Sunday, October 24, 2010

Blind Date

(या कथेचा मगच्या पोस्टशी संबंध नाही. नवा गडी नवं राज्य)
(कथा पुर्णपणे नसली तरी थोडीशी काल्पनिक आहे. त्यात कशाशीही साधर्म्य वगैरे शोधण्याचा प्रयत्न करू नये. साधर्म्य सापडल्यास, तो वाचकाचा कल्पनाविलास असेल, आणि त्याला लेखक जबाबदार नाही.)

अमेरीकेच्या रणधुमाळीमधे यावेळी बऱ्याच काही तिरपांगड्या गोष्टी घडल्या. शक्य असतं तर प्रत्येकावर काही ना काहीतरी लिहीलं असतं. पण असो. आता परत "आत्याबाईना मिशा असत्या" प्रकारच्या बाता नको मारायला. "अमेरीकेच्या लेटेश्ट ट्रिपमधे" असे म्हणायचे होते खरं तर, पण उगाच ईफेक्ट तयार करण्यासाठी रणधुमाळी वगैरे. नकोत्या ठिकाणी नाही ते करण्याचा किडा जरा उपजातच आहे आपल्याला काय करणार? पुण्यातून निघताना मला आठवतय, आदितीशी बोलणं सुरू होतं. कशाबद्दल? तर ब्लाईंड डेटबद्दल. म्हणे किती मज्जा येईल नं! आपण थोडीच मागं हटणार बाता मारायला? सुरू एकदम जोरदर चर्चा आणि कल्पनांचे मनोरे. पण आता कसं आहे नं, की देवानं पण काही गोष्टी विचित्र बनवलेत यार. म्हणजे ज्याचा जोरदार विचार कराल म्हणे तसलं काही खरच घडतं. याची खरच काही गरज नव्हती. पण आता करणार काय? म्हणालो नं, देवानं खरच काही विचित्र बनवलेत गोष्टी. काही लोकांसाठी ते शाहरुख खाननं बनवलेलं असेल. शिद्दत, कयामत, सजिश, कायनात वगैरे तो जे काही म्हणतो तसं. पण मुद्दा काय पुढे अमेरीकेत असल्या काही गोष्टी घडल्या. अगदी अशाच नाही, पण आता जवळपास देव डी आणि देवदास मधे जेवढा फरक होता, तेवढ्या फरकानं घडल्या. एक जवळपास ब्लाईंड डेट घडून आलीच आली. वर आणि बरेच काही उगाचच पणावर लागले. कारण काहीही नाही. बस झाले, एवढेच.

सॅली नावाची एक फटाक पोरगी योगायोगानं पदरात पडली. म्हणजे पडली म्हणजे एकदम धपाक करून पडली. आले देवाजीच्या मना. कोणा अमुकची तमुक फ्रेंड वगैरे. फ्रेंड सिटींगचा जॉब मिळालेला एका ईवीनींगसाठी. आता कसा आणि का ही वेगळी कथा. पण माझी सो कॉल्ड ब्लाईंड डेट अशी सुरू झालेली. ज्या गोष्टी एकत्र नाही यायला पाहिजेत, त्या सगळ्या एकत्र येऊ लागल्या, की बऱ्याच भलत्या आणि असंबद्ध गोष्टींची श्रुंखला सुरू होते. तसा प्रकार होता. माझ्या सुपिक डोक्यानं सॅलीला सुट होईल आशी आयडिया काढली. आम्ही डिस्को नाईटला जायचा प्लान केला. तोही बप्पी लहरी येणार होता त्या वाल्या. तीही लगेच तयार झाली. ऑलमोस्ट म्हणालीच - "What an idea, sirji". आता हे का केलं? याची मला आजिबात कल्पना नाही. मी तसा डीजे डिस्क वाला माणूसही नाही. पण आता काय सांगू? योग असतात सगळे, जशी सॅली धपाक करून पदरात पडलेली तसे. 

लगेच तयार होऊन आम्ही पोचलोही, अ‍ॅवलॉन नामक देसी डिस्कमधे. सॅलीतर आलेलीच फटाक कपडे घालून. माझ्या मंदबुद्धीनं गडबडीत एक काळा पायजमा आणि लाल टीशर्टवर भागवलं. डिस्कमधे पोरींना ड्रेस कोड नाही पण मुलाना मात्र आहे या स्वार्थी परंपरेचा मला क्षणभर विसर पडलेला. तसंही देसीच डिस्क आहे, करू अ‍ॅडजस्ट ही असली मनातल्या मनात कारणं केली अ‍ॅवलॉनला पोचल्यावर.  गोऱ्या पोरीना तसंही देसी गाण्यांची, खाण्याची भलती आवड. तशी सॅलीलापण. कोणा माझ्या देसी मित्रानंच पटवलेली हिला. आणि हिच्याबरोबर मी डिस्क मधे. "नादखुळा, गणपतीपुळा, तुमच्या लाईनीवर आमचा डोळा" हे जे काही लहानपणी शाळेमधे बोबडे बोल ऐकलेले, थोडंफार तसंच होणार होतं. म्हणजे माझा डोळा वगैरे नव्हता सॅलीवर पण त्रयस्थ होऊन पहाल तर तशी डेटच ना ही. असो. आपल्या डेट तशाही मनातल्या मनातच व्हायच्या. सॅली आणि मी पुसटशा पिवळ्या लाईटखालून लाईनीतून काऊंटर पर्यंत आलो. आत जाऊन येड्यागत देसी नाच करायला तिकीटपण काढले. माझ्या पायजम्याला कोणी जमेत धरलं नाही. कदाचीत सॅलीसारखी चिकनी पोरगी आत येणार नाही या भीतीनं मला डिस्काऊंट मिळाला असावा. दणदणीत आवाजात आत "पग घुंगरू" सुरू होतं. ड्रम बीट वर आख्खी जमिन वर खाली होतीये असं वाटत होतं. ईतकं जुनं गाणं का वगैरे विचार येण्याआधीच समोर बप्पीदांचं पोस्टर बघितलं. सोन्याच्या माळांच्याखाली दबलेला भलासा देह. डोळ्यावर गॉगल. हात वर उंचावलेला. ठाकरेंनी ही पोज आधी शोधली की बप्पीदांनी, असा उगाचच पीजे मनात येऊन गेला. सॅलीकडे बघीतलं आणि पीजे सांगायचा मोह आवरला. काय काय explain करणार हिला? ठाकरे कोण असा पहिला प्रश्न असायचा हिचा. आमच्या कोल्हापुरामधे असलं कोणी म्हणलं असतं तर आजुबाजूचे ४-५ शिव सैनिक पुढं सरसावले असते. काहीतरी काम मिळाल्याचं सुख असतच की. पण असो, त्यात नको पडायला. तसंही तिथे एकमेकाशी बोलायचं म्हणजे जवळ जवळ किंचाळूनच बोलावं लागणार होतं. मग आपली एनर्जी सांभाळून खर्च करणंच भलं.

बाईंनी मोर्चा बारकडं वळवला. काहीतरी दोन चार ग्लास रिचवल्याशिवाय या नाचणार कशा? किंवा याला मूड क्रिएशन म्हणूया. सुरेख पोजमधे बार स्टूलवर बसून बाईंनी चोहीकडे नजर टाकली. क्षणभर मला वाटलं की सगळं म्युजिक अचानक थांबलय आणि सगळे लोक (आणि कपल्स विशेषतः) रागानं (किंवा असुयेनं वगैरे) माझ्याकडं बघतायत, "भला ईसकी लडकी मेरे लडकीसे सफेद कैसे?". आता माझी काय चुक यार, कधी पडतो लंगुरके मूह मे अंगुर. सॅलीच्या ड्रिंकच्या ऑफरने मी तसा लगेचच भानावर आलो. बाईंसाठी वोडका आणि माझ्यासाठी लिंबू सरबत! छ्या! असं कसं. मी कशी अशी ऑर्डर करू? आजूबाजूच्या तमाम कपल्सको जेलस बनायेंगे वाल्या मगासच्या कल्पनेला यानं तडा गेला असता. तेवढ्यात सॅलीनेच तशी ऑर्डर करून टाकली. काहीही म्हणा, गोऱ्या पोरींच्या तोंडी काही छानच वाटतं. माझ्यासाठी हिने लेमोनेड (लिंबू सरबतचं लेमोनेड व्हायला ईतकं पुरे होतं) मागीतलं हे बघूनच, मला परत सगळी कपल्स परत माझ्याकडं मत्सरानं बघतायतचा भास झाला. परत म्युजिकवगैरे थांबलय असलं सगळं वाटलं. बार टेंडरनं एकदम विरक्त भावनेनं माझ्यासमोर जेव्हा लेमोनेड बडवलं तेव्हा थेट कॉलेजच्या कॅंटीनमधल्या वेटरची आठवण झाली. तोही असंच टेबलवर येऊन ऊपकार केल्यागत कटींग वगैरे बडवून ठेवून जायचा. अर्धा चहा कपात, अर्धा खालच्या थाळीत. ईथे थाळी नव्हती, पण प्रकार थोडाफार तोच होता. तसंही ग्लासमधे बर्फ जास्त! त्यातलं सांडणार काय? एकदा हातात ग्लास आला की बास. त्यात लेमोनेड आहे की वोडका हे फक्त तुम्हालाच माहित. परत एंबॅरेसमेंटचा सवाल नाही. सॅलीनं तिचे काहीतरी अनुभव सांगीतले. कधीकाळी मागे जेव्हा देसी डिस्कमधे आलेली तेव्हाचे. कळो न कळो हसणं प्राप्त होतं. तसं हसलो. मी सहसा येत नाही डिस्कमधे ही माहिती देण्याची गरज नव्हती. पण दिली उगाचच. तिला कळाली असेल नसेल काही कळालं नाही पण तिनंही मान हलवून माझ्यासारखंच प्राप्त हसुन दाखवलं. तसंही कोणी डिस्कमधे गप्पा मारायला थोडीच येतं? आणि येऊही नये म्हणून तसंही दणादण म्युजिक. आणि ते तर बप्पीदांचं! एव्हाना, नौ दो ग्याराह वगैरेची गाणी पण झालेली. तशी नॉन-बप्पीदा गाणीही होतीच. सॅलीनं मधे बप्पीदा कोण वगैरे समजून घ्यायचा माफक प्रयत्न केला. आता हिच्या ब्रायन अ‍ॅडम्स वगैरे उदाहरणांसमोर आता मी कसं समजवावं या प्रश्नातून त्या दाणादाण म्युजिकनं मुक्ती केली.

समोर आता आत घुसण्याकडे कूच केली. अशक्य उत्साहामधे नाचणारी जनता बघून जोश नाही चढला तर नवल. बाजुला सहसा कपल्सच असावीत. मला उगाच वाटलंही, हे सगळे खरच ईतके खुश असतील का? की असं बेहोश होऊन नाचतायत? ईतका आनंद! ईतकी मस्ती! जन्नत! काय माहित? खरच काय झालं असेल असं? मला त्यांच्या आनंदाचं नेहमीच कौतुक वातलय. पण नंतर नंतर तेही मॅनीप्युलेशन वाटायला लागलेलं. तिथं असं कोणीच नव्हतं याची मला अगदी खात्री होती जो ईतका वेड्यासारखा खुश होता. खरं तर दिवसभर कचकच झाली, कधी आठवडाभर बॉसनं डोकं खाल्लं, किंवा बरेच दिवस खुश झालोच नाही, मला वाटतं की असं काही झाल्यानं तिथं आलेली जनता खुप असावी. आठवड्याच्या खुशीचा कोटा भरवण्याची ही रिच्युअल! एकदम बेहद्द खुश होणं गरजेचं तर आहे. पण घडत काही नाही तसंलं! मग स्वतःच स्वतःचा मामा बनवायचा. नाचायचं ईथं येऊन. परवा झुठाही सही मधे जॉन अब्राहम पण पाखीला तेच सांगतो. वेडे, दुःखी झालीस की नाच. देवानंही कुठल्यातरी वेदामधे सांगीतलं असेलच की, वत्सा, दुःखी कष्टी झालास की नाच! शंकराचा तर स्वतःचा ब्रॅंडही होता. पण काहीही म्हणा, तिथे आलेले लोक खुशतर दिसत होती. एकमेकांच्यात मिसळलेले. ४-५ जणांचा घोळका जरी असेल तरी त्यांच्याही बऱ्याच कलाकारी चालू. वेगवेगळ्या पोज घेऊन गाण्याची नक्कल करण्याच्या. काही लोक केवळ नाच एंजॉय करत होते. आपल्यामधेच गुंग. नाचाची देसी स्टाईल तशी एकमेवाद्वितिय. वर डिस्को गाणी. आम्हीही त्या अनोळखी आनंदाच्या जश्नमधे सामिल झालो. ओळख असो नसो, काही तासांपुर्वी बऱ्यापैकी अनोळखी आणि एकमेकांसाठी अनभिज्ञ असलेलो आम्हीही तिथे मिसळून गेलो. नाचू लागलो. उड्या मारू लागलो. वेगवेगळ्या पोज देऊन एकमेकाना अ‍ॅप्रिशिएट करू लागलो. नाही म्हणलो तरी, कपल म्हणून नाचू लागलो. तेवढ्याशा छोट्या जागेमधे तसे भरपूर लोक मावलेले. पण सगळेच तितकेच झिंगलेले. आत आल्यावर तो लेमोनेड पिऊन नाचतोय की वोडका, हे कोणा सांगा. तसे एक टकीला शॉट सॅलीमुळं माझ्यात पण रिचलेला. त्यामुळं मीही काही फारसा वेगळा नव्हतो. सगळे सारखेच असल्यानं कोणाला कोणाचा धक्का वगैरे कळत नव्हतं. नाहीतर आपल्याला तर सवय कुठली? तर, धक्का लागला तर एकदम अक्षम्य गुन्हा केल्याचा लुक घेण्याची! पण तसं काही नसतं डिस्क मधे. सगळे किती छान नाचतोय असाच लूक देतात. तेही लूक दिला तर. नाहीतर रनटाईम अ‍ॅडजस्ट करणं सुरू असतच. कदाचीत हेही एक कारण असावं लोक डिस्कमधे येण्याचं. प्रचंड टॉलरन्स.

पण असो. सगळं सुरू होतं. बप्पीदा स्टेजवर येणार अशी अनाऊंन्समेंट झाली. लोक नाचायचे थांबले. स्वतःला स्थिरस्थावर करून झालं की जसं काही बप्पीदा काय म्हणतील. किंवा असच असेलही बुवा. कशाला प्रत्येक गोष्टीवर कमेंट करा? माझेही हात खिशात गेले. सॅलीबरोबर नाचताना मला आमच्या ऑफिसमधल्या एका बॉसचं दर्शन झालेलं. उंचीला जरा कमी, रंग सावळा. तरीही तिथल्या डिम लाईटमधे दिसलाच मला. अचानक माझ्यातल्या "लोग क्या कहेंगे" वगैरे जागा होऊन, शक्य तितक्या जागा बदलून पाहिलेल्या. आता या फिरंगबरोबर असं डिस्कमधे? आता हे का आणि कसं घडलं याचं ऊत्तर मी घरी जाऊन तयार करायचं ठरवलेलं. आताच हा येडा भेटला तर काय सांगू! आता म्युजिक थांबल्यावर परत एकदा माझं लक्ष चौफेर गेलं. काय सांगा, माझ्याच मागे ऊभे असायचे साहेब! पण असं काही नव्हतं. कदाचीत मलाही तिथं बघून त्यानीही असाच लपाछीपीचा डाव सुरू केला असावा. काय सांगा? हे सर्व सुरू असताना खिशातल्या हाताला अपेक्षित जाणिव नाही झाली आणि माझी असली नसलेली सगळी झिंग सर्रकन ऊतरली. समोरच्यानं मधेच परत अनाऊंन्समेंट केली, "Put your hands together for BA....PPI....DA!" आणि हात तसेच खिशामधे ठेवून सॅलीकडे वळून मी जवळ जवळ किंचाळलो, "सॅली!! माय आयफोन??"

(क्रमशः)
पुढचा भाग: Blind Date (Contd)

Post a Comment