Wednesday, October 02, 2013

Follow the rule!

परवा गुजारीश पहिला. एक तर मला कळत नाही की असले त्रासदायक सिनेमे काढतातच कशाला? असो. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. च्यायला डोक्यात किडा सोडून गेला न पण हा सिनेमा!

इच्छामरण हा आता पुष्कळ वेळा चघळून झालेला विषय आहे. जगण्याची इच्छा. Spirit of living. हे सगळं ठीक असलं तरी, एखाद्या भाजीपाल्यासारखं १४-१५ वर्ष जगत आलेला इथन. त्यातूनही तमाम जनतेला आयुष्य कसं छान आहे असा आशावाद शिकवणाऱ्या पण स्वतः हालचाल करू न शकणाऱ्या इथनला स्वतःसाठी इच्छामरण मागताना झालेला त्रास. लोकांनी समजून घेण्याच्या पलीकडे असलेल्या त्याच्या समस्या. जगण्यावर त्याने मिळवलेला विजय, कल्पनेच्याही पलीकडचा. आणि म्हणून हक्काने मरण मागणारा त्याचा चेहरा खूप वेगळा वाटतो. त्याच्याइतकं आयुष्य कोणालाच कळलं नाही. असंही वाटतं. इतके सगळं करून त्याला लाचारपणे जज्जकडे मृत्यू मागवा लागतो. मला हाच मोठा अन्याय वाटला. अपमान वाटला. कोणाला पटवायची गरज का भासावी? माझं आयुष्य. मी जगलो. तुम्हा सर्वांच्या शतपटीने जास्ती चांगले जगलो. तेही भयंकर प्रतिकूल परिस्थितीमध्ये. आता मला तुम्हाला स्पष्टीकरण का द्यावे लागावे? ज्ञानेश्वरांनी कोवळ्या वयात समाधी घेतली. आजच्या काळात, त्यानाही कोर्टामध्ये उभे केले असते. "लिहिलास बाळा ज्ञानेश्वरी. मग? शहाणा झालास? समाधी हा ऑप्शन आमच्या घटनेमध्ये नाही. त्यामुळे तुला पुढे जगावे लागेल. तसेही १०+२+४ असले pattern असतात आमच्याकडे. तू इतक्या लवकर सगळं शिकूच शकत नाहीस. तुला पुढच्या इयत्तेमध्ये प्रवेश दिलंच कोणी?" असलं नक्कीच झालं असतं.

आता ज्ञानेश्वर आणि इथन एकाच तराजूमध्ये तोलाण्यासारखे विषय नाहीच आहेत. इथनचा विषय जरा नाजूक आणि वेगळा होता. खूपच इथनचा स्वतःचा होता. त्याचा सरसकट नियम होऊ शकत नाही. किंवा मला तसं सुचवायचंही नाहीये. पण खटकलेली बाब म्हणाल तर त्याला कोर्टात जाऊन आपली केस लढवण्याची. तीही अश्या लोकांसमोर की ज्यांना काडीचीही कल्पना नाहीये त्याच्या आयुष्याबद्दल! काल्पनिक गोष्टीचा इतका उहापोह कशाला? हे जरी खरं असेल तरी थोड्या फार फरकानं असल्याचं गोष्टी मला खूप ठिकाणी दिसू लागलेत! म्हणून असले सिनेमे बनवूच नयेत. च्यायला नंतर हा त्रास! इच्छामरण म्हणजे, एखाद्याच्या पीडा थांबवण्यासाठी त्याच्या मागणीनुसार डॉक्टरने त्याचे आयुष्य संपवणे. हा कायदा होऊ नये, याला खूप बाजू आहे. खूपशा धर्मांनाही मान्य नाहीये हे. कायदा म्हणतो की याचा खूप मोठा गैरवापर होऊ शकतो. आणि म्हणून असला कायदा आम्ही करणारच नाही. किंबहुना असलं काही नाहीच करायचं असा कायदा करणार. म्हणजे कोणी विचारही नाही करायचा याबद्दल!

काही अंशी बरोबरही असेल हे. पण गैरवापर करणाऱ्या लोकांना पकडणे आणि वेसण घालणे तितकेसे सोपे नाहीये. म्हणून सब घोडे बारा टक्के म्हणून नियम लावायचा? शेवटी कोणाचंतरी भलं व्हावं म्हणूनच नियम बनवायचे न? मग अरे ते नियम न पळताही कोणाचं भलं होत असेल तर नियम पाळण्याचा अट्टाहास का? हे असंच नियमात गुराफाटायचं आपण की त्यामागच्या माणसाला समजून घ्यायचं? कोणी सुखी होवो न होवो, शेवटी नियम पाळल्याचे सुख! घरी जाऊन शांत झोप आली पाहिजे न! एक वकील मित्र म्हणाला, "माणूस म्हणून सगळं पटतंय पण एका व्यवस्थेचा भाग आहोत आपण. एकदा नियमाला फाटा दिला की मग शंभर लोक हात वर करतात. त्यांना कोण निस्तरणार?" म्हणजे जास्तीचे काम आणि अवघड प्रश्न नकोत म्हणून केलेली पळवाट आहे का ही? की मला कायद्याचं ज्ञान कमी आहे म्हणून मला एकट्यालाच असं वाटतंय?

इच्छामरण हा विषय गंभीर आहे. अशा १-२ पान खरडून त्यावर करण्यासारखा नाहीये. पण एकूण आपली अशी प्रवृत्ती खूप दिसून येते. एकानं चूक करायची आणि मग बाकीच्या साऱ्यांवर नियम लादायचे! असे बनवतो आपण नियम! बऱ्याच वेळा चूक करायचीपण गरज नसते. "कोणीतरी चूक करू शकेल" हे इतके पुरेसे असतं! शाळेत असताना हक्क आणि कर्तव्ये यावर नागरिक शास्त्रामध्ये एक धडा होता. उदाहरणार्थ गाडी चालवण्याचा आपल्याला हक्क आहे, पण लोकांना त्रास होईल इतका आवाज करत न जाणे, किंवा वेडेवाकडे न जाणे, हे आपले कर्तव्य आहे. आपण हक्क मिळाले की मोकाट सुटतो. आणि मग नियम लावावे लागतात. आपण सगळेच नसू पण आता एखाद दुसरा नक्कीच नियम धाब्यावर बसवतो. दिलेल्या हक्कांचा, मुभेचा गैरवापर करणं इतकं गृहीत पकडलंय की कोणी गैरवापर करण्याच्या आधीच हजार प्रकारचे नियम बनतात.

आता बघा. माझे तिच्यावर प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचे आहे. तर मग आम्ही लग्न केलं हे मी कोण्या काळ्या कभिन्न आणि अंधारात बसलेल्या माणसासमोर का सिद्ध करायचं? तेही फोटो आणि राशन कार्ड दाखवून? कारण त्या हापिसातल्या बाईने सही शिक्का मारला नाहीतर तुम्ही दोघे शादीशुदा कसे? त्याचच दुसरं टोक. आता आम्ही दोघानी ठरवलं की बाबा आपलं काही जमत नाही आता आपण वेगळे होऊ! तेही असं लगेच होत नाहीच. तर इथेपण तुम्हाला कोर्टात जाऊन सिद्ध करावं लागतं! इथेही मिया बीबी राजी, वगैरे काही चालत नाही! पाच सहा महिने चकरा माराव्याच लागतात. हे हास्यास्पद नाहीये का? म्हणजे आधी लग्न करताना चकरा मारायच्या कागद रंगवण्यासाठी, आणि मग त्यातून मोकळे होताना परत चकरा मारायच्या ते कागद खोडण्यासाठी! मग मुळात ते कागद बनवलेच कशाला? त्यांचा सबंध काय? त्याशिवाय काय आम्ही सुखी राहिलोच नसतो का काय? लग्नव्यवस्था आणि त्याचे फायदे तोटे हा विषय खूप मोठा आहे. पण तिथेही सब घोडे बारा टक्के केलेच आहे आपण! मला त्याचं नवल वाटतं!

एका टळटळीत दुपारी. एका कोपऱ्यातल्या चौकात, जेव्हा कोणीही कुत्रा नव्हता, तेव्हा माझ्यासमोरचा लाल सिग्नल मात्र माजोरड्यासारखा सुरु होता. थोडावेळ थांबलो, आणि मी डावीकडे वळलो. समोर पोलिसाने पकडले. म्हणाला तुम्ही सिग्नल तोडलाय. पैसे भरा. मी म्हणालो. अरे भल्या माणसा. इथं कोणाचं नुकसान झालंय? कोणाला धोकातरी होता का? तुमचा सिग्नल नको हुशार इतका की समोरचे ट्राफिक बघून सुरु बंद व्हायला? आणि असे असतातही सिग्नल! पोलीस म्हणाला, साहेब, उगाच शहाणपणा शिकवू नका. लायसन्स ठेवून द्या. नंतर येऊन साहेबाना स्टोरी सांगा! मी म्हणालो, अरे बाबा, तू बघ न विचार करून! की तेही साहेबच करणार? मी नाहीच तोडत सिग्नल. पण इथे चिटपाखरू नाहीये. मी नेकीमध्ये थांबलोपण सिग्नल वर. पण निरर्थक आहे ते! गाढवपणा नाही का हा? ते मशीन म्हणालं थांबा तर आपण थांबायचं? तुमचं मशीन चूक आहे. मागासलेलं आहे. ते कधी दुरुस्त करणार? अंदाधुंद कारभार असू नये. शिस्त असावी. हे मलाही माहिती आहे. शेवटी नियम जो केलाय तो लोकांच्या सुरक्षिततेसाठीच केलाय न? आणि जेव्हा इथं तुंबल्यासारख ट्राफिक असतं, तेव्हा गरज आहे न शिस्तीची! आणि मी माझ्या सहकाऱ्यांनाही सांगतो तेव्हा नियम पाळायला! पण हे आत्ता काय? इतकं बोलल्यानंतर पुढं काय झालं हा वेगळा विषय. उगाच नियम म्हणून नियम पाळण्यात काय अर्थ? यालाच अंधश्रद्धा नाही का म्हणायची? अक्कल गहाण ठेवायची, आणि नियम पळत सुटायचे! म्हणायचं की हे असच असतं आणि तुलापण असच कराव लागेल! पटो. किंवा न पटो. 

ज्या लोकांच्या भल्यासाठी नियम बनवलेत त्या लोकांचे आता भले झालंय. आता नियम बंद करा. हे ही आपण नाही करणार! किंवा त्या नियमाने कोणाचेच भले होते नाहीये. आता नियम बंद करा! हे ही आपण करणार नाही! थोडासा नियमांना बाजूला ठेवून खरच भलं करायचा विचार करूया? तेही आपण करणार नाही!

हे इतकं क्लिष्ट कधी करून ठेवलं आपण हे सगळं? सगळं सोपं गणित असावं. काय बरोबर काय चूक. हे सहसा अवघड नसतच. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण समजूतदारपण दाखवायला सुरु केला की कदाचित कधीतरी मोठ्या मोठ्या गोष्टींची गणितं पण सोपी होतील. आता माझी एक मैत्रीण म्हणते की गणित म्हणालं की ते कधी सोपं असूच शकत नाही! कदाचित ते खरं असेल! काय सांगा! 


* Euthanasia (इच्छामरण) चे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे स्वतः मागीतालेले मरण. हे बेल्जियम, नेदरलंड आणि लक्सेमबर्ग या देशांमध्ये आणि अमेरिकेच्या काही राज्यांमध्येच कायद्याने मान्य आहे याला assisted suicide असंही म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे, जेव्हा माणूस स्वतःचं मत व्यक्त करू शकत नसेल, तर त्याच्या नातेवाईक किंवा जवळच्या लोकांनी मागितलेले मरण. हे सर्व देशांमध्ये कायद्याने अमान्य आहे. अपवाद, नेदरलंडमधे केवळ नवजात शिशुसंदर्भात हे वापरले जाते, तेही खूप विशिष्ठ केसमध्ये! तिसरा प्रकार म्हणजे, जेव्हा माणूस आपलं मत व्यक्त करू शकत असतानासुद्धा, त्याला अंधारात ठेवून, किंवा धोक्याने मारणे. याला आपण हत्या म्हणतो. एकूणच इच्छामरण दोन प्रकारे करतात. एक म्हणजे, औषधोपचार बंद करून. आणि दुसरे म्हणजे ठराविक औषधं जादा प्रमाणात देऊन! इंटरनेटवर यासंदर्भात खूप NGOs नी आणि वैद्यकीय संस्थांनी दिलेली माहिती आढळते. यासंदर्भात कायदा सशक्त व्हावा म्हणून खूप प्रयत्नही सुरु आहेत. But I am sure they also have to go and convince so many totally unrelated, and uninterested people about this very important topic, before they actually reach the decision maker! It's so unfair!
Post a Comment