Sunday, June 21, 2015

एखाद्या दिवशी असं व्हावं की

एखाद्या दिवशी असं व्हावं की सकाळी साडे पाचला जाग यावी आणि चक्क "परत झोपावं" असं वाटूच नये. आता उठलोच आहोत तर सरळ तय्यार होऊन सहा पर्यंत तडक घराबाहेरच पडावं. बघता बघता आपण ५-६ किलोमीटर पळत जावं. रस्त्यावर नेहमी बसमधून बघतो त्या मोठ्ठ्या गार्डन मध्ये त्या दिवशी चक्क पायी जावं. पायातले शूज काढून, तिथल्या हिरवळीवर चालावं. मधोमध आल्यावर उगाच विचार यावा की हे असं इथे आपण सूर्यनमस्कार घालायला सुरु केले तर? आणि दुसऱ्याच क्षणी आपण ते सुरुही करावं! सगळं झालं की "काय सही सुरुये हे सगळं!" असं मनाशीच म्हणत आकाशाकडं बघत तिथंच हिरवळीवर पाठ टेकावी.

त्याचं दिवशी पुढं असं व्हावं की जेवायला म्हणून बाहेर पडावं आणि ६-७ तास भटकतच राहावं. थोडसं नदीवर जावं. थोडं नदीखालून जावं. थोडं नदीच्या बाजूला जाऊन बसावं. तिथल्या बोटी बघत आपल्या देशातल्या गोष्टी अठावाव्यात. पोटभर वारा खाल्ल्यावर सरळ उठावं आणि मग आपल्या मागं चक्क एक फ्ली मार्केटच सापडावं! तिथ खूप सारे कपडे, टोप्या, मफलर, ज्यूलरी, आरसे, चित्रं, फोटो, फ्रेम्स, रंगीबेरंगी कागदाच्या गोष्टी, खाण्याची ठेले, ज्यूस वाले, आपल्या हाताने गोष्टी बानावणारे, हातानी केलेल्या गोष्टी विकणारे, हात बघून भविष्य सांगणारे, हात धरून भविष्य सांगणारे, डोळ्यात बघून भविष्य सांगणारे आणि भविष्य वगैरे विसरून भटकंती करणारे असे खूप सारे लोक असावेत.

छोट्या छोट्या गल्ली बोळामधून फिरताना छोटे छोटे कॅफे सापडावेत. लाल पिवळ्या रंगांच्या भिंती असलेले. खडूने लिहून ठेवलेला मेनूचा फलक दारात लावलेले. तीन किंवा चारच टेबल असलेले. अशाच एका गल्लीतून बाहेर पडता पडता एक वेगळाच कॅफे सापडावा. बिस्कीट अशा विचित्र नावाचा! त्यांच्याकडं खूप साऱ्या रंगांच्या बुधल्या, खूप साऱ्या आकाराचे ब्रश, बरेचसे स्पंज, एचबीच्या लाल पेन्सिली, हे असं सगळं भिंतीलगत लावून ठेवलेलं असावं आणि तुम्हाला कॉफी पीत पीत काही रंगवावं असं वाटलं तर, तिथलं हवं ते हवं तेव्हा उचलायची संधी सुद्धा असावी!

तुम्ही एखादा पांढरा फटक सिरामिकचा मग उचलावा, दोन ब्रश, चार रंग घ्यावे आणि त्यावर मनसोक्त रंगीबेरंगी फर्राटे मारावेत. आजूबाजूची लहान मुलं सुद्धा आपल्यापेक्षा चांगलं बनवतायत याचं तुम्हाला हसूही यावं. मग त्यांच्याकडंच अमुक रंग देतोस का तमुक ब्रश कसा वापरायचा वगैरेचं ज्ञान घ्यावं. कॅफे बंद होईस्तोवर हे सगळं असंच चालू ठेवावं. आणि मग बाहेर पडल्यावर घरी जाताना सोबतीला हलकासा पाऊस यावा. मग पावसात हात हलवत जायला काय मजा म्हणून कोपऱ्यावर एक आईसक्रीमचं दुकानही आपसूक मिळावं.

हा तृप्त आत्मा घरी आल्यावर झोपणार इतक्यात कुंगफू पांडा बघायचा प्लान बनावा. There are no accidents आणि There is no secret ingredients बघत बघत रात्री बारा वाजता दिवस संपवा.

How about that?

I just had such a day yesterday!

Monday, June 08, 2015

तर मग भेटताय कॉफीला?"तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर आम्हाला सांगा, मग आम्ही काहीतरी arrange करू. तुम्हाला एकमेकांना सोयीस्कर वेळ आणि जागा जमली की झालं. मग भेटा. कॉफी प्या. गप्पा मारा. आणि मग आम्हाला सांगा कशी काय झाली भेट. फोटो वगैरे पण द्या."

तसेही पुण्यामध्ये ३ च आठवडे मिळणार होते. त्यामध्ये आधीच बऱ्याच भेटी गाठी ठरलेल्या होत्या. त्यात ही पण एक जमली तर छानच. या अशानं सुरु झालेला हा किस्सा.

मी ऑफिसमधून धावत पळत, ठरलेल्या वेळेच्या १५ मिनिटं उशिरा पोचलो. दलजीतही नुकतीच पोचलेली. येताना तिच्या मैत्रिणीबरोबर आलेली. भेटल्यावर तिनं एक फुलांचा बुके दिला आणि मला ट्यूब पेटली की आपण हात हलवतच आलोय! पण आता इलाज नव्हता. प्रथमच भेटत असल्यामुळे, आमच्यात बोलण्यासारखे असे बरेच कुतुहलाचे विषय होते. ते सगळे घेऊन आम्ही कॅफे मध्ये घुसलो. आणि गप्पांना सुरुवात झाली.

अपेक्षेप्रमाणे खूप वेगवेगळ्या विषयावर बोललो आम्ही. आणि आत्ता लिहिताना हे आठवतंय की बरेचसे विषय राहूनही गेले!
...
...
...
पहिलीच भेट असल्यामुळं असेल किंवा कदाचित नेहमीची सवय असेल म्हणून असेल, सुरुवातीला खूपच आदरानं एकमेकाचं नाव घेणं सुरु होतं. "रोहितजी" वगैरे ऐकायला मलाही जडच होतं. मग "जी" काढायला लावलं. मुळची पंजाबची असली तरी दलजीतला मराठी सुरेख येत होतं हे लगेचच कळलं. जन्म महाराष्ट्रातलाच आणि म्हणून ही अशी मराठी हे तिचं स्पष्टीकरण.
...
...
...
"मी माझ्या family बरोबर नाही राहत. त्यांचं माझं पटत नाही. माझ्या बरोबरच्या बऱ्याच जणींच असंच आहे. मग आम्हीच एकमेकीची काळजी घेतो. तसंही आमच्याकडे पोलिसांकडे कोणी जात नाही. आमचे आमचे पंच असतात. काही भांडण तंटे असतील तर तेच मिटवतात. ते मिटवण्याची पण खास पद्धत. जर कोणाचं भांडण झालं असेल तर ते त्याना समोर बोलावतात आणि मनसोक्त भांडा म्हणतात. पंच त्यातून निर्णय देतात की कोणाचं बरोबर आणि कोणाच चूक. पण त्या नंतर दंड मात्र दोघांनाही होतो. थोडा कमी जास्त असेल, ज्याच्या त्याच्या चुकीनुसार, पण दंड दोघांना हे नक्की!"
"असं का?"
"टाळी एका हातानं थोडीच वाजते?"
...
...
...
"आम्ही ना हिंदू, ना मुस्लीम, ना ख्रिश्चन, ना स्त्री, ना पुरुष. काहीच नाही. आम्ही केवळ एक human being! तसच जगू. आणि तसच मरू."
आता हे स्वेच्छेनं की परीस्थितीमुळं हा प्रश्न वेगळा असला तरीही जगभरच्या तमाम जनतेला हेच सगळं जीवाच्या आकांतानं ओरडून सांगितलं तरी झेपत नाहीये हेही तितकच खरं! मी आपलं फक्त "छान" एवढच म्हणालो. खर तर कुठल्याही धर्मानं आम्हाला स्वीकारलंच नाही यामध्ये मला 'सुंठेवाचून खोकला गेला' असं वालं खट्याळ फिलिंग चाटून येऊन गेलं.
...
...
...
मी. "तुम्ही हे जे काही सांगितलं त्यातलं थोडं सायन्स गंडलं असलं तरी तुमचा मुद्दा कळलाय मला. तुमच्या एवढं सविस्तर आणि असं 'चला भेटूया गप्पा मारायला' अशा स्टाईलनं कधी कोणी बोललंच नव्हतं."
"मला गप्पा मारायला आवडतात. लोकांना भेटून त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला, माझ्याबद्दल सांगायला मला आवडतं."
...
...
...


बऱ्याच नेहमीच्या आणि बऱ्याच वेगळ्या अशा सर्व प्रकारच्या गप्पा मारून, दलजीत, तिची मैत्रीण आणि मी आपापल्या मार्गी परत निघालो. एखाद्या व्यक्तीच्या चूक किंवा बरोबर, अशा जशा काही भावना किंवा मतं असतील, तशीच मतं दलजीतची होती. "चला, आज पासून आपण फ्रेंड्स म्हणून बोलू" अशा सहज वळणावर येऊन आम्ही थांबलो. तरीही या भेटीमध्ये नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं होतं!

परत येताना असं वाटलं की जगभरात स्त्री मुक्ती आंदोलनं वगैरेना आत्ता कुठे ऊत आलाय! तरीही कमीच अशी स्थिती आहे. मीच श्रेष्ठ आणि तुम्ही कनिष्ठ या सगळ्या गदारोळामध्ये कित्येक पिढ्या गेल्या. आत्ता आपल्याला हळू हळू कळू लागलंय की "भीतोस काय मुलीसारखं" किंवा "बांगड्या भार हातात" या vocabulary मध्ये आपण कुठे माती खाल्लेली! पण याच्याही पलीकडे "एक मच्छर आदमीको हिजडा बना देता है!" यामधली चूक दुरुस्त करायला किती काळ लोटेल याबद्दलच गणित आउट ऑफ सिलॅबस राहू नये म्हणजे मिळवली!

"आम्हाला तृतीयपंथी किंवा transgender किंवा मराठीमध्ये हिजडा म्हणतात." अशी दलजीतनं सहज करून दिलेली तिची आणि तिच्याबरोबर आलेल्या मैत्रिणीची ओळख. अनम प्रेम या संस्थेने घडवून आणलेली आमची ही भेट. मित्र मैत्रिणीना आपण भेटतो, एखाद्या कॉफी साठी, तशीच सहज घडवलेली. Inclusive Society बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नातली एक पायरी.
समानतेच्या चर्चेमध्ये नकळत काही रेषा समांतरच राहू नयेत म्हणून हे थोडसं.

दलजीतशी बोलल्यावर दोन गोष्टींची जाणीव झाली. एक म्हणजे तृतीयपंथी लोकांच्याबद्दल आपल्याला कमी असलेली समज. त्यांना आहे तसं accept करण्याची गरज. वयात येऊ लागल्यावर ज्यांना स्वतःचं काही झेपत नसतं तेव्हा त्यांना झिडकारण्यातला फोलपणा. आणि दुसरं म्हणजे, तृतीयपंथी लोकांच्यासमोर नसलेली, आपण पुढे काय करायचं याची कमी असलेली उदाहरणं. (नुकत्याच एका तृतीयपंथी महिलेला प्रिन्सिपल बनवल्याच्या बातमी बद्दल पण आम्ही बोललो).

आज आहोत तिथपासून, ते शिक्षण, नोकरी, उद्योगधंदा करत मोठं होण्यासाठी कशाची मदत लागेल? यावर दलजीत कडं पूर्ण उत्तर नव्हतं. "शाळेमध्ये आम्हाला घेत नाहीत. दवाखान्यात आम्हाला कुठल्या वार्डात ठेवायचं यावरून अडतं. नोकरीपर्यंत खूप कमीच लोक पोचलेत." यातलं कुठपासून सुरु करायचं हे तिला माहिती नव्हतं. मलाही नव्हतं.

पण हा असा संवाद वारंवार, शहरामध्ये, गावामध्ये अशा विविध ठिकाणी, वेगवेगळ्या स्तरावर घडला, तर मात्र यातून काहीतरी सकारात्मक घडू शकेल याबद्दल मी आशावादी आहे.

दलजीतबरोबरच्या भेटीची ही आठवण.अशी भेट तुम्हालाही हवी असेल तर ... हे इथं बघा
https://www.facebook.com/SatyamevJayate/posts/667812799984849
तुमच्या छान गप्पा होतील याची नक्कीच खात्री.