Sunday, September 28, 2014

एक गोष्ट त्याची आणि तिची

एक गोष्ट लिहित होतो. त्याची आणि तिची. पण दुर्लक्ष झालं त्यांच्याकडं! तमाम जगामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर भाष्य करण्याच्या माझ्या आगाऊ हावरटपणामुळे, त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. आज खूप दिवसांनी जुना कप्पा उघडला तर त्यां दोघांचे खूप सारे रिकामे संवाद सापडले. बरंच काही लिहायचं राहून गेलेलं. त्याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये घडण्यासारखं खूप काही रचून ठेवलेलं. आता सगळं साचून राहिल्यासारखं वाटतंय इतका काळ उलटला.

एकमेकासमोर कित्येकदा उभं केलेलं त्यांना. पण गोष्ट पुढं सरकवायचं राहून गेलेलं. मग कधी तिनं पाठ फिरवली असेल. कधी त्याला शब्द सापडले नसतील. "जाऊ दे! असंच होतं सगळ्यांचं", हे त्यांनीही शतदा ऐकून घेतलं असेल. तशा सगळ्यांच्या काही ना काही गोष्टी असतातच की अशा. धक्का लागेपर्यंत एकाच वळणावर रेंगाळणाऱ्या.

कदाचित आजही त्यांचं असंच काहीतरी सुरु असेल.
तो कोण्या ट्रेन स्टेशनवर उभा असेल.
ती खांद्याला पिशवी लटकवून शहराचे कानेकोपरे भटकत असेल.
त्याच्या कानात हेडफोन लटकवलेले असतील.
ती कुठे सूर गवसतो बघत असेल.
त्याच्या कानातल्या गाण्यांचा आवाज इतका मोठा केला असेल की त्याच्या बाजूने जाणाऱ्या प्रत्येकाला अस्पष्ट तरी ऐकू जातच असेल. पण आजूबाजूचं स्वतःपर्यंत काहीच पोहोचू नये याची त्यानं काळजी घेतली असेल.
ती कुठल्यातरी भिंतीच्या अडोशाला पोटाशी पाय घेऊन बसलेल्या अज्ञात माणसाशीही संवाद साधत असेल. लोकांच्या थेट मनाला भिडत असेल. पण तिच्या मनातलं कुठं बाहेर सांडणार नाही याचा मात्र तिनं जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला असेल.

तो आलेल्या ट्रेनमध्ये बसण्याची क्रिया एखाद्या यंत्राप्रमाणे करून मग काचेबाहेर बघण्यात गुंग होत असेल. काचेबाहेरच्या सर सर सर मागे जाणाऱ्या गोष्टींच्यात आणि कानात सुरु असलेल्या गाण्यांत एकच लय शोधायचा थोडासा फिल्मी प्रयत्न करत असेल. ज्याच्यात रमायला हवे होतो, ते वेगात मागे सोडतोय, असंही अधे मध्ये त्याला वाटत असेल, आणि मग तो मोठ्या लगबगीने परत स्वतःला आठवण करून देत असेल की त्याच्या आयुष्याला त्यानं कशी गती प्राप्त करून दिलीये. हे सगळं मनात सुरु असताना अंगावरच्या शर्टची इस्त्री आणि चेहऱ्यावरचा कुठलाही भाव हलणार नाही हे त्याला आता पक्कं जमत असेल.
फुटपाथवरून उठून आपल्या गाडीकडे जाताना आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीची ती नोंद घेत असेल. सिग्नलला थांबलेला बाईकवाला, गजरा विकणारी मुलगी, रस्ता क्रॉस करणारे आजोबा, हातवारे करत मोबाईलवर बोलणारा मुलगा. आणि या सगळ्यामधून तिच्या हाकेला प्रतिसाद देणारी तिची गाडी. "आजूबाजूला असलेल्या सजीव आणि निर्जीव गोष्टी या आपल्याच साठी खास रचून ठेवलेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधला तरच मजा नाहीतर मग आपणही निर्जीवच!" असं तिनं चारशे त्रेचाळीस लोकांना सांगितलं असेल. तरी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपल्या आजूबाजूला नसल्या तरी ते मनावर नाही घ्यायचं हे स्वतःला कितीवेळा सांगितलं याची गणती ती विसरली असेल.

काही गोष्टी का झाल्या आणि काही गोष्टी का होऊ शकल्या नाहीत, यांची उकल करत त्याला बसायचे नसेल.
काही गोष्टींची उकल होणं गरजेचं असेल तर ती आता आपोआप होईल आणि आपल्याला फक्त तोपर्यंत स्वतःला जगवत ठेवायचंय हे तिनं स्वतःला शिकवलं असेल.

आज त्यांच्या संवादातल्या रिकाम्या जागा भरायची इच्छा झाली. पण इतका काळ लोटला. इथून पुढं काय आणि कसं हा एक मोठा प्रश्नच आहे. तरीही लिहायला बसलो. पण मग बाजूला पाहावं तर महाराष्ट्रात युती तुटतीये, मोदींची कडक भाषणं सुरुयेत. आप दिल्लीमध्ये कसून काम करतंय, आपलं यान मंगळावर पोचतंय, आयफोनवर तुटून पडायची लाट आलीये. आणि अमुक अमुक घडतंय. तमुक तमूक बिघडतंय. आता या सगळ्यांवर काहीतरी पिंक टाकायची की इकडच्या रिकाम्या जागा भरायच्या हा ही एक वेगळा प्रश्न आहेच की.

... अधांतरी गोष्टींची व्यथा वेगळीच.
पण तशा सगळ्यांच्याच थोड्या फार गोष्टी अधांतरीच असतीलच की. नाही? मग आता माझ्याकडून एक गोष्ट अर्धवट राहिली तर मला गिल्ट फिलिंग कशाला?

खरं तर प्रत्येकाच्याच गोष्टीचा एक लेखक असेल. पण प्रत्येक लेखकाकडे एकच गोष्ट नसेल. मग लेखाकाच्याही काही आवडत्या आणि नावडत्या गोष्टी असतील. आपल्या गोष्टीचे आपण हिरो असतोच. आपण आपल्या लेखकाच्या आवडत्या गोष्टीचे हिरो की नावडत्या गोष्टीचे हिरो, हाच जरा तपशिलातला फरक असत असेल. बाकी सगळे सेमच की! नाही का?