Thursday, February 13, 2014

Happy Valentine's Day!

मी एक जाहिरात बघितली. कशाची होती आठवत नाही पण एक छान दृश्य होतं. त्यात एक छोटं कुत्र्याचं पिल्लू आणि एक घोडा मित्र असतात. त्यांचा मालक ते पिल्लू विकून टाकतो. तर सगळे घोडे मिळून त्याला घेऊन जाणारी गाडी अडवतात. आणि मग ते पिल्लू परत येतं. आणि मग धावत धावत जाऊन मालकाला प्रेमानं मिठी मारतं! 

हेच जर माणसाचं असतं तर असं जे झालं ते सगळं विसरून मिठी मारायला जमलं असतं?

न वापरल्यामुळे खूप प्रमाणात उरलेली, देवानं दिलेली, विचार करायची क्षमता वापरून, आपण गोष्टी सोप्या करतो की क्लिष्ट करतो हा संशोधनाचा विषय वाटतो मला. विसरून जाणं ही कला जर जमली तर आई शप्पथ, किती गोष्टी निकालात निघतील! आजसे बीस साल पेहले जो थप्पड लगायी थी, उसकी गुंज आज तक कशाला आठवायला हवी?

खूप ओसरती पहिली जाहिरात ती पण छान वाटलं बघून. ते प्रेम बघून.

लहान मुलांचं नसतं? तुम्ही काहीही म्हणालात, किंवा केलात तरी नंतर येऊन चिकटायची ती चिकटतात. समोरच्याचं आपल्यावर केवळ प्रेमच असू शकतं. यावर गाढ विश्वास असतो त्यांचा. ते पुरतं त्यांना. आता आपण सगळेच कधी न कधी तरी लहान होतोच की! आता कुठल्याशा त्या क्षणाला आपण हे सगळं टाकून दिलं देव जाणे? 

असं तर होत नाहीये, की आपण कोणा कोणावर का का प्रेम नाही करायचं, याचीच मोठी यादी करतोय? की एखादं जरी चांगलं कारण असलं तरी तेही पुरतं आपल्याला प्रेम करायला? अप्रिय गोष्टी विसरायला?

आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती आणि त्यांच्या कृती या सगळ्यांच्या केवळ चांगल्या आणि चांगल्याच गोष्टी मनात ठेवणं आणि बाकी सगळ्याला फाटा देणं असा असू शकेल यंदाचा Valentine's Day?

आजूबाजूच्या प्रत्येकावर प्रेम करण्याचं, आजूबाजूची प्रत्येक गोष्ट आवडण्याचं, एक तरी कारण शोधणं असा असू शकेल यंदाचा Valentine's Day?

गुलाबांच्या पाकळ्यांच्या पलीकडे, अंधुक मिणमिणत्या मेणबत्त्यांच्या पलीकडे, कागदावरच्या छापील भावनांच्या पलीकडे, केवळ दोन व्यक्तींमध्ये अडकून न पडलेलं प्रेम शोधणं, असा असू शकेल यंदाचा Valentine's Day?

No comments: