोस्ट वगैरे पण भलतीच बदलली होती. गडी अजून तसाच होता मात्र. म्हणाला या बेटावरून पुढच्या बेटावर निघालो. याची बेटही कन्सेप्ट मला आधीपासून माहीत होती. एकदम सरळ बोलणारा माणूस मधेच भडकायचा पण. काही गोष्टी असा काही बोलून जायचा की ऐकणाऱ्याला काय प्रतीक्रीया देऊ हा प्रश्न पडावा! काहीही म्हणजे काहीच्या काही बोलायचा हा गडी - तेही हसत. आणि पुढच्या क्षणी विषय एकदम निराळा!
"You know what? She is not vergin! And I can bet on that. It is just that I do not want to talk about it. That doesn't mean that she should assume I know nothing! बात करती है! तुला सांगतो ... पोरीना नको त्या ठीकाणी माज ... आणि नको त्या ठीकाणी लाज वाटते!"
एक ना दोन. बरेचसे असे त्याचे कमेंट हळू हळू आठवू लागले. पुढच्या बेटावरचा प्रवास सुखाचा जावो म्हणून मी निघालो. एकूणच एक वेगळ्याच दृष्टीकोन असलेला हा गडी फक्त बस स्टॉपवरच्या ओळखीमधे बरेच काही नवल बोलून गेला. त्याची बेटाची कन्सेप्ट, हा गेल्यावर जास्ती आठवते हल्ली.
.
.
.
.

एका दुसऱ्याच जगामधे आलोय मी. मी स्वतः आणलेय मला ईथे. अगदी जाणून बुजून! ठरवून वगैरे नाही पण एकदमच अनभीज्ञ होतो यापासून असेही नाही - अगदी पुरेपूर कल्पना होती आपण कुठे जातोय याची. ऐलतीर पैलतीर करत करत आपला तीर कधीच मागे सोडलाय मी. कोणा अनोळखी बेटावरून फिरतोय. हा बेट माझा नाही पण या बेटाबद्दल कुतूहल नेहमीच होते मला. ईथे यायची अफाट ईच्छा पण होती. मी आलोय त्या बेटावर पण त्यासाठी स्वतःचा गाव सोडावा लगेल याची जाणीव ऊशीरा झाली. जसे एकदा बाटला की बाटला! परत मागे फिरतो वगैरे प्रकरण चालत नाही तिथे! दोनही गोष्टी एकदम नाही होत. आता ईथून मला माझा गाव दुरवर अंधूक दिसतो. त्या गावामधे आता मी पाहूणा असेन. कारण या बेटावरची धुळ मला चिकटलीये. या बेटावरचा मीठ मझ्या रक्तात गेलेय.

ईथे सगळीच नवलाई. मान, अपमान, स्वाभीमान किंवा आत्मविश्वासाचे कपडे काय तर अगदी लाज, शरम, आब्रू आणि मैत्रीचेही बुरखेही वेगळे. कोणी नवे म्हणेल तर कोणी वेगळे! पण माझ्या गावासारखे नक्कीच नाहीत. हे सर्व कुतुहलाने बघता बघता कधी स्वतःवर पांघरले कोणास ठाऊक? मी या लोकांच्यातलाच एक वाटतो माझा मला! कधीकधी बेटाच्या ऊंच टोकावर चढून बसून मी माझा गाव पाहतो. तिथे नसलेला मी पाहतो. कधी नोंद न केलेली मर्यादा पाहतो. ईथे सगळेच स्वतःसाठी आदर्श. मी माझ्या गावातले बुजुर्ग आठवतो. मला आदर्श म्हणणाऱ्यांपासून पळून येताना मागे सोडलेला माझा आदर्श पाहतो.

परतीचा रस्ता दरवेळी मिळेलच असे नाही, पण परत जाण्याची ईच्छा करून कोणी लक्ष्य गाठायला निघत नाही. अशी बरीच बेटं लागतील, बरेच किनारे सोडावे लागतील. कुठवर जाऊ शकतो आपण हे मापायला मी नक्कीच निघालो नव्हतो. कुठे पोचायचेय नसेल माहीत तर ईंधन वाया घालवायची काय गरज? आणि जर माहीत असेल तर दिरंगाई कशाची? हिशोब एकदम सरळ आणि सोपा - समजायला आणि बोलायला. निघालो तर आहे, पण माझ्यामधला मला आवडणारा "मी" मागे सोडत. आणि कदाचीत हाच प्रश्न आहे - ज्याला मागे सोडतोय, त्यालाच अंतिम लक्ष्यापर्यंत पोचवायचे होते - तोच नाही राहीला तर पुढचा प्रवास काय कामाचा?

ईथे लोक मर्यादा ओलांडतील आणि मग शांतपण एक वेगळेच नाव देऊन नामानिराळे होतील. ईंपल्स होती ती म्हणून बऱ्याच गोष्टी खपवतील. स्वतःलाच शहाणपणाचे धडे शिकवतील. एकदम कमीत कमी प्रश्न पडावेत असे सोयीस्करपणे आपलेच एक वेगळे तत्वज्ञान बनवतील. ना प्रश्न, ना ऊत्तरे या अशा अवस्थेमधे आपण किती खुश आहोत हे बघून समाधानी होतील. हे एकदम अचाट! अगदी अनाकलनीय पण वरकरणी एकदम चौकटीबद्ध. काहीच पंगा नाही. "चुका होऊ शकतात" हे माझ्या गावामधे सहानुभूती देताना वापरायचे वाक्य होते - या बेटावर ते ब्रीद भासते. लांबून चकाकत होते ते सोने होते की वाळू हे समजायच्या आत किंवा समजून घेण्याच्या आत, मीही चमकू लागतो. एकदम लख्ख! आणि मग कधी बेटाच्या किनाऱ्यावरून आपल्या गावाकडे बघणाऱ्यांच्या भाऊगर्दीमधे जाऊन मीही सामील होतो. हे बेट या अशांच्याच गर्दीमुळे मग दुरून ऊजळून निघत असावे!

ईथे थांबायचे कोणालाच नाहीए. मलाही नाहीए. पण जाऊ त्या बेटावर, त्या बेटाचा रंग पांघरू, हे प्रवासाच्या सुरूवातीला माहीत नव्हते. आणि ही मिळालेली समज एक तगमग जागी करते. मी पुढे पुढे चाललोय यावर समाधान मानायचे की मी परतीचा रस्ता मिटवतोय याचे दुःख? मी आणि माझे लक्ष्य यातले अंतर कमी करतोय कि त्या लक्ष्या पर्यंत ज्याला पोहोचवायचे होते त्याला मागे सोडतोय याचे दुःख. तसे मलाही माहीत होते की बऱ्या़च बेटांवरून जाणार आहे, पण प्रत्येक बेटाचा रंग लागत जाईल हे जरा निराळेच. रंग लागू नये म्हणून की प्रयत्न केला नाही - पण रंग लागल्यावर, आपण परत बाटलो असे काही मात्र वाटून गेले - दरवेळी.

सुख दुःखाच्या गोष्टी केल्या की ऊगाच जरा भावनीक झाल्यासारखे वाटते. हे बेट हा एक टप्पा आहे, प्रत्येक जण येतो या टप्प्यावर. या टप्प्यावर कोणीच थांबायचे म्हणून येत नाही. पण काही थकून तर काही समाधान मानून ईथेच नांगर टकतात. बकीचे पुढे जातात. थांबले ते बरोबर? की पुढे निघाले ते बरोबर? हे असले हिशोब मांडायचा माझा मानस नाही. तसे जरी समाधान आपले ईतके स्वस्त नाही की या टप्प्यावरच हत्यारं ठेवावी, पण कुठेतरी धुसर भीतीही वाटते - ऊद्या तसेच झाले तर ...? मी ईथेच अडकून पडलो तर...? किंवा ईथेच मलाही समधान गवसले तर...? हा आत्मविश्वासाचा कमकुवतपणा की या बेटावरच्या कपड्यांचा परीणाम? मला या प्रश्नाचे ऊत्तरही शोधायचाही विचार नाही, कारण मला विषयच बदलायचा नाही. पुढे एक दुसरे बेट वाट बघत असेल, मला तिथे ऊशिरा पोहोचायचे नाही.