Monday, April 08, 2019

नामधेयानि किं फलम्

मला लहानपणी महाभारत बघताना असा प्रश्न पडायचा की घटोत्कच किंवा हिडिंबा अशी नावं ठेवायची वेळ यावी म्हणजे exactly काय झालं असेल या बाळांच्या बारशात. आत्या रुसली म्हणायचं की यांनी चुकीच्या भाषेत नाव ठेवलं? तसं म्हणलं तर मला हरिवंशराय हे नावही लहान बाळाकडं बघून कसं काय सुचलं असेल असा प्रश्न पडायचा. घटोत्कचच्या काळात अर्जुन आणि हवंच तर भीम वगैरे नावं होतीच की चलती मध्ये. हरिवंशराय यांच्या काळात तर खूपच सुटसुटीत पर्याय होते. उचलायचं एखादं नाव. त्या काळी एकसारखी नावं असल्याचा प्रॉब्लेम पण कुठं असायचा?

आपण शाळेत शिकलेला इतिहास आठवून बघा. एकाच काळात एकच नावाची दोन माणसं होती असं आठवतंय? आपल्या बालमनाला याचं खूप आश्चर्य वाटायचं ब्वा याचं! (असल्या प्रश्नांवर लक्ष घातलं म्हणूनच काय तर बालमनाची इतिहासाच्या पेपर मध्ये हलाखीची परिस्थिती असायची!) तसं म्हणाल तर अजोबांवरून नाव ठेवायचं असले प्रकार असले तरीही असा एकही धडा आठवत नाही जिथे तू रोहित म्हणजे पाटलांचा की भोसल्यांचा असला प्रश्न कोणीही कोणालाही कुठेही विचारलेला असेल. आमच्या काळी शिवाजी किंवा टिळक घडला नाही याचं कदाचित हे कारण असावं. पिढी सगळी उधारीचं नावं घाऊक मध्ये घेऊन त्यामुळं तयार झालेला आयडेंटिटी क्रायसीस सोडवत बसली. (आता हे असं घडल्याचा कुठलाही पुरावा कुठेही उपलब्ध नसला तरीही न कचरता, अधिकारवाणीने हे नमूद करण्याचं माझं धडास पाहता माझे इतिहासाचे मार्क्स किती होते याचा अंदाज आलाच असेल. असो.). तिकडे युरोपमध्ये असायचे आठवतंय? पाहिला हेनरी, तिसरा जेम्स आणि पाचवा जॉर्ज असले पब्लिक. पण एकाच शाळेत पहिल्या बाकावर जोशांचा पाहिला क्लाइव्ह, दुसऱ्या बाकावर कुलकर्ण्यांचा तिसरा क्लाइव्ह आणि तिसऱ्या बाकावर पाटलांचा पाचवा क्लाइव्ह असलं कुठंही कधीही झालं नाही. हे कसं काय जमवलं असेल? युद्ध, मारकाट, आणि कट कारस्थान बरोबर, हे असलं पण सांगायला हवं इतिहासात.

आडनावांच्या बाबतीतले प्रश्न थोडेसे वेगळे. आमच्या शाळेत कुलकर्णी, जोशी आणि पाटील लोकांची अख्खी रांग असायची परीक्षेच्या वेळी. आमच्या शाळेत असं तर मग राम कृष्ण सीता पासून ते गांधी टिळक हिटलर यांच्या शाळेत कसं असेल हा प्रश्न ऑब्व्हियस आहेच की. मग वाटायचं की कापड मील जशा बंद पडल्या तसं नवी आडनावं बनवायचा कारखाना पण बंद पडला असावा. हे आडनावांचं दुकान कधीतरी कोणीतरी सुरू केलंच असेल की. मग ती प्रथा मोहंजदाडो हडप्पा सारखी हरवली की कोणी मोडीत काढली ते शोधून काढलं पाहिजे असं माझ्या क्रांतिकारी मनाला वाटायचं. हगवणे, नलावडे, टर्नर, फिटर, किंवा अशी असंख्य आडनावं पाहता, it's clear that we are victims less creative developers. (तसं म्हणाल तर शिवाजी महाराज आणि मी जर नसतो तर भोसले हे आडनाव सुद्धा या यादीमध्ये आलंच असतं.)

आता शोध घ्यायचाच म्हणाल तर, आपल्याकडे चंद्रगुप्त मौर्य होता म्हणजे त्या काळच्या आधीसुद्धा आडनावाची फॅक्टरी सुरू होती. आता कोणी म्हणेल कृष्ण पण यादव होता पण मग अर्जुन, भीष्म आणि धृतराष्ट्र यांची आडनाव विचारली की विकेट उडते. कदाचित कुठेतरी स्टार्ट अप असावी ही आडनावं विकणारी. कृष्णाने घेतला किक स्टार्टर वरून आडनाव. बाकीचे लोक थांबले असावेत, कंपनी स्टेबल होईपर्यंत. (कोणाला माहिती नाही म्हणजे सगळ्यांनी आपापल्या परीने कल्पना विलास करायचा, हे तर आपलं सध्याचं फॅड आहेच की. मग का सोडा?)

एकूण मुद्दा असा की, कुठं सब स्टॅंडर्ड माल वापरायची सक्ती तर कुठं उगाच अवघड करून ठेवलेली गणितं. वस्तूंचा पुनर्वापर करावा याचं आपण शंभर टक्के समर्थन करतो. अनावश्यक नव्या गोष्टी नको बनवायला वगैरे ठीक आहे. पण नाव आणि आडनाव यांच्या बाबतीत हे सर्वप्रथम लागू करायची काय गरज होती? कॅप्टन फॅंटास्टिक मध्ये बेन नं आपल्या मुलाचं नाव बोडवान ठेवलेलं असतं. या नावाचा अर्थ म्हणजे हाच की माझा मुलगा हे त्याचं उत्तर. हे स्पष्टीकरण किती बेस्ट आणि सफिशिअंट आहे! (Of course, माझ्या मुलाचं नाव ठेवताना it was neither best nor sufficient पण तो विषय वेगळा). कुठल्याही नावाचा आणखी कुठला फळ, फुल, गाव असला अर्थ असायलाच कशाला पाहिजे? म्हणजे नाव सोनुबई असल्या म्हणींचा जन्मच होणार नाही. आपापली भारी भारी नावं बनवायची सुद्धा एखादी प्रथा प्रचलित असावी. त्यात वावगं किंवा नवल वाटू नये. आपल्या आवडीची आणि आपण तयार केलेली खूप नावं असावीत. एखाद्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना सगळी वंशावळ बघून कोणा कोणाची नावं कशी कशी आणि का बनवली याच्या गोष्टी आठवून नॉस्टॅल्जिक वाटावं. In fact, अगदी चायनीज किंवा जापनीज मुळाक्षर कशी असतात तसा नावं आणि आडनावांचा पसारा असावा. हवा तसा पुनर्वापर आणि हवे तितके नवे उत्पादन. शेवटी "नामधेयानि किं फलम्" असं शेक्सपिअर म्हणालाच की. त्यामुळं एकच प्रकारच्या नावावर किती अडकून पडायचं? प्रत्येक पिढीचे आपापले फॅड. तशी वेगवेगळी नावं. हसत खेळत राहायला जमलं की झालं. तुम्हे मैंने दिल में जगह दी है असं कितीही उर बडवून सांगितलं, तरी दिल आणि नाव यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो. शेवटी जगण्यासाठी ऑक्सीजन हवा. बीना नावाचं ही जगता येतंच.



तळटीप: इथवर आलाय म्हणजे तुम्हाला मजा आलीय असं मी सोयीस्कर पणे म्हणेन. आता एक सिक्रेट. तसं मला हे विविधावह धर्म, जाती, त्यांच्या आपापल्या असंख्य चूक, बरोबर, अनाकलनीय आणि अस्पृश्य छटा यांच्याबद्दल लिहायचं होतं. आता बाकीचे संदर्भ आपले आपण लावून घ्यावे. जास्ती स्पष्ट झालो तर मग "नाम बताऊंगा तो लोग मजहब ढूंढ ने लगते है" त्यातला प्रकार झाला असता. त्यामुळं कोणा एकाला धरा किंवा एकाला सोडा असला प्रकारच नको. सगळेच एका माळेचे मणी. बाकी आपला मुद्दा सुखरूप मांडून झालाय.
You are welcome.