Friday, September 20, 2013

प्रगतीच्या मार्गावर ... प्रेमाचा सुळसुळाट!

“मला love stories आवडत नाहीत! मला “I hate love stories” हा सिनेमाही आवडत नाही! हे प्रेमाचा भडिमार करणारे जे कोणी लोक आहेत न, ते सगळे खरे अतिरेकी आहेत! किती अरे त्रास द्यावा? त्याला काही प्रमाण? काही करा न करा, पण प्रेम कराच! बारा महिनेमे बारा प्रकारे करा. प्रेम केला नाहीत तर काहीच केला नाहीत! आयुष्यात काही करण्यासारखे असेल तर प्रेमच! प्रेम म्हणजे सर्वस्व. शेजारी पाजारी, कलीग, मित्र, मैत्रिणी, रस्त्यावर गर्दीमधले लोक, तो होर्न मारणारा काळा जाकेटवाला, सिग्नल तोडलेल्या बरोबर मांडवली करणारा पोलीस, किराणामाल वाला दुकानदार, करच्या दारावर टकटक करणारे भिकारी, हे सगळे तुम्ही नजरेआड झालात की प्रेमच करत असतात. मग तुम्हीच कसे काय करत नाही? प्रेमाचा विसर पडू देऊ नका. सगळीकडे प्रेमाच्याच आणाभाका घ्या.

आमच्याकडं प्रेम अमर असतं. प्रेम आंधळं असतं. प्रेम लुळं पांगळं पण असतं. कोण म्हणतो प्यार बिकाऊ नसतं? मी तर म्हणतो की प्रेमापेक्षा जास्ती बिकाऊ आणखी काहीच नसतं! प्रेमाच्या विक्रेत्यांचा सुळसुळाट तर पुण्यातल्या कुत्र्यांच्या सुळसुळाटापेक्षा जास्ती असतो! शाम्पू घ्या, तेल घ्या, साबण घ्या, टॉवेल घ्या, दात घासा, पाणी प्या, ज्यूस प्या, चिंगम चघळा, फिरायला जा, गाड्या घ्या, जेवायला जा, कपडे घाला, कपडे घालू नका, चड्ड्या घ्या, रुमाल घ्या, चोकलेट घ्या, बिस्कीट खा, पेन पेन्सिली घ्या, श्वास घ्या, मोबाईल घ्या, फोन करा, फोनची तोबा बिलं भरा, बल्ब घ्या, ट्यूब घ्या, घरं घ्या! आणि प्रेमात पडा. प्रेमात पडायचं असलं तर इतके सगळे अस्सल उपाय आहेत! का? का काय विचारता? का नसतंच विचारायचं. का विचारणारे शहाणे असतात आणि आपण तर हुशार आहोत! आपण कुठे शहाणे आहोत? हे सगळं करा म्हणजे कोणीतरी तुमच्या प्रेमात पडेल, किंवा तुम्ही कोणाच्यातरी प्रेमात पडाल! दिल दिल दिल करत पळत सुटा. “दिल” हरवा, मिळावा, सांभाळा, त्यावर छुरी चालवा, पागल बनवा, त्याची पुकार ऐका, त्याला शिव्या घाला, त्याचं ग्यान ऐका, ऐकू नका, दिल मध्ये कोणा कोणाला बसावा, तिथून हाकलून लावा, ते तोडा, फोडा, पायदळी तुडवा! Exchange offer देऊन त्याचा कुकर आणा! दिल मे दर्द घाला, कंदील घेऊन शोधात बसा. घंटा काही कळत नसेल, तरी दिलचा बोलबोला करत फिरा.

माणसानं नर आणि मादी याहून थोडासा वेगळा विचार केला पाहिजे. असे एकीकडे बोंबलायचं आणि दुसरीकडे मुलगी हुडका. मुलगा हुडका असा भडीमार करायचा! जनावरामध्ये आणि आपल्यामध्ये फरक एवढाच की त्यांना मार्केटिंगचा त्रास नसतो. बाकी हुंगत हुंगत फिरणं हे उपजत असतंच. नावाला आपण प्रगत.
"

एवढं बोलून हुशारला धाप लागते. तो खाली बसतो! हुशार काही प्रगत नाही हे पुराना लोकांना आधीच माहिती असतं. वर तांडव करत, चेहऱ्यावर एवढे भाव आणून तो काय बोलला ते पुराना लोकांना झेपलेलंही नसतं! पण तरीही सगळे दया येऊन टाळ्या वाजवतात! हुशारला शिकार का जमत नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत असतो. हुशारला आपण एवढं कसं बोललो याचं त्याला आश्चर्य वाटलेलं असतं. शाहरुख खानला 'वो सत्तर मिनिट ...' म्हणाल्यावर कसं वाटलं असेल, हे हुशारला कळलेलं असतं. आपल्याला शिकार येत नाही, हे लपवण्यासाठी आपण केवढा मोठा तमाशा केला, आणि त्यातलं काहीच या लोकांना कसं कळलं नाही, याचा हुशारला आनंदही होतो आणि दुःखही!


... थोड्या वेळा पूर्वी, 


हुशारला शिकार येत नाही हे बघून समस्त पुराना लोक चकित होतात. शिकार करत नाही आणि तरीही जिवंत आहे. हट्टा कट्टा आहे. त्यामुळे हा देव वगैरे आहे की काय असंही काही पुराना लोकांना वाटलेलं असतं. पण एकूणच हुशारची हुशारी आणि बोलणं ऐकून, तसं नसेल हेही त्यांना लगेच कळलेलं असतं.

हुशारच्या मित्रवर्गामध्ये “शिकार” या शब्दाचे विशेष अर्थ असतात. हुशार ला अजून कोणी शिकार सापडलेली नसते. पण इथं आपल्या अमुक अमुक मित्राची शिकार कशी आहे आणि त्याने काय काय केलेलं वगैरे सांगून हुशार फुशारकी मारणार असतो पण त्याला वेळीच पुराना लोकांना अभिप्रेत शिकार म्हणजे काय आहे हे कळून तो आपला उत्साहाची शिकार करतो! आणि फक्त मान हलवतो. सकाळी चुकून लवकर उठल्यावर हुशारला बाल्कनीमध्ये कबुतरं आणि क्वचित चिमणी दिसत असते. मग तो विस्कटलेले केस, टी शर्ट आणि चड्डीमध्ये, हातवारे करत त्यांच्या मागे पळत असतो. अशानं त्या पक्ष्यांची पण करमणूक होत असते. तेही म्हणून परत परत हुशारच्याच बाल्कनीमध्ये येऊन दररोज नित्य नियमाने मुक्तपणे घाण करत असतात. तेव्हा इथे पुराना लोकांकडून चुकून शिकार शिकलोच तर काय करायचं हे हुशारनं मनात पक्कं केलेलं असतं. आपल्याला शिकार अजून नाही मिळाली याचा राग खरी शिकार करून काढता येईल, असेही त्याला वाटून जाते. PS3 सोडला तर हुशार कुठेच शिकार सदृश काही करत नसतो.

थोड्या वेळाने हुशारला अभिप्रेत “शिकार” चा अर्थ पुराना लोकाना कळतो. आणि तीही शिकार हुशार कडे नाही हे कळून त्यांना खूप हसू येते. या सगळ्या आदिवासी लोकांवर आपल्याला आधीच इम्प्रेशन मारता येत नाही आणि आता तर यांनी जखमेवर बोट ठेवलं म्हणून हुशार पेटून उठतो. त्याच्यामधला activist जागा होतो!

“स्त्री आणि पुरुष. आणि मग एवढंच प्रेम? त्याच्या छटा असतात की! तुम्हाला काय कळणार म्हणा! तुम्हाला कुठं काय फरक पडतो!..." थोडा वेळ हुशारला काळातच नाही की पुढे काय बोलायचं. "पण खरं सांगू? तुमच्याहून आम्ही जास्ती काही वेगळे नाही या बाबतीत. म्हणजे तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे मान्य आहात. माहिती आहात. फरक एवढंच आहे की आम्हाला आम्ही अजून तुमच्यासारखेच आहोत हे मान्य नाहीये. माहिती नाहीये, असं म्हणणार नाही. इथं प्रेमाचं पिक येतं. एक गेला की दुसरा भेटतो. दुसरी गेली की तिसरी सापडते. हे सगळं ज्याला जमतो तो भाव खाऊन जातो. आम्हीही अशांनाच भाव देतो. कारण आम्हाला spicy आवडतं! वर आमच्यावर भडीमार होतो. एक ठराविक प्रकारे विचार करण्याचा. ठराविक गोष्टी आवडून घ्यायचा. ठराविक प्रकारे आयुष्य जगण्याचा!

मुळात मला love stories आवडत नाहीत! ...


थोडासा संदर्भ लागलाच तर ... प्रगतीच्या मार्गावर

Tuesday, September 10, 2013

Too busy to do good!

सकाळी सकाळी "पिंकी है पैसेवालोकी", "ताकी हो ताकी, हो ताकी ताकी ताकी रे" अशी आचरट गाणी कानावर पडली आणि दिवस सुरु झाला. मागच्या वर्षी "चिकनी चमेली", "पल्लू के पीछे छुपा के रख्खा है" या गाण्यांनी दिवस सुरु झाला होता. लोकांच्यातला सळसळता उत्साह तर काय सांगावा? त्यावर कलेची ही अशी आराधना. आणि आपली आराधना आजूबाजूच्या प्रत्येकाच्या कानापर्यंत पोचलीच पाहिजे, म्हणून प्रामाणिक धडपड. खूपच पवित्र वातावरण. सकाळी उठल्यापासून, ते आता पुढचे दाही दिवस अशाच भक्तीभावामध्ये न्हाऊन निघणार, या कल्पनेने मी तोंडावर पांघरूण घेऊन आणि आणखी एक तासभर झोपून घेतलो!

आपली सगळी तयारी चोख असल्याने, सकाळी सकाळी दुर्वा आणायला बाहेर जावे लागले. तिथे २ लहान मुलांची बडबड ऐकली. नुकतीच गोकुळाष्टमी झालेली. सोसायटीमध्ये लहान मुलानीपण काही बाही केलेलं. तर या दोघांची स्पर्धा सुरु होती. गोकुळाष्टमी vs गणेश चतुर्थी! त्यातल्या एकाचे स्पष्ट म्हणणे होतं की गणेश चतुर्थी म्हणजे सगळं वरवरचं असतं! गोकुळाष्टमीच जास्ती मजेशीर. असले सडेतोड मतं होऊ घातलेल्या भावी पिढी कडून ऐकून, मी उगाच आजू बाजूला घोटाळलो. "गोकुळाष्टमीला आपल्याकडे कोण आलेलं माहितीये न? आशिकी-२ मधली आरोही आलेली! माझ्या एका फ्रेंड कडे तर बिपाशा बसू आलेली! त्याच्या फ्रेंड कडे आलिया भट आलेली! मागच्या वर्षी तर सनी लिओन आलेली!" च्यायला यांना सनी लिओन कशी काय माहिती? असे विचार करून उगाच आश्चर्य वाटून घ्यायचा प्रयत्न केला. पण नाहीच झालं बुआ आश्चर्य! त्यांचे पुढे सुरूच होते, "गणेश चतुर्थीला काय? फक्त गाणीच असतात. येत कोणीच नाही! कसलं bore!" आता ही असली genuine चर्चा ऐकून मी उगाच मध्ये बोललो. "अरे, गोकुळाष्टमीला कृष्ण येतो आणि गणेश चतुर्थीला गणपती येतो! हे नाही का माहिती तुम्हाला?"

"वेडेच आहात काका. आई म्हणते. देव कायम आपल्या बरोबरच असतो!"

आधुनिकता आणि निरागसता याचा हा अनोखा मिलाप बघून मला पुढचं सुचेना. मी आपल्या दुर्वा घ्यायला निघून गेलो. नेहमीच आपल्या बरोबर असलेल्या देवाला वाहायला की खास आजच्या मुहूर्तावर भेटायला आलेल्या पिंकी किंवा चमेलीला वाहायला हे मात्र मला माहिती नव्हते.

पुढचे दहा दिवस आता गणपतीच्या मूर्तीसमोर चित्र विचित्र नाच बघायला मिळतील. जेवढी म्हणून अश्लील गाणी असतील, ती सगळी वाजतील. रस्त्यावर वाहतूक अडकून बसेल कारण गणपतीला बसायला जागा करून दिलेली असेल. ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस जाताना, हे सगळं सहन करत जावे लागेल. आणि असल्या कशाहीमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत. कारण धार्मिक भावना दुखवायचे मुद्दे वेगळेच असतात. किंबहुना, यापैकी कशाच्याही विरुद्ध बोलला, तर मात्र खूप लीकांच्या खूप काही भावना दुखावतील!

मला तर खात्री आहे गणपती दर वर्षी परत गेला की जाऊन, टिळकांना १० चाबूक मारत असेल. "ये तुने क्या कर दिया यार!" असे म्हणून!

पण हे सगळे आपलेच दात. आपलेच ओठ. आपणच वाढवलेल्या गोष्टी. आपणच दुर्लक्ष केलेल्या घटना. मग त्या आपणच सुधारावल्या पाहिजेत की.

माझ्या ओळखीचे एक आजोबा म्हणतात, "तुम्हा आजच्या पिढीला सगळ्यात काही न काही खुपत असतं! आणि मग आता तुम्ही याचा कीस पाडत बसणार. शेवटी फार फार तर मेणबत्त्या पेटवाल. त्या उपर काय कराल? एखादी गोष्टी चूक आहे म्हणून ओरडत फिरू नये. एखादी गोष्टी चूक आहे, तर बरोबर काय? ते शोधून काढावे. आणि त्याचा प्रचार करावा! हे थोडीच माहितीये तुम्हाला? चुका हुडकायच्या आणि फेसबुकवर टाकायच्या. या पलीकडे कुठे काय करता तुम्ही?"

थोडासा बदल आपणही करावाच की! जर काहीच बदल करणार नसू आपण, तर मग उगाच पुढच्या वर्षी लवकर या, असं कशाला म्हणायचं गणपतीला?

पण तो ही बिचारा येतो बापडा! पण कदाचित असं नसेल कशावरून की, गणपतीला अजून आशा असेल, काहीतरी बदल बघण्याची?

आता आपण त्याला किती काळ ताटकळवत ठेवायचं हे आपल्यावर अवलंबून. Perhaps, we all are too busy to do good things!

गणपती बाप्पा मोरया!