सकाळी उठलो आणि ही एकच बातमी सगळीकडे.
इंस्टाग्राम रिल्स, व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक, ट्विटर, आणि एवढंच काय तर, रेडीट आणि डिस्कॉर्ड वर सुद्धा एकच काय तो गोंधळ उडालेला. खग्रास सूर्यग्रहण लागलं की पक्षी कसे अंधाधुंद होतात, तो प्रकार माणसांचा झाला होता. कोणाला सुधरत नव्हतं की ही बातमी कशी पचवायची? कशासोबत पचवायची? निवडणुका तोंडावर आहेत, देश आत्ता कुठं कोरोना मधून बाहेर निघतोय, आणि आत्ता तर हिजाब सारखा हिट्ट विषय सुरू आहे, आणि ते सगळं बाजूला सोडून हे काय नवीन? अशी प्रतिक्रिया बऱ्याच लोकांच्या मनात आली. काहींनी प्रसार माध्यमांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय म्हणून टीका केली. २००१ ला नाही का, एकाच वेळी गदर आणि लगान रिलीज केलेला. लोकं म्हणाली, तसं केलंय हे. उगाच जमतंय म्हणून ज्यादाची काय शिप्पारस! जरा दम धरायचा न? काहींना वाटलं की प्रसार माध्यमांना नेटफ्लिक्सची स्पर्धा झेपत नाही आहे. म्हणून आता ही असली पिल्लं सोडतायत.
पण थोड्याच वेळात कळलं की, प्रसार माध्यमं सुद्धा तेवढीच गोंधळली आहेत. हा मास्टर स्ट्रोक खरोखरच पंतप्रधानांकडून आलेला... तोही रात्री आठ वाजताच्या ब्राह्म मुहूर्तावर... आणि तेही ट्विटर सारख्या जागृत देवस्थानी!
मित्रों... मी आता आज रात्री बारा पासून काँग्रेस मध्ये! काल मी लोकसभेत जे जे काँग्रेस विरोधी बोललो, त्याचा मला इतका पश्चाताप होतोय की आता मी स्वतःला काँग्रेसमध्ये झोकून देणार आहे.
मित्रों... मी आता आज रात्री बारा पासून काँग्रेस मध्ये! काल मी लोकसभेत जे जे काँग्रेस विरोधी बोललो, त्याचा मला इतका पश्चाताप होतोय की आता मी स्वतःला काँग्रेसमध्ये झोकून देणार आहे.
शहांचा तेव्हा सोशल मीडिया डिटॉक्स सुरु होता म्हणून त्यांना ही बातमी थेट सकाळीच समजली. एका रात्रीत एवढं होईल अशी त्यांनाही कल्पना नव्हती. आता पुलाखालून खूप पाणी गेलेलं होतं. "सठिया गया है बुड्ढा" असं म्हणालं तर UAPA लागेल, देशाचा अवमान होईल, की धर्मभ्रष्ठ होईल हे न कळल्याने भाजपाच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी आवरतं घेतलं. निवडणुकांत उमेदवार पळवतात ईथपत ठीक होतं. पण पंतप्रधानच पळवला? हे कसं काय? तेही शहा सहेबांच्याकडून!
प्रसंगावधान साधून, शहांनी आधी योगींना फोन लावला. म्हणाले, "तुम्ही तुमची निवडणूक सोडू नका. आम्ही पंतप्रधानपदाचं बघून घेतो". योगी म्हणाले, "त्यापेक्षा तुम्हीच व्हा मुख्यमंत्री. मी पंतप्रधानपदाचं बघून घेतो." कोणी योगींना पळवून नेईल का असं शहांचं झालं!
पलीकडे केजरीवालनी यशराज मुखाटेला आपल्या गेल्या दहा वर्षातील "ये सब मिले हुए है जी!" म्हणालेल्या वाक्यांचा मॅश-अप बनवायला सांगितला. यशराज मुखाटे "स्वीट आतंकवादी" घेऊन काही जमतंय का बघत होता. त्यालापण एका रात्रीत इतकं मटेरियल मिळायची अपेक्षा नव्हती.
डोळ्यात पाणी आणून मोदींना सहकार्य करा रे, असे व्हिडीओ बनवलेल्या लोकांना रायटर्स ब्लॉक आला. आय-टी सेल मध्ये दी ग्रेट रेसिग्नेशनची लाट पोचली. इकडच्या सेल मधले तिकडे आणि तिकडचे इकडे जाऊया असा विचार करायला लागले.
हसावं की रडावं, चिडावं की खुश व्हावं, कशाचं काही सुधरेना. डिबेट्स मध्ये कोणाला बोलवायचं, आणि कोणाला झाकायचं याच गणित सुटेना. स्टॅन्ड-अप करणाऱ्या लोकांना वाटलं आता आपलं दुकान बंद!! आता जोक कोणावर करणार? अर्धे लोक तर डिप्रेशन मध्ये गेले. वीर दास म्हणाला, मी तर सांगत होतो, there is a gigantic joke which is not funny. मुनावर ने आधीच सांगितलं, हा जोक मी केलेला नाही! एआयबी ला नवीन रोस्टची आयडिया आली म्हणून त्यांनी लगेच प्रोव्हिजनल बेल घेऊन टाकली. कुणाल कामारा ने सियाचीनमे जवान लढ रहे है, त्यांचं काय? म्हणून प्रश्न विचारला. त्याला इंसेन्सिटिव्ह म्हणून परत विमान कंपन्यांनी बॅन केला. "ऐसी तैसी डेमॉक्रसी" वाल्यांनी आपलं गाणं राष्ट्रगीत करा म्हणून आग्रह धरला. आमिर खान यावर कशावरच काही बोलला नाही, म्हणून त्याला अँटी-नॅशनल घोषित करण्यात आलं. जावेद अख्तरनी यावर काहीतरी प्रतिक्रिया दिली म्हणून त्यांना बॅन करण्यात आलं. अर्णब (व्हॉट्सॲप वर) म्हणाला, "स्क्रू दी नेशन, हाऊ कम आय डीडंट नो?" पतंजलीने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन प्रमाणित "मोदी-वापसी काढा" काढला. पण हा प्यायचा कोणी हे ठरेना. या बाबाच्या कुठल्याही बाबीशी आमचा संबंध नाही असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने परत जाहीर केलं. हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं वागणं कसं अँटी नॅशनल आहे हे सांगायला स्वास्थ्य मंत्री पुढं सरसावले. पण नंतर आपण आता मंत्री नाही याची त्यांना आठवण झाली. क्वांटम, मोलेक्यूलर, काॅस्मीक हे शब्दभांडार वापरून सद्गुरूंनी सुरू असलेल्या गोष्टीचं विश्लेषण करायचा प्रयत्न केला आणि शेवटी योगा से होगा यावर सांगता केली.
अमिश, रजत, अमन, सुधीर, राहुल, नाविका या सगळ्यांनी तातडीची बैठक बोलावली. हिंदू-मुस्लिम, पाकिस्तान का हाथ, एलियन्स, ड्रग्स, नेहरू, गांधी, वो सत्तर साल यातलं काही थीम बरोबर जातंय का बघितलं. आज संस्कृती, सिस्टीम, जिहाद, किंवा असे कोणते शब्द वापरायचे, बंब कुठल्या सोमेश्वरी न्यायचा याचे काहीच निर्देश न आल्याने, त्यांनाही दिशाहीन वाटत होतं. आज स्वतः स्वतः विचार करायचा म्हणजे जरा आऊट ऑफ सिलॅबस असल्यासारखं झालेलं. आपण स्क्रिप्ट रायटरना बोलवायचं का? असंही कोणीतरी मत मांडलं. पण मग स्क्रिप्ट रायटरना पैसे द्यावे लागतील आणि ते आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही, म्हणून त्यांनी सोडून दिलं.
मी पण डोळे घट्ट मिटून घेतले. आजच्या ईस रात को सुबह नकोच अशी मनोमन प्रार्थना करत आता पुढे काय होणारे बघायचा प्रयत्न केला. एव्हाना मलाही कळलेलं की आता कुठल्याही क्षणी मला जाग येणार आणि हे अर्धवट राहणार आहे सगळं! माझ्या स्वप्न टिकवण्याच्या प्रयत्नांत स्टोरीची लिंक तुटली. (स्वप्नं फास्ट फॉरवर्ड करून बघता यायला हवी होती नई?)
आता राहुल गांधी यांची शुद्ध हरपली याची बातमी सुरू होती. मोदीजी काँग्रेस मध्ये आले म्हणजे आपण जिंकलो की आपली रिटायरमेंट आली, याचा काही पत्ता लागेना. शशी थरूरांनी काहीतरी ट्विट केलं, लोकांनी डिक्शनऱ्या पालथ्या घातल्या पण शब्दांचा अर्थ लागेना. इथे "सठिया गया है बुड्ढा" असं म्हणायला कोणाची भीती नव्हती. म्हणून कोणी आपले २८० अक्षरं त्यावर खर्चावी असा विचारही केला नाही. फ्रीडम ऑफ स्पीच आहे बब्बा याची परत एकदा जाणीव करून दिली.
ललित मोदीनी आयपीएलच्या नव्या फॉरमॅटची कल्पना पुढे ठेवली. दर निवडणुकीला खुले आम पैसे देऊनच आपण नेते मंडळी विकत का घेऊ नयेत असा प्रस्ताव मांडला? काँग्रेस, बिजेपी, आप, सपा आणि काय जे कोणी असतील ते, त्यांनी आपापले अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला वगैरे आपापले स्पॉन्सर निवडायचे, प्रत्येकाने आपापल्या टीम बनवायच्या आणि बोली लावायची. प्रत्येक टीमचे चार लोक चार वर्ष फिक्स. बाकी लोक येऊन जाऊन! त्यानिमित्ताने पैशावर टॅक्स लावता येईल, आणि प्रत्येक नेत्याला आपली किंमत वाढवण्यासाठी सतत कामही करत राहावं लागेल. खऱ्या अर्थाने ब्लॅक मनी व्हाईट होईल. तेही डीमॉनेटायजेशन न करता. आणि शेवटी धोनी चेन्नई कडून खेळला काय आणि पुण्याकडून खेळला काय, शेवटी आहे धोनीच न? मग मोदी काँग्रेसकडे गेले म्हणून फरक पडतोच कुठे? या प्रकारामुळे केवढा ताण कमी होईल. आज एकाला शिव्या घातल्या तर उद्या प्रेमाने मिठी मारताना अवघडल्या सारखे होणार नाही. पण तेवढ्यात नरेंद्र मोदी, नीरव मोदी आणि ललित मोदी हे अमर अकबर अँथनी सारखे बिछडे हुई भाऊच असल्याचा फॉरवर्ड आला आणि आय-टी सेल परत कार्यरत होतोय यांची चाहूल सगळ्यांना लागली!
मोदीजींचा पहिला ट्वीट बघून ट्विटरने त्यांचं अकाउंट आपोआप काही काळ सस्पेंड केलेलं. ट्विटरच्या अल्गोरिदमला सुद्धा ते झेपलं नव्हतं. पण नंतर काही काळानंतर त्यांनी अकाउंट परत सुरु केलं आणि बाकीचे ट्विट आले. आता खरी मन की बात कळणार होती.
आणि झोप उडालीच हो.