Thursday, February 13, 2014

टाळलेला मोह ...!

|| श्री Valentineराव प्रसन्न ||कॉलेज संपलं. पोरगी जवळपास पटलीच होती. सासराही खिशात होता. रांचोचा पूर्ण मामला सेट होता. पण ते सगळं सोडून पठ्ठ्या कितीतरी वर्षं अज्ञातवासात गेला! पुढे मग त्याला शेवटी पिया येऊन मिळते आणि उनकी नाक नही टकराती वगैरे बाकीचा तपशील सोडा. पण विचार करा या कॉलेज संपल्यापासून ते थेट ते परत भेटेपर्यंतचा भाग दाखवण्याचा मोह टाळणे किती कठीण काम आहे? तुम्ही केलाच नाही न विचार? कारण डायरेक्ट ते दोघे एकमेकांना मिळाले हेच पहिला तुम्ही! मला हा विचार आला. आणि धडकी भरली. मग राजू हिरानीचे आणखी आभार मानले मी. 3-idiots आणखी जास्ती आवडला! लौव ष्टोरीचा मोह टाळला आणि मग भले झाले असली उदाहरणं आपल्याला तशीही विशेष आवडतात! नाही पटत अजून? आता बघा काय काय होऊ शकलं असतं!

थोडा विचार करा!

सगळा मामला सेट असताना रांचो कॉलेज मधून गायब. पियाला पण पत्ता नाही. फरहान आणि राजू पण भांबावलेले. आता पिया आहे भरणार! मेरा प्यार खो गया वगैरे म्हणणार. मग कब तक कुवारी रहोगी म्हणून विरू सहस्रबुद्धे तिला मार्गी लावायची प्रयत्न सुरु करणार. तिकडे रांचोला ही परफेक्ट वेळ आहे हे कळणार! अशाच वेळी विकतची दुखणी आणि तत्वं घ्यायची असतात न! सगळं सुरळीत वगैरे करेल तर मजा काय! मग लगेच रांचो तत्वांशी प्रामाणिक होणार. मिया बीबी राजी वगैरे म्हणून हळूच पियाला संपर्क साधून सच सच सांगून, आपण प्यार पा लिया वगैरे ... आज्जीबात नाही करणार! झूठका सहारा लिया असं पिया म्हणेल म्हणून नाही. पिया म्हणालीही असती की झूठ वगैरे गेलं तेल लावत. तुला मी आवडते मला तू आवडतो. मग कशाला दंगा? पण मग वेळेचं महत्व कसं कळणार न? (मै समय हु. म्हणून लहानपणी आपल्या जनरेशनच्या मनावर वेळेचं महत्व बिंबवलय की नाही?) म्हणून तो तसलं काही आज्जीबात करणार नाही. तर तो पियाला आपल्या दिलमध्ये ठेवून, आपल्या आयुष्याच्या एकमेव ध्येयाकडे जाणार. सायन्स! आता मग त्याला दररोज प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये, प्रत्येक उपकरणामध्ये पिया दिसणार. एकटा नदीकाठी बसून सोनू निगम किंवा थेट आतिफ असलमला गाणी म्हणायला लावणार! त्याच्या सायन्स सेंटरला भेट द्यायला एखादे कपल आले की हा कपाळावर हात मारणार. कारण याला तो आणि पिया आठवणार. कोणी लग्नात आमंत्रण दिलं की याला पिया पहिल्यांदा भेटलेली ते आठवणार. अहाहा. या केवळ सुंदर आठवणी आहेत. याने मला काहीही फरक पडत नाही. हे तो स्वतःला समजावणार आणि प्रेक्षकांना रडवणार.

तिकडे पिया पण अस्ताव्यस्त. आता रांचो गेला. पण काहीतरी केलेच पाहिजे की. मग ती आधी मापात काढलेल्या जुन्या हिरोला पकडणार. तो चप्पल घड्याळांच्या किमती सांगणार. (विसरला? होता की तो एक ... मेरी घडी भी वोही समय दिखती है ... ज्याला म्हणालेला तो) तिला त्याच्या घड्याळ आणि चपलात रांचो दिसणार! पण ती तरीही स्वतःला समजावणार. की अरे हे असेच व्हायचे होते. रांचोची इच्छा हीच होती. नाहीतर थांबला असता न! मग ती स्वतःला या price tag वाल्या माणसाच्या प्रेमात पाडणार. त्यालाही आपल्या प्रेमात पडणार. रांचोच्या आठवणी तर केवळ अशाच! मंद वाऱ्याची झुळूक. गेलेला चांगला वेळ. एक स्वप्न. किंवा असच काहीतरी होतं. या अर्थच श्रेया घोशाल कडून गाणं म्हणवून घेणार.

आता अचानक सगळं सेट झालेलं असताना. मधेच रंचो उपटला तर मग तिच्या मनातली द्विधा दाखवणं हे किती बेष्ट! आहाहा! मग जरा गिल्ट वगैरे. आता तर मी इतके सारे घडवून आणले. आता मीच कशी माघारी फिरू? हा प्रश्न! सदा सुहागन राहो म्हणून तिच्या होणाऱ्या सासऱ्यांनी दिलेला आशीर्वाद तिच्या कानात घुमणार! तसा तिनं स्वतःला सुद्धा या price tag वाल्याच्या प्रेमात पडलयच की! आता आला पहिला हिरो म्हणून अशी कशी टाकेल याला? साजन मध्ये माधुरी नाही म्हणत? मला पण वोटिंगचा हक्क मिळाला पाहिजे! तुम्ही दोघेच का ठरवणार? तसं!

तुम्हाला काय वाटलं की एक फोन आला नी लगेच पिया गेली रांचोकडे? किती काय काय होऊ शकलं असतं!

झालंच तर आणखीही शक्यता आहेतच की. मैने "रांचो"को मनसे अपना पती मान लिया है असं म्हणून पिया काही वर्षं जावेद जाफरी बरोबर पण संसार थाटू शकेल. बघा, वाईट डील नाहीये. श्रीमंत आहे. छान ठिकाणी राहतो. बाप पण मेलाय त्याचा. किंवा वांगडू आडनाव आपल्यामध्ये कसं चालेल म्हणून विरू सहस्रबुद्धे नवीन प्रॉब्लेम तयार करू शकतील! किंवा खास वैचारिक लोकांसाठी, असंही होऊ शकेल. पिया आणि रंचो भेटले. मग ते चर्चा करतील. मुझे अब लौट जाना होगा. ये सही नही है. जमाना हमे जिने नाही देगा. हम अमुक अमुक को क्या मुह दिखायेंगे? असले प्रश्न पडूच शकतात की. तशी मी परवा एक फिल्म पहिली. त्यात एका बहिणीबरोबर लग्न होत असताना शेवटी हिरो म्हणतो अरे थांबा. नेम चुकला. मला त्या दुसरी बरोबर लग्न करायचंय. मग त्यांना असले अमुक अमुक को कैसा मुह दिखायेंगे वगैरे प्रश्न नाही पडत. सुरळीत होतं सगळं. पण असो. तो पण एक टाळलेला मोह असावा! 

विचार करा. काहीही होऊ शकलं असतं!
हे सगळं डोळ्यासमोर आलं आणि मग 3-idiots किती पटीमध्ये जास्ती आवडला काय सांगू? राजू हिरानीला धन्यवाद! किंवा त्या सगळ्यांनाच धन्यवाद! ऐसेहीच taken for granted नही लो!

या valentine's day ला अशा साऱ्या टाळलेल्या लौव ष्टोरीना सलाम! Let's thank them all for not existing and making our life beautiful! 

Happy Valentine's Day!

आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपल्या आणखी प्रेमी मित्र मैत्रीणीना शेअर करालच अशी अपेक्षा. कळावे. लोभ असावा.
(या शेअर करण्याच्या आणि करवण्याच्या सवयीबद्दल कधीतरी खास लिहायला आवडेल! ... पुढच्या वेळी!)
Post a Comment