Saturday, February 06, 2010

पुढच्यावेळी जरा जपून ...


… and you always feel that you have plenty of time in hand!मला अजुनही आठवत नाहीए आम्ही काय बोलत होतो. कदाचीत खरच असावं आई म्हणायची तसं. माझं लक्षच नसतं तिच्या बोलण्याकडं. गाडी चालवताना थोडंसं मागं झुकून आई काय बोलते वगैरे प्रकार जरी सुरू असले तरी मधेच वाऱ्यामुळं तिचं ऐकू यायचं बंद व्हायचं. पण मग अंदाजानं आमची गाडी सुरू असायची. म्हणजे असायची तरी. अधे मधे माझं कसं लक्ष नाही बोलण्याकडं याबद्दलही चार शब्द व्हायचे. म्हणजे आईचा एक, आणि माझे सफाईचे तीन! पण खरच माझं लक्ष नसावं! आणि आज सफाई द्यायची संधी पण नव्हती!

विशूच्या घरी जायचं म्हणून निघालेलो आम्ही. भारूमावशीकडून संध्याकाळी सात-आठच्या सुमारास निघतानाची चर्चा लक्षात आहे. येतानाचा जरग नगरकडचा रस्ता खराब आहे म्हणून सुभाष नगरकडून जायचं ठरत होतं. ईतपत लक्षात आहे. आश्याला विशूकडं ये म्हणून सांगून आम्ही निघालो. ऍक्टीवावर ढांग टाकून बसलो. आईनं काहीतरी सीटखालच्या डीक्कीत ठेवलं. माझा नेहमीसारखा सीटवरून ऊठायचा आळस, पण तशीच सीट वर करून काहीतरी ठेवलेलं. पण खरच आठवत नाहीए की काय बोलत होतो. की गप्पच होतो कोण जाणे! पण नेहमीसारखा थोडंसं मागं झुकून आई काय बोलतीये याकडं लक्ष द्यायचा प्रकार सुरू होता. थोडासाच रस्ता पार केला असेल, आणि आमची गाडी लडबडली.

"खटॅक्क्‍ खड्‍" असा आवाज करून गाडीनं जोरात आपली नाखुशी दाखवली. माझ्या हातातलं हँडल एकदम चुंबकाकडं खेचलं जावं असं खाली गेलं! मी काही सावरेन ईतक्यात ते तेवढ्याच स्पीडनं वरही आलं. खांद्याना झटका लागला. "अरे अरे" असं म्हणायचं संपायच्या आत गाडीचा आणि आईचा संबंध तुटला. मी आपण कसे चतूर या नादात कदाचीत स्वतःला संभाळलं. किंवा संभाळायचा प्रयत्न केला. परत एकदा "काय ते खड्डे!", "मी अजुनही कसे बेसावध चालवतो?", किंवा "रस्त्यावरचे लाईट्स", "ट्रॅफिक" अशा असंख्य गोष्टींवर उखडण्याच्या मूडमधे जाण्याच्या आधीच गाडीवर आई नाही हे लक्षात आलेलं. एका क्षणाचे ईतके काही भाग असतात याचा आलेला तो एक भयाण अनुभव होता. गाडीचा ब्रेक कच्चकरून दाबला. दुपारच्या टळटळीत उन्हामधे चालताना जशी कोरड पडते, तशी घशाला कोरड पडलेली. मागे वळलो रस्त्याच्या बाजूला एक बाई पडलेल्या. पालथ्या. चेहराही जमीनीशीच खिळलेला. तेवढंच काय ते दिसलं. बाकीचं तिथं होतं की नव्हतं मला अजुनही आठवत नाहीए. तिच माझी आई होती. गाडी तशीच साईड स्टॅंडवर सोडून मी मागे पळालो. की चालत गेलो? माहीत नाही. पण मागे गेलो. समोर फक्त तिलाच बघत. गाडी सुरूच होती मागे. पहीली अपेक्षा की मी तिच्यापर्यंत ती थोडीशी कण्हत ऊठावी! नंतर वाटलं चेहरा तरी ऊचलावा तिनं मदत मागण्यासाठी. हात, पाय, काहीतरी हलावेत. दुखलं वगैरे असेलच की. शेवटी वाटलं की कमीत कमी वाऱ्यानंतरी हालचाल व्हावी! मी जवळ जात होतो तसा तिचा निश्चलपणा जास्तीच भडक वाटू लागला. काही मोठसं आपल्याला कधीच होणार नाही, असं का कोणास ठाऊक मला बऱ्याचदा वाटायचं. ते तेव्हाही आठवत होतं. पण ती अजीबातच हलत नव्हती! Parents category is always special. They should always be in commanding position. You always want to see them stronger and stronger. Last thing you would expect is to see them helpless. Disable. Someone, you always drive energy from. You don't want them to be so unable. That's perhaps the most uncomfortable moment. Helpless moment. I realized it hard way. I realized it when I was in no position to even acknowledge.

जवळ गेलो, वाटलं, मी ऊचलायचा प्रयत्न केला की तीही ऊठून बसेल. असच बसतात ना फिल्म वगैरे मधेही. तिनं तसलंही काही केलं नाही. डोळे भिरभिरवले ईकडून तिकडे. मी जे ऊचलतोय ते शरीर तिचंच आहे याचं भान तिला नव्हतं. तिच्या शरीरालाही नव्हतं. जसं की आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टींपैकी तीही एक अचल वस्तू बनली होती. केसं चेहऱ्यावर आलेले. भुवयांवर माती लागलेली की खरचटलेलं हे मला कळलं नाही. तिच्या काळ्या पांढऱ्या केसामागे चेहऱ्यावर एक मातीचाही तिसरा रंग आलेला. गालावर काहीतरी खरचटलेलं. थोडंसं रक्तही होतं. त्याचा चौथा रंग. मी बघीतलंही नसेल नीटसं. "आई, आई" असं एक दोनदा बोललो असेन, पण त्यामुळं तिच्या चेहऱ्यावर काहीही फरक पडला नाही. कसं बसं तिला अर्धवट ऊचलू शकलो असेन. अशा प्रसंगी किती जोर लावावा, किंवा किती पोटतिडकीनं जोर लावावा ही दोनही गणितं नविन होती. अर्धवट ऊठवल्यावर माझ्या छातीवर डोकं ठेवलं तिनं. रस्त्यावर आम्ही दोघेच फक्त नाही हे एव्हाना लक्षात आलं माझ्या. थोडी बोहोत गर्दीही चटकन जमलेली. हे जग म्हणजे एक प्रोजेक्ट आहे, आणि हे आपल्याला असाईन झालेलं टास्क आहे, असा काहीसा फिल आला. का कोणास ठाऊक? स्वतःची लाजही वाटली. ते ही का कोणास ठाऊक? देवाचा नेम चुकला कदाचीत. माझ्या ऐवजी त्यानं कमजोर प्लेअर निवडला. काय केला तोच जाणे. पण काहीतरी नवाच डाव मांडलेला.

"आजी पाणी पाहिजे का" वगैरे म्हणत कोणी पुढं आलं. माझी आई, काकू वरून आजी कधी झाली कळालंच नाही मला. वाटलेलं अजुन बराच अवकाश आहे त्याला. कदाचीत मीही एव्हाना मुलावरून प्रौढ वगैरे होणं अपेक्षीत असावं – आजूबाजूच्या माणसांच ऐकत - त्याना वेळ देत. एवढ्यात कोणीतरी पाणी आणलं. आईला पाणी देण्याईतपतच काहीतरी करू शकलो, पण ती पीत होती की नव्हती माहीत नाही. भारू मावशीला फोन केला, "आईचा छोटासा ऍक्सीडेंट झालाय, सुभाष नगरच्या रस्त्यावर, तू येणार काय?" ती आलेच वगैरे काही म्हणाली. "रिक्षात घालू चला" असंही कोणी म्हणालं. "माझी मावशी येईल गाडी घेऊन." या वाक्यावर मी तिथंच बसून होतो. आई अजुन तशीच निश्चल, माझ्या कुशीत होती. एक कारवाला थांबला. म्हणाला, माझी कार आहे, चला चटकन हलवूया. रिक्षापेक्षा हा पर्याय बरा होता. एक दोघानी हात दिला. मी खांद्यातून पकडलं, कोणी हात धरले. कसं बसं ऊभी राहीली आई. आधी मी गाडीत शिरलो, मग आईला आत घातलं. त्या कारवाल्यानं त्याच्या घरच्याना रस्त्यावर ऊभं केलं. आणि आम्ही निघालो. कोणालातरी गाडीची चावी आणायला सांगीतली. भारूमावशीच्या घराजवळ आलोच होतो, तेवढ्यात आई बोलायला लागली.

"काय झालय मला?", "आपण कुठं निघालोय?", "हे कसं झालं?", "माझा डावा खांदा का दुखतोय?", आणि मग परत "काय झालय मला?". सगळी ऊत्तरं दिली. आणि मग परत पुढचा प्रश्न "काय झालय मला?" भारूमावशीच्या घरापर्यंत जाईपर्यंत या सगळ्या प्रश्नांचं किमान दहावेळा पारायण झालं. मी दाहीवेळा ऊत्तरं दिली. या चालू प्रकाराचा निष्कर्ष लावायचं धाडस आणि वेळ दोनही गोष्टी नव्हत्या. पुढच्या तासाभरात, किंवा त्याहून कमीच वेळात, गाडीच्या प्रत्येक पुढच्या स्टॉपवर एक-दोन नातलग वाढत गेले. आधार नर्सिंग होम पर्यंत पोहोचेतो सगळे जमले. तसं वेगळं काहीच झालं नाही. ऊपचारतर सुरूही झाले नव्हते. आईचा त्याच त्याच प्रश्नांचा रतिब सुरूच होता, पुढचे प्रश्न माहीत असल्यानं आमची ऊत्तरंही वेगात सुरू होती. पण आता सगळे घरचे चेहरे परत बघून आपल्याला काही होऊ शकत नाहीचा फिल परत एकदा आला. काहीतरी होईलच.

कोण डॉक्टर, काय टेस्ट, कुठले रिपोर्ट्स अशा बऱ्याच गोष्टीनी आता डोक्याचा ताबा घेतला. ईथवर येताना जेव्हा जेव्हा आईच्या खांद्याला हात लागेल, तेव्हा तेव्हा ती खूप ओरडायची. फार असह्य वेदना व्हायच्या तिला. मला फार वाटत होतं, मला परीस्थीतीचं गांभिर्य अजुनही कळत नाहीए असं का कोणास ठाऊक सारखं वाटत होतं. बऱ्याच गोष्टी जशा आत्तापर्यंत "का कोणास ठाऊक" वर सोडलेल्या, तशी ही पण एक सोडली. ओर्थोचे डॉक्टर येईपर्यंत ३ वेगवेगळ्या डॉक्टरनी तपासण्या सुरू ठेवल्या. आईच्या त्याच त्याच प्रश्नांच्या सरबत्तीला बघून CT Scan करायचंही ठरलं. डावा डोळ्याच्या वरचा भाग बऱ्यापैकी सुजून फुगला होता. आता आणखी सुजला की बघवणार नाही ईतका. पण डॉक्टरनी तो दुसऱ्या दिवशी वाढेल असं सांगून आधीच चेतावनी दिली. खरचटलेल्या जखमा स्वच्छ झालेल्या. X-ray काढून झाले. Fracture होतं. डाव्या खांद्याचा Joint शाबूत होता, पण त्यापसून काही सेंटीमीटरवर Fracture होतं. X-ray मधे दोन तुकडे दिसत होते, त्यांच्यामागे तिसराही असेल, असं डॉक्टरनी सांगीतलं. Admit करायला लागणार हे कळालं. आईचे प्रश्न सुरूच होते. "काय झालय मला?", "आपण कुठं निघालोय?", "हे कसं झालं?", "माझा डावा खांदा का दुखतोय? "मोडलाय?" तिच्या प्रश्नांची शंभरी होत आलेली. पण हे ऐकायला मी एकटा नव्हतो. आता आपली अशी बरीच माणसं होती आजूबाजूला. माझ्या महिनोन्महिने अदृश्य होण्याला "त्याला काम असतं" या कारणाखाली स्वतःच लपवून अविरत प्रेम करणारी. आपण एकटे नाही याची जशी जाणीव झाली त्यापुढं सगळ्या प्रकारात मी नव्हतोच अशी नवी जाणीव व्हायला लागली. कोणी लिफ्ट दिली. कोणी गाडीतून घालून आणलं. कोणी हॉस्पीटल हुडकलं. या सगळ्या प्रकारत मी केवळ ऊपस्थीत होतो पण अलिप्त होतो. कधी कधी आपण स्वतःवर जरा जास्तीच क्रिटीकल होतो, त्यातला प्रकार. पण "तू करतोस, तुला कळत नाही" असं म्हणायला आई आज भानावर नव्हती. कधीतरी "हो बाई, खरय तुझं" असलं काही कधीतरी म्हणायचं राहूनच गेल्यासारखं वाटलं.

एकुणच या सगळ्यामधल्या माझ्या अनुपस्थीच्या फिलींगमधे मला ईन्शुरन्सची आठवण झाली. ती का झाली कोणास ठाऊक? आत सगळा गोतावळा सोडून मी बाहेर आलो. धिरजनं फोनवर प्रोसीजर सांगीतली. अंकितनं ऑफिसमधल्या या संबंधी काम करणाऱ्या माणसाला जोडून दिलं. त्यानं पटकन ईंशुरन्सचा आयडी दिला. एक बाजू सुरक्षीत झाली. मी आत आलो. CT Scan ला कधी जायचं याची वाट बघत बसलो.

अधेमधे ऑपरेशन थिएटरमधे जाऊन डॉक्टरबरोबर प्रश्नोत्तरं झाली. ऑपरेट काहीच करायचं नव्हतं, तरीही ती OT मधेच होती. प्रत्येकवेळी तिच्या डाव्या डोळ्यावरचा भाग अधिकाधिक सुजलेला वाटला. आणि त्या त्या प्रत्येक वेळी ती माझ्यासमोर रस्त्यावर निपचीत पडलेली आठवायची. बिन हलता! आणि मला माझ्याच बेजबाबदारीची जाणिव व्हायची. तरीही मी आत जायचो. तरीही मी तिच्या समोर ऊभा होतो. कारण मी कदाचीत तिथं नव्हतोच. तिच्या जखमा आता ऊठून दिसत होत्या. तिचे तेच तेच प्रश्न आता जास्ती रास्त वाटत होते. मलाही तेच प्रश्न पडत होते. "हे तिलाच का झालं?", "कुठच्या कुठं जात होतो आपण?". तिनं शंभरदा ऐकलेलं पण अजुनही तिला माहितच नव्हतं तिला काय झालय ते. भुवयांच्यामधे नाकावरच्या जखमेवर थोडंसं रक्त होतं. खाली खरचटलेला भाग तपकीरी पडत चाललेला. भंडारा ओढतात कपाळावर तसं तिथेही खरचटलेलं. ओठावर, हनुवटीखाली खरचटलेलं तो भाग आता निळा दिसत होता. मुका मार लागलेला. हाताचे कोपरे, गुडघे, त्यांचीही तिच अवस्था. प्रत्येक जखम आपाअपलं अस्तित्व पाळीपाळीनं दाखवून देत होता. त्यांच्या विरुद्ध पेनकिलर असा लढा आई लढत होती. अशा माझ्या कितीतरी जखमा आजवर तिनं घालवलेल्या. ती म्हणायची "पुढच्यावेळी तरी जरा जपून". तिच्या या वाक्यातला कळवळा हा असा कळावा? ईथे मला हे तिचं वाक्य परत म्हणायचीही संधी नव्हती. तिची थोडीच काही चुक होती? पुढच्यावेळी मलाच जरा जपून वागायचं होतं. पण आज ती सांगायच्या भानावर नव्हती. तिची प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. "काय झालय मला?", "आपण कुठं आहोत?", "हे कसं का झालं?", "माझा डावा खांदा का दुखतोय?", "मला गुडघ्याला का चरचरतय?". CT Scan च्या वेळी ते मशीन बघून क्षणभर भारावून गेली. "असं सिनेमामधे असतं तेच का हे?" हे ही विचारली. विषय नकळत बदलला म्हणून का काय कोण जाणे पण क्षणार्धात झोपली. मशीन सुरू झालं. अंगाई वगैरेसारखा त्याचा आवाज मुळीच नव्हता, पण तिला झोप आली.

पुढे रीपोर्ट नॉर्मल आले. सुज आणि जखमा बऱ्या व्हायची वाट बघणं सुरू झालं. डोक्याला मार लागला म्हणून एक-दोन दिवस थांबून मग सर्जरी करायचं ठरलं. हात लटकवायची वगैरे गरज नव्हती. हातामधे प्लेट्स आणि स्क्रू लावायचं ठरलं. आजच्या शनीवार सकट दोन दिवस जाऊन सोमवारी सर्जरी करायची ठरली. हे दोन दिवस आईने पुर्ण आराम करावा यासाठी मी आणि माझी बहिण तैनात. कुठेही काही खुट्टसाही आवाज होणार नाही याची काळजी घेत. "तू झोप मी जागं राहणार" यावर भांडत. अगदी लहानपणी आई बाबा दुपारी झोपायचे तेव्हा आमची आभ्यासाची वेळ असायची किंवा आमचीही झोपायची वेळ असायची. एकत्र असताना बिना भांडण करता बसणं तसंही कठिण. तेही जमलं तरी हाताचे चाळे बंद असणं आणखी कठिण. "कुचकुच करू नका!" या आईबाबांच्या वाक्यावर आम्ही दोघेही मग शांत बसायचा प्रयत्न करायचो. असंख्य वेळा ओरडून घेतलं असावं या विषयावर. पण ते शांत बसून त्याना झोपू देणं आम्हाला कधीच जमलं नाही. आज ते जमवायची पाळी अशी विचित्र रित्या समोर आली. सर् सर्‍ असे बरेचसे प्रसंग डोळ्यासमोरून सरकत होते. काकूची आजी झालेल्या माझ्या आईला बघून, माझंही मुलाचं माणुस होणं सुरू होतं! I hope.


येत्या सोमवारी सर्जरी झाली की या सगळ्यावर पुर्णविराम लागणार होता. एक विनाकारण सुरू झालेलं पर्व संपणार होतं.