Tuesday, November 02, 2010

Blind Date (Contd)

(पुर्वार्ध: Blind Date)

ब... प्पी... दा...!  ब... प्पी... दा...!  ब... प्पी... दा...!  ब... प्पी... दा...!  म्युजिक थांबलेलं तरी आता या अवाजानं जमिन हादरत होती. बप्पीदांबद्दल मला काही आकस नाहीये पण खरं सांगावं तर असं वाटलं, काय यार? बप्पीदांसाठी काय ईतका दंगा करायचा? पण पक्का मुरलेला डिस्कवाला समोरे तुषार कपूर आला तरी त्याला तु... षा... र! तु... षा... र! असे चित्कार टाकेल. म्हणजे माझं तुषार कपूरशीही वाकडं नाहीये. पण असो. डिस्कमधे येऊन खुश असल्याचा आविष्कार (किंवा साक्षात्कार) करण्यासारखी हीपण एक रिच्युअल असावी. किंवा जसा प्रचंड टॉलरन्स हा एक युएसपी आहे डिस्कचा, तसाच लोकांना बीनशर्त प्रेम करणं हाही दुसरा युएसपी असावा. मग तो तुषार असो किंवा बप्पीदा. जो मेन गेस्ट असेल त्याच्या तालावर मुकाट्यानं सगळे खुश होऊन नाचतात. किती विन-विन सिच्युएशन ना? असं आणि कुठं होतं यार? लोक ईतके गुण्यागोविंदानं नांदताना आणखी कुठे दिसतील? बप्पीदांची एंट्री जबरदस्त झाली. लोकांचा आवाज, ड्रमरने तेव्हाच धडाधड काहीतरी वाजवलं. बप्पीदांचा हात वर होताच, ठाकरेंसारखा. गळ्यात चेन्स. काळा पोषाख. आधीच पुरेसा लाईट नसतो डिस्क मधे. त्यात एवढासा देह. काळा काय म्हणून घातला असेल पोषाख? पण चालायचच, त्यावर चेन होत्या भरपूर. एकदम लखलख चंदेरी केलेलं बप्पीदाना. काहीतरी २-४ वाक्यं म्हणली यार त्यानी! पण आठवत नाही आजिबात. लोकानी टाळ्या मारल्या जब्राट.

हे सगळं सुरू असताना, आख्खी जनता वर बघत होती आणि एकच गरीब, गरजू, होतकरू तरूण आणि त्याच्याबरोबर आलेली फटाकडी खाली बघत होते. मी आणि सॅली होतो ते.
"Damn! Sally, I lost it!! s#it! I guess I dropped it. I knew it man! I just knew it. Who gets the phone no dance floor yar!?"
सॅलीला सहानुभूती होती की डिस्कची मजा खराब केल्याचा राग, हे काही समजून घेण्याच्या मनस्थीतीत मी आजिबातच नव्हतो. मी तिच्याकडं बघतही नव्हतो. अशक्य गोष्ट! असं कसं काय करू शकतो मी? एकदम सुरूवातीपासूनच्या सगळ्याच गोष्टी चुक वाटू लागल्या. फ्रेंड सिटींग?? असं कधी असतं का? साल्या माझ्या मित्राची फ्रेंड एकटी म्हणून तिला मी एंटरटेन करायचं? मला समजतात तरी काय लोक? आणि मी ही हिच्याबरोबर नाईट आऊटला कसा काय लगेच जाऊ शकतो? जगात असलेल्या अब्जावधी पर्यांयांपैकी कोणता पर्याय निवडला तर म्हणे डिस्क!?? का? का? डिस्क का? गरज काय होती? कधी नाचून माहीत नाही पण आम्हाला गोरी पोरगी घेऊन नाचायचय! साला निजामाची औलाद असल्यासारखं एका खिशात वॉलेट आणि दुसरीकडं फोन घेऊन नाचायची हौस. Impossible! I am just freaking impossible fellow!! वॉलेट आठवल्यावर क्षणभर आणखी पोटात बुडबुडा आला, पण वॉलेट होतं जाग्यावरच. ते अजुन हरवलं नव्हतं. सध्या फक्त फोन डिजास्टरच सुरु होतं. सॅलीपण बिचारी त्या गर्दीमधे खाली मुंडी फोन धुंडी करत होती. बप्पीदांचं बोलणं संपूच नये अशी मनोमन प्रार्थना करत मी माझा शोध सुरू ठेवला. कारण नंतर लोक परत नाचायला लागले तर मला हार्ट अ‍ॅटॅक येणार हे नक्की होतं. काहीही सुचत नव्हतं. एकदम शुन्य. There was no possible explanation I had for the situation! कोणावर साला ब्लेमपण टाकता येत नव्हता यार. फोन कधी पडला असेल? म्हणजे बप्पीदा येणार असं सांगीतल्यावर जेव्हा म्युजिक थांबलं, तेव्हा मला कळलं की फोन नाहीये खिशात. याचा अर्थ नाच सुरू असतानाच पडलाय फोन. आई शप्पथ सांगतो, छातीतून कळ येणं बाकी होतं. खास वाट बघून मुद्दमहून पांढराशुभ्र आयफोन घेतलेला. कायच्या काय जपून वापरलेला. एवढा महागाचा फोन घेण्याचं सत्कार्य करताना हजारदा विचार केलेला. आणि आता सगळं कोणाच्यातरी पायदळी तुडवलं गेलं असणार होतं. फोनवर एक स्क्रॅच आला तर दु:ख, पुढचे सगळे माफ, असलं गणित मी कित्येकाना सांगितलेलं. आता मला सगळे स्क्रॅच एकत्र मिळणार होते. वेळ जसा जसा वाढला तसे मला एकसंध फोन मिळण्याची आशा कमी होत होती.

सॅलीनं तेवढ्यात बोलावलं.
"Hey ... he saw your phone! I guess"
हे अशक्य आहे. मगाशी हिच्या कमरेत हात टाकून नाचताना ही पोरगी मदतीलापण येईल असं खरं सांगतो आजिबात वाटलं नव्हतं. एक शामका साथ, करा ऐश, कल हम कहा तुम कहा. असला प्रकार सुरू होता. पण कोणताही अशेचा किरण तेव्हा पुरेसा होता.

"Who? Did you find any phone? White one ... iPhone ..." पुढे 3GS, IOS4 हेही सांगायची फार ईच्छा होती
"White one. Yes. I did. It was on the floor"
बप्पीदांचे शब्द तिकडं संपले. म्युजिक परत सुरू. बप्पीदांचं गाणं सुरू. लोकांचा नाच सुरू. जमिनीचं हादरणं सुरू!!
माझा फोन जमिनीवर सापडला?? म्हणजे जमिनीवर होता तो! किती वेळ कोणास ठाऊक? तो सापडला याला? खाली बघून कोण कशाला नाचेल? म्हणजे पायच दिला असेल!! स्क्रीनवर दिला असेल का? नाही! नकोच. स्क्रीन कशी होती हे विचारायचं धाडसच नाही झालं. मी मख्खासारखा बघत होतो त्याच्याकडं. सॅलीनं विचारलं पुढं. "Where is it now?" स्वाभावीक प्रश्न होता हा. पण मला नाही सुचला. सॅलीला सुचला. त्या बाबाने स्टेजवर दिला म्हणे बप्पीदा यायच्या आधी. अशक्य योगायोग होता तो.

मी स्टेजकडं धाव घेतली. सिक्युरीटीनं आडवलं. स्टेजवरतर आणखी जोरात आवाज होता. त्याला सांगायचा प्रयत्न केला की माझा फोन स्टेजवर कोणाकडंतरी दिलाय. त्याला कळेना. आवाजामुळं तसंही घसा दुखेपर्यंत ओरडून बोलायला लागत होतं. विलन सारखं त्यानं मला फारसं काही न ऐकून घेता हाकललं. स्टेजवर जोवर बप्पीदा आहेत तोवर बाकी कोणाला एंट्री नाही! हाताशासारखं मी स्टेजच्या बाजूला ऊभा होतो. बप्पीदांचा डायहार्ड फॅनसारखा आधाशासारखं त्यांच्या गाण्याकडं बघत. माझ्यामागं एक गोड गोरी मेम असूनही! फोन आत्ता कोणाच्या पायात नाही हे ही कुठं थोडं होतं! पण काय? असंख्य शिव्या देऊन झालेल्या माझ्या मलाच! सॅलीनं मधेच मागे ओढलं. म्हणाली, "I want to use the restroom!" मनात म्हणालो, मग कर ना युज! मला काय सांगते? ईथ मी माझा फोन शोधायचं सोडून रेस्टरूम शोधू काय? पण हे डिस्कमधे नॉर्मलच. ढसाढसा प्यायची, आणि मग रेस्टरूमला पळायचं. तसंही बप्पीदा दमल्याशिवाय फोन मिळणार नव्हता. गेलो मॅडमबरोबर रेस्टरूम शोधायला. छताकडं बघत, भींतीवर रेलून बाहेर वाट बघत ऊभा राहीलो. मॅडम घुसल्या आत. किती मुर्खपणा केलाय आपण याचं गणित वर छतावर मांडायचा प्रयत्न करत होतो. म्युजिकपासून लांब आल्यामुळं आता तुलनेनं जरा शांत वाटत होतं. एवढ्यात एक सीक्युरीटी गार्ड दिसला. त्याला शांतपणे माझी दर्दभरी कहाणी सांगीतली. कमीत कमी मी काय म्हणतोय हे त्याला कळालं तरी होतं. निर्दयीपणानं मला स्टेजवरून हाकलणारा पहिल्या गार्डसारखा हा नव्हता. म्हणाला मदत करेल. त्यानं विचरलं, "Your girlfriend is inside?" आता या प्रश्नाचं ऊत्तर आपण जे काही पाहतो सिनेमामधे ते साफ चुक आहे. आजिबात एनर्जी नव्हती स्पष्टीकरण देण्याची आणि मुख्य म्हणजे गरजही नव्हती. कुठं त्याला शब्दबंबाळ करू सांगून की, 'नाही बाबा, ती फ्रेंड आहे जी गर्ल आहे?' किती बकवास? गौतम बुद्धाना जसा बोधी वृक्षाखाली साक्षात्कार झाल्यावर आनंद झाला चक्क तसं वाटलं मला तिथं! हे सगळं स्पष्टीकरण देण्याचं प्रकरण थोतांड आहे. मी दाबात काहीही आढेवेढे न घेता म्हणालो, "Yes, She is inside." आहाहा. काय ते सुख. ज्ञान प्राप्तीचे. पण गार्डनं पुढच्याच वक्यात विकेट काढली. "She is taking lot of time". आता यावर काय उत्तर देतात कोणाला ठाऊक? आता माझी गर्लफ्रेंड आहे म्हणजे ही किती सेकंदात रेस्टरूममधून बाहेर येते याचं गणित मी ठेवावं की काय? की 'तुला काय घाई आहे बाबा?' असं विचारावं गार्डला? शेवटी शरण येऊन, अरे ही आत्ता पाच सेकंदापुर्वी या प्रश्नाबरोबरच माझी गर्लफ्रेंड झालीये तेव्हा मला माहित नाही की का वेळ लावतेय, असं सांगावसं वाटलं. खरं तर मुलीना लागतो कशाला ईतका वेळ यार? आता लेका तुझी गर्ल फ्रेंङ असती तर तुला मी विचारलं असतं काय? पण असो, ईतक्यात सॅली आलीच बाहेर. हसली गोड आमच्याकडं बघून. सगळे प्रश्न, शंका चुपचाप आपल्याआप जाहिरातीतल्या मुह के किटाणूंसारख्या अचानक गायब झाल्या. आमची गाडी परत आत गेली. बप्पीदांचा निरोप घेणं सुरू होतं. माझ्या दिल की धडकने वाढलेली. लोक ओरडत होते परत ... ब... प्पी... दा!!! ब... प्पी... दा!!! ब... प्पी... दा!!! मला भेटलेला गूड मॅन गार्ड मगासच्या विलन गार्डशी आता बोलायला गेला. माझ्याकडे मधे मधे हात वगैरे करून काहीतरी सुरू झालं त्यांचं. मीही केविलवाणा चेहरा घेऊन ऊभा होतो. पण बाजूला सॅली होती. माझा केविलवाणा चेहरा आणि फटाकडी सॅली, यामधे साहजिकच सॅली जिंकत होती. पण काही का असेना. कोणाकडंका बघून होईना, फोन मिळाल्याशी कारण. विलन गार्डच्या चेहऱ्यावरची माशीही हालत नव्हती, लेकाचा मख्खासारखा ऐकत होता. मग कुठेतरी गेला आत मधे. मी परत वर चढलो स्टेजवर आणि गूड मॅन गार्डला विचारलं की बाबा काय झालं? तो काही बोलेल तोपर्यंत मगासचा विलन गार्ड क्लायमॅक्सला एकदम चांगल्या माणसासारखा हातात फोन घेऊन आला. खुशिनं पागल होणं काय असतं त्याची अनुभूती मिळाली मला पुढच्या काही क्षणात. स्क्रीनवर काहीही नव्हतं!! एकदम स्वच्छ. जसं काही झालंच नाही. एक रेघोटी होती हलकीशी पण तीही स्क्रीन प्रोटेक्टरवरच. मला विश्वासच बसत नव्हता. खुशीची परीसीमा! दुधात साखर म्हणजे समोर तमाम जनता खुशित बेभान झाल्यासारखी नाचत होती. जणू काही माझ्याच साठी. सुखद अनुभव होता तो! खरं सांगू तर हे ही वाईट नाही ना? कोणीतरी खुश आहे म्हणून आपण नाचावं. जसं काही आपणच खुश आहोत. खुश व्हायला कशाला काय कारण लागावं? कारण नसताना डिस्कमधे येऊन नाचलं तर बिघडलं कुठं? जगाच्या पाठीवर माझ्यासारख्या कोणा वेड्या माणसाला त्याची जवळ जवळ गमावलेली गोष्ट मिळाली म्हणून तमाम जनता नाचली तर काय वाईट? आता जनतेला आनंदाचा तपशील माहीती असावा असं थोडीच आहे? डिस्क ही एकदम मंदिर वगैरे सारखी गोष्टी वाटली क्षणभर. मी स्टेजवरून खाली ऊतरलो.


पण रुको ... पिक्चर अभीभी बाकी था मेरे दोस्त! एक शेवटची हिकअप अजुनही बाकी होती!

 ============================================================  
मी फोन वापरून पाहिला. सगळं सुरू होतं.  रात्रीचे २ वाजून गेलेले. सॅलीला आता ड्रिंक हवं होतं. परत डान्स फ्लोरवर जायची माझी ईच्छा नव्हती. फोन घेऊन तर नक्कीच नाही. आम्ही बारकडं रस्ता वळवला पण थोड्या वेळात संपलंच सगळं. म्युजिक थांबलं. लोकही पांगायला लागले. आम्हीही बाहेर पडलो. रात्रीचे ३ वाजत आले होतो. माझा हात सॅलीपेक्षा माझ्या खिशाकडंच जास्ती होता. फोन सही सलामत परत मिळाला या धक्क्यातून मी अजुन बाहेर आलो नव्हतो. घरी परतताना, फोन खिशातून घसरून कारच्या सीटखाली घसरला तेव्हा मी गाडी चालवत असताना कसरत करून तो परत खिशात ठेवला. अब एक पलभी दुर रहा जाये ना, असं. आम्ही घरी आलो. गादीवर पडल्या पडल्या झोपलो. म्हणजे, आपआपल्या गाद्यांवर पडल्या पडल्या झोपलो. अंगात आजिबात एनर्जी नव्हती. फ्रेंड सिटींगचा प्लान जवळ जवळ अंगावर येता येता राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा मित्र परत येणार होता आणि माझं हे फ्रेंड सिटींगचं प्रकरण संपणार होतं.

सकाळ झाली. मित्र काही आला नव्हता, पण सॅलीनं काहीतरी बनवलेलं. फटाक गोऱ्यापान मुलीनं सकाळी ब्रेकफास्ट बनवलाय म्हणून ऊठवणं यापेक्षा सुंदर ते आणखी काय. मुकाट्यानं उठून लगेच तयार झालो. काही तासांपुर्वीची माझी हालत आणि आत्ताची यात जमिन आसमानाचा फरक होता. फोन बघण्यासाठी नजर फिरवली, पांघरूणाच्या पसाऱ्यात काही दिसेना. समोर असा ब्रेकफास्ट तोही सॅलीनं बनवलेला. ते सोडून पांघरूण कोण आवरेल? पण परत फोन आठवला आणि मनाशी म्हणालो, ते काही नाही! आधी लगीन फोनचं. आत्ता जेव्हा विचार करतो, तेव्हा वाटतं सगळ्या ईलेक्ट्रॉनीक्स गॅजेट्सनी आयुष्य बरबाद केलय. मी सॅलीच्या ब्रेकफास्टसोडून आयफोनसाठी पझेसीव होतो! असो. ऊठलो. झरझर आवरलं सगळं. सॅलीनं एव्हाना आशा सोडून स्वतः खायला सुरू केलेलं. मी परत भेळसटलेलो. मला परत फोन सापडत नव्हता! आता हे म्हणजे अतिरेकी होतं. शक्यच नाही. पण माहित होतं गाडीमधे असेल. सॅलीचा ब्रेकफास्ट तसाच ठेवून मी पार्कींगकडे पळालो. आपला कर्वे रोडची जितकी रुंदी तितकाच रस्ता मधे होता पर्किंग आणि अपर्टमेंटमधे. कारमधे सगळीकडं पाहीलं, फोन कुठंच नव्हता! आता ऊगाचच अनईझी होत होतं. वर येऊन सॅलीच्या फोनवरून कॉल देऊन पाहिला. फोनवर रिंग तर वाजत होती. पण आख्ख्या अपार्टमेंटमधून कुठूनही आवाज येत नव्हता. परत गाडीमधे जाऊन पाहिलं. परत फोनवर रिंग वाजत होती, पण गाडीतूनही कुठूनही आवाज येत नव्हता! सॅली माझ्याकडं "What a loser?" अशा नजरेनं बघतीये असं मला उगाचच वाटलं. पण बिचारी शोधायला मदत करत होती! आता हे मात्र नक्की होतं की मी डिस्कमधे फोन नक्कीच पडला नव्हता. मला मधे गाडीमधे सीटखालून फोन काढतानाची कसरत आठवत होती. आता गाडी पार्कींगमधे लावून ते अपार्टमेंटपर्यंत येईपर्यंत काय होऊ शकेल? यावेळी मी नाचतपण नव्हतो. मला फायनल डेस्टीनेशन मुवी आठवला. म्हणजे काल कदाचीत चुकून सापडलेला फोन! त्याला जायचच होतं. आता गेला बापडा. विचार तर हाच होता. पण मन मानायला आजिबात तयार नव्हतं

मी परत परत कॉल करत होतो. कधी खाली जाऊन कार मधे तर कधी परत घरामधे शोधत होतो. अचानक रिंग बंद झाली! कट. वाजता वाजता कट!? पुढे वाजेचना. डायरेक्ट वॉईसमेल मधे! आई शप्पथ!? म्हणजे फोन चोरला कोणीतरी? आणि आता बंद केला! नाही. हे म्हणजे शक्यच नाही. पण कधी करेल हे कोणी? पार्कींगमधून घरापर्यंत येताना पाखरू नव्हतं रस्त्यावर. १० सेकंद लागले असतील फार फार तर. तेवढ्यात? कसं यार? काहीच अर्थ लागेना. वेडा झालेलो जवळ जवळ. त्यावर अशक्य गोष्ट कुठली असेल तर, १२ तासामधे आयफोन हरवल्याची दुसरी वेळ आणि मला मधेच आपण फेसबूकवर काय स्टेटस टाकणार याचा विचार आला! खरं सांगतो असाच विचार आला! किती कृर! पण आपलेच दात आपलेच ओठ! काहीतरी खरच बेसिकमधे गंडलंय माझ्या! फेसबूक?? काहीही काय

"How to track lost iPhone" यावर लगेच गूगल करायचं ठरवलं. मशिन ऊघडलं तसं नवं ईमेल आलं. यश कडून. "Your phone is with Navin. Please call me once you get it." आता मात्र मी बेशुद्ध पडायच्या मार्गावर होतो. यश? नविन? यांचा संबंध काय? दोघेही माझे कलीग. नविन तर त्याच अपार्टमेंट कॉंप्लेक्समधे रहायचा पण पार दुसऱ्या टोकाच्या ईमारतीत. म्हणजे मी रस्त्यात पाडलेला फोन नविनला मिळाला? आणि त्याने यशला फोन केला? काहीच गणित लागेना. यानी माझा बकरा केला असावा! पण कसा? सॅलीनं माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून मला काहीही न विचारायचं ठरवलेलं. तिनं ब्रेकफास्टची प्लेट ठेऊन फोन सुरू झालेले. तिचा डार्लिंग यायचा होता. ती कशाला माझ्या फोनचं सुतक करत बसेल? मदत केली मात्र तिनं, कशाला नाही म्हणू? गोड दिसत होती कारमधे फोन शोधायला आलेली तेव्हा. नाईट ड्रेसमधे कदाचीत सगळ्याच मुली सुंदर दिसत असाव्यात. कदाचीत तेव्हा अजिबात मेकअप नसतो म्हणुन असेल. पण असो. पोरीनं गिवअप तरी कधीच मारला नव्हता माझ्यावर. सगळीकडे मदत करत होती. माझं पुढं चक्र सुरू झालं. फोन नविनकडं कसा? याचं कुतुहल असलं तरी जरा हायसं पण वाटलं. त्याच विचारात मी सॅलीकडं गेलो. ती पाठमोरी होती बाल्कनीमधे. फोनवर बोलून झालेलं तिचं नुकतच. तिला कळलं मी मागे ऊभा आहे. चपापून वळली मागं. माझ्या चेहऱ्यावरचे लॉस्ट लूक अजुन गेलेले दिसत नव्हते. मी तर भेळसटलेलो होतोच तसाही. "What? What happened?" असं ती म्हणेपर्यंत मी तिचा हात पकडला. आता क्षणभर तिच्या चेहऱ्यावरही लॉस्ट लूक आले. आत्तापर्यंत गोड वगैरे दिसणारा चेहरा जरा वेगळाच दिसला. पण मला लगेचच कळलं की मी न काही बोलताच तिच्या हातातला फोन घ्यायचा प्रयत्न करत होतो. आता तिला थोडीच कळणार की मी कोणते ईमेल बघीतले? आणि काय विचार आहेत माझ्या मनात सुरू ते. हॅंग झाली बिचारी जरा वेळ. आपले विचार कृतीपेक्षा वेगात पळतात यावर कित्येक शिक्षकानी कॉलेजमधे टाहो फोडलेच होते. आज थोबाड वगैरे फुटलं असतं. किंवा नाहीही. गोड आहे पोरगी असलं काही नसतं केलं. मी फोन प्रकरणामधे ईतका गुंगलेलो की काय घडतय बाजूला याचं ध्यान तसं कमीच झालेलं. सॅलीचा फोन घ्यायचा माझा प्रयत्न अजुन सुरू होता आणि तिला कळत नव्हतं मी काय करतोय ते!

"Dude! What are you doing?"
"अरे... I found the phone ... let me make a call ना! Please" हे असं ईंग्लीशमधे बोलताना मधे "अरे" आणि "ना" करणं मला अजिबात आवडत नाही तरीही अशा मोक्याच्या क्षणी मी असलं काही हमखास करतो.


तिनं सोडला फोन. हसली गोड परत आणि येडा मुलगा आहे असा लुक देऊन गेली आतमधे! अशक्य मुली असतात राव! या असल्या प्रसंगी कशाला तिनं असं गोड दिसावं? असो. मी नविनला कॉल लावला. म्हणाला की तो मुवी थेटर मधे आहे? मी मनात विचार केला, दुपारी बाराला कोण जाईल मुवीला? पण ते सोड, याला माझा फोन तिथं कुठं मिळाला? नविनच परत म्हणाला २ ला परत येईल तेव्हा देईल फोन. मी यशला फोन केला.
"बाबा! काय भानगड? तुला काय माहित नविनकडं फोन?"
"त्यानं कॉल केलेला मला. त्याला वाटलं तू गेलास शिकागोला"
"पण त्याला मिळाला कसा फोन?"
"मी सांगीतलं त्याला घ्यायला."
"???? तुला काय माहित फोन कुठं होता?"
"तुला जेवायला बोलवायचं होतं ना बाबा. सकाळपासनं कॉल करतोय. शेवटी फोन कोणीतरी ऊचलल्यावर ओरडलो मी, क्या भाई कितनी बार बुलाया तुझे?"
"मग?"
"तिकडून जरा दबकून आवाज आला, मै भाई नाही हू!"

आता मात्र सगळ्या मगासच्या टेन्शनचं रुपांतर पोट धरून हसण्यात झालं. या त्रयस्थानं यशला सांगीतलं की त्याला रस्त्यात आयफोन दिसला. पांढरा म्हणून दिसला, काळा असला तर मिस झाला असता. मधेच आपण पांढरा फोन निवडला याचं कौतुकही वाटलं. यशला सॅली प्रकरण माहित नाही म्हणून त्यानं जवळचा म्हणून नविनचा नंबर दिला. नविननं फोन घेतला खरा, पण मी शिकागोला असेन म्हणून तसाच मुवीला गेला आणि यशनं मेल कलं, चेक करायला की मी शिकागोला गेलो की आहे अजुन.

सुन्न!


अगदी अशिच अवस्था झालेली माझी! अशक्य नशिब होतं ते!

२ ला नविनकडून फोन घेतला. फोनवर अजुनही स्क्रॅच नव्हते पडलेले!