मध्यंतरीच्या काळात मी प्रवासातल्या गडबडी लिहायचं बंद केलेलं. प्रवासात गडबडी होत नव्हत्या असं नसलं तरी दर वेळी काहीतरी होतंच आहे हे बघून लोकं माझ्यावरच शंका घेऊ लागलेले. मग एकदा बोधी वृक्षाखाली बसलो आणि वाटलं की, लोक असंही बदनाम करतायत आणि तसंही बदनाम करणारेत, तर आपणच उपवास का करा? तर म्हणून एक ताजा ताज किस्सा. उपवास मोडायला.
जाने कितने दिनो के बाद, गली में आज चांद उगवावाच, म्हणून यंदा अमेरीकेला वारी काढली. अमेरीका आणि माझं नातं अगदी ठाकूर आणि गब्बर सारखं जुनं आणि गहिरं आहे. पण इतक्या काळात, मोहोल बदल गया, हालात बदल गए, जज्बात बदल गए, असं जरी असलं, तरीही अधिकार चले जाते है, पण आदतें कुठं जाणार? असंही आहेच.
नाताळच्या शुभ मुहूर्तावर ट्रम्प तात्यांच नाव घेऊन अमेरीकेच्या पायरीला हात लावूच असं ठरवलं. तिकीट काढलं. नियम बदललेत का पाहिलं. आणि इतक्या अगोदर सगळं सेट केलं म्हणून स्वतःवर खुश होऊन घेतलं. या नंतर थेट दुसऱ्या दिवशी निघायचं या अशा वेळी जागा झालो. मग बॅग भरली. ऑनलाइन चेक इन करायला गेलो. ऑफ कोर्स ते झालं नाहीच. एअरपोर्ट वर भेटा म्हणाले. पण हे कुठं नवीन आहे आपल्याला? पण तरीही परत नियम बघितले. आणि तेव्हा दिसलं की ESTA नावाचं प्रकरण आधीपासून करून ठेवायला लागतं. आणि यंदा ते मलाही लागू होतं!
आपण ऑनलाइन जाऊन आपलं नाव गाव फळ फुल द्यायचं आणि त्यांनी बरं म्हणायचं. ही अशी भानगड वाटली (उगाच). लंडनमध्ये म्युझियम बघायला फुकट असलं तरी "आम्ही येतोय बरं का", म्हणून शून्य पौंडाचं तिकीट काढावं लागतं. थोडाफार तसला प्रकार वाटला. ते काढलं नाही तर आतमध्ये घेत नाहीत. लवकरच समजलं की ESTA हा प्रकार भलताच वेगळा होता. आणि शून्य पौंडाचा तर नक्कीच नव्हता.
मी अर्ज भरायला सुरू केला. त्यांनी पहिल्याच पानावर सांगितलं की तुम्ही असाल कोणीही पण आम्ही उत्तर द्यायला ७२ तास सुद्धा लावू शकू. लंडनमध्ये शून्य पौंडाची तिकिटं लगेच येतात! असो. माझी फ्लाईट २० तासावर होती. म्हणजे आता ESTA नाही मिळालं तर नाताळ लंडनच्या म्युझियम मधेच.
ही आमची आदल्या दिवशीची, म्हणजे कालची सकाळ. एक तर चेक इन होईना, आणि दुसरं म्हणजे सुप्रभात म्हणून ७२ शिट्ट्या वाजलेल्या.
पण दुसऱ्यांचे आणि स्वतःचे केलेले शंभर धांदरटपणे निस्तरलेल्याचा अनुभव गाठीशी असला की तो इथे कमी येतो. acceptance आणि maturity याचा अनोखा संगम बघायला मिळतो. "आपण गाढवपणा केलाय" हे बिनशर्त मान्य करणे, हा acceptance! आणि शनिवार असला तरी आपलं काम होणार म्हणजे होणारच, यावर गाढ विश्वास ठेवून पॅनिक न होणे, ही maturity. जय हनुमान.
इंग्लंडमध्ये यायचं असेल तर फक्त एक अर्ज आणि सोबत थोडीशी कागदपत्रं द्यावी लागतात. अमेरीकेत यायचं असेल तर कागदपत्रं आणि त्याबरोबर मुलाखत पण द्यावी लागते! इंग्लंड मध्ये यायचं म्हणून केलेल्या अर्जाबरोबरचा, एखादा कागद मागे राहिला तर लोक परत ईमेल करून मागवून घेतात. अमेरीका मात्र लग्नातला फोटो काही ठीक नाही म्हणून रुसून व्हिसाच्या परीक्षेत नापास करू शकते. हे असं असताना, ESTA चा अर्ज सरळसोपा असायचं काहीच कारण नव्हतं. त्यांनीही जून पुराणे सगळे दाखले द्यायला लावून, दहावेळा कुबूल है, कुबूल है, कुबूल है, म्हणवून घेऊन, शेवटी "आता वाट बघा" असा इशारा केला.
वाटलं की, याचि साठी केला होता का ट्रम्प तात्यांच्या तसवीरीचा अभिषेक? पण त्याचं फळ मला मिळालं. नाष्टा संपे संपेपर्यंत ESTA वर शिक्कामोर्तब झालेला ईमेलआलं सुद्धा!
अहो होणारच होते ते.
आंधळ्याच्या गाई परमेश्वर नाही राखी, तर मग कोण राखी? ट्रम्प?
केवळ चेक इन राहिलेलं. ते तसंच ठेवून शनिवार मावळला. आज पहाटे, राहिलेलं चेक इन पण झालं. कदाचित टॉयलेटवर बसून केलं नव्हतं म्हणून आदल्या दिवशी झालं नसावं. काय माहिती? एक पल में परत एकदा हालात बदल गए, जज्बात बदल गए, मौसम बदल गया!
अब मुझे किसका इंतजारही नहीं है, असं म्हणत विमानतळावर पोचलो, बॅग घ्या आतमध्ये म्हणून दिली, तर बॅगचा टॅग छापला जाईना. हा कसला चिरकुट प्रॉब्लेम असं मी म्हणायच्या आत तिथल्या ताई म्हणाल्या, तुमच्या मुलाचा पासपोर्ट स्कॅन होत नाही आहे! म्हणून प्रॉब्लेम आहे.
मला तर भरून आलं. मुलगा अशा प्रकारे बापावर जाईल असं वाटलं नव्हतं.
मी म्हणालो, "अहो, पण बोर्डिंग पास मिळालाय की मला."
ताई, "मला पण सिस्टिम मधे दिसतंय. पण मला पासपोर्ट स्कॅन होत नाही आहे."
मी, "स्कॅनरच्या लेन्स वर फुंकर मारा. कधी कधी होतं त्यानं."
ताई, "नको सिनिअर ना बोलावते."
मग अजून एक जण आले. ते म्हणाले, "तुमच्या तिकिटात मुख्य प्रवासी म्हणून तुमचा मुलगा आहे. आणि तुम्ही सहप्रवासी आहात."
मला वाटलं माझ्या "स्कॅनर पुसा" वाल्या विनोदाला प्रत्युत्तर असावं हे. म्हणून मीही ख्या ख्या करून दाखवलं. म्हणालो, "होय. मोठा झालाय तो आता."
ते म्हणाले, "तो मायनर आहे. ते सहप्रवासी घेऊन जाऊ शकत नाही"
मी, "हॅ?"
ते, "तेच. असं कसं झालं ते बघतोय."
मी, "काय कसं झाले?"
ते "म्हणजे, तुम्ही बुकिंग करताना त्याला मुख्य प्रवासी म्हणून टाकलंय."
हीच ती "डोस्क्यावर पडल्यासा काय?" मोमेंट. साहजिकच आपण हे मनातच म्हणतो.
मी म्हणालो, "मला असलं काहीतरी करायला येतं?"
ते, "नाही आलं पाहिजे. आमच्याच सिस्टिम मध्ये घोळ असणार. असं नाहीच होऊ शकत."
मी, "तरीपण लेन्स पुसून बघा. काय माहित त्यानं सगळं होऊन जाईल." हे असं अगदी ओठावर आलेलं, म्हणायचं टाळलं.
आधीच्या ताई, नंतरचे सिनियर, यांनी आणि कोणाला तरी फोन केला. व्यथा आणि गाथा सांगितली. "असं कसं झालं? बघा की!" हे केलं. मग प्रिंटर खरारला. आणि माझा बोर्डिंग पास छापून बाहेर आला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर खुशी झळकली.
मी, "अहो पण बोर्डिंग पास होताच की माझ्याकडे आधीपासून."
ताई, "आता प्रिंटेड घ्या."
माझ्यासाठी अजून एक "डोस्क्यावर पडल्यासा काय?" मोमेंट. पण अर्थातच आपण ते नाही म्हणालो.
मी, "म्हणजे झालेलं काय एक्झॅक्टली?"
ते, "अहो सिस्टिम बॅग चेक इन करून देत नव्हती. कारण प्रवासी मायनर आहे. मग आम्हाला ते बायपास करून घ्यावं लागलं."
मी, "मायनर प्रवाशांनी बॅग नसते न्यायची?"
ते, "त्यानं सहप्रवासी नाही नेता येत."
मी, "असो. जाऊच देत. सकाळी सकाळी एवढं नाहीच झेपतंय. तुमची परवानगी असेल तर निघू काय?" हे अर्थातच नाही म्हणालो.
...
तर बघा. हे असं होत असतं. ही थांबलेलं नाहीच आहे.
तर आता आपण यंदाचा नाताळ ममदानीच्या परगण्यात काढणार आहे. असाल आजूबाजूला तर हाक मारा.
