Sunday, January 04, 2026

ट्रेनच्या फलाटावरचा एक तास

लोकं वय वाढलं की तिरसट होतात, असं ऐकलेलं. मला वाटतंय जसं माझं वय वाढतंय तसं मला जगच तिरसट होतंय असं वाटायलंय. 


आत्ताच्याच ट्रिपचा उदाहरण घ्या. मी ट्रेनने नुअर्क पेन स्टेशन वरून न्यू-ब्रुन्सविक स्टेशनला जाणार होतो. आता याठिकाणी मला आधी असं नमूद करावं असं वाटतंय की अमेरीकेबाहेरुन आलेल्या पब्लिकने "नुअर्क" हे बरोबर म्हणून दाखवलं की तिथंच अमेरीकनांनी पुढचं सगळं मनातलं ओळखलं पाहिजे. नाहीतर काय उपयोग तुमच्या ऐआय माळून घ्यायचा? 


नुअर्कच्या "नु" चं "न्यू" होत नाही न? "नुअर्क" चं "नेवार्क" होत नाहीये न? आपल्याला आधी "नुअर्क" आणि "न्यूयॉर्क" हे करवीर आणि कोल्हापूर टाइप एकच वाटलेलं, हे समोरच्याला कळत नाहीये न? हे सगळे न्यून ओलांडून आपण नुअर्क यशस्वीपणे म्हणालो, आणि मग त्या गडबडीत बाकी समजा आजूबाजूच्या शब्दांची खांडोळी झाली असेल, तर ती समोरच्याने दुरुस्त करून समजून नाही घेतली, तर त्याला असहिष्णू नाही तर काय म्हणायचं?



आमच्या लंडन मध्ये येऊन लोकं, "ग्रीनीच" ला निवांत "ग्रीनवीच" म्हणून इंग्रज माणसाशी संपूर्ण संवाद साधू शकतात. संवाद संपेपर्यंत आपल्याला भेजा-फ्रायचा भारत भूषण बनवलाय हे अजिबात समजू देत नाहीत. पण अमेरीकेत मात्र हे दिसलं नाही. मी म्हणालो, "मला नुअर्क पेन स्टेशन वरून न्यू-ब्रुन्सविक स्टेशनला जायचंय", आणि वर शंका नको स्पेलिंगसाठी माझं तिकीट सुद्धा दाखवलं. तर तिथल्या काकी म्हणाल्या, "डार्लिंग, आम्ही काय जनता गाडी चालवत नाही!"



तिच्या "डार्लिंग" च्या sarcasm मध्येच मला कळलं पाहिजे होतं की बाईंचे पूर्वज इंग्रजांच्या सानिध्यातच घडले वाढले असावेत. शहाण्या माणसाने इथेच हुज्जत घालायची थांबवायला हवी. पण मी तिच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून, तिने दुर्लक्षिलेल्या माझ्या नुअर्क-कलेचं परत प्रात्यक्षिक करून दाखवलं. "माझ्या या तिकिटावर नुअर्क ला जाता येणार न?" 



पण मग काकी जरा अगदीच थेट बोलल्या. "का सोचे थे? गब्बर साबासी देगा?" का तर "नुअर्क" म्हणाला म्हणून? असं थोडीच होत असतं. बाईंनी समोरच्या वेगळ्या काउंटर कडे बोट करून दाखवलं आणि म्हणाल्या, "एनजे ट्रान्झिट ना विचारा. ऍमट्रॅक ने जायचं तर शंभर डॉलर लागतात!" यामध्ये शंभर वर जोर होता. आणि ऐन जे ट्रान्झिट कडे कनिष्ठ भावना. तर ही ती जनता गाडी! आणि माझं तिकीट साहजिकच ऐन-जे ट्रान्झिटचं होतं.


हा भेदभाव! ही वागणूक! मला वाटलं याच गोऱ्या लोकांनी आपल्या गांधीजीना ट्रेन मधून धक्का मारला असावा. आज आपल्या मुलासमोर क्रांति करूनच दाखवू असं मनाशी ठरवून मी बाह्या सरसावल्या. आणि म्हणालो, "हे बघा डार्लिंग बाई, दोनही ट्रेन केवळ एक मिनिटाच्या अंतरावर एकाच ट्रॅक वर येतायत. राइट? एकाच दिशेने जातायत. राइट? आणि न्यू ब्रुन्सविकला थांबणार पण आहेत. राइट?" या सगळ्या राइट च्या गर्दीमद्धे माझं मलाच कळेना की आपण यामध्ये कुठला राइट युक्तिवाद करणार होतो! मनात गांधीजी असले, तरी शर्टच्या आतमध्ये मीच होतो.  



अर्ध्या वाक्यात तलवार म्यान करून, डार्लिंगला मेरी क्रिसमस म्हणून मी माझं भाषण आटोपतं घेतलं. स्वतःचं स्वतःला क्लोजर देऊ करावं म्हणून पोराला म्हणालो, "जरा उद्धटच होती नई रे बाई?" पण आजच्या पिढी कडून कायच अपेक्षा करायची? त्यावर चिरंजीव पडले पक्के इंग्रज आणि इंग्रज लोकाना कोणीतरी उद्धट वाटण्यासाठी एखाद्याने किती उद्धट असेल हवं? माझ्या पोराला ती उद्धट नाहीच वाटली म्हणे! तो म्हणाला, "माईक वर बोलत होती म्हणून तुला वाटलं असेल." आपलेच दात. आपलेच ओठ. अब क्या ही बोले!