संध्याकाळची फ्लाईट होती. ६:२० ला आम्सटरडॅम वरून उडणार आणि ६:२० ला च लंडन मध्ये पोहोचणार. असा प्लॅन होता. हे असं कसं काय यावर गप्पा मारता मारता आम्ही टाईम झोन बद्दल बोललो. कसा सूर्य पूर्वेकडच्या देशात आधी उगवतो याची उजळणी केली.
पण तेवढ्यात एक अजून खास प्रकार दिसला. सूर्य मावळायची वेळ झाली होती. आमचं विमान पश्चिमेच्या दिशेला उडत होतं. आता एका ठिकाणी स्थिर असतो तर सूर्य नक्कीच कधीच बुडाला असता. पण आम्ही तर वेगात पश्चिमेकडे झेपवलो होतो. आणि त्यामुळं सूर्य पश्चिमेला रेंगाळला. आकाश तांबूस लाल झालेलं, ते जवळ जवळ आख्खी फ्लाईट तसंच राहिलं.
हे असं सहसा भारतामध्ये कलकत्ता - मुंबई विमानात होत नाही. कारण, विषुववृत्ताजवळ पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग, विमानांच्या आकाशातल्या वेगपेक्षा खूपच जास्ती असतो. पण हे गणित आमस्टरडॅम किंवा लंडनच्या वरच्या भागामध्ये बदलतं. पृथ्वीचा वेग जवळ जवळ अर्धा झालेला असतो, आणि त्यामुळे विमानाचा वेग चुकून माकून त्याच्या जवळपास फिरकू शकतो.
आणि म्हणून, संध्याकाळच्या फ्लाईट मध्ये, आकाशात वर जाऊन स्थिर झाल्यावर आकाशाची जी परिस्थिती असते, ती रेंगळते, किंवा कदाचित, उलट होते, असंही भासू शकतं. मधल्या एका क्षणी आम्हाला वाटलंही की सूर्य पश्चिमेला बुडत नाहीये, तर कदाचित थोडासा वरच येतोय. तेवढीच काही मिनिटांची मजा.
मला आठवतंय, खूप खूप खूप वर्षापूर्वी, मला बाबांनी "आकाशाशी जडले नाते" हे जयंत नारळीकरांचं पुस्तक आणून दिलेलं. त्यामध्ये नारळीकरांनी असा एक अनुभव सांगितलेला. असा पूर्वेला सूर्यास्त आणि पश्चिमेला सूर्योदय ठळकपणे दिसण्यासाठी विमान एक ठरावीक अक्षवृत्ताच्या वर, सूर्यास्त किंवा सूर्योदयाच्या ठरावीक वेळ आधी, आकाशात ठरावीक उंचीवर असावं लागतं. युरोपातून अमेरिकेकडे जाणाऱ्या सकाळच्या विमानात कदाचित हा प्रकार दिसायला हरकत नाही.
आता काय.. विमानात तर आपण नेहमीच बसतो. फ्लाइट्स पण इतक्या घेतल्या, पण आता मैत्रेय सोबत प्रवास सुरू झाल्यामुळे, चार गोष्टी वेगळ्या आठवतात. चार गोष्टी वेगळ्या सुचतात. आपसूकच.
असो .. अशीच फावल्या वेळातली मजा. या सगळ्या प्रकारात फोटो काढायचं राहून गेलं. पण तरीही वेळ निघून गेल्यावर, जरा अॅंगल हुकल्यावर एक काढलेला फोटो इथे टाकतो आहे.
No comments:
Post a Comment